तो एक प्रतिभाशाली कर्तृत्ववान विवाहित पुरुष, एका बेसावध क्षणी एका कमालीच्या देखण्या अप्सरेचं त्याच्यावर मन जडतं. तो तिला टाळू पाहतो पण तिच्यापासून दूर जाऊ शकत नाही आणि तिला जवळही करू शकत नाही. त्याचा संसार उध्वस्त व्हायची वेळ येते. त्याची पत्नी उन्मळून जाते, त्यांचं आयुष्य विस्कटतं. पण तो पत्नीशी सर्व गोष्टी शेअर करतो. ती ही त्याच्यावर विश्वास ठेवते. तुझे मन माझेच असेल, देह कोणाचाही असू शकतो असं त्याला सांगते. मात्र तरीही त्यांच्यात गैरसमज होत जातात. अखेर त्यांचा घटस्फोट होतो. तोवर बराच उशीर झालेला असतो. ती शापित अप्सरा तोवर खचून गेलेली असते. ती अंधाऱ्या विजनवासाच्या एकांती गुहेत जाते. इकडे तो दुसरे लग्न करतो तेही एका मनस्वी समजूतदार स्त्रीशी !
काही वर्षांनी एका उदास दिवशी अत्यंत भयाण मृत्यू त्या विन्मुखलेल्या अप्सरेला तिच्या दुःखासह बंधमुक्त करून जातो. या घटनेचे त्याला फार वाईट वाटते, त्याच्या दुसऱ्या पत्नीसही दुःख होते. काळ पुढे जात राहतो. पहिल्या पत्नीपासून झालेल्या व वयात आलेल्या आपल्या तरुण मुलीसोबत तो आपला भूतकाळाचा सगळा पट शेअर करतो. त्या अप्सरेच्या आणि स्वतःच्या कथेवर चित्रपट बनवतो. आपल्या मनातलं आभाळ रितं करतो. एकेकाळी आपण जिच्यावर काही घटिकांसाठी का होईना पण प्रेम केले होते त्या रूपवतीला तो आपल्या मुलीत पाहतो !! तिला त्या चित्रपटात त्या अप्सरेच्या भूमिकेत साकारतो. असं करून नकळत स्वतःच्या मुलीला आपल्या भूतकाळात डोकावायची संधी देतो.....
२८ जून १९९३ ला मुंबईतल्या 'मेट्रो'मध्ये या चित्रपटाचा प्रीमिअर शो झाला तेंव्हा सिनेमा सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत साठ मिनिटे तो अखंड सिगारेटी शिलगावीत होता. त्याच्या शेजारी बसलेल्या त्याच्या पत्नीने त्याचा हात घट्ट धरून ठेवला होता !! जणू काही तिने धीराचा वसा घेतला होता ! ३० जूनला हा चित्रपट मोजक्या चित्रपट गृहात रिलीज झाला आणि दणकून आपटला. वास्तविक पाहू जाता ‘त्याने’ लौकिकासाठी वा अर्थप्राप्तीसाठी हा सिनेमा केलेलाच नव्हता त्यामुळे त्याला याचे सोयरसुतक नव्हते. त्याला आपल्या नात्यात व्यक्त व्हायचे होते. ते त्याने केले. मनातली तगमग बाहेर काढण्यासाठी त्याला त्याचंच माध्यम हवं होतं आणि त्यासाठीच तर त्यानं ही चित्रपट निर्मिती केली होती. त्यामुळे तिकीट बारीवर झालेलं नुकसान हा विषय किमान इथे तरी त्याच्यासाठी गैरलागू होता. हा चित्रपट होता 'फिर तेरी कहानी याद आई'. ती अप्सरा म्हणजे अर्थातच परवीन बाबी, तर तो म्हणजे महेश भट्ट, त्याची आधीची पत्नी म्हणजे लोरेन ब्रेट जिचे नाव बदलून त्याने किरण हे नाव ठेवलं होतं. थिएटरमध्ये बसून त्याला धीर देणारी त्याची दुसरी जीवनसंगिनी म्हणजे सोनी राजदान आणि आपल्या वडिलांच्या प्रेयसीची भूमिका साकारणारी मुलगी म्हणजे पूजा भट्ट !
नात्यात पारदर्शकता असली की नाती नक्की टिकतात. महेश भट्टने आधी चूक केली आणि त्याने पत्नी आणि प्रेयसी दोन्हीही गमावले. पण त्याने जेंव्हा सत्याचा स्वीकार केला तेंव्हा त्याची उरलेली नाती शाबूत राहिली. विश्वास टिकवून ठेवण्यासाठी इतकं तरी केलंच पाहिजे कारण सर्वांनाच समान संधी मिळत नसते !! आयुष्यात पाय घसरला नाही अशी माणसं क्वचित असतात पण केलेल्या चूकीचा स्वीकार करून मनावरचे ओझे हलके करणारे आणि नात्यातला ओलावा टिकवून ठेवणारे कमी असतात. असे केले नाही तर बेडरूम मध्ये सुरु असतो तो निव्वळ भंडारभोग असतो ! मनातल्या संवेदनशीलतेला पोखरणारा आणि अखेरीस किमान मरताना तरी खरं बोलावेसे वाटणारा ! काळजातल्या चोरकप्प्यात रहस्य दडवून ठेवणारा पवित्र असूनही अपवित्र वाटणारा हा भंडारभोग उर्वरित आयुष्यालाच एक भोग बनवून जातो. तेंव्हा वेळ निघून गेल्यावर बोलण्याचे बळ येते. पण ऐकून घ्यायला जवळ कुणीच नसते. यातून कधी खेळ मोडू शकतो पण मनातलं गढूळपण निघून जातं जे कृत्रिम संसारसौख्यापेक्षा अधिक सुखावह असतं. काहींना हे पटणार नाही पण हा मार्ग निश्चितच अंतिम सुखाचा आहे हे नक्की.
‘फिर तेरी कहानी याद आई’चे आणखी एक वैशिष्टय म्हणजे झी टिव्हीचं लॉन्चिंग ! एक काळ होता तेंव्हा देशभरात दूरदर्शनची राष्ट्रीय वाहिनी आणि तिच्या जोडीला हरेक राज्यात एक प्रादेशिक वाहिनी होती. महाराष्ट्रात ही वाटणी सह्याद्री वाहिनीकडे होती. राष्ट्रीय वाहिनीचे प्रक्षेपण काही वेळासाठी खंडित करून सह्याद्री वाहिनीचे प्रक्षेपण जारी राही. त्यामुळे सरकारी साचेबंद कार्यक्रमांची ठाशीव चौकट अनुभवास येई. दुसरी कुठली चीवीस तास मनोरंजनपर वाहिनी हे केवळ स्वप्न वाटे. दूरदर्शननंतर देशात प्रक्षेपित झालेली पहिली खाजगी वाहिनी म्हणजे झी होय. तर या झी वाहिनीचे प्रायोगिक प्रक्षेपण जेंव्हा सुरु झाले होते तेंव्हा किमान सहाएक महिने तरी झी टीव्हीचा लोगो असणारी रंगीत फ्रेम स्क्रीनवर दिसे आणि बॅंकग्राउंडला गाणी लागलेली असत. विशेष म्हणजे दिवसातील निम्याहून अधिक काळ 'फिर तेरी कहानी'ची गाणी लागलेली असत. त्यामुळे ही गाणी चांगलीच परिचयाची झाली. यांच्याशी जवळीकीचे नाते तयार झाले.
राहुल रॉयचा अवतार सोलापूरी प्रेक्षकांना पसंत पडला नाही. पूजा भट्टचा अभिनय यथा तथाच होता, किंबहुना चित्रपटभर ती भांबावल्यासारखी वाटली कदाचित कथेतील वास्तवाचे तिला ओझे झाले असावे. बादशाही चित्रपटगृह अशी ख्याती असलेल्या उमा मंदिरमध्ये 'फिर तेरी' रिलीज झाला होता, आठवड्यात त्याने पाणी देखील मागितले नाही. पाच दिवसात पोस्टर्स खाली उतरली. थियेटरमधलं पब्लिक मध्यंतरानंतर आत आलंच नाही. सोलापूरी माणूस या बाबतीत खूप निर्दयी असल्याचं दुसऱ्यांदा जाणवलं. याबाबतीत तो बिलकुल आस्था दाखवत नाही. आपलं परकं असा दुजाभाव देखील करत नाही. १९८५ साली प्रदर्शित झालेल्या 'महानंदा' या चित्रपटास याच भागवत थियेटरमधील कलामंदिरमधून तीन दिवसात गाशा गुंडाळावा लागला होता. त्यात जयवंत दळवींची कथा होती, शांता शेळकेंच्या गीतांना हृदयनाथ मंगेशकरांनी सुरेल संगीत दिले होते. विक्रम गोखले नायक होते, मूळच्या सोलापूरच्या अशी ख्याती असणाऱ्या शशिकला आणि फैयाज या दोन मुख्य अभिनेत्री लीड रोलमध्ये होत्या तरीही मायबाप सोलापूरकर प्रेक्षकांनी दयामाया दाखवली नाही. चित्रपट पसंत पडला तर डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या आणि भट्टी बिघडली तर पार विल्हेवाट लावणाऱ्या सोलापूरी माणसाचा फिल्मी आवडीनिवडीचा कार्यक्रम अगदी पिटातल्या प्रेक्षकासारखा टिपिकल चौकटबंद नसला तरी त्याला एक निश्चित स्वाद आहे ज्याची चव अनेक सिनेमांनी सिल्व्हर गोल्डन प्लॅटीनम ज्युबिलीमधून चाखली आहे. ‘फिर तेरी कहानी’मध्ये सामान्य लोकांना अपील होण्यासारखं काहीच नव्हतं ते एक वैयक्तिक स्मरणरंजन होते सबब लोकांचा दृष्टीकोनही निव्वळ तटस्थतेचा जाणवला तर त्यात नवल काहीच नव्हते...
- समीर गायकवाड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा