सारा डोस दिग्दर्शित 'फायर ऑफ लव्ह' ही डॉक्युमेंटरी म्हणजे केवळ दोन ज्वालामुखी तज्ज्ञांच्या कार्याचा आलेख नाही, तर तो निसर्ग, विज्ञान आणि प्रेम यांच्या अद्वैताचा एक नितांत सुंदर आविष्कार आहे. कात्या आणि मॉरिस क्राफ्ट या फ्रेंच दाम्पत्याच्या आयुष्यावर आधारित हा माहितीपट प्रेक्षकांना एका अशा जगात घेऊन जातो, जिथे मृत्यूच्या सावलीतही जीवनाचे विलोभनीय संगीत ऐकू येते. कात्या आणि मॉरिस या दोघांचेही ज्वालामुखीवर असलेले प्रेम हे त्यांच्या वैयक्तिक प्रेमापेक्षाही अधिक उत्कट होते की काय, असा प्रश्न ही डॉक्युमेंटरी पाहताना पडतो. ही केवळ दोन भिन्नलिंगी शास्त्रज्ञांची कथा नसून 'निसर्गाच्या काळजाचे ठोके' ऐकणाऱ्या दोन वेड्या निसर्गप्रवाशांची गाथा आहे. 1970 आणि 80 च्या दशकात त्यांनी टिपलेले ज्वालामुखीचे थरारक चित्रीकरण हा या डॉक्युमेंटरीचा मुख्य कणा आहे. 'लाल ज्वालामुखी' (Red Volcanoes) आणि 'राखाडी ज्वालामुखी' (Grey Volcanoes) यांच्यातील भेद स्पष्ट करतानाच, मानवी अस्तित्वाची क्षणभंगुरता यात प्रभावीपणे मांडली आहे. क्राफ्ट दाम्पत्याने ज्वालामुखी विज्ञानात (Volcanology) मोलाची भर घातली आहे. त्यांच्या संशोधनाचे दोन मुख्य भाग पडतात - लाल ज्वालामुखी हे प्रामुख्याने हवाई किंवा आइसलँडमधील ज्वालामुखी होते. यात लाव्हा संथपणे वाहतो. कात्या आणि मॉरिस यांनी या लाव्हाच्या प्रवाहाचा वेग, त्याचे तापमान (जे अनेकदा 1000 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते) आणि त्यातील वायूंचे उत्सर्जन यांचा सखोल अभ्यास केला. राखाडी ज्वालामुखी हे सर्वात धोकादायक ज्वालामुखी मानले जातात. 1980 मधील 'माउंट सेंट हेलेन्स'च्या उद्रेकानंतर क्राफ्ट दांपत्याने आपला मोर्चा या राखाडी ज्वालामुखींकडे वळवला.
या डॉक्युमेंटरीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात वापरलेले 'अर्काइव्हल फुटेज'. कात्या आणि मॉरिस यांनी स्वतः चित्रीत केलेली दृश्ये इतकी जिवंत आहेत की, ते एखादे कल्पित वास्तव (Surrealism) वाटते. रसरसणारा लाव्हा, आकाशाकडे झेपावणारी धुराचे लोट आणि त्या भीषण पार्श्वभूमीवर उभ्या असलेल्या या जोडप्याच्या आकृत्या चित्रकलेतील श्रेष्ठ कलाकृतीसारख्या भासतात. दिग्दर्शिकेने या जुन्या फुटेजला आधुनिक संकलनाची जोड देऊन एक लयबद्धता प्राप्त करून दिलीय. मिरांडा जुलै यांच्या आवाजातील निवेदन या माहितीपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. त्यांचे संथ आणि काहीसे गूढ निवेदन प्रेक्षकांना या जोडप्याच्या मानसिक अवस्थेशी जोडून घेते. "विज्ञानातूनच प्रेमाचा जन्म होतो" किंवा "ज्वालामुखी हा त्यांच्यासाठी एक असा देव होता, ज्याच्या जवळ जाण्यासाठी ते सदैव उत्सुक होते", अशा प्रकारचे कोट्स या कलाकृतीला केवळ माहितीपटापुरते सीमित न ठेवता एका दृकश्राव्य कवितेचे स्वरूप देतात. कात्या आणि मॉरिस यांनी टिपलेली छायाचित्रे या केवळ वैज्ञानिक नोंदी नव्हत्या, तर निसर्गाच्या रौद्र रूपाची 'पोट्रेट्स' होती. अनेक सीन्समध्ये सिल्व्हर प्रोटेक्टिव्ह सूटमधील त्यांची छबी आकृष्ट करते. यामध्ये चांदीसारखा चमकणारा 'हीट-प्रोटेक्टिव्ह सूट' त्यांनी घातलेला दिसतो. रसरसत्या केशरी लाव्हाच्या अगदी काठावर उभ्या असलेल्या त्या एका दुसऱ्या ग्रहावरील मानवासारख्या वाटतात. हे चित्र मानवी जिद्द आणि निसर्गाची भव्यता यातील द्वंद्व अधोरेखित करते. काही फ्रेम्सच्या पार्श्वभूमीला लाव्हाचा प्रचंड मोठा धबधबा वाहताना किंवा कारंजे (Lava fountain) उडताना दिसते आणि समोर हे जोडपे अगदी शांतपणे उभे असते. लाव्हाचा तो गडद लाल रंग आणि धुराचे राखाडी लोट यांच्यातील 'कॉन्ट्रास्ट' तांत्रिकदृष्ट्या अप्रतिम वाटतो.
एका प्रसंगात मॉरिसने लाव्हाच्या प्रवाहावर (ॲसिड लेक) नौकाविहार करण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळची त्यांची छायाचित्रे, त्यांच्या विज्ञान वेडाच्या पराकाष्ठेची साक्ष देतात. ज्वालामुखीतून निघणारे पायरोक्लास्टिक फ्लो हे उष्ण वायू आणि खडकांचे अत्यंत वेगवान लोट असतात, क्राफ्ट दाम्पत्याने या लोटांचे जवळून चित्रीकरण केले, जेणेकरून त्याचा वेग आणि संहारक शक्ती जगाला समजू शकेल. त्यांच्या संशोधनाचा सर्वात मोठा तांत्रिक फायदा म्हणजे त्यांनी बनवलेले माहितीपट. कोलंबियातील 'नेव्हाडो डेल रुईझ'च्या भीषण दुर्घटनेनंतर, त्यांनी सरकारांना सावध करण्यासाठी शैक्षणिक फिल्म्स बनवल्या, ज्यामुळे पुढे हजारो लोकांचे प्राण वाचले. त्या काळी आजच्यासारखे ड्रोन किंवा रिमोट कॅमेरे नव्हते. त्यांनी 16 एमएम आरिफ्लेक्स कॅमेरे वापरले. लाव्हाच्या उष्णतेमुळे कॅमेरा वितळण्याची भीती असतानाही, त्यांनी टेलिफोटो लेन्सचा वापर करून अतिशय जवळचे शॉट्स घेतले. कोडाक्रोम (Kodachrome) फिल्मचा वापर केल्यामुळे त्यांच्या फोटोंमधील लाल आणि केशरी रंग आजही तितकेच जिवंत वाटतात. कात्या आणि मॉरिस यांची ही शोधयात्रा केवळ विज्ञानापुरती मर्यादित नव्हती, तर ती निसर्गाच्या अनाकलनीय शक्तीला समजून घेण्याची धडपड होती1991 साली घडलेल्या अघटित घटनेने त्यांचे प्रेम अजरामर झाले. 1991च्या जून महिन्यात जपानमधील 'माउंट उनझेन' हा ज्वालामुखी कित्येक वर्षांच्या सुप्तीनंतर जागा झाला होता. कात्या आणि मॉरिस यांना अशा 'राखाडी' ज्वालामुखींचे वेड होते. हे ज्वालामुखी अत्यंत धोकादायक असतात कारण ते लाव्हा ओकत नाहीत, तर पायरोक्लास्टिक फ्लोचे उष्ण वायू आणि राख यांचे प्रचंड वेगाने येणारे लोट उत्सर्जित करतात. 3 जूनच्या दिवशी कात्या, मॉरिस आणि त्यांच्यासोबत आलेले सहकारी संशोधक हे ज्वालामुखीच्या अगदी जवळ, एका सुरक्षित समजल्या जाणाऱ्या अंतरावरील ठिकाणी थांबले होते. कात्या आणि मॉरिस यांनी नेहमीप्रमाणे आपले कॅमेरे सज्ज ठेवले होते. दुपारी 3 वाजून 18 मिनिटांनी माउंट उनझेनच्या शिखराचा एक मोठा भाग ढासळला आणि त्यातून निर्माण झालेला पायरोक्लास्टिक फ्लो त्यांच्या दिशेने धावून आला. हा वायूचा लोट ताशी 100 मैलांपेक्षा जास्त वेगाने वाहत होता आणि त्याचे तापमान साधारणपणे 700 ते 1000 सेल्सियस होते. त्या लोटाने खाली वाहत येताना अचानक आपला मार्ग बदलला आणि ज्या ठिकाणी क्राफ्ट दाम्पत्य उभे होते, तो संपूर्ण परिसर काही क्षणांत राखेखाली गाडला गेला. या उद्रेकात कात्या आणि मॉरिस यांचा मृत्यू झाला. कात्या आणि मॉरिस क्राफ्ट यांचा शेवटचा प्रवास म्हणजे त्यांच्या विज्ञानाप्रती असलेल्या निष्ठेचा आणि ध्येयवेड्या साहसाचा एक अंगावर काटा आणणारा अध्याय आहे. 1991 साली जपानमधील माउंट उनझेन येथील त्यांच्या शेवटच्या मोहीमेचा उल्लेख आजही ज्वालामुखी तज्ज्ञांच्या वर्तुळात आदराने आणि कारुण्याने केला जातो! 'फायर ऑफ लव्ह' ही डॉक्युमेंटरी त्यांच्या मृत्यूकडे शोकांतिका म्हणून न पाहता, त्यांच्या ध्येयपूर्तीचा एक भाग म्हणून पाहते. ज्या ज्वालामुखीवर त्यांनी आयुष्यभर प्रेम केले, त्याच ज्वालामुखीत ते विलीन झाले. त्यांचे हे समर्पण विज्ञानाप्रती असलेल्या निष्ठेचा परमोच्च बिंदू आहे.
त्यांच्या निधनानंतर जेव्हा शोध पथक तिथे पोहोचले, तेव्हा त्यांना कात्या आणि मॉरिस यांचे अवशेष एकमेकांच्या अगदी जवळ आढळले. असे म्हटले जाते की, मृत्यू समोर दिसत असतानाही ते एकमेकांपासून दूर झाले नाहीत. विशेष म्हणजे, ज्या कॅमेऱ्याने ते चित्रीकरण करत होते, तो काही अंशी सुरक्षित राहिला. त्यात टिपलेले शेवटचे क्षण हे निसर्गाच्या क्रूरतेचे आणि मानवी हतबलतेचे जिवंत पुरावे ठरले. मॉरिस क्राफ्ट यांनी त्यांच्या शेवटच्या मुलाखतीत म्हटले होते की, "मी ज्वालामुखीच्या तोंडाशी मरण्यास तयार आहे, कारण तेच माझे घर आहे." त्यांचे हे वाक्य खरे ठरले. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण वैज्ञानिक जगत हादरले, पण त्यांच्या बलिदानातून एक मोठा धडा मिळाला. त्यांच्या मृत्यूमुळे ज्वालामुखी तज्ज्ञांसाठी नवीन 'सुरक्षा प्रोटोकॉल' तयार करण्यात आले. त्यांच्या निधनाच्या अवघ्या काही दिवसांनंतर फिलिपिन्समध्ये 'माउंट पिनाटुबो'चा उद्रेक झाला. कात्या आणि मॉरिस यांनी यापूर्वी बनवलेल्या 'राखाडी ज्वालामुखीच्या धोक्यां'च्या फिल्म्स पाहून स्थानिक सरकारने वेळेत स्थलांतर केले आणि सुमारे पाच हजार पेक्षा जास्त लोकांचे प्राण वाचले.
कात्या आणि मॉरिस क्राफ्ट यांची केमिस्ट्री ही केवळ पती-पत्नीची केमिस्ट्री नव्हती, तर ती दोन समांतर चालणाऱ्या पण एकाच ध्येयाकडे झेपावणाऱ्या ऊर्जेची गाथा होती. 'फायर ऑफ लव्ह'मध्ये त्यांचे नाते एखाद्या सुंदर काव्यासारखे उलगडत जाते. कात्या आणि मॉरिस यांची भेट 1960 च्या दशकात एका पार्कमधील बाकावर झाली होती. त्या काळात इतर तरुण प्रेमी युगल सिनेमा किंवा बागेत जाण्याचे स्वप्न पाहत असत, मात्र या दोघांच्या गप्पांचा विषय 'ज्वालामुखी' हा असायचा. कात्या या भूगर्भशास्त्रज्ञ (Geochemist) होत्या, तर मॉरिस हे भूगर्भशास्त्रज्ञ (Geologist) होते. विज्ञानाप्रती असलेल्या याच ओढीने त्यांना एकत्र आणले. या दोघांच्या नात्यातील सर्वात धाडसी निर्णय म्हणजे त्यांनी मुले न जन्मावण्याचा घेतलेला निर्णय. त्यांनी ठरवले होते की, त्यांचे आयुष्य हे केवळ ज्वालामुखींच्या अभ्यासासाठी समर्पित असेल. मॉरिस गमतीने म्हणायचा, "आम्हाला मुले नाहीत, कारण आमचे आयुष्य फिरस्तीचे आहे आणि ज्वालामुखी हेच आमचे कुटुंब आहे." एका अर्थाने, त्यांनी स्वतःच्या संसारापेक्षा विज्ञानाच्या विश्वाला अधिक प्राधान्य दिले.
या जोडीमध्ये स्वभावाचे दोन वेगळे पैलू होते, जे त्यांच्या कामात एकमेकांना पूरक ठरले. कात्या अतिशय सूक्ष्म निरीक्षण करणाऱ्या आणि संयमी स्त्री होत्या. ज्वालामुखीतील वायूंचे नमुने घेणे, फोटोग्राफी करणे आणि बारकाव्यांवर लक्ष ठेवण्यात त्या माहीर होत्या. मॉरिस हे काहीसे धाडसी आणि प्रसिद्धीची आवड असणारे होते. त्यांना 'मोशन पिक्चर्स' बनवण्याची आवड होती. ते अनेकदा अतिशय धोकादायक ठिकाणी जाऊन चित्रीकरण करत, तर कात्या मागून त्यांना सुरक्षिततेच्या सूचना देत असत. त्यांच्यात असलेली 'केमिस्ट्री' त्यांच्या संवादातून जाणवते. एकदा मॉरिस ज्वालामुखीच्या अगदी जवळ गेले असताना कात्या त्यांना ओरडून सांगत होत्या की, "तू खूप जवळ गेला आहेस!" त्यावर मॉरिस हसून दुर्लक्ष करत असे. मृत्यू कोणत्याही क्षणी येऊ शकतो हे माहीत असूनही, त्यांच्यातील हलकी-फुलकी खेळीमेळीची वृत्ती कधीच कमी झाली नाही. त्यांचे लग्न झाले आणि त्यानंतरचे त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांनी एका व्हॅनमध्ये घालवले. ते जगभर फिरले—काँगोपासून आइसलँडपर्यंत आणि हवाईपासून जपानपर्यंत. एका साध्या व्हॅनमध्ये राहून, डब्यातील अन्न खाऊन त्यांनी जगातील सर्वात भयानक नैसर्गिक सौंदर्याचा मागोवा घेतला. त्यांच्यासाठी 'घर' म्हणजे एखादा जागृत ज्वालामुखी असायचा. 'फायर ऑफ लव्ह'मध्ये दाखवल्याप्रमाणे, कात्या आणि मॉरिस यांचे देह भिन्न असले तरी त्यांचे मन एकाच लयीत धडधडत होते. 3 जून 1991 रोजी जेव्हा जपानमध्ये त्यांचा अंत झाला, तेव्हा ते एकमेकांचे हात हाती धरून होते. ज्या विज्ञानाने त्यांना एकत्र आणले, त्याच विज्ञानाने त्यांना कायमचे अमर केले.
कात्या आणि मॉरिस यांचा हा शेवट म्हणजे एक शोकांतिका नसून, आपल्या लाडक्या 'दैवता'च्या चरणी अर्पण केलेली ती एक आहुती होती. 'फायर ऑफ लव्ह' ही डॉक्युमेंटरी या प्रवासाला अत्यंत सन्मानाने आपल्यासमोर मांडते.'फायर ऑफ लव्ह' ही डॉक्युमेंटरी मानवी धाडसाला आणि निसर्गाच्या अफाट शक्तीला केलेला सलाम आहे. विज्ञानाला सौंदर्याची जोड दिली तर ते किती प्रभावी ठरू शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. केवळ ज्वालामुखीची माहिती हवी असणाऱ्यांसाठीच नाही, तर मानवी नात्यातील गुंतागुंत आणि निसर्गाशी असलेले आपले आदिम नाते समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक रसिक प्रेक्षकाने हा अनुभव घ्यायलाच हवा.
- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा