महिला टेनिसचा तो खऱ्या अर्थाने सोनेरी काळ होता असे म्हटले जाते कारण पुरुषांच्या सामन्यांहून अधिक लोकप्रियता या दोघींच्या सामन्यास लाभे. चुरशीच्या द्वंद्वावरून यांच्यातलं नातं सहज सुलभतेचे नसेल असं कुणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. या दोघी बेस्ट फ्रेंड्स होत्या ! आणि आजही त्यांच्यातल्या मैत्रीचा गंध सीमापार दरवळतो आहे.
मार्टिना नवरतिलोवा आणि ख्रिस एव्हर्ट यांचे टेनिस कौशल्य अफलातून होते. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात विम्बल्डनपासून रोलँ गॅरोसपर्यंत त्यांनी महत्वाची सर्व टेनिसकोर्ट्स गाजवली. मार्टिनाचा जन्म झेकोस्लोवाकियाचा होता. वयाच्या सोळाव्या वर्षी तिने अमेरिकेकडून खेळण्यास पसंती दिली. तिथेच तिची गाठ पडली जन्माने अमेरिकन असलेल्या ख्रिस एव्हर्टशी ! ख्रिसची आई कोलेट तिला सरावासाठी घेऊन येत असे. मार्टिनाची त्या दोघींशी गट्टी जमली. ती मैत्री आजही कायम आहे.
ग्रँड स्लॅमसाठी या दोघीत चुरस असे. ख्रिस आणि मार्टिना यांच्यात जेंव्हा अंतिम सामने असत तेंव्हा प्रेक्षकांत टसल टेन्शन राही. मात्र सामने संपल्यानंतर जय पराजय जाहीर झाल्यानंतर लॉकररूममध्ये फक्त या दोघीच असत. दोघींपैकी एक रडत असे आणि दुसरी तिचे सांत्वन करत असे. हे खूप कमी लोकांना ज्ञात होतं. कारण जगाने त्यांच्यातली स्पर्धाच पाहिली होती, मैत्री पाहिलीच नव्हती.
१९८६ मध्ये ख्रिसचा घटस्फोट झाला आणि ती कोलमडून पडली तेंव्हा मार्टिनाने तिला सपोर्ट केले. मानसिक स्थैर्य लाभावे म्हणून मार्टिनाने ख्रिसला आपल्या घरी आणले. ख्रिसला तिथे खऱ्या अर्थाने आधार लाभला, वैवाहिक जीवनातील वादळाच्या धक्क्यातून तर ती सावरलीच खेरीज याच दरम्यान तिच्या भावी साथीदाराशी तिची भेट झाली. पुढे त्यांचा विवाह झाला तेंव्हा मार्टिनानेच सारे नियोजन केलेलं !
ख्रिस आणि मार्टिना दोघीही अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात राहतात. मार्टिना मियामीत राहते तर ख्रिस बोकरटोन शहरात राहते. त्यांच्यातली मैत्री काळागणिक दृढ झालीय. दिड दशके एकमेकाविरुद्ध उभं राहूनही जिवलग मैत्र कसं होता येतं याचं हे दार्शनिक ठरावं.
स्त्रिया फार भांडकुदळ असतात, कजाग असतात, त्यांच्यात हेवा मत्सर अधिक असतो असंच आजवर आपल्या मनावर बिंबवलं गेलेलं असल्याने अशा प्रकारची निकोप मैत्री आपल्या पचनी पडत नाही.
आपण ज्यांच्याशी चुरस केलेली असेल, इर्षा केली असेल, दैनंदिन जीवनात एकमेकासमोर उभे ठाकलेले असू आणि तरीही आपल्यात अत्यंत निकोप सच्ची मैत्री असेल तर आपली मने खूप नितळ नि संयमी असतात !
खरे तर प्रत्येकास मित्र असतात मात्र हरेक परिचित व्यक्ती म्हणजे मित्र नसते.
मित्र, मैत्रीण म्हणून आपण ज्यांच्यासोबत आनंदाचे क्षण शेअर करतो ते सर्व मित्र आणि ते आनंदक्षण आपल्या सदैव स्मरणात राहत नाहीत.
मात्र ज्यांच्यासोबत आपलं दुःख, आपली वेदना हतबलता शेअर केलेली असते, ज्यांच्या खांद्यावर माथा टेकून आपण अश्रू ढाळलेले असतात ते मित्र आणि ते क्षण कायम आपल्या स्मरणात राहतात.
ते क्षण आपण कधीही विसरू शकत नाही, किंबहुना ते आपल्या स्मृतींचा अविभाज्य घटक झालेले असतात.
मित्र निष्पाप लंगोटीयारीपासून ते चितेस अग्नी देईपर्यंत आयुष्यभर सोबत असतात.
शाळेत असताना चुगल्या करणारे, कॉलेजमध्ये असताना सेटिंग करून देणारे आणि लग्नानंतरच्या सर्व भल्याबुऱ्या गोष्टीत सांभाळून घेणारे मित्रच असतात.
"संध्याकाळी ये रे, आपण बसू !" असं म्हणणारेही मित्र असतात.
मित्र धूरसोडे असतात, निव्वळ चखणा खाणारे असतात, अव्याहत बकबक करणारे असतात आणि केवळ मुकाटपणे ऐकत ढोसणारेही असतात.
"साल्या माजलास का, साधा एक फोन करता येत का नाही तुला ?" असं ठणकावून विचारणारेही मित्रच असतात.
आता तुला माझी गरज उरली नाही रे, असं म्हणून रुसणारे अन पुन्हा दुसऱ्याकडून आपली ख्यालीखुशाली जाणून घेणारेही मित्रच असतात.
अडचणीत सांभाळून घेणारे अन प्रसंगी दोन कानशीलात लावून चुका सुधारवून घेणारेही मित्रच असतात.
मित्र हरतऱ्हेचे असतात.
काही 'टेबल'यार असतात तर काही गल्लीदोस्त तर काही बेंचमेट्स,
काही क्लासमेट्स असतात.
तर काही फक्त खायला प्यायला सोबत असले तरी मनाशी जुळून असतात.
काही रूममेट्स असतात.
तर काही थेट सोलमेट्स असतात जे हृदयस्थ असतात !
बराच काळ परस्परांशी न बोलताही एकमेकांची मनातल्या गाभाऱ्यात आठवण काढतात, ते कधी फोनाफोनी करत नाहीत की मेसेजही पाठवत नाहीत, तरीही ते एकमेकाशी कनेक्ट असतात कारण त्यांच्यात एकच धागा असतो मैत्रीचा.
मित्र आपली बदनामी करत नाहीत, आपलं सिक्रेट जपून ठेवतात.
पाठीवर थरथरता हात ठेवतात. त्याचा खिसा हलका होत आलेला असला तरी मदत हवी का रे म्हणून हक्काने विचारपूस करतात.
आईवडील आपल्याला जन्मतःच लाभलेले असतात, भाऊ बहिणींसह सगळी रक्ताची नाती आपल्याला जन्माने लाभतात मात्र एकच नातं आपल्याला जन्माने लाभत नाही ते म्हणजे मैत्रीचे.
जगातला सर्वात कमनशिबी माणूस कोण असेल असं जर मला कुणी विचारलं तर त्यावर माझं उत्तर असेल की, ज्याला आपलं दुःख हलकं करायला मित्राचा खांदा लाभत नाही तो सर्वात भणंग माणूस !
कधी कुठल्या मित्राशी भांडलो असू, त्याच्याशी संवाद थांबवून मूक झालो असू वा आपसात रुसवा फुगवा होऊन कोषमग्न झालो असू तर आज त्याच्याशी पुन्हा कनेक्ट व्हायचं.
सरळ चुका कबूल करायच्या आणि नंतर मग त्याला मनसोक्त शिव्या द्यायच्या आणि त्याच्याकडूनही खायच्या.
यासाठी दोघेही आसुसलेले असतात. प्रश्न असतो कोण पुढाकार घेणार याचा.
कारण मैत्रीतही एक देखणा अहं असतो. बस्स त्याचं निराकरण करता यायला हवंच !
परस्परांचे गुणदोष खुल्या मनाने सांगता आले पाहिजेत, त्यांना स्वीकारता आले पाहिजे आणि परस्पर हितासाठी झटले पाहिजे, मग आपलीही अशीच कसदार दास्तान होते !
मैत्री कृष्ण सुदाम्यासारखी एक शब्द न बोलताही काळीज जाणून घेता येणारी हवी आणि उदय शेट्टी मजनूभाईसारखीही हवी, मिलबाटकर गांलिया खानेवाली !
मैत्री कृष्ण सुदाम्यासारखी एक शब्द न बोलताही काळीज जाणून घेता येणारी हवी आणि उदय शेट्टी मजनूभाईसारखीही हवी, मिलबाटकर गांलिया खानेवाली !
मैत्रीदिनाच्या शुभेच्छा...
- समीर गायकवाड
- समीर गायकवाड
धन्यवाद...
उत्तर द्याहटवा