बुधवार, ६ मार्च, २०१९

रेड लाईट डायरीज - सुटका


नित्य सराईतपणे रखेलीकडे यावं तसं
चंद्र रात्रीच्या दारापाशी येतो,
सोबतीला कधी चांदण्यांचा चमेली गजरा आणतो
तर कधी तारकांचा गुच्छ !

चंद्रवेडी रात्र तासकाटयाच्या चौकटीवर एका हाताने रेलून
क्षितिजाच्या तोरणाखाली उभी असते.
इच्छा असो, नसो
आपल्या बिजवर देहाला तिला सजवावं लागतं,

कधी मदालसेची उत्तानता तर
कधी मेनकेचा उन्माद डोळ्यात रंगवावा लागतो.
अंधार जसजसा वाढत जातो तसा
चंद्र रात्रीच्या देहावर स्वार होतो,

अंगातलं तुफान उधळून देतो,
पश्चिमपूर्व गतीने कूस बदलत राहतो.
अनैतिकतेचे नरककुंभ सांडावेत तशी
रात्र विवस्त्र होत जाते,

काळेकुट्ट अंतराळ अंधारकाचांनी
चंद्रासाठी चिरकाल सजवत राहते,
रात्रभोगाचं चौंडकं असह्य झालेली
एखादी भ्रमिष्ट उल्का स्वतःला कोसळवते,

दिशांच्या षंढत्वाला उबलेला एखादा धुमकेतू
नुसताच पाहत जातो.
चंद्रदंशाचा कैफ अनुभवत अजस्त्र काळ
घड्याळाचे काटे सरकवत राहतो.

रात्रीच्या कायेवर संस्कृतीचे सैतानी सुक्तकोश ओकून झाल्यावर
चोर पावलाने चंद्र निघून जातो.
म्लान झालेली गर्भगळीत रात्र
आपल्या वस्त्रांच्या चिंध्या काळ्यानिळ्या ढगात शोधू लागते,

मेघांच्या अभ्र्यात आपलं निर्लज्ज तोंड खुपसून
ती मूक आक्रोश करत राहते.
रात्र अस्ताला जाते पण
तिचं रक्तन्हाण माथ्यावर घेऊन सूर्य उगवतो,

सभ्यतेचा बुरखा पांघरून दिवसभर
प्रत्येक कानाकोपरयावर स्वतःची पूजा करवून घेतो.
जणू काही घडलेच नाही अशा तऱ्हेने
आपल्या पुरुषत्वाच्या प्रकाशकथांचे असत्यकथन करतो...

रात्रीच्या करपलेल्या हृदयाची प्रतिबिंबे जतन करणाऱ्या समुद्राने
एके दिवशी बंड केले.
तेंव्हापासून महिन्यातून एकदा,
रात्र रजस्वतेचा आनंद घेते ; तेव्हढीच तिची सुटका !

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा