हृदयी पान्हा नयनी पाणी, बंदिनी ! |
गुंटूर. आंध्रप्रदेश.
स्वर्णकुमारी वय वर्षे पस्तीस. पेशा दलाली नि विभ्रम.
देशात कोविडच्या डेल्टा व्हेरीयंटची साथ (दुसरी लाट) ऐन भरात होती तेंव्हाचा काळ. लोक कोविड रुग्णांना अक्षरशः वाळीत टाकत होते. खेड्यांनी संसर्ग वेगाने पसरत होता आणि माणसं किड्यामुंग्यांगत मरत होती. नानाविध अफवा आणि नेमक्या माहितीचा अभाव यामुळे सारेच भयभीत होते. याचा फायदा अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने घेतला आणि नैतिकतेला बाजारात उभं करून आपल्या तुंबड्या भरून घेतल्या. यात विविध स्तरावरील भल्याभल्या गणल्या गेलेल्या पेशांमधली मंडळी होती. यात ह्युमन ट्राफिकिंग करणारी मंडळी मागे कशी असतील ? कोविडकाळातील स्त्रियांचे दमण, शोषण याविषयीची जी भीती व्यक्त केली होती तिला पुष्टी मिळाल्याचे अनुभवतोच आहे. मात्र या सर्व घटनाचक्राचं शिखर ठरावं अशी एक काळीज पिळवटून टाकणारी घटना उजेडात आलीय. ही घटना जिच्या आयुष्याचं मातेरं करून गेली त्या मुलीचं नाव इथे पुष्पा लिहितोय कारण आपल्याला खोट्या नायकांची ओढ फार असते आणि खऱ्यांना आपण किंमत देखील देत नसतो.
आठवीत शिकणारी पुष्पा पंधरा वर्षांची होती. तिचं मूळ गाव गुंटूरमधल्या क्रोसूर तालुक्यातलं. पोटाची खळगी भरायला तिचे कुटुंब गुंटूरमध्ये स्थायिक झालेलं. बंगालच्या उपसागराला लागून असलेल्या या दर्यावर्दी जिल्ह्याच्या सीमेवरून कृष्णेमाई वाहते. पुष्पाने तिच्या बालपणी कृष्णेपाशी आपले अश्रू अर्पण केलेले. कारण ती शैशवावस्थेत असतानाच तिची आई तिची साथ सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेलेली. वडील मोलमजुरी करायचे आणि पुष्पा आपलं शिक्षण सांभाळून घरातली सगळी कामे करायची. कोविडच्या लाटेत तिलाही बाधा झाली. तिला बऱ्यापैकी त्रास होऊ लागला. अठराविश्वे दारिद्र्य असल्याने गुंटूरच्या शासकीय रुग्णालयात तिला दाखल केलं. रूग्णापाशी कुणी थांबायचं नाही असा दंडक असल्याने तिच्यापाशी घरचं कुणी नव्हतं, तसेही तिच्याजवळ थांबू शकेल असं तिच्या कुटुंबात कुणी नव्हतंच मुळी. याचा फायदा स्वर्णकुमारीने उचलला. बायकांची ने-आण करणाऱ्या वा त्यांना गुमराह करणाऱ्या टोळ्यांमधली माणसं (?) कुठेही कसल्याही रुपात वावरत असतात. स्वर्णकुमारी गुंटूरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये सावज हेरण्याच्या मोहिमेवर होती. यासाठी तिने परिचारिका असल्याचा आव आणला होता. बिनाआईची नि कोलमडल्या कुटुंबाची कोवळी पोर असलेली पुष्पा तिने अचूक हेरली. तिने पुष्पाचा विश्वास संपादित केला. तिच्या वडिलांना तिने कळवले की पुष्पाला विशेष देखरेखीची निकड असल्याने ती आपल्या घरी घेऊन जातेय आणि तिची प्रकृती बरी होताच तिला घरी सोडलं जाईल. परिस्थितीने गांजलेल्या आणि नियतीने पोटावर मारलेल्या पुष्पाच्या अल्पशिक्षित पित्याचा स्वर्णकुमारीवर सहजी विश्वास बसला, त्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायही नव्हता.
इथून पुष्पाच्या आयुष्याच्या चिंधड्या उडत राहिल्या आणि ती राजरोस कुस्करली जाऊ लागली. स्वर्णकुमारीने पुष्पाला साम दाम दंड भेदाने धमकावून पाहिलं, शेवटी तिच्या वडिलांच्या जीवाचं बरेवाईट करण्याची मात्रा लागू पडली. पुष्पाची बोली लागली. आधी गुंटूरमध्येच सलग एक महिनाभर तिच्यावर पाशवी अत्याचार केले गेले. त्यानंतर तिथली तिची कुमारिकेची ‘क्रेझ’ (?) ओसरल्यावर स्वर्णकुमारीने तिला नेल्लोर, विजयवाडा, ओंगोल तसंच हैदराबाद अशा ठिकाणी नेलं. तिथं तिच्यासाठी ना दिवस होता ना रात्र होती. होती फक्त शय्यासोबत ! तीही कुठल्याही वयाच्या कसल्याही पुरुषाशी ! अनेक पुरुषांनी तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान या काळात आपली मुलगी स्वर्णकुमारीच्या घरी सुरक्षित आहे असंच पुष्पाच्या वडिलांना वाटत होतं. त्यांना खरं कळू नये यासाठी स्वर्णकुमारी या मुलीला स्वतःच्या देखरेखीखालीच वडिलांशी फोनवर बोलू देत असे. दरम्यान पुष्पाने अनेकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ती असफल ठरली नि परिणामी तिला अनन्वित छळ सोसावा लागला, तिच्यावरचा पहारा कडक झाला. दोन महिने हा छळ सोसल्यानंतर ऑगस्टच्या अखेरीस स्वर्णकुमारीच्या कराल जबड्यातून निसटण्यात पुष्पाला यश मिळालं. मिळेल त्या वाहनाने तिथून ती सुसाट निघाली. ती ज्या टेम्पोमधून गेली त्याचा अखेरचा थांबा विजयवाडा होता. नियतीने तिच्या पुढ्यात आता वेगळंच संकट वाढून ठेवलं होतं.
पुष्पाने पलायन केल्याचे लक्षात येताच धूर्त स्वर्णकुमारीने ती घरातून बेपत्ता झाल्याची माहिती तिच्या वडिलांना दिली. एव्हढेच नव्हे तर गुंटूरमधील नल्लापाडू पोलिसांकडे मिसिंगची तक्रार दाखल केली. रीतसर एफआयआर नोंद झाला मात्र त्याचा पाठपुरावा करण्यास कुणी नसल्याने तपास कागदावरच राहिला. इकडे पुष्पाच्या शोषणाच्या नव्या अध्यायास सुरुवात झाली होती. विजयवाडा बसस्थानकावर घाबरून एकटीच बसलेल्या पुष्पाला तिथे सावज हेरण्यासाठी फिरत असणाऱ्या शांतीने हेरले. तिने तिला खोटा दिलासा दिला, धीर दिला आणि खाऊपिऊ घालण्याचं आमिष दाखवून ती तिला आपल्या घरी घेऊन गेली. दोन दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नसलेल्या पुष्पाने तिच्यात आपली आई पाहिली असावी ! शांतीने तिला आपल्या घरी नेलं आणि अन्नातून तिला भुलवलं. तिच्या इथे पुष्पाला स्वर्णकुमारीपेक्षाही अमानुष वागणूक मिळाली. विजयवाड्यातली पुष्पाची ‘डिमांड’ कमी होताच तिने तिला काकिनाडा, तनुकू अशा अनेक ठिकाणी नेऊन अनेक पुरुषांशी तिचा सौदा केला. इथे पुन्हा एकदा शोषणाचं नवं वळण तिच्या वाट्याला आलं.
पुष्पाला वेश्याव्यवसायासाठी बळजबरीनं एका ठिकाणाहून दुसरीकडे नेलं जात असताना जससिंथा आणि तिची मुलगी हेमलता या मायलेकींच्या जोडीने तिला हेरलं आणि आपल्या कह्यात केलं. शांतीपासून सुटका करून देण्याचा बहाणा करून त्या दोघींनी तिच्याकडून सगळी माहिती गोळा केली. तिच्यासोबत कुणी कुणी हमबिस्तर झालं यांची वर्णने मिळवली, काहींची माहिती त्यांनी अचूक ताडली आणि त्यातून सुरु झाला नवा खेळ ! त्या इसमांना ह्या दोघी ब्लॅकमेल करू लागल्या. त्यांच्याकडून त्यांनी बक्कळ पैसे उकळले. त्यांना वाटलं पुष्पाच्या रूपाने आपल्याला सोन्याचं अंडं देणारी कोंबडी गवसलीय, त्यातच त्यांना अधिक मोह पडला. पुष्पाच्या वयाची खातरजमा करून तिला कायदेशीर धंद्याला लावण्यासाठी त्या दोघी थेट पुष्पाच्या शाळेत गेल्या. तिथे त्यांनी तिच्या एलसीसोबत टीसीची मागणी केली. मात्र त्यांचं वर्तन थोडंसं संशयास्पद वाटल्याने शाळा व्यवस्थापनाने प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. आपलं बिंग फुटणार हे लक्षात येताच त्या सावध झाल्या आणि त्यांनी एकशे ऐंशी अंशातला उलट पवित्रा घेत आपण पुष्पाच्या मदतीसाठी हे सारं करत असून तिला चमडीबाजारमधून बाहेर काढण्यासाठी हे करत आहोत असा पवित्रा घेतला. रीतसर पुष्पाच्या वडिलांना बोलवलं गेलं. त्यांच्याशी बोलताना या दोघींनी आपली ओळख चक्क बालकल्याण विभागातील अधिकारी म्हणून करून दिली ! पुष्पाच्या वडिलांना आपल्या मुलीचे काय झालेय याची चिंता लागली होती. त्यांच्यातला बाप कधीच कोसळून गेला होता. त्यामुळे त्या दोघी काय म्हणतात यावर विश्वास ठेवण्यापलीकडे त्यांच्याकडे काहीच ऑप्शन नव्हते. पुष्पाच्या वडिलांनीच तिला देहविक्रय करण्यास भाग पाडले आहे अशा अर्थाची तक्रार आपण देऊ अशी धमकी त्या दोघींनी दिली आणि तो खचलेला बाप ढसाढसा रडू लागला. त्याने स्वतः शाळा व्यवस्थापनाकडे पुष्पाच्या टीसीसाठी अर्ज केला. शाळा व्यवस्थापनाला आता प्रमाणपत्र देण्यावाचून गत्यंतर नव्हतं. जससिंथा आणि हेमलताने ते प्रमाणपत्र आपल्या ताब्यात घेतलं आणि त्या तिथून पसार झाल्या. पुष्पाच्या आठवणीने व्याकूळ झालेला तिचा निराधार गरीब बाप पुरता हादरून गेला. त्याची कुठे ओळख नव्हती की कुठल्या सरकारी टेबलावर ठेवण्याजोगं वजनही त्याच्याकडे नव्हतं, मीडियाने दखल घ्यावी असंही काही चमचमीत मटेरियल यात नव्हतं. रात्र अंधारून आल्यावर तो त्याच्या झोपडीत परतला.
इकडे या मायलेकींनी तिचा उघड छळवाद मांडला. अनेक पुरुषांबरोबर पुष्पाचा मुलीचा सौदा होऊ लागला. यात आणखी दोन महिने उलटले आणि 17 डिसेंबरच्या पहाटेस पुष्पाने त्यांच्या तावडीतून निसटण्यात यश मिळवलं. 18 डिसेंबर 2021 रोजी ती आपल्या घरी पोहोचली. बापाच्या कुशीत शिरून ती धाय मोकलून रडली. तिनं आपल्या वडिलांना सर्व कहाणी सांगितली. त्यांनी मेडिकोंडुरू पोलिसांशी संपर्क साधला. प्रकरणातील गांभीर्य पाहून पोलिसांनी तत्काळ एफआयआर दाखल केला आणि तपासाची सूत्रे गतिमान झाली.
आता पुष्पा कृष्णेकाठी जाईल तेंव्हा तिच्या डोळ्यातून ओघळायला अश्रूच उरले नसतील. कारण तीच एक नदी होऊन गेलीय जिच्यात अनेकांनी आपलं घाणेरडं शरीर बुचकाळून काढलंय, तिच्या देहावर जितक्या जखमांचे व्रण आहेत त्याहून अधिक व्रण तिच्या काळजावर आहेत. तिचे हे घाव कधीही भरून येणार नाहीत. कृष्णेला जसा पूर येतो तसे तिच्या मनातले गहिवर अधून मधून दाटून येतील. ती रिती होईल की नाही हे मी सांगू शकत नाही. पुष्पाचे गुन्हेगार किती नि कोण आहेत याची यादी काढायला गेलो तर रात्र पुरणार नाही. त्यापेक्षा ‘फ्लॉवर समझा क्या, फायर हुं मैं झुकेगा नही..’ या खोट्या विभ्रमातच दुनियेला जगू दिलेलं बरं. खऱ्या पुष्पाला तसंच आयुष्यभर जळत राहू दिलेलं बरं, निदान त्यातूनच तिची अखेरची सुटका होईल !
- समीर गायकवाड
इंडियन एक्सप्रेसमधील बातमीची लिंक -
https://www.newindianexpress.com/states/andhra-pradesh/2022/feb/04/sex-rackets-use-girl-for-6-months-54-held-2415162.html
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा