रविवार, ५ जुलै, २०२०

बेंजामिन मोलॉईस - गीत विद्रोहाचे


मार्टिन ल्युथर किंग यांचं “ए रायट इज ए लँग्वेज ऑफ अनहर्ड !”(ज्यांचं ऐकून घेतलं जात नाही अशांची भाषा म्हणजे दंगे !) हे वक्तव्य प्रसिद्ध आहे. या वक्तव्याच्या संदर्भाशिवाय हा लेख अधुरा राहील. सद्यकाळात अमेरिकेस दंगलींच्या खाईत लोटणाऱ्या घटनेची पार्श्वभूमी आजच्या लेखास समांतर आहे. बनावट चलनाविषयीची एक तक्रार मिनिआपोलिसच्या पोलिसांकडे आली होती. यावर कारवाई करणाऱ्या पोलिसांनी कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड यांची गाडी रोखली. पोलिसांनी त्यांना कारपासून दूर जाण्यास सांगितलं. त्याचा त्यांनी प्रतिकार केल्यानंतर त्यांना हथकड्या ठोकण्यात आल्या. या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक श्वेतवर्णीय पोलीस जमिनीवर पडून असलेल्या फ्लॉईड यांच्या गळ्यावर तब्बल नऊ मिनिटे गुडघा दाबून बसल्याचं दिसतं. "प्लीज, मला श्वास घेता येत नाहीये," "माझा जीव घेऊ नका," अशी विनवणी फ्लॉईड करतात. रस्त्यावरच त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला. जगाला मानवाधिकाराचे डोस पाजणारं अमेरिकेन नेतृत्व स्वतःचे हात किती डागाळलेले आहेत यावर कधी भाष्य करत नाही. वंशवाद आणि वर्णभेद आजही तिथे मोठ्या प्रमाणत आढळतो. कृष्णवर्णीयांनी अमेरिका सोडून जावं असं जाहीररित्या सांगणारे उजव्या विचारांचे ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून तर वर्णभेदास अधिक धार चढली आहे. त्यामुळे साहजिकच श्वेतवर्णीय उन्मत्तांना बळ प्राप्त झालंय. आपल्याला असुरक्षित समाजणाऱ्या कृष्णवर्णियांना अधिकच भीती वाटू लागलीय. काही दशकापूर्वी जगात सर्वाधिक वर्णभेद दक्षिण आफ्रिकेत केला जायचा, विशेष म्हणजे तो तिथे गुन्हा नव्हता. त्याच आफ्रिकेत एका कवीने त्या राजवटीचे बुरूज ढासळवणार्यात कविता रचल्या आणि जगापुढे नवा इतिहास मांडला गेला. त्या कवीचे नाव होते बेंजामिन मोलॉईस.

बेंजामिन मोलॉईस हा एक अश्वेत मिल कामगार होता. 1955 साली दक्षिण आफ्रिकेतील अलेक्झांड्रामध्ये त्याचा जन्म झाला. प्रारंभीपासूनच त्याची वाणी भेदक आणि निर्भीड होती. एखादी चळवळ उभी करावी वा सत्तेला टक्कर द्यावी इतका काही तो मोठा असामी नव्हता. मात्र त्याच्याकडे एक अद्भुत प्रतिभा होती. तो एक असामान्य कवी होता. दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदावर कठोर प्रहार करणाऱ्या कविता त्यानं लिहिल्या. श्रमिकांचा शोषितांचा आवाज त्याने बुलंद केला. कृष्णवर्णीयांचा असीम तिरस्कार करून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करणाऱ्या पी. डब्ल्यू. बोथाची जुलुमी राजवट तेंव्हा तिथे सत्तेत होती. त्याने बेंजामिनविरुद्ध षडयंत्र रचलं. त्याला डिवचण्यासाठी सापळा रचला आणि त्यात तो अलगद अडकला. त्याच्या हातून एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या झाली. 1982 मध्ये ही घटना घडली. बेंजामिन तेंव्हा आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ताही होता. नेल्सन मंडेलांकडे याचं नेतृत्व होतं. ते कट्टर गांधीवादी होते. त्यांनी पोलीस हत्येमध्ये बेंजामिनचा सहभाग असल्याचं मान्य केलं. इतकेच नव्हे तर आफ्रिकन नॅशनल काँग्रेस याची जबाबदारी घेत असल्याचं जाहीर केलं. बेंजामिनला अटक करून त्याच्यावर खटला भरण्यात आला आणि बोथाच्या वर्णद्वेषी राजवटीला साजेशी शिक्षा सुनावण्यात आली. 18 ऑक्टोबर 1985 रोजी प्रिटोरियामधील केंद्रीय कारागृहात बेंजामिन मोलॉईसला फासावर लटकावण्यात आलं. जगभरातून याची कठोर निंदा करण्यात आली. आफ्रिकेतील रस्त्यारस्यावर लोकांनी निषेधाचे जत्थे काढले.

आता आफ्रिकेत बोथांची विखारी राजवट नाही मात्र आजही आफ्रिकन जनता बेंजामिन मोलॉईसला विसरलेली नाही. फासावर जाण्याआधी त्यानं लिहिलेली कविता प्रसिद्ध आहे.त्यातल्या काही पंक्ती -
"I am proud to be what I am…
The storm of oppression will be followed
By the rain of my blood
I am proud to give my life
My one solitary life.... "
कवितेत अखेरीस तो लिहितो -
माझं रक्त त्यांच्यासाठी अविरत वाहत राहील,
जे मागे उरले असतील.
संघर्ष जारी राहिलाच पाहिजे
कुणालाही त्याची भीती नसावी..

अवघ्या तीस वर्षांचं आयुष्य वाट्याला आलेला हा कवी विलक्षण आयुष्य जगला होता आणि त्याच्या जगण्यातला सल त्याने अत्यंत अणकुचीदार शब्दात गोंदवला होता. आज जेंव्हा आपल्या देशातील कामगार त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची आयुष्ये पणाला लावत आहेत, त्यांच्या जिंदगानीचे धिंडवडे निघत आहेत तेंव्हा काही अपवाद वगळता सगळे सुहृद नेहमीप्रमाणे स्वान्तसुखाय कोशमग्न आहेत, सरकारने तर आपली पंचेंद्रिये कधीच आकसून घेतलीत. अमेरिकेतही असेच बधिर सरकार सत्तेत आहे. मग अशा वेळी बेंजामिन मोलॉईस आठवणं नैसर्गिक होय. बेंजामिन मोलॉईसच्या कवितेचे अस्सल देशी धागे नारायण सुर्वे मास्तर आणि नामदेव ढसाळ यांच्या कवितेच्या वीणीत दिसतात. हिरा बनसोडेच्या 'गीत विद्रोहाचे' या कवितेत मोलॉईसचा स्पष्ट उल्लेख आहे. सुर्वे मास्तर हे स्वतः मिल कामगार होते, 'कामगार आहे मी तळपती तलवार आहे'चा गजर त्यांनी केलेला. तर ढसाळ म्हणजे कोणत्याही विद्रोहाच्या निद्रिस्त ज्वालामुखीला आपल्या शब्दांनी पेटवून प्रस्थापितांच्या गुहांच्या तोंडापाशी जाळ शिलगावत जाणारा क्रांतिकारक कवी. देशात आणि जगभरात इतकं काही घडत असताना आपली कथित साहित्य, सांस्कृतिक चळवळ अस्ति बडवल्यासारखी चैतन्यहीन झालीय. का कुणी मोलॉईस इथे जन्म घेत नाही ? आज ढसाळ आणि सुर्वेमास्तर आठवले ते याच अनुषंगाने ! कवी नुसतीच लेखणी चालवत नाही तर तो क्रांतीची बीजेही रोवत असतो !

- समीर गायकवाड.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा