मंगळवार, २४ मे, २०२२

फिलिपिन्समधील निवडणुकांचे धक्कादायक वास्तव..

#sameerbapu, sameergaikwad, sameerbapu, समीर गायकवाड
मार्कोस ज्युनियर यांच्या विजयाचे अन्वयार्थ काय लावायचे ? 

नुकत्याच पार पडलेल्या फिलिपिन्सच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांचा विराट विजय होताच चीनी प्रसारमाध्यमांना आनंदाचे भरते आले. चीनची सरकारी वृत्तसंस्था असणाऱ्या झिन्हुआचा खुनशी उन्माद बातम्यांच्या शीर्षकांतून ओसंडून वाहत होता तर ग्लोबल टाईम्स या अन्य एका सरकारी नियंत्रित दैनिकात देखील याचे वार्तांकन करताना जो बिडेन यांच्या नावाने मल्लिनाथी करण्यात आली होती. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने काहीशी सौम्य भूमिका घेत झिन्हुआची री ओढली होती. ग्लोबल टाईम्समध्ये हर्मन टीयू लॉरेल यांनी लिहिलं की मार्कोस ज्युनिअर हे आपल्या पूर्वसुरींच्या मार्गावरून वाटचाल करताना चीनशी असलेले संबंध बळकट करतील आणि आपल्या पद्धतीने फिलिपिन्सला आकार देतील ! लॉरेल हे सामान्य लेखक नाहीत, ते फिलिपिनो थिंक टॅंक म्हणून विख्यात आहेत, फिलिपिनो ब्रिक्स स्ट्रॅटेजीचे ते संस्थापक आहेत, फिलिपिन्सच्या सरकारी मीडियामध्ये ते माध्यमकर्मी आहेत, त्यांना तिथल्या राजकारणाचे बारकावे उत्तम ठाऊक आहेत. हे पाहू जाता त्यांच्या भाष्याकडे गांभीर्याने पाहायला हवे. फिलिपिन्स हा बेटांचा समूह असणारा देश जगाच्या नकाशाच्या दृष्टीने छोटासा असला तरी त्याचे भौगोलिक स्थान महत्वाचे आहे. तिथली बदलती राजकीय गणिते कोणत्या नव्या समीकरणांना जन्म देऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी मार्कोस ज्युनियर यांचा पूर्वेतिहास धुंडाळणे क्रमप्राप्त आहे.

मार्कोस ज्युनियर हा माजी हुकूमशहा फर्डिनांड मार्कोस सीनियर यांचा मुलगा. फर्डिनांड मार्कोस हे फिलिपिन्समध्ये साठ ते ऐंशीची दोन दशके अध्यक्षपदी राहिले. आधी लोकनायक वाटणारे मार्कोस १९७२ नंतर आपल्या खऱ्या रंगात समोर आले. अध्यक्षपदाची दुसरी कारकीर्द संपुष्टात येण्यास एक वर्ष बाकी असताना त्यांनी सत्ताकेंद्रे एकहाती ताब्यात घेत देशात मार्शल लॉ लागू केला. न्यायपालिकादेखील त्यांनी सोडली नाही. पार्लमेंटला स्थगिती देऊन विरोधकांची गळचेपी केली गेली, निर्मम हत्याकांडे घडवली गेली. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर निर्बंध आले. एकीकडे उभा देश बंदिशाळा होऊन जनता कफल्लक झाली होती तर दुसरीकडे मार्कोस कुटुंबियांनी जनतेची अब्जावधीची संपत्ती अक्षरशः लुबाडली. वाट्टेल तशी अय्याशी केली, त्याचे कैक किस्से जगभर चर्चिले गेले. बेनिन्यो अक्विनो हे मार्कोस यांचे मुख्य विरोधक होते. मार्कोसांच्या बेबंदशाहीने त्यांना परागंदा होण्यास भाग पाडले. अमेरिकेत पळून गेलेले अक्विनो १९८३ च्या ऑगस्टमध्ये देशात परतले असता विमानातून उतरताच त्यांनी क्रूर हत्या केली गेली. यामुळे जनतेच्या मनातल्या उद्रेकाचा विस्फोट झाला. अक्विनोंची पत्नी कोरी हिने आंदोलनाची कमान हाती घेतली. कोरी यांनी मार्कोस यांच्याविरोधात निवडणूक लढवली मात्र गैरप्रकारांच्या आधारे मार्कोस पुन्हा सत्तेत आले. जनतेला हे पचनी पडले नाही. लोक रस्त्यावर आले, धर्मसत्तेनेही त्यांना साथ दिली, जगभरात मार्कोस यांची निंदा होऊ लागली. सैन्यानेदेखील प्रबळ विरोध करताच फर्डिनांड मार्कोस आपल्या अख्ख्या कुटुंबासह हवाई बेटांत पळून गेले. तिथे त्यांनी राजाश्रय घेतला. विविध ऐवजाच्या स्वरूपात त्यांनी तब्बल दहा अब्ज डॉलर्सची लूट हेलिकॉप्टर्सच्या सहाय्याने सोबत नेली. मनिलामधील राजप्रासादात मार्कोसपत्नी इमेल्डा यांच्या कक्षात तीन हजार वाहणांचे जोड आढळले होते त्याची सर्वत्र चर्चा झालेली. लुटीपैकी चार अब्ज डॉलर्सच फिलिपिनो तिजोरीत वळते झाले. 1989 मध्ये फर्डिनांड मार्कोस यांचे निधन झाले. तीन वर्षांनी मार्कोस कुटुंबिय फिलिपिन्समध्ये परतले तेच राजकीय महत्वाकांक्षेने ! लुटीच्या पैशाचा वापर करत त्यांनी आपले बस्तान बांधले. मार्कोस ज्युनियर एका प्रांताच्या गव्हर्नरपदापर्यंत पोहोचले. काँग्रेस सदस्य, सिनेटरपासून ते आताच्या अध्यक्षपदापर्यंत ते नियोजनबद्ध पद्धतीने पोहोचले. आई इमेल्डा आणि बहिण इमी यांनीदेखील राजकीय पदे भूषवली हे विशेष होय !

आपल्या पित्याची इतकी दुष्कीर्ती असूनही मार्कोस ज्युनिअर इतक्या मोठ्या मताधिक्याने कसे विजयी झाले याचे जगाला कोडे पडले याचे नवल ते काय ! मात्र याची उत्तरे कालसुसंगत सुलभ आहेत. चिनी माध्यमांनी सढळ हातांनी ज्युनिअर मार्कोसला मदत केली. निवडणूक काळात व्हॉटसअप, फेसबुकसह सर्व समाजमाध्यमे खोट्या माहितीने दुथडी भरून वाहत होती. अचाट दावे आणि अफाट लबाडीने भरलेल्या माहितीची फिलिपिनो जनतेस भुरळ पडली. या निवडणुकीदरम्यान ज्युनिअर मार्कोसनी कोणत्याही वादविवाद वा थेट चर्चासत्रात साधा सहभाग नोंदवला नाही, त्यांनी पत्रकार परिषदा देखील पेड स्वरूपात घेतल्या, आपला हिडन अजेंडा वा आपले धोरण यातले काहीच जनतेपुढे त्यांनी कधीच स्पष्ट मांडले नाही. त्यांनी निव्वळ स्वप्ने विकली, भूलथापा मारल्या आणि आपल्या कुटुंबास खूप सोसावे लागले अशी इमोशनल मांडणी केली. कोविड काळात कोसळलेल्या फिलिपिनो अर्थव्यवस्थेस आपणच तारू शकतो याची दांभिक ग्वाही दिली आणि नागरिक त्यास बळी पडले. या दरम्यान आशियाई प्रसारमाध्यमात देखील त्यांची छबी दुरुस्त करण्याचे काम सोशल मीडियाने इमानदारीने पार पाडले. अर्थात यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झाला असणार हे नक्की. मावळते अध्यक्ष रॉड्रीगो दुतेर्ते यांनीही त्यास हातभार लावला. दुतेर्ते यांच्या काळ्या कारकिर्दीत झालेल्या हत्याकांडांना आता कधीच वाचा फुटणार नाही. दुतेर्ते यांच्या काळात फिलिपिन्सचे राजकीय धोरण मोठ्या प्रमाणात चीनकडे झुकलेले होते. एक प्रकारे चीनचे मांडलिकत्व स्वीकारल्यासारखे ते वागत होते. दुतेर्तेंच्या मार्गावरूनच ज्युनिअर मार्कोस यांची वाटचाल असणार आहे एव्हढी एकच गोष्ट सध्या फिलिपिनो राजनीतीत स्पष्ट झालेली असल्याने शी जीन पिंग यांना समाधान वाटलेय. श्रीलंकेची जी वाताहत चीनने केली आहे ती पाहू जाता ज्युनिअर मार्कोस अगदी सहजी चीनचे प्यादे होतील असे वाटत नाही मात्र खाल्ल्या मीठास जागण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायही नाहीत.

या विजयानंतर 'बाँगबाँग' उर्फ मार्कोस ज्युनियरनी आपल्या वडिलांच्या काळातील कटू आठवणींना जोडू नये असा संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याचे मत निरीक्षकांनी नोंदवलेय. त्यांच्या राज्यकारभाराचे धोरण काय असेल याबाबत देशात संभ्रमाचे वातावरण असूनही जनतेने त्यांना निवडून दिले यावरून लोकांचा सामुहिक विवेक क्षीण होत चालल्याचे महत्वाचे निष्कर्ष अमेरिकन प्रसारमाध्यमांनी नोंदवलेत. मार्कोस ज्युनियरच्या विजयानंतर त्यांचे प्रवक्ते विक रॉड्रिग्जनि सांगितले की ज्यांनी बाँगबाँगला मत दिले आणि ज्यांनी मत दिले नाही त्या सर्व फिलिपिनो नागरिकांचे प्रतिनिधित्व करण्याचे वचन ज्युनिअर यांनी दिलेय, खेरीज ते जनतेत समान आधार शोधून राष्ट्राला एकत्र करण्याचा प्रयत्न करतील. वास्तवात एके काळी फर्डिनांड मार्कोस यांचीदेखील हीच भाषा होती ! दुतेर्ते यांनी जशी चीनला अक्षरशः अलिंगने दिली होती. दक्षिण चीनच्या समुद्रातील सागरी हद्दीवरून फिलिपिन्सशी असलेल्या वादात 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाने फिलीपिन्सच्या बाजूने निर्णय दिला असूनही दुतेर्ते त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी वचनबद्ध राहिले नाहीत. निक्कीएशियाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार दुतेर्ते यांच्या कारकिर्दीत चीनची फिलीपिन्समधील गुंतवणूक गत सहा वर्षांच्या तुलनेत तब्बल बारापट वाढलीय. दुतेर्ते यांच्यापेक्षा चीनी धोरणापेक्षा अधिक झुकलेली नीती बाँगबाँग यांच्याकडून राबवली जाईल असा अंदाज व्यक्तवण्यामागचे कारण म्हणजे त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान मनिला येथील चीनचे राजदूत हुआंग शिलियन यांची उघड भेट घेऊन खुले समर्थन मिळवले होते. हे त्यांच्या परराष्ट्र धोरणाच्या प्राधान्यक्रमांचे संकेत म्हणून पाहिले जात होते. हर्मन लॉरेल यांच्या मते या निकालांमुळे आशिया-पॅसिफिक क्षेत्रासाठी अमेरिकेच्या धोरणासमोर नवीन आव्हान निर्माण होऊ शकते.

या निवडणुकीने एक नवा सिद्धांत रूढ झालाय तो म्हणजे चारित्र्य कितीही डागाळलेले असले वा धोरणे कितीही फसवी व जनविरोधी असली तरी सत्ता मिळवता येते ! अर्थात त्यासाठी मुक्तहस्ताने छद्ममार्ग अवलंबता आले पाहिजेत. कपटनीतीने झळाळत्या स्वरुपात आपलं पॅकेज मांडण्याचे कसब असले पाहिजे. देशप्रेमाच्या खोट्या कथा रचून लोकप्रिय घोषणांचा मारा करून खोटा लोकानुनय करता आला पाहिजे. राष्ट्रउभारणीत शून्य योगदान असूनही निव्वळ स्वप्ने विकण्याच्या स्कीलवर लोकांना गंडवता आले पाहिजे आणि मुख्य म्हणजे जनतेच्या रोजच्या मुद्द्यांवर न बोलता भ्रामक मुद्द्यांचे मायाजाल पसरवता आले पाहिजे. मार्कोस ज्युनिअर यांनी कमालीच्या व्यावसायिक पद्धतीने हे केलं आणि अध्यक्षपद काबीज केलं. फिलिपिन्सचे पुढे काय होणार याचे आडाखे बांधणे कठीण नाही तरीही जागतिक मीडिया मिठाची गुळणी धरून आहे हे विशेष !

- समीर गायकवाड 


मार्कोसना विरोध होत होता मात्र तो नियोजनपूर्वक अनफोकस्ड ठेवला गेला..    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा