शनिवार, ६ जून, २०२०

लॉकडाऊन स्टोरीज – जिंदगी का सफर...

लॉकडाऊनच्या काळातील काहींच्या वेदना इतक्या टोकदार आहेत की कुणाही सुहृदाच्या आतडयाला पीळ पडावा. अशीच एक कहाणी महंगी प्रसाद यांची आहे. आजही लॉकडाउनमुळे देशभरातील मजूर कामगार मिळेल त्या मार्गाने प्रवास करत आपल्या घरी पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अनेकजण तर कित्येक वर्षांनी आपल्या घरी जात आहेत. अशाच अभागी लोकापैकी एक होते महंगी प्रसाद ज्यांनी तब्बल तीस वर्षांपूर्वी रागाच्या भरात आपलं घर सोडलं होतं. उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यामधील कैथवलिया हे त्यांचं गाव. खेड्यातलं सामान्य जीवन जे देशभरात अनुभवायला येतं तसंच शांत रम्य ग्रामजीवन त्यांच्या गावी देखील होतं. घरातल्या छोट्याशा कुरबुरीवरून नाराज होत त्यांनी गाव सोडलं होतं ते साल होतं 1990चं ! तेंव्हा ते संतापाच्या इतक्या आहारी गेले होते की आपल्या जबाबदार्‍यांचा विसर त्यांना पडला होता, आपण कोणता अनर्थ करत आहोत याचं त्यांना जरादेखील भान नव्हतं. वास्तवात हे भान हरपल्यामुळेच आणि जोडीला विवेक गमावल्यामुळेच त्यांनी आपल्या गावाची वाट कायमची सोडून दिली होती. घर सोडून परागंदा झाले तेंव्हा ते काही पोरजिन्नस होते वा अगदी पंचविशीतले तरुण होते अशातलीही बाब नव्हती. ते खरे तर परिपक्वतेच्या उंबरठ्यावर होते, कारण तेंव्हा त्यांचं वय तब्बल चाळीस वर्षांचं होतं.

महंगी प्रसादना आपल्या मागे आपल्या कुटुंबाचे काय हाल होतील याची जरादेखील पर्वा वाटली नाही. असं करताना त्यांनी थोडा तरी विचार करायला हवा होता. त्यांचं लग्न
होऊन त्यांना तीन अपत्ये झाली होती, तिन्ही मुलीच जन्माला आल्याचं त्यांना शल्य होतं. घरात कमाई करणारे ते एकटेच होते आणि खाणारी तोंडे मात्र जास्त होती. यामुळे छोट्याछोट्या गोष्टींवरून घरात अधूनमधून खटके उडत, मात्र पेल्यातलं वादळ शमावं तशी ही भांडणं आपसूक मिटून जात, त्यातला अबोला काही तासांचा ठरे. एके दिवशी मात्र कडाक्याचं भांडण झालं आणि अंगावरच्या कपड्यांवरच त्यांनी आपलं घर सोडलं, गावाची वाट सोडली. एव्हढेच नव्हे तर आपला मुलुखही त्यांनी सोडला. उत्तरप्रदेश सोडून ते महाराष्ट्रात आले. मुंबईने त्यांना आपल्या कुशीत घेतलं. त्यांना नोकरी दिली, डोक्याला छत्र दिलं. जवळपास तीन दशकं मुंबईने त्यांना रोटी कपडा मकान देऊ केलं. मात्र करोनाच्या साथीत अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, अनेक कंपन्या बंद पडल्या. त्यात ज्यांना मार पडला त्यात महंगीप्रसादही होते. मुंबईत राहून अनेक छोटी मोठी कामं करताना त्यांना घरची आठवण यायची पण त्यात आस्थेसोबत अपराधीपणाची भावनाही असायची त्यामुळे त्यांनी आपल्या गावी कधीही संपर्क केला नाही. दरम्यान ते जेंव्हा घरातून निघून गेले तेंव्हा त्यांच्या कुटुंबियांना वाटलं की नेहमीप्रमाणे भांडणं सरल्यावर राग ओसरल्यावर सगळं सुरळीत होईल. मात्र तसं झालं नाही. दिवस जाऊन रात्र झाली, दिवसामागून दिवस गेले तरी ते परत आले नाहीत. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा बराच शोध घेतला. आप्तेष्ठांचे, मित्रांचे उंबरठे झिजवले, सरकार दरबारी खेटे मारले मात्र काही फायदा झाला नाही. नंतरच्या काळात तर त्यांनी शोध घेणंच थांबवलं. काही वर्षांनी तर त्यांची अशी धारणा झाली की एव्हाना त्यांचा मृत्यू देखील झाला असावा.

महंगी प्रसाद घर सोडून गेल्यानंतर त्यांच्या वडिलांनीच घराची सर्व जबाबदारी घेतली. त्यांनीच तिन्ही मुलींचं लग्न लावून दिलं. जगाच्या नजरेत मुलाच्या जाण्याचं दुःख त्यांनी पचवलं मात्र एकांतात असताना ते त्याच्यासाठी व्याकुळ होत. यातच वार्धक्याने त्यांना ग्रासलं. पुढच्या काळात महंगी प्रसाद यांच्या आई-वडिलांचं निधन झालं. इकडे महंगी प्रसादना याची कोणतीच खबरबात नव्हती कारण त्यांनी आपणहोऊनच परतीचे दोर कापले होते. लॉकडाउनमुळे हातचं काम गेल्यावर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. शेवटी परिस्थितीला कंटाळून त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. ३५०० रुपये देऊन भाजीच्या गाडीतून प्रवास करत ते गोरखपूरपर्यंत पोहोचले आणि तेथून पायी चालत निघाले. वाटेने त्यांनी अनेक स्वप्ने रंगवली होती.

गावापासून थोड्या अंतरावर असताना ते रस्ता चुकले. तीन दशकानंतर येत असल्याने सर्व काही बदललेलं होतं. गावातील एक व्यक्तीने त्यांना पाहिलं आणि ओळखलं. ती व्यक्ती त्यांना गावात घेऊन गेली. ते जेव्हा घरी पोहोचले तेव्हा सर्व काही बदललं होतं.वाटेने येताना रंगवलेल्या स्वप्नांची धूळधाण झाली, त्यांच्या आई वडिलांचा आणि पत्नीचाही मृत्यू झाला होता. ज्यांच्या भेटीची त्यांना आस लागून राहिली होती ते मायबाप आणि जन्माची संगिनी आता हयात नव्हते. त्यांचं मन व्याकुळ झालं. लहान असताना ज्या मुलीला सोडून गेले होते ती मुलगी घराची देखभाल करण्यासाठी माहेरी आली होती. तिला जवळ घेत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. आपण शहरात धड पैसे साठवू शकलो नाही की गावात राहून कुटुंबाचा भार सांभाळू शकलो नाही नि मातापित्यांची सेवा करू शकलो नाही हे शल्य आता त्यांना आयुष्यभर सोबत करत राहील, याची टोचणी त्यांना सुखाने जगू देणार नाही. मात्र आपल्या मातीत मरण्याचं सुख त्यांना आनंदाने मरु देईल याची त्यांना खात्री आहे ! आयुष्य हे असंच असतं, आपण देऊ ती दिशा त्याला लाभते, मात्र तत्क्षणी आपल्याला काहीच कळत नाही. मात्र काळ सरल्यानंतर जेंव्हा वास्तव उमगतं तेंव्हा आपण नशिबाला दोष देत बसतो. ‘जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम वो फिर नही आते..’ हेच खरं !

- समीर गायकवाड

1 टिप्पणी: