गुगल ह्या सर्च इंजिन क्षेत्रातील दिग्गज कंपनीवर कॅलिफोर्नियातील दलित हक्कांसाठी सजग असणाऱ्या संस्थेने गुगल ही एक जातीयवादी संस्था असल्याचे अत्यंत गंभीर आरोप केलेत. गुगलकडून जातीयवादाला उघड खतपाणी घातलं जतेय असा त्यांचा दावा आहे. झालं असं होतं की, एप्रिल महिन्यात गुगलच्या कार्यालयात 'जातीची समस्या' या विषयावर कॅलिफोर्नियातील इक्वॅलिटी लॅब्सच्या संस्थापिका आणि कार्यकारी संचालिका, दलित कार्यकर्त्या थेनीमोझी सुंदरराजन यांचा संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र काही कर्मचाऱ्यांच्या विरोधामुळे गुगलनं अकस्मात हा कार्यक्रम रद्द केल्याचं बोललं गेलं. विदेशी वृत्तसंस्थांनुसार गुगलच्या काही कर्मचाऱ्यांनी सुंदरराजन ह्या हिंदूविरोधी व हिंदूफोबिक असल्याच्या अफवा पसरवल्या. गुगलकडून प्रस्तावित कार्यक्रम रद्द होताच सुंदरराजन आणि इक्वॅलिटी लॅब्सकडून जारी केलेल्या निवेदनात ही बाब अधोरेखित झालीय. जातीय समानतेच्या विरोधी मानसिकता असणाऱ्यांनी नागरी हक्कांशी संबंधित असलेला हा कार्यक्रम रद्द व्हावा यासाठी चुकीची माहिती पसरवली' असा दावा त्यात होता. या कार्यक्रमाच्या आयोजिका असणाऱ्या गुगल न्यूजच्या वरिष्ठ व्यवस्थापिका तनुजा गुप्ता यांनी या प्रकरणानंतर राजीनामा दिला. मागील अकरा वर्षांत कंपनीस अलविदा करण्याची अनेक कारणे मिळूनही तिथे टिकून असणाऱ्या तनुजा यांच्या मते कंपनीत जातीय समानता वाढवताना महिलांना त्यांच्या जातीवर्णामुळे त्रास सहन करावा लागला. त्यांना गप्प केलं गेलं असं खुद्द तनुजा यांनीच म्हटलं. यावर खुलासा करत सर्व आरोप फेटाळूनही गुगलला सहजी हात झटकता येणार नाहीत कारण सुंदरराजन यांचा टॉक शो रद्द करण्याचा निर्णय घेणाऱ्या गुगल इंजिनिअरिंगच्या उपाध्यक्षा कॅथी एडवर्ड्स यांनी तनुजा गुप्ता यांच्यासह अन्यत्र पार पडलेल्या याच कार्यक्रमास हजेरी लावून हा एक चांगला अनुभव होता अशी महत्वाची प्रतिक्रिया दिलीय ! त्यामुळे गुगलने कितीही झाकून नेण्याचा प्रयत्न केला तरीही धुरळा खाली बसताना दिसत नाहीये. शिवाय अशा तऱ्हेची ही काही पहिली घटना नव्हती. भारतातून विदेशात गेलेला माणूस आपला जातीय अभिनिवेश आपल्यासवे घेऊनच तिथे वावरत असतो याचे कैक दाखले आजवर समोर आलेत.
सुंदरराजन यांचा कार्यक्रम रद्द व्हावा यासाठी सवर्ण कर्मचाऱ्यांनी गुगलच्या ८००० भारतीय-अमेरिकी कर्मचाऱ्यांसह आपल्या व्यवस्थापकासाठी जशी अंतर्गत ई-मेल मोहीम राबवली होती तशाच पद्धतीच्या संयुक्तिक आणि संघटीत मोहिमा आखून अशा प्रकारच्या घटनांना आकार दिला जातो हे वास्तव आहे. गुगल वा अन्य डिजिटल माध्यमात केवळ हिंदुत्व समर्थक बाब म्हणून याकडे पाहता येणार नाही. याला काही राजकीय कंगोरेही आहेत. देशात सध्या सत्तेत असणाऱ्या सरकारचा खरा अजेंडा आता सर्वांच्या समोर आहे. त्याला साजेशी अशीच ही वृत्ती आहे. जातीवर्चस्वाच्या लढाईत कथित बुद्धीप्रामाण्यवादी व अतिउच्चविद्याभूषित मंडळीही मागे नाहीत हे देखील स्पष्ट झालेय. स्वतःच्या देशात बुरसटलेल्या कल्पनाविश्वात नि पुराणकथात रममाण होऊन तीच आपली भव्य दिव्य संस्कृती असा अहंगंड मिरवणारा एक वर्ग वास्तवात आतून पोखरलेला असतो. मायक्रोसॉफ्ट, ऍपल सारखी संसाधने आणि ट्विटर, मेटा, लिंक्डइनसारखे डिजिटल मंच आपल्याइथे उभे राहत नसल्याने ते हताश असतात. सुंदर पिचाई, पराग अग्रवाल यांचे यांना गारुड असते. 'मंक हू सोल्ड हिज फेरारी' छाप पुस्तकांनी एकीकडे बावचळून गेलेली ही मंडळी दुसरीकडे फुक्या राष्ट्रवादाच्या भाकडकथांनी भारलेली असतात. जगात सर्वाधिक सहजस्थलांतरीतांत भारतीय माणूस प्रथम क्रमांकावर आहे, त्याला पैसा नाव आणि लौकिक कमवायचा आहे, नवे इप्सित साध्य करायचेय. पोथ्यापुराणे, धर्मग्रंथ वाचून वा गतकाळातल्या अस्तंगत वैभवाच्या रडकथांचे पठण करून होणार नाही हे यांना पक्के ठाऊक असते, मग ही मंडळी आपला देश सोडून विदेशात रवाना होतात. देशावर अतोनात प्रेम असल्याचा दावा करणारी ही बहुतांशी मंडळी विदेशात भक्कम अर्थार्जनासाठी, तिथल्या मोकळ्या ढाकळ्या व समृद्ध जीवनशैलीसाठी गेलेली असतात. पैकी काही शिक्षणासाठीही गेलेले असतात मात्र नंतर तिथलेच होऊन जातात. तिथे राहून यांची इथे लुडबुड सुरु असते. आपल्या वर्णजातीधर्म श्रेष्ठत्वाच्या गळूला ते ममत्वाने जपत राहतात. इथली उजव्या विचारांची मंडळी त्यास खतपाणी घालतात, अशांना गौरवतात ! हे लोक विदेशात राहूनही संस्कृतीच्या कडबोळयाला आपल्या शिंगात किती मिरवताहेत याची कवने इकडे रचली जातात ! यातून जातीधर्मवर्चस्ववादी वृत्तीस बळ मिळते.
भारतातून विदेशात जाणाऱ्या मंडळींचा ओढा बहुतकरून 'डॉलर'देशांकडे असतो, त्या खालोखाल युरो आणि मग येतात ते 'दिनार'वाले देश. काहीसे अनस्किल्ड आणि तुलनेने कमी शिकलेले लोक आखाती देशांत श्रमिक म्हणून रुजू होतात हे ही आता लपून नाही. एकीकडे पेट्रोडॉलरच्या हव्यासापायी आखाती देशात राहायचं आणि दुसरीकडे तिथला बहुसंख्य असणारा आणि आपल्याला रोजगार पुरवणारा मुस्लिमांचा धर्म किती वाईट अन् आपला धर्म किती महान यांची घिसीपिटी रेकॉर्ड समाज माध्यमांत वाजवायची असा काहींचा खाक्या झालाय. ही विकृती आपण तिथे वाढवत आहोत. अमेरिकेसारख्या देशात बहुअंगी विविधता हा नैतिकतेचा चरमबिंदू होतोय, तिथल्या मानवी हक्काच्या सजग लोकचळवळी, उत्तम पर्यावरण, जागरूकतेने जतन केलेला देखणा निसर्ग, सधन नि समृध्द जीवनमान, आरामदायी जीवनासाठीच्या भौतिक साधनांची मुबलकता, संधींचा अवकाश, मुक्त विचारसरणीस मिळणारा व्यापक पाठिंबा सर्वांनाच मोह घालतो यात गैर काहीच नाही. मात्र यांचा वारेमाप उपभोग घेऊन आपली जातीवर्चस्वाची कीड तिथं बाळगायची हे द्वेषमूलक लक्षण लांच्छनास्पद आहे. भारतातून काही विशिष्ठ जातीसमूहाचे लोक अमेरिका युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत झालेत, ज्यांच्या ठायी आपली एतद्देशीय वर्णवर्चस्वाची ब्राम्हण्यवादी वृत्ती ठासून भरलेली असते. हे लोक भारतातून तिथे आलेल्या कनिष्ठ मानल्या गेलेल्या जातींतील लोकांना कमी लेखत असतात. त्यांच्यात आणि आपल्यात फरक आहे याची टोकदार जाणीव आपल्या वर्तनातून करून देतात, त्यांना तुच्छ लेखून आपणच कसे महान आणि श्रेष्ठ आहोत याची चूड पेटवत असतात. काही काळापूर्वी नेदरलॅंडमधील एका मराठी डॉक्टरांना तिथे वास्तव्यास असणाऱ्या उच्चजातीय भारतीयांनी अगदी जाम छळलं होतं. भाषा व संस्कृती मंडळे अशा जातीयअभिनेवेशी लोकांसाठी अड्डयांचे काम करतात अशी टीका तेंव्हा व्यापक प्रमाणात झाली होती जी अपवाद वगळता काही अंशी खरी आहे.
आपल्यावर होणाऱ्या या अन्यायाकडे विदेशातील भारतीय दलित जॉर्ज फ्लोयडच्या भूमिकेतून पाहतो. विदेशात जोपासल्या गेलेल्या वर्णवर्चस्ववादास मुंहतोड जवाब देण्यासाठी प्रशासनाला हाताशी धरून लोकचळवळी सक्रीय असतात तशा चळवळी दलितांसाठी देखील राबवण्यात याव्यात याकडे अलीकडील नवशिक्षितांचा कल असतो. त्या दिशेने पावले टाकत काही संघटनांची स्थापना देखील झालीय मात्र अद्याप त्यांचे कार्यक्षेत्र व एकूणच परीघ खूपच कमी आहे. १४ जुलै २०२० रोजी प्रसिद्ध झालेल्या 'द स्पेक्टर ऑफ कास्ट इन सिलिकॉन व्हॅली' ह्या याशीका दत्त लिखित शोधनिबंधात अमेरिकेतील विख्यात कंपन्यांत होणाऱ्या जातीभेदाची ज्वलंत उदाहरणे दिली आहेत. अलायक, आळशी, स्वार्थी, कमअस्सल अशी शेलकी निंदा करण्यापासून ते जात एक्सपोज झाल्याने नोकरी गमावण्यापर्यंतच्या अनेक नोंदी दिग्मूढ करतात. इक्वॅलिटी लॅब्सने २०१८ साली केलेल्या एका सर्वेक्षणानुसार अमेरिकेतील २५% दलित आपल्यावर जातीय दृष्टिकोनातून शाब्दिक अथवा शारीरिक हल्ला झल्याचे सांगतात, तीनपैकी दोन दलित आपल्यावर कामाच्या ठिकाणी भेदभाव झाल्याचे नोंदवतात, ६०% दलितांना जातिवाचक शेरेबाजीला सामोरे जावे लागते, ४०% दलित आणि १४% मागासवर्गीय व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याचे सांगतात. हे कशाचे द्योतक आहे ? 2020 मध्ये कॅलिफोर्नियातील आयटी कंपनी सिस्कोच्या दोन उच्च-वर्णीय कर्मचार्यांवर भारतीय वंशाच्या एका दलिताशी भेदभाव केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिस्कोच्या खटल्यानंतर इक्वॅलिटी लॅबने एक हॉटलाइन सुरू केली. या हॉटलाईनवर काही दिवसांतच सिलिकॉन व्हॅलीमधील मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून 250 हून अधिक कॉल्स आले. या कर्मचाऱ्यांनी आपल्यासोबत जातीच्या आधारावर भेदभाव झाल्याची तक्रार केली. 2021 मध्ये आणखी एका प्रकरणात, बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (बीएपीएस) या संस्थेवर दलित मजुरांचे शोषण आणि त्यांना किमान वेतनापेक्षा कमी वेतन देण्याचा आरोप झाला होता. सप्टेंबर 2020 मध्ये प्रसारित झालेल्या एनपीआरच्या रफ ट्रान्सलेशन शोमध्ये बोलताना एका तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्याने सॅम कॉर्नेलस हे टोपणनाव वापरून आपले अनुभव शेअर केले, त्याने जानवं घातलंय की नाही हे पाहण्यासाठी त्याचे सहकारी त्याच्या कमरेला हात लावायचे. या कार्यक्रमात सहभागी असणाऱ्यांनी देखील कबूल केलेलं की भारतीय विद्यापीठातील पार्ट्यांमध्ये एकमेकांना जात विचारली जाते. आणि यामुळे ते अस्वस्थ आहेत आणि आपली जात सांगायला ते घाबरतात. या सर्व गोष्टींच्या परिणामस्वरूप यंदाच्या वर्षापासून कॅलिफोर्निया विद्यापीठ, डेव्हिस कोल्बी कॉलेज, हार्वर्ड विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया डेमोक्रॅटिक पार्टीने त्यांच्या धोरणांमध्ये वांशिक भेदभावाविरूद्धचे संरक्षण हे धोरण समाविष्ट केलंय.
अमेरिकेत उजव्या विचारांचा हिंदुत्ववादी गट मात्र अशा घटनांत धर्माभिमानी म्हणवत वर्णवर्चस्वधार्जिणी भूमिका घेतो. भारतातील उजव्या संघटनांची यांना साथ आहे. यातूनच दलित हक्कांच्या सिस्कोमधील विजयाला अमेरिकेतील हिंदू अमेरिकन फाउंडेशन (HAF) सारख्या हिंदूवादी गटांनी आव्हान दिलं. एकीकडे हिंदू असणं म्हणजे भारतीय असणं वा भारतीय असणं म्हणजेच हिंदू असणं अशी साखरपाकी विधाने करायची आणि दुसरीकडे अंतरंगी कमालीची उच्चजातीय अस्मिता जोपासत जातीभेद करत राहायचे ही परस्परविरोधी भूमिका आता उघडी पडत असली तरी याला भूलणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. मातृभूमीपासून दूर राहूनही मनातला जातीयतेचा विखार तेवता ठेवणारी मंडळी खऱ्या अर्थाने अमानवी आणि मागास होत, ज्याचा सर्व स्तरांतून धिक्कार व्हायला हवा. पुरेशी बौद्धिक संपदा नसणे आणि संशोधन व विकास यासाठी आग्रही नसणं हे आपण समजू शकतो, मात्र भूतकाळातील वैभवाच्या गप्पांचे इमले रचत त्यात सामान्य जनतेला भुलवत ठेवून त्याआडून जातीभेदाची छुपी अवजारे परजत राहायचं हा इथल्या व्यवस्थेचा आणि सरकारचा फंडा झालाय. त्यामुळे हरेक व्यक्तीने यासाठी जागरूक राहून खऱ्या समानतेसाठी आग्रही राहिले पाहिजे.
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा