मंगळवार, ७ जून, २०२२

जॉली एलएलबी व्हाया सीबीआय

#sameerbapu, sameerbapu, समीर गायकवाड, sameer gaikwad
बदामीदेवी त्यांच्या नातलगांसह न्यायालयात आल्या तो क्षण ...   

2013 साली प्रदर्शित झालेल्या 'जॉली एलएलबी' या चित्रपटामध्ली ऍडव्होकेट जगदीश त्यागीची मध्यवर्ती भूमिका अभिनेता अर्शद वारसी याने साकारली होती. या चित्रपटाला भरपूर यश लाभले होते खेरीज क्रिटिक्सचे उत्तम शेरे मिळाले होते. त्यानंतर चारच वर्षात याचा सिक्वेल देखील निघाला होता ज्यात अक्षयकुमार नायकाच्या भूमिकेत होता. हे दोन्ही सिनेमे कोर्टरूम ड्रामा होते. एका हिट अँड रन केसमध्ये एक अमीरजादा मस्तवाल मद्यधुंद तरुण आपल्या अलिशान गाडीखाली सहा लोकांना चिरडून मौका ए वारदात वरून पळून जातो. फुटपाथवर झोपलेले जीव निष्कारण बळी पडतात. मात्र व्यवस्था इथे अपराध्याच्या बाजूने उभी राहते त्यासाठी बरेच मोठे आर्थिक व्यवहार होतात, जीवांची बोली लागते अन सौदे होतात. वकिलांपासून ते पोलिसांपर्यंत सगळी तपास यंत्रणा यात सामील असते. सगळ्यांचे उखळ पांढरे होते, कारण जे मृत्युमुखी पडलेले असतात तेच मुळात बेसहारा असहाय गरीब लोक असतात, त्यांच्यासाठी कोण लढणार ? मुळात यात सहाजणांचा मृत्यू झालेलाच नसतो, पाच जण जागीच ठार झालेले असतात आणि रमाकांत शुक्ला नावाचा अपंग गंभीर जखमी झालेला असतो. वास्तवात तो एकटाच या गुन्ह्याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतो, गाडी चालवणाऱ्या राहुल दिवाणने त्याची मदत करण्याऐवजी त्याच्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. ज्यात रमाकांत बचावतो मात्र इन्स्पेक्टर सतबीर राठीच्या कचाट्यात सापडतो. त्याची आयुष्यभराची कमाई हडप करून राठी त्याला हाकलून लावतो, जोडीस सज्जड दम भरतो. रमाकांत शुक्ला हा देखील अपघातात मरण पावल्याची नोंद करून मोकळा होतो. अपघातातील मृतांची संख्या पाचऐवजी सहा होते ! खटल्याच्या सुनावणीच्या अंतिम टप्प्यात गबरगंड वकील तेजिंदर राजपाल त्यांना हव्या त्या दिशेने तपास वाकवतात ! मात्र जगदीश त्यागी अगदी ऐन मोक्याच्या समयी रमाकांत शुक्लाला हजर करतो. ज्याला व्यवस्थेने मृत घोषित केलेले असते तो स्वतः चालत येऊन न्यायालयात साक्ष देतो आणि मग कुठे खरा न्याय होतो अशी कथा 'जॉली एलएलबी'मध्ये होती. हे सर्व इथे का लिहिलेय असा प्रश्न अनेकांना पडला असेल, कारण हा काही सिनेमाविषयक लेखनाचा स्तंभ नाहीये हे सर्वश्रुत आहे. मात्र घटनाच अशी घडली आहे की या चित्रपटाची आठवण व्हावी ! व्यवस्थेने मृत जाहीर केलेली वयाची ऐंशी वर्षे पार केलेली एक वृद्धा थेट न्यायालयात अवतरते आणि न्यायमूर्तींना खऱ्या न्यायासाठी विनवणी करते, ही घटना या शुक्रवारी ३ जून रोजी घडलीय ! बातम्यांच्या गदारोळात या घटनेची नोंद नीट घेतली गेलेली नाही कारण एका वृद्ध निराधार शोषित महिलेसाठी मीडिया रान पेटवेल असे दिवस आता राहिले नाहीत. त्याच घटनेचा हा धांडोळा.

उत्तर भारतातील दैनिक जागरण, दैनिक जनसत्ता अशा सर्वच मुख्य दैनिकांत या घटनेची त्रोटक नोंद आढळली. कठोर टीका वा वर्मावर घाव घालणारे कटाक्ष कुठल्याच मीडियात दिसले नाहीत कारण मामला सीबीआयशी म्हणजेच केंद्रीय गृहखात्याशी निगडीत होता. सद्य काळात सीबीआयला उघडे पाडण्याचे धाडस कमी लोकांच्या अंगी आहे. त्यात ही घटना ज्या गुन्ह्याच्या संदर्भात घडली तो एका निडर पत्रकाराचा खून खटला होता, ज्यात एक बाहुबली गुंड खासदार आरोपी होता. शिवाय याचा तपास सीबीआयने केला होता. इतकी सगळी व्हीआयपींची मांदियाळी असल्यावर सीबीआयवर ताशेरे मारायचे साहस करून गृहखात्याची खपामर्जी ओढवून घेण्यास फारसे कुणी उत्सुक दिसले नाहीत. मूळ घटनेची पार्श्वभूमी जाणून घेतली की जॉली एलएलबीशी असणारे साम्य लक्षात येईल. हिंदी दैनिक हिंदुस्थानसाठी काम करणारे विख्यात निडर पत्रकार पत्रकार राजदेव रंजन यांची 13 मे 2016 रोजी संध्याकाळी बिहारमधील सिवान येथे घरी जात असताना वाटेतच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेत तत्कालीन खासदार शहाबुद्दीन याचा हात असल्याचा आरोप रंजन यांच्या पत्नीने केला होता. याच खटल्याची सुनावणी सुरू असताना बिहारमधील मुझफ्फरपूर येथील न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पुनीत कुमार गर्ग यांनी शुक्रवारी सीबीआयला साक्षीदाराच्या मृत्यूचा खोटा अहवाल सादर केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली. या प्रकरणातील पुढील सुनावणीच्या तारखेपूर्वी 20 जून रोजी उत्तर दाखल करण्यास सांगितले.

तत्पूर्वी, सीबीआयने या खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असणाऱ्या बदामी देवी यांच्या चौकशीसाठी समन्स मागितले होते, जे न्यायालयाने जारी केले होते. मात्र नंतर 24 मे रोजी केंद्रीय तपास संस्थेने बदामी देवी यांना मृत घोषित केले आणि त्यांच्या मृत्यूची पुष्टी करणारी कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केली. शुक्रवारी ३ जून रोजी कोर्टात हजर झाल्यावर बदामी देवींनी प्रतिज्ञापत्रात म्हटलेय की सिवान येथील कासेरा टोली येथील स्वतःच्या निवासस्थानी त्या एकट्याच राहतात. या खटल्यात त्यांना साक्षीदार बनवण्यात आले असले तरी अजावर सीबीआयचा एकही अधिकारी त्यांना भेटलेला नाही. सीबीआयने आपल्याला मृत घोषित केल्याचे त्यांना वर्तमानपत्रांतून कळले. हे एक षडयंत्र आहे असे बदामी देवींचे वकील शरद सिन्हा यांचे मत आहे. सिन्हा यांनी न्यायालयासमोर सांगितले की, "देशातल्या सर्वात मोठ्या तपास यंत्रणेचे हे कृत्य अत्यंत संशयास्पद असल्याचे संस्कृतदर्शनी दिसते. दुसऱ्या साक्षीदाराच्या संगनमताने सीबीआयने असे काम केले आहे, असे म्हणण्यास इथे वाव आहे." विजय कुमार आणि अझरुद्दीन बेग यांना खोट्या आरोपात गुंतवून ठेवण्यासाठी सीबीआय मोठी खेळी खेळत असल्याचे आरोप देखील सिन्हा यांनी केले. सीबीआयचे हे कृत्य विचित्र आणि धक्कादायक असल्याचे त्यांनी न्यायालयाबाहेर पत्रकारांना सांगितले. बराच आक्रोश झाल्यानंतर मे २०१६ मध्ये राजदेव रंजन हत्या प्रकरणी सीबीआयकडे तपास सुपूर्त केला गेल्यावर सीबीआयने 15 सप्टेंबर 2016 रोजी गुन्हा नोंदवला. ऑगस्ट 2018 मध्ये या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर जानेवारी 2019 मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती मनोज कुमार यांच्या न्यायालयात पत्रकार हत्या प्रकरणातील आरोपींवर आरोपपत्र दाखल केले होते. सिवानमधून चार वेळा आरजेडीचे खासदार राहिलेले दिवंगत मोहम्मद शहाबुद्दीन यांच्याव्यतिरिक्त अझरुद्दीन बेग उर्फ ​​लद्दन मियाँ, विजय गुप्ता, रोहित सोनी, राजेश कुमार, रिशू जैस्वाल आणि सोनू गुप्ता यांच्या विरोधात समन्स निघाले. डिसेंबर 2014 मध्ये एका स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या 'सिवान तुरुंगातून जारी झालेल्या हिटलिस्टनुसारच्या हत्या' अशा मथळ्याच्या बातमीमुळे पत्रकार राजदेव रंजनच्या हत्येचा कट शहाबुद्दीनने रचल्याचे सीबीआयचे म्हणणे होते.

शहाबुद्दीन हा जरी खासदार असला तरी एक कुख्यात खुनी गुंड बाहुबली नेता होता हे कुणीच नाकारत नाही. 2015 मध्ये बिहारमधील विशेष न्यायालयाने शहाबुद्दीन आणि त्याच्या साथीदारांना 2004 च्या ऍसिड हत्याकांडात जन्मठेपेची सजा लागली होती. खंडणी देण्यास नकार दिल्याने सिवानचे व्यावसायिक चंद्रकेश्वर प्रसाद यांच्या दोन तरुण मुलांचे अपहरण करून अ‍ॅसिडने आंघोळ घालून त्यांची हत्या करण्यात आली होती. या खटल्यातील साक्षीदार असलेल्या तिसऱ्या भावाचीही २०१६ मध्ये हत्या करण्यात आली होती. दरम्यान दिल्लीच्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला शहाबुद्दीन गतसाली 1 मे रोजी कोविड संसर्गामुळे मरण पावला. नराधमाचा अंत झाला तरी त्याच्यावर सुरु असलेले खटले पुरते निकाली निघाले नव्हते. पैकीच एक खटला रंजन यांच्या हत्येचा होता. मार्च 2016 मध्ये बिहार सरकारचे तत्कालीन मंत्री अब्दुल गफूर आणि रघुनाथपूरचे आमदार हरिशंकर यादव यांनी शहाबुद्दीनसोबत सिवान तुरुंगात भेट घेतली होती. या भेटीचा व्हिडिओ यापूर्वी पत्रकार राजदेव रंजन यांनी सोशल साइटवर व्हायरल केला होता. त्यानंतर सर्व वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या. याचा बदला घेण्यासाठी त्यांची हत्या केली गेली. याप्रकरणी असे सांगितले जातेय की मुख्य साक्षीदार असणाऱ्या बदामी देवीचे घर वीरेंद्र पांडे नावाच्या व्यक्तीच्या ताब्यात आहे, मात्र ती अजूनही त्याच घरात राहत असल्याचे सांगण्यात येते. तर रंजन हत्याकांडात सामील असलेल्या शूटरसोबत पांडेच्या जमिनी आणि घराचा सौदा करून काहींना वाचवण्यासाठी 24 मे रोजी सीबीआयने न्यायालयासमोर बदामी देवी मृत झाल्या असल्याची माहिती दिली.

इथे संशयास वाव आहे, गरीबास न्याय नाही याची इथे पुष्टी होतेय. लोकसभेतील माहितीनुसार सीबीआयकडून तब्बल 1,256 प्रकरणांची चौकशी सुरू आहे आणि त्यापैकी 64 प्रकरणे पाच वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत. गेल्या 10 वर्षांत केवळ 65-70% आरोपींना दोषी ठरविण्यात सीबीआय यशस्वी झालीय. असे असूनही या प्रकरणी सीबीआयने जो कलंक माथी लावून घेतला आहे तो दीर्घकाल पुसला जाणार नाही हे नक्की !

- समीर गायकवाड


#sameerbapu , sameer gaikwad, समीर गायकवाड
बदामीदेवींनी न्यायमूर्तींना दिलेले निवेदन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा