बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

प्रेमात जगणं म्हणजे काय - मस्ट सी मुव्ही - '96' !


तमिळ चित्रपट '96' मधला हा सीन 'वन ऑफ द फाइनेस्ट प्रपोज' आहे !

'आय लव्ह यू' म्हणायची गरजही बऱ्याचदा पडत नाही कारण डोळयांची भाषा प्रेमात अधिक टोकदार असते.
तरीही 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' हे सांगता येणं हे देखील जगण्यासाठी पुरेसं असतं.
अनेकांना हे सांगता येत नाही, किंबहुना कित्येकांना व्यक्त होण्याची एकही संधी मिळत नाही.
सगळ्या गोष्टी मनात राहून जातात.

प्रेमाचा स्वीकार होवो न होवो मात्र आपण प्रेम करतो हे सांगता यायला हवं. समोरून ते अव्हेरलं गेलं तरी हरकत नसते कारण प्रेम देहावर थोडंच केलेलं असतं ! ते तर मनावर आत्म्यावर केलेलं असतं.
आपलं कुणावर तरी प्रेम जडणं ही भावनाच ज्यांच्या वाट्याला येत नाही त्यांचं जगणं थोडंसं आधं अधुरं असतं...

'व्हेल अँड बर्ड' या कवितेमध्ये व्हेल मासा आणि चिमणीच्या प्रेमाची कथा आहे, अतिविशाल व्हेल आणि इवलीशी चिमणी यांचं परस्परांवर प्रेम जडतं.
मात्र व्हेल जमिनीवर येऊ शकत नाही नि चिमणी पाण्यात राहू शकत नाही. व्हेल समुद्राच्या किनारी देखील खूप क्षण राहू शकत नाही, चिमणी अविरत समुद्री लाटांवर उडू शकत नाही.
मग ते दोघं आजन्म आपलं प्रेम जतन करायचं ठरवून विभक्त होतात !

भिन्न प्रकृती, स्वभाव, गुणलक्षण नि जीवनशैली असणाऱ्या दोन जीवाचं देहिक एकरूप होणं शक्य असेलच असं निर्धारपूर्वक सांगता येत नाही मात्र त्यांच अंतरिक प्रेम कधीही अशक्य नसतं हे त्रिवार सत्य होय !
याच व्हेल माशाच्या ध्वनीचा आणि चिमणीच्या चिवचिवाटाचा वापर '96' मधील गाण्यात बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये अत्यंत कल्पकतेने केलाय !

राम आणि जानकी यांचं प्रेम कसं झालं याचा इथे किंचित उलगडा होतो..
राम, जानकी गेट टुगेदरच्या निमित्ताने दोन दशकांनंतर भेटतात तेंव्हा गायत्रीला कळते की रामने लग्नच केलेलं नाही तिथून पुढचे सर्व सीन अप्रतिम आहेत. असो..

कधी कधी आपल्या भवती काहीच नसतं, तरीही आपल्याला वाटत राहतं की आता काही तरी नक्कीच घडणार आहे...
हे वाटणं म्हणजेच एक उर्मी असते, एका हव्याहव्याशा अनुभूतीची...

अनेकांच्या आयुष्यात हे फिलिंग कधी न कधी येऊन गेलेलं असतंच, कुणी कबूल करतं तर कुणी नाकबूल तर कुणी मौन राहतं !
आपण इजहार करू...

'96' ची आणखी एक खासियत म्हणजे यातली लोकेशन्स. देशाच्या चारही दिशांना हा सिनेमा शूट झालाय. पश्चिमेस कोलकता, उत्तरेस हिमाचल प्रदेशमध्ये स्पिती व्हॅली आणि कुलू मनाली, पूर्वेस राजस्थानमधील श्रीगंगानगर, दक्षिणेस कुंभकोनम आणि चेन्नै, दक्षिणमध्यात कर्नाटकमधील जोग फॉल्स, दक्षिण पश्चिमेस पुदुचेरी आणि अरबी समुद्रात अंदमान निकोबार ! ... कुंभकोनम मधील ज्या टाऊन हायर प्रायमरी स्कूलमध्ये कुमार वयीन राम आणि जानकी यांचे चित्रीकरण झाले आहे तिथे आता सैराटसारखे सेल्फी स्पॉट आहेत ! लोक प्रेमवेडे असतात, कुठेही गेले तरी त्यांना प्रेमाची अनुभूती घेता येते !

'96' ही रिअल लाईफ स्टोरी आहे असं दिग्दर्शक सी. प्रेम कुमार सांगतात. 2015 सालच्या डिसेंबरमध्ये चेन्नैला पुराने वेढा घातला होता. वीस दिवस शहर पाण्यात होतं तेंव्हा या देखण्या चित्रपटाची कथा सिंगल राइटअपमध्ये लिहिली गेलीय. प्रेम कुमार यांच्या कॉलेज मेट्सचे रियुनियन सेम टू सेम नव्हते मात्र एस. जानकीदेवी त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आली नि निघून गेली...

अवघ्या तेहतीस वर्षांचा गोविंद वसंता हा '96' चा संगीतकार आहे. तो एक उत्कृष्ठ व्हायोलीन वादक आहे. प्रेम कुमार यांनी '96' साठी थीम म्युझिक द्यायला सांगितलं तेंव्हा त्याने अवघ्या काही तासांत 'व्हेल अँड बर्ड'पासून इन्स्पायर होत संगीत दिलं. 'Kaathalae Kaathalae' या गीताच्या सुरुवातीस हे संगीत खूप अफलातून वापरलं आहे...

96 मधली चार प्रमुख गाणी कार्तिक नेता याने लिहिली आहेत. सालेमसारख्या दुर्लक्षित जिल्ह्यामधील चिन्नानूर या छोट्याशा खेड्यात त्याचं वास्तव्य होतं. गावाला लाभलेला निसर्ग त्याच्या गीतांमधून नेहमी झळकतो. 96ला अफाट लोकप्रियता मिळाली, अनेक पुरस्कार मिळाले, फिल्मफेअरसाठी नॉमिनेट होऊनही यश लाभले नाही तेंव्हा प्रेमकुमारने त्यांना गीतांना लाभलेली लोकप्रियता ही पुरस्कारांहून मोठी असल्याचं सांगितलं तेंव्हा कार्तिकच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तिशीतल्या संगीतकार आणि गीतकाराची ही कमाल देशभराला प्रेमात रंगवून गेली !

त्रिशा आणि विजय सेतुपती वगळता 96 ची महत्वाची टीम तिशी पस्तीशीमधली आहे. दिग्दर्शक लेखक प्रेमकुमार यांना रियुनियनला जाता आलं नाही तेंव्हा त्यांनी मित्रांना सगळ्या घडामोडी विचारल्या, त्या सगळ्या प्रतिक्रिया तद्दन तकलादू आणि बोजड वाटल्या. ते आधी स्वतःवर नाराज झाले होते, मात्र सहाध्यायी मित्रांच्या प्रतिक्रिया ऐकून त्यांना हायसे वाटले. जेंव्हा स्क्रिप्ट लिहायला घेतली तेंव्हा त्यांनी नायक नायिकेचे फ्लॅशबॅक आधीचे वय दोन टप्प्यात घेतले त्याचे कारण यात दडले आहे. या दोघांचे वय किती असावे याचे उत्तर त्यांच्या मित्रांच्या प्रतिसादातून त्यांना मिळाले हे विशेष !

फ्लॅशबॅकनंतर मूळ फ्लोमध्ये सिनेमा स्ट्रीम होतो तेंव्हा नायक नायिका चाळीशीतले का दाखवावे वाटले याचे देखणे उत्तर त्यांनी दिलेलं - चाळीशी हा वयाचा सर्वात अद्भुत टप्पा असतो मात्र तिथून सिंहावलोकन करायला कुणालाच आवडत नाही कारण भूतकाळाच्या आरशात जे दिसतं ते मनाला क्लेशच देऊन जातं. त्यापेक्षा माणसं पन्नाशी साठी नंतर मागे वळून आयुष्याचा हिशोब घालू लागतात आणि त्यावरच सुख समाधान मानू लागतात ! नायक नायिकेच्या चाळीशीच्या प्रगल्भ वयाचा मुद्दा खूपच परिणामकारक आहे मात्र तो उलगडून दाखवल्याशिवाय लक्षात येत नाही ! हे '96' चे आजवर समीक्षेत व्यक्त न झालेलं यश होय !

'96'च्या यशाचे खरे रहस्य त्याच्या क्लायमॅक्समध्ये आहे. सिनेमाच्या शेवटी राम आणि जानकी एकत्र येत नाहीत, ती तिच्या दूरदेशी जाते आणि तिच्या आठवणी घेऊन राम घरी परततो. त्याच्या स्मृतींच्या संग्रहात भर पडते इतकाच हा सिनेमा आहे का ? कदापिही नाही. प्रेमात सफल होणं किंवा असफल होणं या पारंपारिक फ्रेम्सना यात छेद दिला गेलाय. 'प्रेमात जगणं म्हणजे काय असतं ?' ही या सिनेमाची टॅगलाईन ठरावी. नायक नायिका मनातलं प्रेम घेऊन भिन्न वाटांनी मार्गस्थ होतात याची हुरहूर हरेकास लागते. किंबहुना अनेकांनी ती अनुभवलेली असते, त्यामुळे मनाच्या एका कोपऱ्यात याला स्थान लाभते. 96 चे हे सर्वात मोठे बलस्थान आहे !

गतपिढीत अशा तऱ्हेचे प्रेम अधिक टोकदार असले तरी आताच्या पिढीला मुळीच अनुभूती नाही असे काही नाही... सर्वच पिढ्यांत प्रेमभावना असते, भडक बटबटीत आपल्यापुढे अधिक वेगाने समोर येतं त्यामुळे आपल्याला वाटतं की नवी पिढी अगदीच बेजान बेसूरी आहे, वास्तव तसे नाही. खऱ्या प्रेमभावना जाणून घेतलेले कित्येक आहेत...
माझ्या परिचयातील एक चाळीशीचे व्यक्ती आहेत त्यांची आणि के. रामचंद्रनची कथा बरीचशी मिळती जुळती आहे. त्यांनी लग्न केलेलं नाही. दशकापूर्वी दत्तक घेण्याविषयीचे नियम पुष्कळ सौम्य आणि सुलभ होते तेंव्हा त्यांनी वेश्यांच्या दोन मुली दत्तक घेतल्यात. त्यांनी जेंव्हा हा सिनेमा पाहिला तेंव्हा ते हमसून रडलेले. मात्र ते उदास झाले नाहीत. त्यांच्या दोन्ही मुलींना आता ते त्रिशा आणि जानकी नावाने हाक मारतात ! प्रेम कशातही शोधता येतं !

प्रेम करणारा हरेक रसिक या सिनेमाच्या प्रेमात पडेल हे नक्की !

- समीर गायकवाड

#Trisha #Love

1 टिप्पणी:

  1. परिक्षण आवडलं. चित्रपट नाही. गेल्या वर्षी अशाच एका 'जरूर पहावा...' मधून मिळवून पाहिला होता. मध्यंतर आणि बऱ्याच काळात कंटाळवाणा वाटला. शाळेतून बाहेर पडल्यावर नायक लायक होण्यासाठी फार काही करत नाही. सुरुवातीचे त्या दोघांचे सलून मधला प्रसंग तर अगदीच वोर करतो! पण आपण परिचय उत्तम करून दिला आहे. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा