सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

कलात्मक अभिव्यक्तीवर धर्मवादाचे दडपण!

अभिव्यक्ती स्वातंत्र्य कला धार्मिक कट्टरतावाद सनातन


२०१७ साली मुंबईमधील बरेलवी रझा अकादमीने इराणी चित्रपट निर्माते दिग्दर्शक माजिद माजिदी आणि विख्यात भारतीय संगीतकार ए.आर. रेहमान यांच्या विरोधात बहिष्काराचा फतवा काढला होता. निमित्त होते एका सिनेमाचे, 'मोहम्मद - मेसेंजर ऑफ गॉड' या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर बनवलेल्या सिनेमामुळे देशातले कर्मठ मुस्लिम संतापले होते. सिनेमा तयार झाला नि रिलीजही झाला. २१ जुलै २०२० साली तो डॉन वाहिनीवरून ऑनलाइन स्ट्रीम होणार होता. रझावाले न्यायालयात गेले नाहीत त्यांनी सत्तेत असणाऱ्या महाआघाडी सरकारकडे याचिका दाखल केली की, या चित्रपटाचे महाराष्ट्रात प्रक्षेपण होऊ देऊ नये. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यास मान्यता देत सिनेमा प्रदर्शित होऊ दिला नाही. उलट त्यांनी केंद्र सरकारला विनंती केली की देश पातळीवरही बंदी लादली जावी. सर्व सोशल मीडिया साधनांवरून हा सिनेमा हटवण्याची त्यांनी मागणी केली होती. 'द वायर'मध्ये शुद्धव्रत सेनगुप्ता यांनी त्यावर कडक निर्भत्सना करणारा लेख लिहिला होता आणि राज्य सरकारच्या या निर्णयास आव्हान देणे गरजेचे आहे असे म्हटले होते. मात्र तसे काही झाले नाही.

१९९७ साली नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असणारा 'गुलाम-ए-मुस्तफा' हा सिनेमा आला होता. या सिनेमाचे मूळ नाव 'मुस्तफा' असे होते मात्र कर्मठ मुस्लिमांनी धमक्या देण्यास सुरुवात केल्यावर त्याचे नाव बदलण्यात आले नि 'गुलाम-ए-मुस्तफा' असे करण्यात आले. सिनेमाच्या पोस्टरवर नमाज पढायला बसलेला नाना होता मात्र त्याच्या पायाजवळ मुस्तफा ही अक्षरे आल्याने धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचा कांगावा केला गेला, परिणामी पोस्टर बदलले गेले. पोंक्षेचे नथुराम गोडसेवरील नाटक अभिव्यक्ती म्हणून पाहिली जाते का? त्याविषयी आक्षेप नोंदवले जातातच! विविध पुस्तके, सिनेमे, सिनेमांची नावे, संवाद यावरून आपले लोक लगेच भावना दुखावून घेतात ही गोष्ट नवी नाही! हे सर्वच धर्मातले लोक करत असतात, मात्र यात सारे लोक सामील नसतात; जे कर्मठ असतात ते यात अधिक गुंतलेले असतात!

पुण्यातला परवाचा नाटकाचा वादही धार्मिक भावना दुखावल्याचा आहे. नाट्यशिक्षणा अंतर्गत अभिव्यक्तीचे प्रकटन हा पाया होय. त्याचेच शिक्षण घेणे अभिप्रेत असते. त्यानुरूप अभ्यास, रिहर्सल आणि प्रकटन होत राहते. याचाच भाग असणारी परिक्षा पुणे विद्यापीठामधील ललित कला केंद्रात घेतली जात होती. यासाठी अख्खे नाटक सादर न करता छोटे छोटे प्रवेश सादर केले जात होते. त्यात विद्यार्थी आपापल्या आकलनशक्तीनुसार प्रवेश सादर करत होते. माहिती झालेल्या गोष्टींआधारे या प्रवेशाच्या नाट्यसंहितेनुसार दशावतारी रामायण करणाऱ्या कलावंतांच्या बॅकस्टेज मोमेंट्सवर हे नाटक बेतले होते. प्रवेशाअंतर्गत एक नाटक आहे ज्यातील कलावंत त्या नाटकातील पात्रांच्या गेटअपमध्ये आहेत आणि त्यातूनच त्यांच्यातले नाट्य समोर येते. सीतेचे पात्र साकारणारा कलावंत विंगेत धूम्रपान करतो, येडझव्या अशा शिव्या देताना दिसतो. त्याचबरोबर लक्ष्मणाची भूमिका करणारा त्याच गेटअपमध्ये या नाट्याच्या विंगेत रावणाच्या गेटअपमधील पात्राची मालिश करताना दिसतो! एकंदर नाट्याअंतर्गत नाटकातील पात्रे त्याच गेटअपमध्ये या मंचावर दिसतात नि त्यातून प्रहसन केले गेलेय. हे संदर्भ न देता या नाट्यप्रवेशाच्या क्लिप्स पाहिल्या तर असा समज होतो की यात सीता सिगारेट ओढते, वायझेड म्हणते! लक्ष्मण रावणाची पाठ दाबून देतो! हे पाहून देव देवतांवर श्रद्धा असणाऱ्या आस्तिक व्यक्तीस राग येणे साहजिक वाटावे असा हा काळ! अशा वेळी हा सर्व प्रकार काय आहे हे नीट समजावून सांगितले जाणे आणि समजावून घेतले जाणे गरजेचे होते. ते घडलेले दिसत नाही. दोन्ही बाजूने हमरातुमरीवर येत हातापायी झाल्याचे स्पष्ट झालेय. मारहाण झालीय याचा निषेध आहे.

इथे काही प्रश्न / शंका निर्माण होतात - मंचावर धूम्रपान करणारी पात्रे दर्शवणाऱ्या महाविद्यालयीन संहितेस अनुमती दिली जाते का? पौराणिक पात्रे जेंव्हा त्याच गेटअपमध्ये डे लाईफमधल्या गोष्टी करताना दिसतात तेंव्हा जी विसंगती निर्माण होते त्यातून उपरोध / प्रहसन आकारास येते. मात्र हे करताना मंचावर एखादे डिक्लेरेशन असते की ज्यानुसार धार्मिक भावना दुखवण्याचा कोणताही हेतू नसून हा काय प्रकारचा प्रयोग आहे त्याचा उल्लेख त्यात करता आला असता का? अभिव्यक्तीचा आधार घेत अशी नाट्यसंहिता लिहिली असेल हे मान्य. मग या नाटकातील पात्रांच्या मूळ गेटअप्स मधील भूमिका ज्या राम लक्ष्मण सीता या देवदेवता रंगवणाऱ्या आहेत त्याबद्दल आक्षेप आले तर त्यावर संबंधितांचा मानस काय होता? देशातील वातावरण इतके कोलाहलग्रस्त आणि नाजूक झालेले असताना अशा स्वरूपाच्या नाट्यप्रकारांची नेमकी अनिवार्यता किती आहे याचे भान असू नये का? डार्क ह्युमर म्हणून जरी याकडे पाहिले तरी वायझेड म्हणत शिव्या देऊन सिगारेट पिणारे सीतेच्या गेटअपमधील पात्र नॉर्मल गेटअपमध्ये असते तर त्यात प्रहसन विनोदनिर्मितीच झाली नसती मग यासाठी याच देवदेवता निवडण्याऐवजी काल्पनिक देवदेवता निवडता आल्या नसत्या का? मारहाण करण्याऐवजी वास्तव जाणून घेऊन हरकत नोंदवता आली नसती का? ज्या गोष्टींवर आक्षेप आहे त्याविषयी संबंधितांकडे आपले म्हणणे मांडता आले नसते का? सादर केल्या जाणाऱ्या नाटकामुळे अशी काही रिऍक्शन येईल याची संबंधितांना पुसटशी कल्पना नसेल तर त्यांचे सामाजिक आकलन कमी आहे असे म्हणावे का?

हिंदुत्ववादी नेहमी एक प्रश्न विचारत असतात की वारंवार आमच्याच देवदेवतांची टिंगल का केली जाते? अन्यधर्मीय देव देवता, धर्मगुरु यांची टवाळकी करणाऱ्या गोष्टी का निर्मिल्या जात नाहीत! प्रांजळपणे विचार केला तर यात तथ्य दिसते. इस्लाममध्ये कट्टरतावाद अधिक असल्याने नि थेट फतवेच काढले जात असल्याने त्यांच्या वाट्याला कुणी जात नसावे, तुलनेने हिंदू खूपच सहिष्णू म्हणावेत का? मात्र काळ बदलला तसे विचारधारेचे प्राबल्यही बदललेय. हिंदूंनाही वाटते की आमच्या देवदेवतांची टवाळकी होऊ नये, अन्यधर्मीयांच्या देवदेवतांविषयी झापडे लावून गप्प असणारे आपल्याच धर्माच्या देवदेवतांची टवाळकी करतात हे जाणीवपूर्वक होते असे त्यांना वाटू लागलेय. याला कारण काही लोकांचे सोयीस्कर मौन होय. चार्ली हेब्दोवर हल्ला झाला तेंव्हाही व्यापक आवाज उठवला जायला हवा, सलमान रश्दी ते तस्लिमा नसरीन यांच्या नावाचे फतवे काढले जातात तेव्हाही निषेधाचा स्वर हवा. निषेध जातधर्म पाहून नकोय, ज्यांनी ज्यांनी अभिव्यक्तीचा गळा दाबला त्यांच्याविरोधात निषेधाचा समान सूर हवा! तसे आपल्याकडे दिसत नाही! अर्थातच याचा दुसरा अर्थ असाही होतो की धर्मसत्तेमुळे भिकेला लागलेल्या इस्लामप्रवण देशात धार्मिक श्रद्धा / ईशनिंदा हा जसा अत्यंत नाजूक मुद्दा करुन ठेवला गेलाय, त्या आडून कडवट धार्मिकवाद जोपासला गेलाय तो आपल्याकडेही हळूहळू रुजू लागलाय! आपल्याला त्यांच्या वाटेवरुन जायचेय का?

इतके सारे घडत असताना अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पदाधिकारी मंडळींनी आणि पुण्यातील नाट्य परिषदेच्या शाखेने जे मौन धारण केलेय ते विलक्षण क्लेशदायक आणि निषेधार्ह आहे. तातडीने त्यांनी दोन्ही बाजूंच्या मंडळींची भेट घेऊन नेमकी काय स्थिती आहे आणि काय घडले आहे याचे खरे चित्र समोर आणायला पाहिजे होते. एका प्राध्यापकास यासाठी अटक झाली असताना एरव्ही संप आंदोलने करणारी त्यांची संघटनाही गप्प राहिली. या सर्वावरून स्पष्ट होते की कुणालाही ठोस भूमिका घ्यायची नाहीये, दुसऱ्याच्या काठीने साप मारायचा आहे! वाईटपणा कुणी घ्यायचा हा आपल्याकडचा मोठा प्रॉब्लेम आहे. या सर्वांत नुकसान नाट्यचळवळीचे आणि सामाजिक विषयांवर चांगली भूमिका मांडू इच्छिणाऱ्या नाट्यकृतींचे होते! हे सर्व टाळता आले असते. एकोपा व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणे गरजेचे आहे.

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा