रविवार, २८ जून, २०२०

पोशिंद्याचा धनी...


घरोघरच्या अंगणातली सकाळची कळा अजून पुरती सरली नव्हती तोवरच गुबुगुबूचा आवाज करत नंदीबैलवाला दाखल झाला. भाऊसाहेब गोंडे त्याचं नाव. गल्लीच्या तोंडावरच असणाऱ्या रुख्माआत्याच्या दारापुढं येताच थरथरल्या आवाजात बोलला,
"दुसऱ्याचं घर भरवणाऱ्या बाप्पा तुझं घर उसवू नकोआत्महत्या करू नकोस !"
भाऊसाहेब असं का म्हणतोस रे बाबा म्हणून खोदून खोदून विचारल्यावर तो बोलला की, “गावात शिरताच पोलीस पाटलाचं घर गाठलंआमी आल्याची अन शंभूचा खेळ करणार आसल्याची वर्दी त्यास्नी दिली. नावपत्तानिशाणी लिहून झाल्यावं परवांगी गाव्हली. तिथून पारापाशी येण्याधी पैल्या गल्लीला लक्षिमण रावताचं घर लागतं. तिथं ढोलकी घुमवलीशंभूच्या पायातली घुंगरं थिरकली. वाड्याचं दार कराकरा वाजवत उघडलं आणि आतून बोडख्या कपाळाची सारजाकाकू सूप हातात घेऊन आल्या. त्यास्नी तसं बगुन काळीज करपलं. बाई ईधवा झाली म्हंजीच लई वंगाळ झालं असं न्हवं. पर ज्या हातानं सोनं पिकवलंजगाला घास भरवला त्याच हातानं फास लावून घ्यायचा. घरच्या लक्ष्मीला लंकेची पार्बती करायचं म्हंजे वाईच इस्कोट... बंद्या रुपयागत कुक्कु कपाळाला लावणारी घरची लक्षुमी अशी कपाळावर बुक्का लावून बघितली की पोटात कालिवतं. तिच्या कपाळावरलं काळं ठिक्कर पडलेलं गोंदण बगवत न्हाई. तिच्या हातनं पसाभर जुंधळा सुपातून घ्यायचा म्हंजे झोळीदिकून म्होरं करूशी वाटत न्हाई. सारजाकाकूच्या मोत्याच्या दाण्यांना न्हाई म्हणता आलं नाई. तवा जाऊन रुख्माआत्याच्या दाराम्होरं आल्यावर त्यास्नी भायेर यायच्या आदी आमीच बोल लावलं. आमचं चुकलं का बापू तुमीच काय ते सांगा ! आमी पडलो अनपड अडाणी. .. 
भाऊसाहेबाने माझ्या डोळ्यात पाणी आणलेलं. मी कसला बोलणार ! माझ्यापेक्षा अधिक संवेदनशील तर तोच होता.


भाऊसाहेबाचा शंभू एकदम दिमाखदार होता. त्याची सजावट भारी होती. रंगीबेरंगी गोधडयांची झूल त्याच्या पाठीवर होती. उपलन म्हणून परिचित असलेली झुलीवर लहान-लहान भिंगाची गोल चौकोनी तुकडे असलेली लालपिवळ्या मण्यांची माळ टाकली हॊती. डौलदार वशिंडाजवळ तेव्हढ्याच आकाराची स्वतंत्र आकर्षक झूल बांधली होती. याला खानोटी’ म्हणतात. शंभूच्या शिंगांना गुंडाळलेले रेशमी रंगीबेरंगी तावांचे तुकडे धुरकट झाले असले तरी डोळ्यात भरत होते. शिंगांच्या टोकांना पितळेच्या शेमल्या बांधल्या होत्या. शेमल्यांच्या खालल्या अंगाला लोंबते सोडलेले गोंडे लक्षवेधक होते. खास वर्दी किंवा सुपारी घेऊन केलेली बतावणी असली की त्याच्या मस्तकावर बांधलं जाणारं त्रिकोणी बाशिंग मात्र दिसत नव्हतं. पावसापाण्याचे दिवस असल्याने ते बांधलं नसावं. या बाशिंगावर मध्यभागी छोटेसे शिवलिंग आणि शिवलिंगावर फणा काढून बसलेला नाग असतो. शंभूच्या गळ्यातल्या घुंगरमाळा वजनदार होत्यात्याचा आवाज लयबद्ध होता. खेरीज कवड्यांच्या माळादेखील त्याच्या गळ्यात होत्या. त्यांना गॅज’ म्हणतात. शेपटीच्या खाली छोट्या घुंगरांची माळ होती. माळेव्यतिरिक्तही गळ्यात आणखी एक घंटा होती. पोळ्याच्या दिवशी वशिंडाजवळ एकमेकांना छेदून बांधले जाणारे मोरपिसांचे कुचे (तुरे) भाऊसाहेबाच्या पिशवीत होते. कुणी फर्माईश केली की ते कुचे तो त्यांच्या हातून बांधून घ्यायचा आणि बदल्यात खुशी मागायचा. सगळा राजीखुशीचा मामला. कुठली जबरदस्ती नव्हती की कुठलं दडपण नव्हतं.

या बैलांना शिकवण्याचीत्याची तालीम करून घेण्याची पद्धत कौशल्यपूर्ण असते. सर्वप्रथम त्याला एका खड्डयात ठेवलं जातं आणि नंदीबैलवाले पांगुळे त्याला वेगवेगळ्या खुबी शिकवून त्या बैलाकडून कसरती करवून घेतात. काही दिवसातच बैल त्याच्या मालकाच्या इशाऱ्याप्रमाणे हालचाल करू लागतो. हातोडी’ म्हणताच नंदी डावा पाय उचलतो. मुंडी’ म्हणताच नंदी पुढचे पाय गुडघ्यातून दुमडून वाकतो. मोटवळे’ म्हणताच गुडघे टेकून झूल हलवत खेळू लागतो. ढोलकी वाजवणाऱ्याला काही सकारात्मक बोलायचे असल्यास पांगुळवाला त्या नंदीला मान हलवायला सांगतो. होकार म्हणताचमालकाच्या आज्ञेप्रमाणे नंदी डोके वर-खाली करू लागतो. तर वळख’ म्हणताचनंदीला नको असे शिकवलेले असल्याने तो नकारार्थी मान हलवतो.

नंदीबैल कोणत्याही वाडीवस्तीवर आला की तिथं सगळे सानथोर गोळा होतात हा आजवरचा अनुभव आहे. मग शक्यतो जवळपासचे एखादे मोठे अंगण असलेले घर निवडून तेथे बैलाबरोबरचा खेळ रंगत जातो. नंदीबैलाला अंगावर खेळवलं जातं. खंडीभर बघे भवताली असल्याने पांगुळवाल्याला चेव येतो. खेळ दाखवत बतावणी सुरू असताना घरोघरच्या सुवासिनी पूजेचं ताट आणि सूपात धान्य घेऊन बाहेर येऊन नंदीची पूजा करतात. नंदीच्या पायांवर पाणी ओतून ते धुतले जातात. मस्तकावरच्या शिवलिंगाला कुंकू लावून फुलेतांदूळ वाहिले जातात. त्या वेळी मातीलाही नमस्कार केला जातो. घरातून कुणी काही सवाल केला वा काही विचारणा केली तर नंदीला सवाल केला जातो. बतावणी उरकल्यावर झोळी फिरवली जाते. मिळालेला शिधादक्षिणा घेऊन पुढील घराकडे रवाना होतो.

शहरी भागात मंगेश पाडगावकर यांची सांग सांगभोलानाथ’ ही कविता ऐकत मोठी झालेली एक पिढी आता प्रौढत्वाकडे झुकली आहे. त्या पिढीपासून आताच्या डिजिटल युगात वाढणाऱ्या पिढीला गावकुस आजही खुणावतेगावजीवनाचा एकसंध घटक असणारा बैल मोठा कष्टकरी आणि कणव येईल असा जीव आहे. त्याचं हे साजिरं रूप कुणालाही भुरळ पाडणारं असंच आहे. यातला गोडवा कुणालाही आवडून जातो. आषाढ सरत येऊन पावसाचा जोर वाढू लागला की हे लोक दोन महिने गावाकडे आपआपल्या खोपटात थांबतात. बाकीचे अर्धे साल चालू लाग बाबा’ म्हणत नंदीच्या सॊबतीनं ते गावोगाव हिंडत राहतात. रात्री गावात वस्तीजवळच्या मोकळ्या जागेत थांबतात.लोकांनी दिलेल्या भाकरी भाजीवर दिवस काढलेला असतो. रात्री तीन दगडांची चूल मांडून भाजीआमटी करून त्याचे चार घास खातात. सकाळी उन्हे वाढायच्या आत नव्याने नंदीबैलाचे खेळ मांडत फिरतात. सतत फिरतं राहणार्‍या या भटक्या जीवांची उन्नती कधी होणार हा प्रश्न कासावीस करून जातो. मात्र हाताची बोटे सारखी नसतात काही उंच असतात तर काही लहान असतातहे नंदीबैलवाल्यांनाही लागू पडतेय.

नगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती या गावात नंदीबैलवाल्यांची वस्ती आहे. तब्बल तीन हजार नंदीबैलवाले तिथे राहतात. साहेबराव नरसाळे यांनी लोकमतसाठी लिहिताना या गावास भेट दिली तेंव्हा तात्या फुलमाळी या वृद्ध नंदीबैलवाल्याने त्यांना केलेला प्रश्न इथे आवर्जून द्यावासा वाटतो. तात्या म्हणतात, “भिक्षेकऱ्याची झूल आम्ही कधीच उतरवली़य. आता आम्ही कष्ट करून स्वाभिमानाने जगतो़. आमच्यात हिंमत आहे़. अनेकदा उपाशीपोटी झोपण्याची वेळ आलीपण हिंमत हारलो नाही़. अमुक शेतकऱ्याने आत्महत्त्या केल्याचं ऐकताना अनंत वेदना होतात़ आमचा पोशिंदाज्याला आम्ही आदरानं पाटील म्हणतोमाय-बाप म्हणतोतो शेतकरी इतका कमजोर कसा असू शकतोज्यांच्या पसाभर धान्याने आमच्या घरात बरकत आली त्या धन्याला जीवन कळलेच नाहीबाप्पा ! आम्ही पूर्वी घरोघर भिक्षा मागायचो़ आत्ताही आमच्यातील काहीजण महाराष्ट्रभर फिरतात़ शंभूदेवाच्या नंदीचे पाय पाटलाच्या वाड्याला लागलेआता पाऊस पडंलबरकत व्हईलधानधान्य पिकल अशी स्वप्ने शेतकऱ्याच्या डोळ्यात पेरून त्याची उमेद वाढवायची़. ज्या गावात जायचेत्या गावातील पोलीसपाटलाला भेटून आमची सर्व माहिती सांगायचीपोलीस ठाण्यात आमची सर्वांची नावे लिहून द्यायचीमगच गावात भिक्षा मागायची हा आमचा नित्यनेम़. पण तरीही आम्हाला चोर ठरवलंजेलमध्ये बसवलं. पाल हेच घर असलेल्या आमच्यावर पोलिसांनी चोराची झूल चढविली़ आम्हाला जामीनही मिळत नव्हता़. घरातील कर्ता जेरबंद झाला की मायबायपोरं उपाशी राहायची़ पण कोणी आत्महत्त्या केल्याचं ऐकलं नाही़. सावकाराच्या घरी सालं धरलीपण कोणी मायबाय अन् पोरांना पोरकं नाही केलं. येईल त्या संकटांचा सामना करीत आम्ही जगण्याची जिद्द बांधायला शिकलोतेही बळीराजाकडूनच ! पण आता वाढत्या आत्महत्त्या ऐकून आमचा जीव तीळतीळ तुटतो़. आम्ही हिमतीने उभे राहिलो़ भिक्षा मागून जगण्याचीदारूच्या नशेत बुडण्याची झूल आम्ही कधीच फेकून दिली़ हवं तर कात टाकली म्हण ना… “

भाऊसाहेबाला जेंव्हा तात्या फुलमाळीचे विचार ऐकवले तेंव्हा तो नुसताच गालात हसला आणि उदास चेहर्‍याने उत्तरला, “सगळ्यांचं नशीब कुठं सारखं असतं का बापू ?”
शेतकरी पोशिंदा आहेबैल त्याचा भक्कम आधार आहे आणि त्या आधाराचा पूजक हे नंदीबैलवाले होत. ज्यांच्या दुर्दैवाचे दशावतार आजही कुठे न कुठे जारी आहेत.     
सूर्य माथ्यावर यायच्या आधी भाऊसाहेब वेस ओलांडून पुढच्या गावाकडं रवाना झालातेंव्हा त्याला बरकत यावी आणि त्याची भटकंती संपून त्याचं जीवनही सुरळीत होऊन बरकत यावी म्हणून विश्वनिहंत्याला हात जोडले. खोलवर असलेला भावनांचा कढ दाटून कंठाशी आला. सकाळपासून साचून असलेलं मळभ दूर झालं होतं... 

समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा