आज्ज्याने आयुष्यभर अफाट कष्ट केले. त्याची फळे त्याच्या पुढच्या पिढीला मिळाली. त्यांच्या सगळ्या मुलांचे कल्याण झाले. मुलं कामावती झाली तेव्हा आजोबांचे कष्ट थांबले, हमाली आधीच बंद झाली होती. पुढे जाऊन टांगादेखील देऊन टाकला. शेरा आणि हिरा म्हातारे होऊन मरण पावले पण त्याचा वंश जारी राहिला. हिराचे आयुष्य फार ओढाताणीत गेले नव्हते मात्र वर्षाकाठी माजावर येणाऱ्या राणीला कष्ट पडलॆ, तिच्या आयुष्यात डझनभर वेत झाले.
शेवटचे शिंगरु वगळता तिची सर्व शावके कुणाला ना कुणाला देऊन टाकली. राणीच्या पायांना तणसने ग्रासले. मागचे दोन पाय उचलताना झटका द्यावे लागे. खूप वेळ एका जागी उभी राहिली की कोसळून जाई. थकलेला आज्जा रोज सकाळ संध्याकाळ तिच्या पायांची मालिश करत बसलेला दिसे. आज्जा तिच्यापाशी बसून असला की राणीच्या डोळ्यांना धार लागलेली असे.
आज्जी जिवंत होती तेव्हा कामावरून दमून आलेल्या आज्ज्याच्या पायांची तेल लावून मालिश करत असे, पाठ दाबून देत असे. नंतरच्या काळात सुनांनी नातवंडांनीही त्यांची सेवा केली पण आज्जी शांत बसली नाही, ती रोजच पाय दाबून देई. एका पावसाळ्यात आज्जी अनंताच्या प्रवासाला निघून गेली, घराला हुंदके फुटले! सगळा गोतावळा हमसून हमसून रडला. आज्जीला आहेव मरण आलं म्हणून कुंकवाचा सडा घातला. आज्ज्याला ते पटलं नाही पण तो गप बसला.
काळ पुढे जात राहिला पण थकलेला आज्जा काळाच्या पटलावर मागेच वावरत राहिला. राणीची सेवा करताना त्याला आयुष्यभर सोबत केलेल्या बायकोची आठवण येत असावी. जिने आयुष्यभर आपल्याला साथ दिली, आपली जमेल तितकी सेवा केली तिचे सुखाचे दिवस आले आणि ती एकाएकी निघून गेली, तिच्यासाठी आपण काहीच करू शकलो नाही याचे त्याला शल्य असावे. त्यामुळेच राणीच्या पायांची मालिश करताना त्याला उचंबळून येत असावे.
एका कडक उन्हाळ्यात कुमरीची लागण होऊन राणी मरण पावली, त्या दिवसापासून आज्जा अबोल झाला. काही दिवसांनी त्यांच्यासाठी नवी घोडी आणायचे ठरले. राणीचे शिंगरू देखील आता मोठे झाले होते पण तो नर होता. आज्ज्याने त्याचे नाव हिरा ठेवले होते. त्याचा अंमळ जीव होता त्याच्यावर, मात्र त्याची सगळी ओढ राणीकडे असे!
राणी गेल्यानंतर आपला म्हातारा बाप घरात मुक्याने राहतो हे त्याच्या पोरांच्या लक्षात आले होते. त्यांनी सरप्राईज भेट म्हणून सेम राणीसारखी दिसणारी काठेवाडी घोडी आणली. त्या दिवशी आज्जा आनंदाने फुलून गेला. बऱ्याच दिवसांनी बाप खुश झालेला पाहून पोरांच्या, नातवंडांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. करड्या तपकिरी रंगाच्या त्या घोडीचे वय चार वर्षे असावे, अद्याप तिचे एकही वेत झालेले नव्हते.
तिच्या चमकत्या तुकतुकीत कायवर चकाकती आयाळ शोभून दिसे. शेपटीपासून ते जबड्यापर्यंतची तिची सारी देहलक्षणे राणीसारखी होती. बांधेसूद, मजबूत हाडापेराचे शरीर, दणकट पाठ, लांब केसांची आयाळ व शेपूट आणि भरदार पुठ्ठे असणारी ती घोडी हुबेहूब राणीसारखी दिसायची, कमी फक्त एकाच गोष्टीची होती आणि ती म्हणजे तिच्या कपाळावर राणीसारखी पांढरी शुभ्र चांदणी नव्हती!
आज्ज्याने तिचे नाव राणी ठेवले. बऱ्याच दिवसानंतर त्या रात्री आज्जा सुखाने झोपला पण कायमचाच! रात्री झोपेतच तो गेला. सगळी वस्ती शोकाकुल झाली. आज्ज्याला दहन दिलं गेलं. हिरा आणि राणीची नवी जोडी त्या दिवसापासून आजोळीच राहिली. वर्षामागून वर्षे गेली. ही दोन्ही घोडी थोराड होऊन मरण पावली. राणीला झालेली शावकं फार जगली नाहीत कारण त्यांची नीट निगा राखली गेली नाही, काहीना देऊन टाकलं.
त्यांचं पुढे काय झालं कळायला मार्ग नव्हता. त्यातलीच एक घोडी बशीरभाईला दिली होती. त्यांनी तिला टांग्याला जुंपले होते. काळ बदलत गेला टांगा बंद पडला, रिक्षापुढे टांग्याचे काही चालले नाही. बशीरभाईंनी ती घोडी म्हातारपर्यंत सांभाळली. तिची जितकी वेतं झाली ती सगळी त्यांनी एकतर विकली वा कुणाला तरी देऊन टाकली. तिच्यापासून जन्मलेलीय एकच घोडी त्यांनी स्वतःपाशी ठेवली. अशीच काही वर्षे निघून गेली.
घोड्यांचे विश्व स्मृतीआड गेल्यासारखे झाले होते मात्र काल एक विलक्षण योगायोग घडला. बशीरभाईंचा नातू एका मिरवणुकीसाठी अगदी तरुण तडफदार घोडी घेऊन वस्तीपाशी आला होता. मिरवणूक पार पडली आणि वस्तीजवळ आल्यावर त्या घोडीने पुढचे दोन्ही पाय हवेत उंचावत लगामास हिसडा दिला आणि ती तडक वस्तीच्या मागे असलेल्या शेताकडे सुसाट वेगाने धावत सुटली.
बरेच जण तिच्या मागोमाग धावत गेले. घोडी वेगात धावत गेली असली तरी तिने वाटेत कुणालाही इजा पोहोचवली नाही हे विशेष! काही उत्साही पोरं मोटरसायकल घेऊन तिच्या मागे रेस करत निघाले. वारा पिल्यागत ती घोडी तराट धावत होती, ती थांबली ते थेट आजोबांच्या समाधीजवळ! तिथे पोहोचताच तिने दोन्ही पाय पुन्हा हवेत उंचावले आणि मोठ्याने खिंकाळली! नंतर बराच वेळ तिच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. बशीरभाईंचा नातू तिथे आला, माझी भाचरंही तिथं पोहोचली.
काही वेळातच घडलेला प्रकार सगळ्यांच्या लक्षात आला! करड्या तपकिरी रंगाच्या बलदंड घोडीच्या कपाळावर पांढरी शुभ्र चांदणी होती! तिचे अंग थरथरत होते, तोंडातून फेस गळत होता आणि मान समाधीला टेकली होती! कालपासून ती आज्ज्याच्या घरी वस्तीवरच मुक्कामी आहे, आता ती कायम तिथेच असेल! तिचा सौदा करून वरख़ुशीची रक्कम बशीरभाईंच्या नातवाला दिलीय. राणी वस्तीवर परतलीय. सुखाचे दिवस परत आले आहेत! मी आजोळी जाईपर्यंत यंदाच्या हंगामात समाधीजवळील सोनचाफ्याला भरघोस फुलं येतील असा विश्वास वाटतोय!
- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा