शनिवार, ३० मार्च, २०१९

आयसीसच्या कथित नायनाटाचे वास्तव..

आयसीसच्या कथित नायनाटाचे वास्तव पूर्वप्रसिद्धी दैनिक दिव्य मराठी दि.३०/०३/१९  

२१ मार्च रोजी 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया' 
(आयसीस) या जहाल अतिरेकी संघटनेचा नायनाट झाल्याची बातमी जगभरात झळकली आणि उजव्या विचारसरणीच्या अनेक पाठीराख्यांनी सर्वत्र आनंद व्यक्त केला आणि इस्लामी मुलतत्ववादावर विजय मिळवल्याची भावना जाणीवपूर्वक दृढ केली गेली. अनेकांना 'आयसीस'च्या कथित पराभवापेक्षा इस्लामी कट्टरतावादयांना परास्त केल्याचं समाधान अधिक सुखावून गेली. आता इस्लामी मुलतत्ववाद आटोक्यात आणण्यास वेग येईल अशी भावना पसरवली जाऊ लागली, भाबड्या समर्थकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून तशा कंड्या पिकण्यास सुरुवात केली. याला जगभरातल्या माध्यमांनी खतपाणी घातले. या सर्व आनंदावर विरजण घालणारे वृत्त 'द ऍटलांटिक' या नियतकालिकाने दिले आहे.

'द ऍटलांटिक' हे एक जबाबदार आणि जागतिक ख्यातीचे नियतकालिक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असलेले अमेरिकन उद्योगपती डेव्हिड ब्रॅडली हे त्याचे मालक आहेत. नॅशनल जर्नल अँड हॉटलाईन, क्वार्ट्झ आणि गव्हर्नमेंट एक्झिक्युटिव्ह ही त्यांची अन्य प्रकाशने आहेत. नुकताच त्यांनी 'द ऍटलांटिक'ची मोठी भागीदारी ऍपलचे संस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवर जॉब्स यांना विकला आहे. तेंव्हापासून तर यातील निर्भीड आणि लोककल्याणकारक भूमिकेस धार आलीय. आयसीसवरील आर्टिकल लिहिणारे डेव्हिड केनर हे लेबॅनॉनची राजधानी बैरुत येथील निवासी पत्रकार आहेत. त्यांनी विशेष मेहनत घेऊन तपशीलात जात हा अहवाल दिलेला आहे. ही सर्व पार्श्वभूमी पाहता यातील सत्यतेवर प्रश्नचिन्ह लावता येणार नाही. डेव्हिड केनर यांच्या रिपोर्ताजनुसार आयसीसचा खात्मा झाला असं आपल्याला केवळ मानसिक समाधान मानावं लागेल अशीच सिरीयातली स्थिती आहे. ते लिहितात की इस्लामिक स्टेटच्या ताब्यात भौतिक दृष्ट्या कोणताही प्रदेश नसला वा त्यांची कोठेही सत्ता नसली तरी देखील सक्षमपणे ते त्यांना हवं असलेलं उपद्रवी प्रॉडक्ट विकू शकतात ते म्हणजे राजकीय हिंसा !

अमेरिकन सैन्याच्या मदतीने सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसने (SDF) बागूज या इस्लामिक स्टेटच्या गडावर ताबा मिळवत आपला पिवळा झेंडा फडकावला तेंव्हा जगभरातून आलेल्या जिहादींसाठी हे शेवटचं ठिकाण असल्याचं सांगण्यात आलं होतं. सिरीयामधील बंडखोरीला संपुष्टात आणल्यानंतर इस्लामी मुलतत्ववादाचा सफाया केल्याचा दावाही त्याच दिवशी केला गेला. तदअर्थाचे ट्विट खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी केलं. मात्र वास्तव तसे नाही. अफगाणीस्तान, पाकिस्तान, ओमान, जॉर्डन, पॅलेस्टाईन, इजिप्त, टर्की, फिलिपिन्स, सोमालिया, नायजेरिया, केनिया या देशांत इस्लामी मुलतत्ववाद टिकून आहे. भारतात देखील त्याची उदाहरणे तुरळकपणे समोर येताना दिसताहेत. आता आयसीसचा विनाश केल्याचे बोलले जात असले तरी अशाच आशयाची घोषणा डोनल्ड ट्रम्प यांनी गतवर्षीही केली होती आणि तिथले अमेरिकन सैन्य परत बोलावत असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यावर अंमल केला नव्हता. आता मात्र अमेरिकन सैन्य खरोखरच परतेल.  

सिरीयन गृहयुद्ध हे खऱ्या अर्थाने सिरीयन राजवट आणि बंडखोरांचे युद्ध नव्हतेच. अमेरिकेसह मित्र राष्ट्रे अध्यक्ष बशर अल असाद यांच्या विरोधात होती. तर रशिया आणि चीन यांचा असाद सरकारला पाठींबा होता. अरब राष्ट्रे तमाशबीन बनून राहिली. सिरीयामधील तेलसाठे हाच खरा कळीचा मुद्दा होता. इराकमधील तेलसमृद्धीवर जसा डोळा ठेवून तिथं सद्दाम हुसेन यांची राजवट उलथवण्यात आली तसं इथं अमेरिकेला घडवता आलं नाही. इराकमधील प्रदीर्घ सैनिकी कारवाईचा वेळोवेळी आसरा घेत अमेरिकन राज्यकर्त्यांनी राष्ट्रवादाला व अमेरिकन वर्चस्ववादाला हवा देत निवडणुका जिंकल्या मात्र त्याने आर्थिक बाजूस झळ सोसावी लागली. डोनल्ड ट्रम्प यांनी हीच भूमिका बदलत जगासाठी अमेरिकन सैन्य फुकट फौजदाराच्या भूमिकेत उतरवण्याचा पवित्रा बदलत जिथे थेट फायदा तिथेच हस्तक्षेप हे धोरण अवलंबणार असल्याचे सुतोवाच केलेय. त्यांच्या जाहीरनाम्यातदेखील त्यांनी याचा उल्लेख केला होता. त्यांच्या याच धोरणाचा एक भाग म्हणून या आयसीसच्या नायनाटाच्या फसव्या घोषणेकडे पाहता येईल. 

सिरीयन गृहयुद्धाअखेरीस आयसीसचे सर्व बंडखोर शरण आल्याचा दावा केला जातोय मग जे हजारो सिरीयन तरुण आणि किशोरवयीन मुले आयसीसमध्ये भरती झाल्याचं सांगितलं गेलं त्यांच्या बेपत्ता घोषित करण्यामागे हतबलता दिसून येते. एका वेळी सिरीया आणि इराकमधील तब्बल 88 हजार चौरस किलोमीटर परिसरावर ताबा असलेल्या आयसीसच्या ताब्यात आज एकही सलग भूप्रदेश नाही हे जरी मान्य केले तरी आयसीस संपल्याचा दावा चुकीचा ठरतो याचे कारण आयसीसची आर्थिक भक्कम तटबंदी अजूनही मोडली गेली नाही आणि नजीकच्या काळात ती मोडली जाण्याची कोणतेही ठोस धोरण दिसून येत नाही. 

डेव्हिड केनर यांनी नाव पत्त्यांच्या पुराव्यानिशी आयसीसच्या आर्थिक जाळ्याचा लेखाजोखा मांडला आहे. आयसीसचे बंडखोर कायिकदृष्ट्या दृश्यवत नाहीत पण ते छुप्या साखळीत कार्यरत आहेत. हे लोक लेबनीज राजधानी बैरुतमध्ये देखील सक्रीय आहेत. सीमेवरील कोणत्याही देशातून सिरियामध्ये कुठेही पैसे पाठवता येतात, या पैशांतुन अतिरेक्यांची साखळी जिवंत राहते. सीरियन बँकांचे खस्ताहाल अतिरेक्यांच्या पथ्यावर पडले आहेत. सीरियन तेलसाठे जरी त्यांच्या ताब्यात नसले तरी तेलपुरवठा प्रभावित करण्याची उपद्रवक्षमता अजूनही ते राखून आहेत व त्याचा पुरेपूर वापरही करताहेत. तेलसाठ्यांच्या अवैध विक्रीतून येणारे चलन त्यांना अजूनही पेट्रोडॉलरमध्ये कन्व्हर्ट करून मिळतेय. आपल्याकडे बेकायदेशीर आर्थिक उलाढालीसाठी जी हवाला पद्धती गुप्तपद्धतीने कार्यरत आहे ती तिथे खुलेआम सुरु आहे. इतकेच नव्हे तर तिथं काम करणाऱ्या विविध मानवाधिकार संघटनांच्या स्वयंसेवकांना, कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत पाठवायची झाली तर हेच नेटवर्क वापरावे लागते हे इथले काळे सत्य आहे !

आयसीसची आर्थिक नाकेबंदी करताना त्यांची जगभरातील खाती गोठवून त्यांना आर्थिक एक्सेस नाकारत त्यांचा कोंडमारा करण्याचे अमेरिकेनं जाहीर केलं असलं तरी सिरीयामधील आयसीसच्या ताब्यातील मुक्त रोकड चलनाला आवर कसा घालायचा हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. चलनबंदी वा बदली करण्यास असाद यांचा विरोध आहे हे विशेष ! जागतिक घटकांनी येथून लक्ष काढल्यानंतर आयसीसचे बंडखोर पुन्हा सक्रीय होऊन नागरिकांवर कर लादू शकतात. तेलसाठे ताब्यात घेऊ शकतात जेणेकरून असाद सरकारची पुरती नाकेबंदी होऊ शकते. किंबहुना आजघडीला भूमिगत अवस्थेतील आयसीसचे नेटवर्क त्याच दिशेने काम करते आहे. इराकमधील इर्बिल शहरात टाकलेल्या छाप्यात स्पष्ट झालेय की आयसीसने अनेक उद्योगांना पतपुरवठा केला असून त्यातून येणाऱ्या उत्पन्नाचे ते भागीदार आहेत.  टर्कीच्या माध्यमातून थेट करिबियन बेटापर्यंत आयसीसने अर्थपुरवठा केल्याचे सिद्ध झालेय. राजधानी अंकारामध्ये स्मगल केलेल्या तेलाचे अनेक खरेदीदार आयसीसच्या व्यावसायिक ग्रुप्सच्या संपर्कात आढळले आहेत. फवाज मुहम्मद जुबैर अल रावी या एका आयसीसच्या म्होरक्याचे हे लागेबांधे आहेत जे उघडकीस आलेत. यावरून समग्र आयसीसच्या आर्थिक जाळ्याचा अंदाज यावा. सद्दाम हुसेन यांच्या पाडावानंतर मोसुल शहराची पुनर्रउभारणी करताना अल कायदाच्या अतिरेक्यांनी लुबाडणूक, अपहरण, लुटमार, खंडणी, बोगस कामे यांची नीती अवलंबत जी यंत्रणा राबवून पहिल्यापेक्षा अधिक माया गोळा केली होती तो पूर्वानुभव पाहता सिरियातील अनागोंदी भविष्यातील तथाकथित पुनर्वसनात आयसीसचे बंडखोर चांगलेच उखळ पांढरे करून घेतील. उत्तर इराकमधील जो भूभाग एके काळी आयसीसच्या ताब्यात होता तो पूर्णतः उधवस्त झाल्याने तिथे मोठ्या प्रमाणात बांधकामे व सर्वाजनिक उपक्रमांच्या उभारणीची कामे सुरु आहेत. केवळ या कामाकरिता इराकी सरकारला तब्बल तीस दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची गरज आहे. यासाठी विविध वित्तसंस्थांनी पैसा पुरवला आहे. मात्र हा पैसा आयसीसनेच नावे व यंत्रणा बदलून फिरवला असल्याची शक्यता आता वर्तवली जातेय. 

हा सर्व झाला नीतीचा भाग पण इस्लामी मुलतत्ववादी मानसिकतेचे काय करणार ? इस्लामी मुलतत्ववादयांसोबत लढताना अमेरिकेस नकळत माघार का घ्यावी लागली हे स्पष्ट करताना 'विथड्रॉइंग अंडर फायर : लेसन्स लर्न्ड फ्रॉम इस्लामिस्ट इन्सर्जन्सीज' या पुस्तकात लेखक जोशुआ ग्लेस म्हणतात की ज्या अट्टाहासापायी आपल्या मुख्य भूमीला धोका होऊ लागतो, आपली एकता आणि सार्वभौम रचना धोक्यात येऊ लागते, लोकांमध्ये अविश्वास निर्माण होऊ लागतो व धर्म- पंथ यावर आधारित दरार पडू लागते तेंव्हा शासकांनी प्रथम प्राधान्य आपल्या मुख्य भूमीच्या संवर्धनास दिलं पाहिजे त्यासाठी विद्रोहयांच्या समोर बोलणी करताना प्रसंगी माघार घेतली तरी हरकत नाही. पण त्यापायी अशा गोष्टी पणाला लावणं योग्य नाही ज्यांच्या जडणघडणीस शतकांचा काळ लागलेला असतो.  दीर्घ काळ चालणाऱ्या या लढ्यात इस्लामी मुलतत्ववादीच जिंकतात असं नसून ते हरतात पण समोरच्यास नमवतात. जोडीने त्या भागाचं आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक नुकसान ते करतात त्याची मोजदाद कशात करणार हा प्रश्न उरतोच. 'वेजिंग इनसर्जंट वॉरफेअर' या संशोधनपर पुस्तकात सीथ जोन्स लिहितात की इस्लामी मुलतत्ववादयांच्या विद्रोहास लोकांची साथ मिळते याची खूप कारणे आहेत, 'आधीच कमी असलेलं उत्पन्न घटत जाणं, धार्मिक धृवीकरण आणि पंथीय भेदातून उद्भवलेलं आक्रमक नैराश्य ही कारणे जिथे जिथे जनतेत वाढीस लागतात तिथे इस्लामी मुलतत्ववादयांचे फावते. याच्या जोडीला मग विद्रोही अशी व्यवस्था तयार करतात की तिथं अस्तित्वात येणारं प्रत्येक सरकार तकलादू आणि कुचकामी वाटू लागतं. भरीस भर म्हणजे अशा भागातील उत्पन्नाच्या साधनांवर ते आपलं नियंत्रण ठेवतात. अशी परिस्थिती निर्माण झाली की त्या भागातले बेरोजगार, भुकेले, अल्पशिक्षित, नडलेले, गरजू, धर्मवादी, अंधानुयायी, मानसिक खच्चीकरण झालेले तरुण खूप सहजतेने विद्रोही इस्लामी मुलतत्ववादयांकडे सहज वळू लागतात. जोन्स लिहितात की हा फ्लो जे सरकार वा जी यंत्रणा थांबवू शकते त्यांनाच त्या भागात या समस्येवर यश मिळू शकतं. पण ते स्थायी नसून कालबद्ध असतं कारण एकदा धार्मिक कट्टरतावादाची पाळेमुळे रुजली की ती काही पिढ्या तरी जारी राहू शकतात. अशा वेळी मुलतत्ववाद्यांचे बंड मोडून काढण्यासाठी केवळ लष्करी कारवाई हे उत्तर कधीच यशस्वी होऊ शकत नाही. त्याने फार तर काही काळ मानसिक समाधान मिळते पण मूळ समस्या आहे अशी राहते. आयसीसचे  दहशतवादी तात्पुरते संपले असले तरी समस्या जैसे थेच आहे हे मान्य करावेच लागेल.

- समीर गायकवाड.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा