गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

नथीचा दुखरा कोपरा...

सामान्य स्त्रीच्या जीवनात नथीला खूप महत्व आहे. मात्र सभ्य स्त्रीच्या जगापलीकडे एक जग आहे जे पांढरपेशी विश्वाशी फारकत घेऊन आहे. या जगात देखण्या बायकांची भेसूर दुःखे आहेत. या दुःखांचा परमकाल या नथीशी संबधित आहे म्हणूनच यावर विचार झाला पाहिजे.

स्त्री काही दागिने परंपरा रिवाज म्हणून घालते तर काही दागिने हौस म्हणून तर काही दागिने शृंगारासाठी घातले जातात. यातील काही दागिने स्त्रीच्या शरीर सौष्ठवात भर घालतात तर काहींनी तिचे शरीर लवचिक राहण्यास मदत होते. माथ्यावरच्या बिंदी, भांगसरने सुरुवात होते आणि पैंजण जोड्व्याने इतिश्री होते.

अग्रफूल, गोंडे, केकत (केवडा), बेसर, मुरकी, मोहनमाळ, बोरमाळ, डोरलं, खोड, बाजूबंद, मणदोरा (कंबरपट्टा), कोल्हापुरी साज, अंगठी, छल्ला, पैंजण, अनवट, जोडवी असे एक ना अनेक दागिने आहेत तरीही नथीला महत्व आहे. याचं कारण काय असावं ?

माणसाच्या किर्तीला बट्टा लागला की लोक म्हणतात अमक्या तमक्याचे नाक चार लोकांत कापले !
कुणाची अपकिर्ती झाली असेल तर ते सांगताना सर्रास म्हटले जाते की तुझे नाक कापले होते का ?
कुणाला आवर घालायचा असेल तर म्हटले जाते की आता याच्या नाकदुऱ्या काढा !
बेअब्रू झाल्यावर आमच्या घराण्याचं नाक कापलं हो असं अजूनही म्हटलं जातं.
मनुष्याच्या मानसन्मानाशी नाक निगडीत आहे आणि त्या नाकाचा नथ हा सुबक दागिना आहे !
आता मूळ मुद्द्याकडे येतो.

एखाद्या कुमारिकेस वा तरुणीस जेंव्हा रेड लाईट एरियात आणले जाते, तिच्यावर बळजोरी केली जाते की तिने धंदा स्वीकारावा. कधी लादलेल्या इच्छेने तर कधी जोरजबरदस्तीने तिला राजी केलं जातं. चमडीबाजारात याची माहिती पुरवली जाते.

आंबट शौकीन लोकांना निरोप दिले जातात. दलाल चौतर्फा कामी लागतात.
त्या मुलीच्या पहिल्या रात्रीची किंमत ठरवली जाते आणि ती सर्वाना कळवली जाते. याला नथउतरन म्हणतात.

एखाद्या मुलीची नथ किती रुपयांत उतरवली गेली यावरून तिचे लाईनमधली व्हॅल्यू ठरते. नंतर बदली होत वेगवेगळ्या शहरी गावी मुलींची जेंव्हा पेशगी होत जाते तेंव्हा त्यात बदल होत जातात. ती व्हॅल्यू घटत जाते.,
ज्या प्रमाणे एखादा सीए एखादया निर्जीव वस्तूचे घटकाचे घसारामूल्य (डिप्रिसिएशन व्हॅल्यू) काढतो तशी त्या बाईची पोरीची किंमत काढली जाते आणि त्यात दरसाली घसरण होते. म्हणून नथ उतरतानाच्या भावाला महत्व असते.

या सगळ्या दुःखद आणि संतापदायी प्रकारास ज्याने कुणी नथउतरनचे नाव दिले तो हरामी देहवेडा असणार हे नक्की ! कारण पहिल्या रात्रीस वधूवर रत होताना एकमेकाची सगळी आवरणे उतरवत जातात आणि एकजीव होतात हा मूळभाव होय.

आधी घुंघट / पदर इथून सुरुवात होते आणि मग एकेक करून सगळी वस्त्रे बाजूला होतात. दागिने काढताना केस आधी मोकळे केले जातात, उतरत्या देहभाषेत अखेरीस पैंजण काढले जातात. आणि मिलनाआधी काढला जाणारा शेवटचा दागिना वा आवरण म्हणजे नथ होय !
एखाद्या स्त्रीची नथ बाजारात उतरवली गेली म्हणजे तिला रत व्हावे लागले असा रूढ अर्थ तिथे लावला जातो.

कामाठीपुऱ्यापासून ते सोनागाचीपर्यंत देशभरात असंख्य वेश्यांना भेटलो, त्यांच्या अंगावर विविध दागिने घातलेल्या विविध फॅशन केलेल्या बायकापोरी बघितल्या. अगदी हरेक वाण पाहिले. मात्र तिथे कधी कुठल्या स्त्रीला नथ घालून उभारलेलं पाहिलं नाही.

काहींना या बद्दल विचारलं तर डोळ्यात टचकन पाणी आलं ! वाटलं आपण हा विषय छेडून त्यांची दुखती नस नकळत अजूनच दुखावली. पुन्हा कधी याविषयी बोललो नाही. तीन दशके लाईनमध्ये राहून मरण पावलेल्या सावित्रीच्या मौतीस योगायोगाने हजर होतो. तिची अखेरची इच्छा होती की हिरवी साडी चुडा नेसवून तिला विदा केलं जावं. तिच्या बाकी इच्छा काही पुऱ्या झाल्या नाहीत मात्र नथ आवर्जून घातली होती.

तिला नथ घातल्यानंतर तिथली एकूण एक बाई धाय मोकलून रडली होती !
नथ त्यांना खूप हळवं करून जाते.

सामान्य पांढरपेशी जगात आपल्याला किती तरी गोष्टी अगदी सहज विनासायास मिळतात, तर आपल्याच जगात मात्र आपल्यापासून अनभिज्ञ असणाऱ्या जगात आपल्यासारख्याच हाडामासाच्या बायका साध्या साध्या गोष्टींसाठी तरसत असतात. नथ हा या बायकांचा अगदी हळवा नि आर्त कोपरा आहे. इथे डोकावलं तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं !

- समीर गायकवाड

३ टिप्पण्या: