१९५६ मध्ये इस्राईलने ईजिप्तच्या सिनाई बेटावर घुसखोरी करून ताबा मिळवला. तीरानच्या सामुद्रधुनी (Straits of Tiran) इस्त्राईली बोटींना असलेली प्रवेशबंदी मोडून काढली. युनायटेड नेशन्सच्या वतीने काही कालावधीनंतर या बेटाच्या सीमेवर सैनिक तैनात केले गेले. पण इस्राईली सैन्य काढून घेण्याचे कोणत्याही स्वरूपाचे करार करवून घेण्यात अरब कमी पडले. या नंतर इस्राईलने सातत्याने या भागात आपले सामर्थ्य वाढवत नेले आणि तणावाची स्थिती टोकाला नेली. जून १९६७ च्या दरम्यान ही स्थिती इतकी स्फोटक झाली की महायुद्धाच्या झळा त्यातून दिसू लागल्या. इस्राईलने आपल्या अजस्त्र नौका आणून या परिसरात उभ्या केल्या. ईजिप्तचे तत्कालीन अध्यक्ष गमाल अब्देल नासेर यांनी सिनाई बेटापासून अरब भूमीकडे जाणाऱ्या १३ किमी (७ नॉटीकल माईल्स) लांबीच्या तीरानी खाडीतून इस्त्राईली नौकांचा मार्ग बंद करण्याची घोषणा केली. ईजिप्तची सेना त्यांनी थेट इस्राईलच्या सीमेनजीक उभी केली. याच घटनेची इस्राईल आतुरतेने वाट पाहत होते, किंबहुना इस्राईलने रचलेल्या सापळ्यात अरब अलगद सापडले होते. ५ जून रोजी इस्राईलच्या अस्मानी हल्ल्यापुढे ईजिप्शियन सैन्य अक्षरशः गळपटले. एकाच वेळी जमिनीवरून आणि आकाशातून प्रखर विनाशकारी विध्वंसक हल्ले इस्राईलने केले. काही तासातच ईजिप्शियन नेतृत्व गर्भगळीत झाले. चलाखी दाखवत इस्राईलने गाझा पट्टीवरही आक्रमण केले. अध्यक्ष गमाल नासेर इतके भेदरले की अधिक मनुष्यहानी होऊ नये म्हणून त्यांनी सिनाई बेटावरील इजिप्शियन नागरिकांना तातडीने निष्कासित होण्याचे आदेश दिले. हतबल झालेल्या ईजिप्तने सीरियन आणि जॉर्डनियन नेतृत्वास मदतीची हाक दिली. त्यांनी तयारी करून युद्धात उतरेपर्यंत इस्राईलने आपला हेतू तडीस नेला.
ईजिप्तच्या ताब्यात असलेली गाझा पट्टीची भूमी, सिनाई बेटे इस्राईलने दांडगाई करून बळकावली. जॉर्डनकडून पूर्व जेरुसलेम आणि पश्चिमी खोरे (वेस्ट बँक) ताब्यात घेतले तर सीरियावर अत्यंत निर्दयी हल्ला चढवत गोलान टेकड्या ताब्यात घेतल्या. इस्राईलने इतकं सगळं गिळंकृत केल्यावर अरब राष्ट्रे हैराण झाली. अखेर ८ जून १६६७ रोजी इस्राईल आणि जॉर्डन - ईजिप्तने युद्धबंदीस सहमती दर्शवून आपली मानहानी करून घेतली. चवताळलेल्या सीरियाला इस्राईलच्या आधुनिक व बलाढ्य लष्करी शस्त्रसज्जतेपुढे जेमतेम आणखी एक दिवस तगता आले. अखेर ११ जून १९६७ साली या राष्ट्रांचा युद्धबंदीचा करार झाला. हा करार म्हणजे अरब राष्ट्राच्या काळजाची भळभळती जखम. आजही या जखमेतून विद्रोहाचा लाव्हा वाहतो. इस्राईलने काबीज केलेल्या भूमीचा ताबा कधीच दिला नाही. युनायटेड नेशन्स तमाशबीन बनून गमजा बघत राहिले. यात अरबांचे वीस हजार तर इस्राईलचे एक हजार सैनिक मृत्यूमुखी पडले. या युद्धास 'सिक्स डे वॉर' असे संबोधले गेले. या युद्धामुळे नासेर यांना सत्ता गमवावी लागली. त्यांची प्रचंड मानहानी झाली तर इस्राईलचा आत्मविश्वास शतपटीने दुणावला. १९७३ मध्ये झालेल्या पुढच्या युद्धात पॅलेस्टीनी जनतेस वेस्ट बँकच्या चिंचोळ्या भूभागामधून हुसकावून लावण्यात इस्राईल यशस्वी झाले तर सोबतच गोलान टेकड्यावरील सीरियन जनतेस आपली भूमी सोडून परागंदा व्हावे लागले. आजही हा सर्व भूभाग अशांत आणि युद्धग्रस्त असल्याचे पहावयास मिळते. जॉर्डनकडून बळकावलेल्या भागापैकी पूर्व जेरुसलेममध्येच अल-अक्सा मस्जिद येते. ‘अल-अक्सा’चे महत्व अनन्यसाधारण असे आहे. १९७८ साली इजिप्तसोबत झालेल्या शांतता करारामध्ये इस्राईलने पॅलेस्टाइनच्या भागात स्थानिक निर्णय घेण्याचे अधिकार असलेले स्वतंत्र प्राधिकरणवजा सरकार स्थापण्यास मान्यता दिली. त्यानंतर दोन वर्षांनी इस्राईलने जेरुसलेम हे राजधानीचे ठिकाण म्हणून जाहीर केले. पॅलेस्टीनींच्या मनात अजूनही जेरुसलेमवर आपला नैसर्गिक हक्क असल्याची दाट भावना आहे. यातूनच इस्राईली दांडगाईविरोधातला विद्रोहाचा पहिला उद्रेक १९८७ मध्ये झाला. याच दरम्यान गाझा पट्ट्यात 'हमास'ची स्थापना झाली. 'हमास'ची ओळखच मुळात आक्रमक दहशतवादी हिंसक संघटना अशी आहे. अजूनही इस्राईलला सर्वाधिक तिखट विरोध हमासचाच आहे. १९९३ आणि १९९५ मध्ये झालेल्या ऑस्लो फर्स्ट आणि सेकंड ट्रिटीनुसार पॅलेस्टाईनसाठी स्वतंत्र प्राधिकार सरकारला हिरवा कंदील मिळाला मात्र ते प्रत्यक्षात येण्यासाठी २००६ साल उजाडावे लागले ! दरम्यान ‘हमास’ने आपला विरोध टोकदार केला. २०१७ साली ‘हमास’ने गाझा पट्टीचा तर ‘फतह’ संघटनेने वेस्ट बँक परिसर ताब्यात घेतला. १९४८ मध्ये ज्यांना त्यांच्या राहत्या भूमीतून परागंदा केले गेले त्या पॅलेस्टिनींनी देखील पूर्व जेरुसलेममध्ये पुनरागमन सुरु केलं. जीवावर उदार होऊन मानवी जीवन साधनांविना ते दाटीवाटीने राहू लागले, त्यांच्या मनात आपली भूमी परत मिळवण्याचा दुर्दम्य ध्यास आहे. इस्राईल पॅलेस्टाइन यांच्यातला सीमावाद आणि वाढत्या संख्येने ठळक होत चाललेलं पॅलेस्टीनींचं अस्तित्व या दोन मुद्द्यांनी या परिसराला ग्रासलेलं आहे. त्याचेच हे अदृश्य पडसाद आहेत. अल-अक्सा मस्जिद हे एक निमित्त आहे.
अल-अक्सा मस्जिद हे ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तिन्ही धर्मियांचे महत्वाचे श्रद्धास्थान आहे. इस्लामी धर्मग्रंथानुसार प्रेषित मोहम्मद हे मक्केहून निघाल्यानंतर त्यांनी रात्रीचा प्रवास इथेच पूर्ण केला. इथल्या 'डोम ऑफ द रॉक'वरून त्यांनी जन्नतच्या दिशेने प्रयाण केले. परिणामी मक्का-मदिना पाठोपाठ हे मुस्लिमांचे मोठे श्रद्धास्थान आहे. येशू ख्रिस्ताला ज्या ठिकाणी सुळावर चढविण्यात आले ते ठिकाण म्हणजेच अल-अक्सा मस्जिद आहे अशी ख्रिश्चनांची धारणा आहे. त्यामुळे हे ठिकाण त्यांना पूज्यनीय आहे. तर ख्रिस्तपूर्व काळात ज्यूंचे दैवत असणाऱ्या अब्राहमने याच ठिकाणी त्याचा लाडका मुलगा आयझॅक याला देवाला अर्पण करण्याची सकल तयारी केली होती, त्याच्या दृढनिश्चयाची भीती घेऊन अखेर दैवतांनीच त्याला अडवलं. ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम या तिघांचे अलौकिक श्रद्धास्थान असणाऱ्या ‘अल-अक्सा’मध्ये दर शुक्रवारी जुम्मे की नमाज अदा होते. ज्यात जेरुसलेममधून पॅलेस्टाइन आणि अरब जगतातून सगळीकडचे मुस्लिम बांधव सामील होतात. रमझानच्या काळात ही संख्या प्रचंड वाढते. २०२१ साली या भाविकांच्या संख्येवर इस्रायलने निर्बंध घातल्यानंतर नव्या संघर्षाला सुरुवात झाली. गतवर्षी हमास व इस्रायल यांच्यात याच कारणावरून अकरा दिवस युद्ध सुरू होते. यंदाच्या मार्चअखेरीस 'हमास'कडून इस्राईली नागरिकांवर छुपे हल्ले केले गेले. ज्यात काही इस्रायली नागरिक मृत्युमुखी पडले. इस्राईलने यावर आक्रमक भूमिका घेत मस्जिदीत सैन्य घुसवले. गत सप्ताहात जुम्मा नमाजच्या दरम्यान तुंबळ चकमक झाली. इस्राईली दाव्यानुसार रमजानच्या निमित्ताने मोठ्या संख्येने एकत्रित आलेल्या लोकांनी दगडफेक केली. तर हमासचा दावा आहे की इस्राईलने नेहमीप्रमाणे अनावश्यक बळाचा वापर करत प्रार्थनेस आलेल्या मुसलमानांना आपले लक्ष्य केलं. या नंतर या भागात मोठा हिंसाचार घडून आला आणि ऐन रमजानच्या महिन्यात मध्यपूर्वेतील शांतता भंग पावली. 'अल-अक्सा'मधला संघर्ष हे हिमनगाचे टोक आहे, त्या खालील हिमपर्वतात दडली आहे ज्यू, इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मांमधल्या वर्चस्ववादाची सुप्ततप्त लढाई ! जगाच्या त्रिसहस्त्राच्या इतिहासात हाच संघर्ष मूळ नि महत्वाचा भाग असून 'अल-अक्सा'चा संघर्ष हा त्याचा छोटासा बिंदू आहे !
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा