टाटांचं मीठ खाल्लं नि त्यांची बाटाची चप्पल घातली इथून सामान्य माणूस त्यांच्याशी जोडला जातो! मुळात इतिहासाच्या पुस्तकातील भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले जमशेदपूर आणि तिथले टाटा घराण्याचे योगदान बालवयापासूनच आपल्या सर्वांवर ठळक बिंबले आहे. टाटा घराण्याने भारतीय औदयोगिक संरचनेचा मजबूत पाया रचला. स्वातंत्र्य चळवळीस पूरक अशी आर्थिक भूमिका त्यांनी वठवली. त्यामुळे पूर्वापार टाटा या नावाविषयी भारतीय मनात एक आस्था आहे! टाटांचा ट्रक असेल वा अगदी महागडी जॅग्वारची कार असेल नाहीतर छोटा हत्ती नावाचं कनिष्ठवर्गीयांच्या पोटाचं साधन असेल भारतीय माणूस त्यांना आपलं मानत आलाय! टाटा सुमोची, सफारीची क्रेज अफाट होती. वाहन क्षेत्रात त्यांची भरारी उत्तुंग होती, सामान्य माणसाच्या आवाक्यात चारचाकी यावी म्हणून केवळ लाखाची कार बाजारात आणली!
टाटांनी कधी आपल्या संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन केले नाही या गोष्टीचा बराच प्रभाव पडला. सामान्य माणसांच्या कार्यक्रमात सहभागी होताना त्यांचा वावर अत्यंत सुखद नि अनुकरणीय असायचा. त्यामुळे लोकांना हा माणूस आपला वाटायचा!
'हे अफाट श्रीमंत आहेत पण आपल्यासारखेच साधे आहेत!" ही भावना या व्यक्तीला अत्यंत उच्चस्थानी घेऊन गेली! आपल्या कर्मचाऱ्यांसोबतचं त्यांचं वर्तन नेहमी चर्चेचा विषय राहिलंय, 'धिस पर्सन इज डाऊन टू अर्थ' याचा दाखला देण्यासाठी त्यांच्यासारखा माणूस नव्हता!
टाटांच्या घरातही लग्ने झालीत, सोहळे झालेत, धार्मिक विधी झालेत मात्र त्यांनी त्याचे प्रदर्शन मांडले नाही. इव्हेन्टबाजीवर त्यांनी फुली मारलेली! आताच्या उठवळ श्रीमंतांच्या वखवखत्या प्रदर्शनाच्या तुलनेत ही असामी नि यांचं घराणं सोबर नि सात्विक वाटतं ते याचमुळे! भारतीय जनमानसाला याची अधिकची ओढ असल्याने टाटांची श्रीमंती कधी कुणाच्या डोळ्यात खुपल्याचे माझ्या तरी पाहण्यात वाचनात आलं नाही!
टाटा म्हणजे विश्वास हे आपल्याकडे रुळले कारण त्यांच्या उत्पादनाच्या दर्जाची, गुणवत्तेची खात्री! पिढी दर पिढी याला कधी तडा गेला नाही त्यामुळे लोकांनी त्यांच्या उत्पादनावर भरवसा ठेवताना मागेपुढे पाहिले नाही. कळत नकळत भारतीय माणूस कोणत्या ना कोणत्या उत्पादनामुळे या समूहाशी जोडला गेला. टाटांनी बाजारात आणलंय म्हणजे चांगलंच असणार असं लोक नेहमी मानत राहिले. गरीबांपासून ते गर्भश्रीमंतांपर्यंत सर्व वर्गवारीचे लोक त्यांच्याशी जोडले गेले. खरेतर हा एक पूल होता जो अनेक विषम आर्थिक वर्गवारीतल्या लोकांना एकाच अदृश्य मंचावर जोडायचा! लोकांना याचं एक छुपं आकर्षण असण्यामागचं हे एक महत्वाचं कारण होय!
'कर लो दुनिया मुठ्ठी में' म्हणत लोकांच्या खिशावर हात साफ करण्याची नियत ही त्यांनी ठेवली नाही. सारं काही ओरबाडून खाण्यासाठी देशाची धोरणे आपल्याला अनुकूल करण्यासाठी त्यांनी कसरती केल्याचे वा आर्थिक हेराफेरी केल्याचेही कधी ऐकिवात नाही!
दारिद्र्यरेषेखालील माणसापासून ते उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत भारतात एक गृहीतक प्रचलित आहे ते म्हणजे कष्ट, सचोटी, विश्वास, जिद्द यांना मेहनतीची जोड लाभली की माणूस यशस्वी होतोच! सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या टाटांनाही हे ठाऊक असावे म्हणून त्यांनी वाममार्ग कधी निवडले नसावेत त्यामुळे सामान्य भारतीय माणसांना हा इसम जबर वंदनीय होता!
टाटांचे नाव आणखी एका विलक्षण हळव्या कारणाने साऱ्या देशाशी जोडले गेले ते म्हणजे 'टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल'! देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे रुग्ण येतात. आपण इथे बरे होणार नि आपला उपचारही वाजवी दरात होणार याची त्यांना जबर खात्री असते! इथे टाटांना ज्या दुवा मिळाल्या आहेत त्या अनंत आहेत! त्यांचे अनुकरण करत आताच्या काही औद्यगिक घराण्यांनी मांडके यांचे हॉस्पिटल घेऊन जो बाजार मांडला तेव्हा या खऱ्या हिऱ्याची लकाकी अजून तेजस्वी वाटू लागली!
टाटांनी आपल्या देशासाठी योगदान दिले आहे नि आपल्या बापजाद्यांना नोकऱ्याही दिल्या आहेत ही भावना अनेक शहरी मध्यमवर्गीयांच्या ठायी असण्याचं कारण म्हणजे टाटा समुहाच्या कोणत्याही शाखेत नोकरी मिळताच माणसं आश्वस्त होतात. 'चला, आता आपली गाडी मार्गी लागली' ही भावना त्यामागे असते. नव्या सहस्रकाचं वर्ष आलं नि मध्यमवर्गीय माणसाची नवी पिढी टाटांच्या 'टीसीएस'च्या नावाशी खिळून राहिली. त्यांच्या आधीची पिढी 'टेल्को'साठी श्रमलेली! हरी नरके सातत्याने टेल्कोविषयी लिहायचे, ही असते कृतज्ञतेची नोंद! आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना एका परिवारासारखं जपणारं घराणं म्हणजे टाटा!
भारतीय बाजारपेठेत फास्ट्रॅक घड्याळे आणि तनिष्क ज्वेलरी आली तेव्हा लोक त्यांना हसले होते! मात्र ही उत्पादने चालली कारण त्या त्या वर्गाची नस त्यांनी ओळखली होती. या अनुषंगाने अलीकडच्या पिढीचा टाटांशी असणारा जवळचा संबंध म्हणजे 'वेस्टसाइड'च्या मॉलमधली खरेदी! आपल्या बापाने आज्ज्या पणज्याने ज्यांची उत्पादने खरेदी केलीत त्यांची नाळ पुन्हा एकदा अधिक जोरकसपणे जोडण्याचे काम या क्लॉथ-चेनने केले आहे.
भारतीय गृहिणींची नि घरगुती बाजाराची नाडी ठाऊक असणाऱ्या टाटांनी बिग बास्केट, क्रोमा, स्टार बाजार, स्टार क्विक, टाटा क्लिक यांचं गारुड उभं केलं. औषधे पुरवठा करण्यासाठी 'वन - एमजी'ची सेवा सुरु केली.
एअर इंडिया ते विस्तारा नि पुन्हा एअर इंडिया हा त्यांचा हवाईसंबंध भारतीय माणसाला लोभस वाटतो कारण त्यामागची आत्मीयता नि आपुलकीचा व्यवहार! गृहनिर्माण, वित्तसहाय्य, पायाभूत संसाधने, पोलाद उद्योग, टेलिकम्युनिकेशन यातही त्यांनी जी भरारी घेतली त्याला कारण त्यांची कल्पकता! मानवी जीवनाशी निगडित सर्व महत्वाच्या क्षेत्रात त्यांनी आपलं योगदान देताना त्याला बाजारू स्वरूप येऊ दिलं नाही हे विशेष होय!
दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला तेव्हा ताज हॉटेल निवडलं होतं कारण भारतीय आदरातिथ्याचे ते सर्वोच्च नाव होतं नि आहे! अनेकांना तेव्हा हळहळ वाटली होती. टाटांच्या हॉटेलवर हल्ला झाला नसून आपल्याच कुणाच्या तरी जवळच्या माणसाच्या व्यवसायावर हल्ला झाला अशी लोकभावना होती. आजही ताज हॉटेल्सची अद्भुत अपूर्वाई टिकून आहे.
व्यापार आणि सेवा हातात हात घालून चालत राहतील यासाठी टाटा दक्ष राहिले, लोकाभिमुख सेवा देताना मान झुकलेली असली पाहिजे पण छाती अभिमानाने फुललेली असली पाहिजे अशी काहीशी त्यांची देहबोली होती! एखाद्या देखण्या राजकुमारासारखं राजबिंडं व्यक्तिमत्व असणारे रतन टाटा छानछोकी वा दिखाऊ भपकेबाजीत कधी दिसले नाहीत.
ममत्वाने भारलेला एक थकलेला वृद्ध वटवृक्ष, ज्याची मृदू देहबोली नि सात्विक तेज पाहता क्षणी थकवा दूर करे असं रतन टाटांचं वर्णन करता येईल. कुणाचं निधन होताच आपल्याच घरातलं कुणीतरी गेल्याचं फील आजकाल येत नाही मात्र रतन टाटा याला अपवाद आहेत! अलीकडील काळात माणूस मेल्याची बातमी अगदी ताजी असली तरी त्याची कुचाळकी सुरु होते! निव्वळ बोथट बधीर कालखंडात आपण सारेच जगत आहोत नि एका उत्तुंग उद्योगपतीच्या निधनाने अवघा देश शोकविव्हळ झालाय ही रतन टाटांची कमाई आताच्या अन्य कोणत्याही औद्योगिक घराण्यातील व्यक्तीस मिळेल याची सुतराम शक्यता नाही!
अमुक एका राज्याचा, भाषेचा, जातीचा, धर्माचा नि राजकीय विचारधारेचा अभिनिवेश त्यांच्या ठायी नव्हता! ते कोणत्या राज्याचे वा भाषेचे प्रतिनिधी कधीच वाटले नाहीत! कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत ते एकाच भावनेने ओळखले गेले ते म्हणजे अस्सल भारतीय!
एकशे चाळीस कोटी लोकांना व्याकुळ करून एक लक्ष्मीपुत्र त्याच्या विसाव्याकडे कायमचा गेलाय नि देश शोकमग्न झालाय हे रतन टाटांनाच जमलेय!
'सारी सोंगे आणता येतात मात्र पैशाचे सोंग आणता येत नाही' अशा अर्थाची म्हण आहे, त्यात वाढ करून असंही म्हणता येईल की कैक श्रीमंत होतील मात्र रतन टाटा कुणाला होता येणार नाही!
कारण हा माणूस अफाट श्रीमंत होता एव्हढीच यांची ओळख नव्हती! एकशेचाळीस कोटी लोकांच्या हृदयात त्यांना स्थान होते, ते इतरांना कसे लाभेल! हे अनमोल रत्न आज आपण कायमचे गमावून बसलो आहोत!
अलविदा रतन टाटा!
- समीर गायकवाड
Great article! For more information on job opportunities, check out Naukri Kendra.
उत्तर द्याहटवा