Tuesday, October 5, 2021

प्रेमिस्ते...


विख्यात तमिळ चित्रपट दिग्दर्शक एस. शंकर हे एकदा रेल्वेतून चेन्नैला प्रवास करत होते तेंव्हा एक विलक्षण घटना घडलेली. त्यांच्या कंपार्टमेंटमधील एका प्रवाशाला दुसऱ्या सहप्रवाशाकडून कळले की आपल्या बोगीमध्ये आपल्या सोबत एस. शंकर हे प्रवास करताहेत. काही क्षण त्या प्रवाशाने विचार केला, मग मनोनिश्चय करून तो शंकर यांच्या पुढ्यात जाऊन बसला. त्याने आधी समोरील व्यक्ती शंकर असल्याची खात्री करून घेतली नि  पुढच्याच क्षणाला त्याने शंकर यांचे हात आपल्या हाती घेतले. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्याने शंकरना विनवणीच्या स्वरात एक प्रश्न केला, "सर मी एक कथा सांगतो तुम्ही त्यावर सिनेमा बनवाल का ?" शंकर बुचकळ्यात पडले. त्यांची द्विधा मनस्थिती त्या प्रवाशाने ओळखली आणि तो बोलता झाला, "ही काही काल्पनिक कथा नाहीये, ही माझ्या जीवनात घडलेली सत्यकथा आहे." त्याच्या उद्गारासरशी शंकरनी मान डोलावली. काही क्षण तो व्यक्ती गप्प झाला, शून्यात नजर लावून थिजून बसला. नंतर तो बोलत राहिला. कथा संपली तेंव्हा त्याच्या डोळ्यातले अश्रू काही केल्या थांबत नव्हते. त्या कथेने शंकर स्तब्ध सद्गदित झाले. तो प्रवासी पन्नाशीच्या आसपासचा होता, त्याने सांगितलेली जीवनकथा त्याच्या मुलीच्या बाबतीतली होती. त्या व्यक्तीला आपल्या चुकांचे प्रायश्चित्त करायचे होते आणि आपण केलेली चूक दुसऱ्या कुणी व्यक्तीने करू नये म्हणून त्यावर सिनेमा निर्मिती व्हावी अशी त्याची मनोमन इच्छा होती. शंकरनि त्याला शब्द दिला आणि त्यावर २००४ साली सिनेमा बनवला. 'काधल' हे त्याचे नाव. काधल म्हणजे प्रेम. सिनेमाने तिकीटबारीवर अक्षरशः टांकसाळ खोलली. अगदी लोबजेट सिनेमा होता तो, त्याच्या यशाने भल्याभल्यांनी तोंडात बोटे घातली. याच सिनेमाचा २००५ मध्ये तेलुगुमध्ये रिमेक झाला, त्याचे नाव होते 'प्रेमिस्ते' !

सोलापूर हे बहुभाषिक शहर असल्याने इथे तेलुगु, कन्नड, मराठी, हिंदी, इंग्लिशसोबत क्वचित तमिळ, मल्याळी सिनेमेदेखील इथे प्रदर्शित होतात. काही कन्नड सिनेमांनी इथे चक्क रौप्यमहोत्सव साजरा केलाय तसेच यश तेलुगु सिनेमांनीदेखील मिळवले आहे. सोलापुरात रौप्यमहोत्सव साजरा केलेल्या तेलुगु चित्रपटात 'प्रेमिस्ते'चा समावेश आहे. या सिनेमाची शहरात इतकी चर्चा झाली की तेलुगुमधील एक अक्षरदेखील न कळणाऱ्या अन्यभाषिकांनीही हजेरी लावली. शहरातली अनेक प्रेमप्रकरणे या काळात नेटकी हॅण्डल केली गेली असं भूतकाळ सांगतो. कैक प्रेमवीरांनी यापासून धडा घेतला तर कित्येकांनी आपल्या कुटुंबातील मुलामुलींच्या भावना जाणल्या. मुळात शहरातील तेलुगु समाज हा अगदी कष्टकरी नि प्रामाणिक म्हणून ओळखला जातो. तसेच संवेदनाशील भावनांचा ओढा या समाजात जाणवतो, त्यामुळे एका सत्यकथेवर बेतलेला तरुण पिढीच्या प्रेमाच्या जिव्हाळयाच्या विषयावरचा प्रेमिस्ते जेंव्हा गाजू लागला तेंव्हा हरेक चौकात यावर चर्चा झडल्या होत्या. प्रेमाची सर्वोच्च अनुभूती श्रेष्ठ की प्रेमाला सामावून घेणारा त्याग श्रेष्ठ याचं उत्तर सिनेमाने दिलं होतं !

प्रेमिस्ते ही मुरुगन आणि ऐश्वर्या यांची प्रेमकथा. मदुराई शहरातील एका छोट्याशा गॅरेजमध्ये मेकॅनिकचे काम करणाऱ्या मुरुगनचे आयुष्य अगदी साधेसुधे होते मात्र एके दिवशी एका उच्चकुलीन श्रीमंत मुलीचे त्याच्यावर मन जडते. तिथून मुरुगनच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्याने सुरुवातीला त्यांच्यातला विविध पातळ्यांवरचा भेद समजावून सांगितला, आपले नाते जुळू शकत नाही हे सांगितलं. मात्र ऐश्वर्याला यातलं काही ऐकून घ्यायचं नव्हतं.  अखेर दोघांचे एकमत होते. ते पळून जाऊन आपला मित्र स्टीफनच्या मदतीने लग्न करतात. आपल्या मुलीने परजातीतील गरीब मुलाशी लग्न केल्याचे कळताच ऐश्वर्याचे वडिल राजेंद्र यांच्या  तळपायाची आग मस्तकाला जाते. नावदांपत्याला भुरळ पाडून चेन्नैवरून मदुराईला बोलवले जाते. वाटेत त्यांना ऐश्वर्याच्या फार्महाऊसपाशी अडवले जाते, तिथे आधीच दबा धरून बसलेले तिचे नातलग त्यांच्यावर हल्लाबोल करतात. राजेंद्र मुरुगनला अत्यंत क्रूरतेने बेदम मारहाण करतात. ऐश्वर्याच्या गळ्यात बांधलेले मांगल्यम तिने आपल्या हाताने काढून फेकून द्यावे म्हणून जीवावर उठतात. ऐश्वर्या ते तोडून फेकून देते. अर्धमेला झालेला मुरुगन मांगल्यमचा धागा हातात घेऊन तिथून खुरडत खुरडत निघून जातो. काही दिवसांनी ऐश्वर्याचे लग्न इच्छेविरुद्ध लावले जाते. ती सासरी जाते, तिला मुलबाळ होते. तिच्या पतीचे तिच्यावर प्रेम असते. एकेदिवशी ती इलाजाच्या निमित्ताने चेन्नैला जाते तेंव्हा एका ट्राफिक सिग्नलवर एक मळकटलेला वेडा भिकारी तिला दिसतो आणि पुढच्याच क्षणी तिच्या लक्षात येते की हा तर मुरुगन ! त्या रात्री ती पतीच्या नकळत त्याला शोधत पुन्हा सिग्नलपाशी येते तर तो तिथेच हातवारे करत पुटपुटत उभा असतो, त्याच्या बोटांना करकचून बांधलेला मांगल्यमचा धागा अगदी त्याच्या कातडीत रुतलेला असतो. त्याला तशा अवस्थेत पाहून भररस्त्यात मध्यरात्रीस ऐश्वर्या टाहो फोडून आक्रोश करू लागते. तिच्या गगनभेदी किंचाळ्या ऐकवत नाहीत. इतक्यात तिचा पती तिथे येतो, आधी ती भेदरते. मात्र तो पुढे होत मुरुगनला आपल्या कवेत घेतो आणि एका बाजूला ऐश्वर्या नि दुसऱ्या बाजूला मुरुगनला घेऊन तिथून निघतो. इथे चित्रपट संपतो.  श्रेयनामावलीसोबतच माहिती येते की ऐश्वर्याच्या पतीने मुरुगनला आपल्या सोबत नेले आणि त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु केले. आत्म्यावर केलेले प्रेम हे खरे प्रेम आहे मगच तुम्हाला सत्याचा स्वीकार करता येतो ! 

सिनेमा संपतो तेंव्हा प्रेक्षक अक्षरशः धाय मोकलून थियेटरमध्ये रडताना दिसत होते.  या सिनेमाने अनेकांचे आयुष्य बदलवले. नंतर कन्नड, बंगाली आणि मराठीत देखील यावर सिनेमे बनवले गेले. प्रेमिस्तेने प्रेमाकडे कसे पाहायचे याची नवी दृष्टी दिली याबाबत कुणीच शंका घेणार नाही. २०१६ सालच्या सैराटमध्ये अशीच कथा होती मात्र तिचा पट आणि शेवट दोन्ही भिन्न होते. सैराटने मनातले मळभ रिते केले असले तरी त्यातून मन विषण्ण करणारी सत्यता समोर आली होती, तर प्रेमिस्तेने प्रेमाचा त्यागाचा नवा अध्याय लिहिला ! विशेष म्हणजे सोलापूरकर रसिक प्रेक्षकांनी या दोन्ही चित्रपटांना भरभरून दाद दिली होती. प्रेमिस्तेमध्ये नायक नायिकेची भूमिका करणाऱ्या भारत आणि संध्यासाठी या सिनेमाचे दक्षिणदरवाजे कायमचे खुले झाले. चित्रपट रसिकांना आजही प्रेमिस्तेची मोहिनी आहे हे खूप काही सांगून जाते. सोलापूरची बहुभाषिक संस्कृती समृद्ध करण्यात अशा चित्रपटांचा मोठा वाटा आहे कारण यामुळेच शहरातला एकजिनसीपणा वाढला आहे. तेलुगु मायमराठीची ही बहिण आहे आणि या बहिणीने इथल्या जनतेला खूप प्रेम दिले आहे. हा ही एक प्रेमाध्यायच होय !

- समीर गायकवाड  

2 comments: