सोमवार, ६ जुलै, २०२०

लॉकडाऊन स्टोरीज - रामपुकार पंडीतची अनसुनी पुकार


हा फोटो एका अत्यंत असहाय हतबल बापाचा आहे...
'शोले'मध्ये एक सीन आहे ज्यात कोवळ्या अहमदला (सचिन) गब्बरने हालहाल करून ठार मारून त्याचं प्रेत घोडयावर लादून रामगढला पाठवून दिलेलं असतं. अहमदचं कलेवर पाहून गाव थिजून जातं. संतापाची लाट येते आणि सर्वांचा राग जय वीरूवर उफाळून येतो. ठाकूर बलदेवसिंग मध्ये पडतो तरी गावकरी ऐकत नाहीत. ते म्हणतात की आम्ही इतकं दुःख सहन करू शकत नाही, या दुःखाचं कारण असणाऱ्या जय वीरूला गब्बरच्या हवाली केलंच पाहिजे. इतका वेळ आपल्या मुलाच्या मृतदेहावरून हात फिरवणारा म्हातारा रहीमचाचा कळवळून उठतो आणि दुःखाचा आवेग आवरत म्हणतो, "जानते हो दुनिया का सबसे बडा दुख क्या होता है ?"

सगळे स्तब्ध होऊन त्या वृद्धाकडे पाहत असतात. एक उसासा घेत रहीमचाचा पुढे म्हणतो, "बाप के कंधे पर बेटे का जनाजा ! यह बोझ सबसे बडा होता है, ये सबसे बडा दुख होता है... " दूरच्या टेकडीवरून अजानची ध्वनी कानी येते. रहीमचाचाला गहिवरून येतं. तो त्या परवरदिगारची प्रार्थना करतो, आपल्या मुलासाठी शांती मागतो. अहमदच्या चेहऱ्यावरून हात फिरवताना रहीमचाचाच्या डोळ्याच्या कडा ओलवतात. बसंती रहीमचाचाला घेऊन मस्जिदच्या दिशेने जड पावलाने चालू लागते....

हे सर्व इथं का लिहिलंय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. सॊबतच्या फोटोत दिसणारा रामपुकार पंडीत हा त्या रहीमचाचापेक्षाही दुर्भागी म्हणायला हवा. याचं नवा रामपुकार आहे मात्र याची पुकार ना कुठल्या देवाच्या कानी गेली ना कुठल्या माणसाच्या कानी पडली. व्यवस्थेच्या कानी कुणाचा आवाज पडण्याचा प्रश्नच नाही कारण आपल्याकडे व्यवस्था कागदोपत्री असते हे आपणही एकांतात कबूल करतो.

मुळच्या बिहारमधील बेगुसरायमध्ये रामपुकारचं गाव आहे. तो दिहाडी मजदूर (रोजंदारी कामगार) आहे. तो दिल्लीत काम करतो. दक्षिण दिल्लीतील झोपडपट्टीत त्याचं वास्तव्य आहे. लॉकडाऊनच्या लाटेत त्याचं सर्वस्व होत्याचं नव्हतं झालं. नोकरी गेली. गावी परतण्याची साधने असण्याचा प्रश्नच नव्हता. तो पायी निघाला. गाझीपूरपाशी युपीगेटजवळ त्याला अडवलं गेलं.

तिथे असतानाच त्याच्या पत्नीचा त्याला फोन आला आणि त्याच्या अंगावर जणू वीजच कोसळली. त्याचा एक वर्षाचा कोवळा मुलगा तापाने मृत्युमुखी पडला होता. आपल्या मुलाच्या निधनाची बातमी ऐकताच रामपुकारच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्याला भडभडून आलं. खरं तर त्याला आपल्या लाडक्या लेकाचं डोळे भरून अखेरचं दर्शन घ्यायचं होतं. इथून त्याच्या जीवाची जी घालमेल सुरु झाली ती लिहिण्यासाठी शब्द खुजे पडावेत.

आपल्या मुलाच्या मृत्यूने व्याकुळ झालेला रामपुकार पंडीत सलग तीन दिवस गाजीपूरच्या फ्लायओव्हरखाली रडत होता. त्याचा आक्रोश कुणाच्या कानी पडला नाही. तिकडे त्याच्या मुलाचा दहनविधी पार पडला आणि इकडे राम पुकार उन्मळून पडला. या दरम्यान तिथून येणाऱ्या जाणाऱ्या युपी पोलिसांच्या प्रत्येक अधिकाऱ्यास कर्मचाऱ्यास त्यानं आपली कैफियत ऐकवली पण कुणाच्या काळजाला पाझर फुटले नाहीत.

त्याला बिहारला जाण्याची परवानगी हवी होती. अखेर काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि स्वयंसेवी संस्थेच्या लोकांनी त्याला अन्न पुरवलं. त्याला धीराचे शब्द दिले. मात्र त्याचं सांत्वन करेल असं तिथं कुणी नव्हतं. कारण त्याचं दुःखच तितकं मोठं होतं.

त्याचं रडणं काही केल्या थांबत नव्हतं. अखेर तिथल्या सोशल मीडियावर त्याची दास्तान झळकली. मग यंत्रणा हलली. त्याला दिल्लीच्या रेल्वे स्थानकापर्यंत सोडलं गेलं. दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या विशेष श्रमिक रेल्वेने त्याला बिहारला पाठवलं गेलं. रामपुकार बेगुसरायला पोहोचला खरा पण तोवर त्याची सगळी स्वप्ने उध्वस्त झाली होती. त्याच्या मुलाच्या अस्थीही गंगेत सोडण्यात आल्या होत्या.

आता सध्या तो क्वारंटाईन आहे असं सरकारी भाषेत सांगितलं जातंय. पण मला तर वाटतं आता त्याचं हृदयच आता कायमचं क्वारंटाईन झालं असेल, तिथला बंदिवास कधीच संपणार नाही.

या यंत्रणेला, न्यायव्यवस्थेला, सरकारला रामपुकारने शाप द्यावा, ज्या प्रमाणे राजा दशरथ पुत्रवियोगाने मरण पावला तसे मरण यांना यावे ! पण याने फारतर त्याच्या जीवाला थोडीफार शांती लाभेल पण मूळ प्रश्न जैसे थे राहील. ज्याचे उत्तर कुणालाच द्यायचे नाही. 'जन पळभर म्हणतील हाय हाय..' यापलीकडे काय होईल ?

रामपुकार पंडीत ना ट्विटरवर आहे ना फेसबुकवर ! त्याच्यासाठी कोण विलाप करेल ? त्याचं जगणं हवंय तरी कुणाला ? समाजाच्या उतरंडीत तळाशी असणारा मेला काय नि जगला काय, त्याने फरक काय पडणार आहे !! ज्या राष्ट्राचा आत्मा मरून गेलेला असतो तिथे कलेवरेच जगत असतात....

- समीर गायकवाड

सोबतच्या फोटोत रामपुकार पंडीत.

२ टिप्पण्या: