रविवार, ५ जुलै, २०२०

करोनाबाधेतील एक दुजे के लिये...

curtis and betty tarpley
कर्टीस आणि बेट्टी टारप्ले  

अमेरिकेत कोरोनाने प्रचंड हाहाकार माजवलेला असल्याच्या बातम्या आपण सर्वचजण पाहतो आहोत. संपूर्ण अमेरिका या विषाणूच्या साथीने स्तब्ध झालीय. त्याची एक गहिरी दास्तान या इस्पितळात लिहिली गेलीय. त्याची ही अद्भुत चैतन्यमय हकिकत. १८ जून २०२० ची ही घटना आहे. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतामधील फोर्टवर्थ भागातलं टॆक्सास हेल्थ हॅरिस मेथॉडिस्ट इस्पितळ. पहाटेपासूनच कर्टीस टारप्ले यांचा श्वास मंदावत चालला होता. त्यांची पल्स हरवत होती. डोळे अर्धमिटले झाले होते. गात्रे शिथिल होत होती. ओठ थरथरत होते, त्यांना काही तरी सांगायचं होतं. त्यांच्या सेवेत असलेल्या परिचारिका ब्लेक थ्रोन यांनी ते ओळखलं होतं. कर्टीससोबत त्यांची गाढ दोस्ती जी झाली होती.

वयाच्या ऐंशीव्या वर्षी कर्टीस टारप्ले 
Fort Worth couple married 53 years died from COVID-19 within an hour of each other
करोनाला हरवण्यासाठी तिथं दाखल झाल्या होत्या. 9 जून रोजी त्यांचा मुलगा टीम टारप्ले याने त्यांना दाखल केलेलं तेंव्हा त्यांना थकवा आल्यासारखं वाटत होतं. सर्दी पडसे झालं होतं आणि अंगात तापही होता. खोकल्यामुळे धाप लागत होती. दवाखान्यात येण्याआधी काही दिवसापासूनच त्यांना सर्दीची लक्षणं जाणवत होती. अखेर त्यांची करोना चाचणी करण्यात आली. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कर्टीसना याचा अंदाज असावा. त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी निश्चय केला होता की आपण या आजाराला बळी पडायचं नाही. सुरुवातीचे काही दिवस त्यांनी उपचाराला चांगला प्रतिसाद दिला. मात्र अखेरच्या क्षणी त्यांची प्राणज्योत फडफड करू लागली तेंव्हा त्यांना राहवलं नाही. त्यांची वाणी कमजोर झाली असली तरी वीसेक दिवसाच्या सहवासाने परिचारिका ब्लेक यांनी त्यांचं अखेरचं म्हणणं ताडलं आणि त्यासाठीची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी इस्पितळाच्या प्रशासनासोबत चर्चा केली. त्यांचं मत ऐकून घेतलं गेलं. त्यांना हिरवा कंदील दाखवला गेला. प्रशासनाकडून अनुमती मिळाल्याने ब्लेकना हायसं वाटलं. त्यांनी ती वार्ता कर्टीसच्या कानी घातली. कर्टीसच्या म्लान चेहऱ्यावर जराशी लकाकी आली. डोळ्यात थोडंसं तेज आलं. हातांची बोटं काहीशी फुरफुरली. कर्टीसने दिलेला प्रतिसाद पाहून ब्लेक भारावून गेल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ती गोष्ट होतीच तशी !

९ जून रोजी जेंव्हा कर्टीसना तिथं आणण्यात आलं त्याच्यानंतर दोनच दिवसांनी त्यांचे यजमान बेट्टी
टारप्ले यांना देखील त्याच इस्पितळात त्याच आजारासाठी दाखल करण्यात आलं होतं. कर्टीस ह्या आपल्या पतीपेक्षा एक वर्षाने मोठ्या होत्या. ते दोघे शाळकरी मित्र होते तेंव्हापासून एकमेकाला ओळखत होते. इलिनॉईसमधील एका शाळेत त्यांची गट्टी जमलेली. त्याच अजाण वयात त्यांना एकमेकाची ओढ लागलेली. त्यांचं प्रेम तिथंच फुललं. १९६७ मध्ये त्यांनी लग्नाची औपचारिकता पूर्ण केली. त्यांची मित्रमंडळी आणि सगळे आप्तेष्ट यावेळी उपस्थित होते. त्यांच्या संसारवेलीवर दोन गोंडस फुले उमलली. या दोन्ही अपत्यांना त्यांनी चांगले संस्कार दिले. त्यांना अत्यंत प्रेमाने वाढवलं. कर्टीस आणि बेट्टीच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव धडाक्यात साजरा झाला होता. त्यांची मुले त्यांना जीव लावत होती आणि सर्वतोपरी काळजी घेत होती. सारं काही आलबेल होतं. मात्र करोनाने त्यांच्या सुखाला ग्रासलं. पंचावन्न वर्षातला एकही दिवस असा गेला नव्हता की त्या दोहोंनी आपल्या भावना एकमेकांशी शेअर केल्या नव्हत्या. त्यांचं प्रेम विषयसुखाच्या पलीकडचं होतं. खऱ्या अर्थाने ते दोघे एकजीव झाले होते.

अमेरिकेत कोरोनाची साथ वाढल्यावर त्यांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो हे लक्षात आल्यामुळे टेक्सासमधील नियमानुसार त्यांना केअरहोम्समध्ये ठेवण्यात आलं. 
टारप्ले कुटुंब  
दर आठवड्याला त्यांच्या मुलांना त्यांना भेटण्याची अनुमती होती, मुले न चुकता त्यांना भेटून जायची. यामुळे त्यांचं प्रेम अधिकच वाढीस लागलं होतं. कर्टीसना इस्पितळात भरती केल्यानंतर बेट्टी स्वतःला असुरक्षित समजू लागले. त्यांचं मन सैरभैर झालं. अखेर त्यांचीही ईच्छा पुरी झाली. त्यांनाही करोनाबाधा झाली. मग ते देखील त्याच इस्पितळात दाखल झाले. मात्र दोघांचे आयसीयू वॉर्डस वेगवेगळे होते. त्यामुळे दोघांची भेटगाठ नव्हती. एकाच इमारतीत असूनही ताटातूट झाली होती. खऱ्या अर्थाने त्यांचे विलगीकरण झाले होते. ७९ वर्षांचे बेट्टी कणखर होते, करोनावर मात करून त्यांना कर्टीसला भेटायचं होतं. ऍनिव्हर्सरीचा आगामी इव्हेन्ट दणक्यात करायचा होता. त्यांना खात्री होती की उभयता या संकटातून सहीसलामत बाहेर पडतील. मात्र नियतीला हे मान्य नव्हतं. कर्टीसची फुफ्फुसे कमजोर होत गेली. शेवटच्या दिवसात टीम आणि त्याची पत्नी भेटायला आले तेंव्हा त्यांना वाटलं की आपली आई यातून नक्कीच बरी होणार. त्यामुळे त्यांनी आपल्या पित्याला याची सगळी कल्पना दिली. आता मात्र बेट्टी मनात घाबरले, त्यांना ते जाणवलं असावं जे कर्टीसलाही जाणवलं होतं.

दोनच दिवसात कर्टीसची प्रकृती वेगाने ढासळत गेली. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा कृत्रिम प्राणवायू पुरवठा
खंडीत
 केला गेला आणि त्यांना हवा असलेला त्यांचा जिवंत प्राणवायू तिथं आणण्यासाठी इस्पितळाने कंबर कसली. बेट्टीदेखील आता खचले होते. स्टाफने त्यांना सगळी पूर्वकल्पना दिली. कर्टीसनी आता निघण्याचा निर्धार केला होता, त्यांच्यापाशी खूप कमी वेळ उरला होता. घाई करायला हवी होती. बेट्टींना कर्टीसच्या आयसीयूत आणलं गेलं. त्यांच्या शेजारच्या बिछान्यावर निजवलं गेलं. बेट्टींनी कर्टीसला डोळे भरून पाहिलं आणि आपली जगण्याची इच्छा त्यागली. जणू त्यांच्यात निर्वाणाचीही शर्यत लागली होती. इथला प्रवास संपवून स्वर्गात आधी पोहोचून फुलांचा गुलदस्ता हाती घेऊन आपल्या जोडीदाराचं स्वागत कोण करणार यावरून ती शर्यत लागली असणार ! बेट्टींनी काया शिथिल झालेला आपला थरथरता हात कर्टीसच्या म्लान हातावर ठेवला. त्या क्षणी कर्टीसच्या हातातून सौदामिनी दौडत गेली ती थेट काळजात शिरली. ते दोघेही निपचित पडून होते. स्पर्शाची त्यांची भाषा अलवार होती, आयुष्यभराची उजळणी काही मिनिटात त्यांनी केली. या हृदयीचे त्या हृदयी होणे म्हणजे काय याचा शब्दशः अर्थ त्या दिवशी इस्पितळातील स्टाफने अनुभवला. हे अनोखे मिलन घडवून आणल्यानंतर वीस मिनिटातच बेट्टींचे प्राणोत्क्रमण झाले तर त्यांच्यानंतर काही वेळातच कर्टीसचे प्राणपाखरू उडून गेले. त्यांचे अचेतन देह तिथे पडून होते मात्र एकमेकाच्या हातात गुंफलेले त्यांचे हात तसेच होते. करोनाबाधेतदेखील त्यांचं जगणंमरणं एक दुजे के लिये असंच राहिलं. 

काही दशकापूर्वी दिग्दर्शक के. भालचंद्र यांच्या 'एक
दुजे  के लिये' चित्रपटामधील नायक नायिका (वासू, सपना) आपला जीव देऊन आपलं प्रेम सिद्ध करतात असं दाखवण्यात आलं होतं. इथे जीव देण्याऐवजी आत्मिक समाधानाने प्राण त्यागले गेले. खऱ्या प्रेमाचा गंध कुठल्याही कुपीत कितीही काळासाठी बंद केला तरी तो कधी न कधी दरवळतोच, त्याचं आकर्षण सर्वकालीन असणं हे मानवतेवरील विश्वास घट्ट करणारं आहे..

- समीर गायकवाड


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा