सोशल मीडियापासून दूर असलेली माणसं अलीकडील काळात दृष्टीपथात नाहीत. अगदी खेडोपाडी देखील याचा बोलबाला आहे. पूर्वीच्या काळातला आर्थिक वर्गवारीचा भेद देखील याला अडवू शकला नाही. जाती, धर्म, वर्ण, वय, लिंग, भाषा, प्रांत, उत्पन्न इत्यादी सर्व बंधने यास रोखू शकली नाहीत हे सत्य आता सर्वमान्य झालेय. दिड जीबीचा डाटा हा आता विनोदाचा आणि मिम्सचा विषय होय पाहतोय. लोकांकडे फोन्स कुठून आले, रिचार्ज कसे परवडते किंवा हे सर्व पेलवते कसे हे सगळे विविध शास्त्रांचे विषय आहेत. खरा प्रश्न हा पडतो की माणूस सोशल मीडिया वापरतोय की सोशल मीडिया माणसाला वापरतोय ? हा प्रश्न म्हणजे निव्वळ शब्दच्छल नाहीये किंवा विभ्रमनिर्मितीचा मुद्दा नाहीये. हा एक महत्वाचा प्रश्न आहे जो पुढे जाऊन मानवी समुदायाला एका गंभीर नि धोकादायक वळणावर नेऊ शकतो. थोडंसं सुलभ करूया म्हणजे सहज मतितार्थ उमगेल.
आपण सोशल मीडिया वापरतो म्हणजे काय ? फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, लिंक्डइन इत्यादीत आपले अकाऊंट असते. माणसं लॉग इन करतात आणि त्यात हरवून जातात. तिथं काय होतं हे खूप गुंतागुंतीचं नाहीये. तिथे अगदी साधी प्रक्रिया अविरत सुरु असते. तिथे सुरु असतं स्क्रोलिंग ! तासंतास माणसं स्क्रोल करत राहतात. या वॉलवरून त्या वॉलवर, या ग्रुपमधून त्या ग्रुपमध्ये भरकटत राहतात. या प्रोफाईलवरून त्या प्रोफाईलवर जातात. डिस्प्ले पिक्चर, फोटो अल्बम, व्हिडीओ रील्समध्ये खोल खोल फिरत राहतात. पटापट चित्रे बदलत राहतात. मजकुरावरून नुसती नजर भिरभिरत राहते, मध्येच एखादा व्हिडीओ रन होतो, मध्येच एखादी ऑडीओ क्लिप प्ले होते, अचानकच टीझर येते, टिकटिक करणारे टिकर येते. मन एकीकडे असते, नजर एकीकडे आणि बोटांची हालचाल अविरत सुरु असते. खरी मेख इथे आहे. हे घडत असताना मेंदू, मन आणि अवयवांची हालचाल एका संदेशपद्धतीने होत नाही. म्हणजे आजवर जसे आपले मन मेंदूशी संलग्न राहून अवयवांची हालचाल घडवते तसे इथे होत नाही. बोटे सवयीने स्क्रोल होत जातात. भूक तहान तणाव वेदना इत्यादी संवेदना मागे पडतात. उरते फक्त अधीरता !
सोशल मीडियाने दिलेला सर्वात मोठा शाप जर कुठला असेल तर तो अधीरतेचा आहे. याचे नेमके काय परिणाम आपल्या येणाऱ्या पिढ्यांवर आणि मानवी जीवनमुल्यांवर होणार आहेत याचे अचूक ठोस निष्कर्ष अजूनतरी समोर आलेले नाहीत. मात्र जे चित्र समोर येतेय ते संवेदनशील मनास अंतर्बाह्य हलवून टाकणारे आहे. सोशल मीडियात पोस्ट, फोटो, व्हिडीओ वा मजकूर स्क्रोल होत नसून माणूसच स्क्रोल होतोय. इथे माणसं अधीरतेच्या कमाल पातळ्या गाठण्यासाठी पेटून उठलीत. एखाद्या चांगल्या वॉलवर, पोस्टवर ते थांबू शकत नाहीत. मोठा मजकूर सलग नि पूर्ण वाचू शकत नाहीत. झर्रझर्र पुढे जातात. या स्क्रोलिंगची सवय आस्तेकदम त्याच्या दैनंदिन जीवनातदेखील भिनू लागते आणि इथून सुरु होऊ लागलेय आपलं माणूसपण, इथून सुरु होऊ लागलंय आपलं डिजिटल आत्ममग्न स्वरूप जे सतत कसल्या न कसल्या तरी अज्ञात वस्तूच्या, घटनेच्या, अणूरेणूच्या शोधात आहे. हा शोध अंतहीन आहे आणि त्यातून सुरु असलेलं स्क्रोलिंग मानवी भावनांच्या मुळांवर उठलेले आहे.
सोशल मीडिया सातत्याने वापरणारी माणसं एकसलग एक गोष्ट करूच शकत नाहीत. ते गाण्याच्या मैफलीत गेले तर अस्वस्थ होतात कधी एकदा गाणं बदललं जातं आणि गायक दुसऱ्या गाण्यास प्रारंभ करतो याची ओढ लागून राहते. इव्हन गाणी ऐकत पाहत बसले तरी सतत गाणी बदलत जातात, जेमतेम एखादे कडवे देखील पूर्ण ऐकली जात नाहीत. टीव्ही पाहत बसले की मिनिटागणिक चॅनेल बदलत राहतात. आवडीचा सिनेमा देखील सलग पाहण्याची क्षमता हरवून बसलीय. कधी काळी लोक थियेटरवर जाऊन एकच सिनेमा कैकदा पाहत असत ही गोष्ट आता कुणाला खरी वाटणार नाही अशी स्थिती निर्माण झालीय. माणसं वाचनालयात खूप कमी जातात. पुस्तके वाचत नाहीत, जरी पुस्तक हाती घेतलं तरी भराभर पाने पालटत राहतात. वाचण्यापेक्षा चाळण्यावर भर जास्त असतो. कुठे भटकंती करायला गेले तर काही वेळच एका जागी बसू शकतात. अवघ्या काही मिनिटात त्यांना त्या जागेचा उबग येतो. कधी एकदा इथून निघून दुसरीकडे जातो यासाठी ते आतुर होतात. एखाद्या गावात सलग काही आठवडे महिने इतक्या काळासाठी जाऊन राहण्याचे दिवस जणू कालबाह्य झालेत.
इथेच हे दुष्टचक्र थांबलेले नाही. माणसं वेळ काढून बाहेर पडली, बाजारात गेली तरी ते एका जागी खरेदी करू शकत नाहीत. हे पाहू की ते पाहू, हे घेऊ की ते घेऊ अशी द्विधा मनस्थिती होते. ठरवतात एक आणि आणतात दुसरेच काही ! प्रवासात असले तर खिडकीबाहेरचं मोकळं स्वच्छंदी चराचर पाहत नाहीत की बाजूच्या सीटवरील सहप्रवाशाशी बोलत नाहीत, बगळ्याने मान वेळावून बसावे तद्वत मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसतात ! गप्पाष्टक सुरु झालं तर एका जागी अधिक वेळ बसू शकत नाहीत. कुठे सेलिब्रेशनला वा कार्यक्रमात गेले तर अवघ्या काही मिनिटातच आपलं वेगळं कोंडाळं करून बसतात. घरीदारी बाहेर कुठेही असले तरी बातम्या पाहताना भराभर स्क्रोल करतात, खरेतर ते बातम्या पूर्ण पाहतच नसतात. ते पाहतात फक्त हेडलाईन्स ! लोकांनी खोलात जाऊन विचार करणं आणि स्वतःला प्रश्न विचारणं बंद केलंय. अशाने स्वमग्नता वाढत चाललीय, परिणामी मन कशातच लागत नाही अशी त्यांची अवस्था झालीय. याचा अतिरेक ज्यांच्याबाबतीत झालाय ते आपल्या वागण्या बोलण्यातली सलगता हरवून बसताहेत.
हे यापुरतेच मर्यादित नाहीये. आपल्या भवतालावर याचा प्रभाव पडताना दिसतोय . जसे की पूर्वी थियेटरला लागलेले सिनेमे शंभर दिवस, सिल्व्हर गोल्डन डायमंड ज्युबिली साजरी करत आता आठवड्याला पोस्टर बदलले जाते. गाण्यांची शेकडो पोर्टल्स निघालीत. दिवसाला हिट गाणं बदलतं. हिट असण्याची व्याख्या अल्पकालीन झालीय. ज्याला त्याला आताच्या घडिला कुठला ट्रेंड सुरु आहे हे जाणून घेण्याची एक अनामिक ओढ लागून असते. माणसं ट्रेंडवेडी झालीत ! ते ट्रेंडप्रमाणे बोलतात, लिहितात, रडतात, हसतात, धावतात, थांबतात, श्रद्धांजली वाहतात, शुभेच्छा देतात ! जित्या जागत्या देहाचे रुपांतर बाहुलीत होऊ लागलेय. लोक नुसते धावताहेत, पुढे पुढे जाताहेत. कुणाला कुणासाठी वेळ नाही असं सर्रास ऐकायला येतं मग सोशल मीडियावर इतका अफाट वेळ कुठून देता येतो याचे उत्तर कुणीच देऊ शकत नाहीये. काय हवेय माहिती नाही मात्र अविरत शोध जारी आहे अशा विचित्र मानसिकतेत लोक पोहोचलेत. याचे सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक नि मानसशास्त्रीय परिणाम हळूहळू दिसू लागले आहेत. अशा वेळी वाट पाहावी टॉलस्टॉयच्या 'त्या' गोष्टीतल्या शेवटाची. जमिनीच्या हव्यासापोटी धावणाऱ्याच्या कोसळण्याची, आहे तो आनंद गमावून बसल्याची जाणीव होण्याची ! खऱ्या अर्थाने याची वाट पाहतोय. 'हाऊ मच लँड डज अ मॅन नीड' ही गोष्ट लिहिताना टॉलस्टॉयला आताचा काळ अभिप्रेत नसेल. मात्र खरे पाहू जाता ती सर्वकालीन असली तरी आताच्या काळात ती अधिक चपखल बसत्येय कारण माणसांच्या वागण्यात, विचारात, जीवनात, सामुदायिक वर्तनात जुने काहीच उरलेले नाही. माणसाचाच एक ट्रेंड झालाय. लोक श्वास कमी घेताहेत मात्र स्क्रोल अधिक होताहेत. लोकांचं स्क्रोल होणं वाढतच राहणार आहे म्हणूनच मी टॉलस्टॉयला शोधतो आहे. तुम्हालाही स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर त्याला शोधलंच पाहिजे. कुणी पाहिलेय का त्याला ?
- समीर गायकवाड
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवा