महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात एक चमकदार तारा काल निखळला. काल बारामती विमानतळाजवळ झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे निधन झाले. वयाच्या 66 व्या वर्षी ते महाराष्ट्रातील जनतेस पोरके सोडून गेले! त्यांच्या आठवणी, त्यांचे भाषण, सभा आणि जनसेवेचा वारसा कायम राहील. 'दादा' म्हणून ओळखले जाणारे अजित पवार केवळ यशस्वी राजकारणी नव्हते, तर एक कर्तबगार प्रशासक, शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे मित्र आणि कुटुंबवत्सल मायाळू व्यक्ती होते. ते जितके मृदु मुलायम होते तितकेच वज्रनिश्चयी आणि प्रसंगी कठोर वाटावे अशा व्यक्तिमत्वाचे धनी होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुन्न झाला आहे, आणि त्यांच्या स्मृतींचे आभाळ पुन्हा पुन्हा भरून येत आहे. त्यांची अनेक भाषणे, त्यांची देहबोली, त्यांचं वागणं, त्यांचं कार्यमग्न असणं, त्यांच्या वैयक्तिक आठवणी आणि लाडक्या जनतेप्रती त्यांचं समर्पित असणं आदी गोष्टींद्वारे त्यांची उणीव अधिक गहिरी होतेय! लोकाभिमुख कामे करणाऱ्या अजितदादांची प्रतिमा 'टग्या' अशी का निर्माण केली असेल हा प्रश्न राहून राहून पडतो! कदाचित राजकीय डावपेचातून हे घडले असावे! असो. वास्तवात त्यांची भाषणे आणि त्यांची कामाची शैली तसेच त्यांच्याकडे कामे घेऊन जाणाऱ्या माणसांचे अनुभव पाहू जाता त्यांची प्रतिमा 'कामाचा माणूस' अशीच असायला हवी होती!
“जो पर्यंत माझे हातपाय हालतात तोपर्यंत तुमचं भलंच करेन, मी काम करून दाखवेन कारण मी कामाचा माणूस आहे! होय मी कामाचाच माणूस आहे”! हे उद्गार होते अजितदादा पवार यांचे! “जमीनीचे पैसे आले तर निवडणुकीत वाया घालवू नका कारण राजकारण लई वंगाळ आहे”! हा स्पष्टवक्तेपणाही अजित दादांचाच! दादांच्या भाषणातील वनलाईनर्स तर अफाट असत! दादा या टोपण नावाने प्रसिद्ध असणाऱ्या, कार्यकर्त्यांच्या लाडक्या अजित पवारांची भाषणे त्यांच्या स्पष्टवक्तेपणा, प्रशासकीय पकड आणि तुफान फटकेबाजीसाठी ओळखली जातात. आपल्या भाषणांतून ते थेट मुद्द्याला हात घालत, कार्यकर्त्यांना कानमंत्र देत असत आणि विरोधकांचा समाचार घेताना अनेकदा विनोदी शैलीचा वापर करत. अजितदादा जे बोलत असत ते अगदी लख्ख स्पष्ट असे. आपल्या भूमिकेबाबत ते कधीही संदिग्धता ठेवत नसत, ते ज्या पद्धतीने ठोकून काढत असत त्याला 'दादा स्टाईल' म्हटले जाऊ लागले. आपल्या भाषणात ते अनेकदा नियोजनावर भर देत. विकासाच्या मुद्द्यांवर बोलताना ते नेहमीच आकडेवारीसह बोलणे पसंत करत ही नोंद अधिक महत्वाची वाटते. गंभीर विषयांवर व्यक्त होतानाही मधूनच ते मिश्किल टिप्पणी करत. त्यांच्या भाषणांत अनेकदा मजेदार किस्से, उपहासात्मक शैली असे, ज्यामुळे उपस्थितांमध्ये रंगत निर्माण होई. भाषणादरम्यान ते कार्यकर्त्यांना कामाचे महत्त्व पटवून देत आणि शिस्त पाळण्याचे आवाहन करत. विरोधी पक्षांवर किंवा राजकीय घडामोडींवर ते थेट भाष्य करत असत जे त्यांच्या भाषणांचे प्रमुख आकर्षण असायचे.
त्यांची भाषणे प्रामुख्याने विकासकामे, नियोजन, अर्थसंकल्प, कृषी आणि बारामती पॅटर्न या विषयांभोवती फिरत असली तरी भाषणा दरम्यान कुणी त्यांना चिठ्ठी पाठवली की अमुक एका गावातील गुरांचा बंदोबस्त व्हावा, तर ते त्यावरही व्यक्त होत! कुणी सांगे की, आमचं गाव तुमच्या पदरात घ्या! एका बहाद्दराने तर गावात पोरांची लग्ने जमत नाहीत, काहीतरी करा दादा असे साकडे घातले होते! कुणी बहीण येऊन सांगे की, आमचा दादला रातदिस बोंबलत फिरतोय त्याच्या मुसक्या आवळायला सांगा! तर कुणी भाजीपाला देत म्हणे की, दादा यांची भाजी करून खावा! तर कुणी आपल्या नोकरीची सोय मागत असे तर कुणी आपल्या भागातील गल्लीतला रस्ता करायला सांगे! जनतेची आणि लोकयोजनांची कामे रखडवणाऱ्या अधिकारी वर्गाची ते खरपूस शब्दांत हजेरी घेत असत! पहाटेच उठून कामाची पाहणी करणाऱ्या दादांचा अधिकारी वर्गाने धसकाच घेतलेला असे! लोक त्यांना अक्षरश: वाट्टेल ती कामे सांगत! कुणी काहीही सांगितलं तरी दादा मनापासून ऐकून घेत आणि त्यावर मिश्किल टिप्पणी करत त्याचं काम करून देत! ते खऱ्या अर्थाने कामाचा माणूस होते! त्यांची खरी प्रतिमा कामाचा माणूस हीच होय! त्यांच्या सोबतच्या फायलीत निवेदने आणि अर्जांची भेंडोळी असत! लोक कामाची कागदपत्रे त्यांच्या हाती देत आणि निर्धास्त होत असत!
केवळ सद्गुण असणारा आणि दोष नसणारा माणूस मी तरी पाहिला नाही. गुणदोष सर्वांतच असतात! दादा त्याला कसे अपवाद असतील! मात्र त्यांचे गुण शोधायचे की दोष शोधायचे हे आपल्या विवेकावर सोपवले तर अजित दादा एक सहृदयी कुटुंबवत्सल आणि प्रेमळ माणूस म्हणून अधिक उजवे वाटू लागतात! त्यांना 'टग्या'चे विशेषण लावून ट्रोल केले जाऊ लागले तेव्हा त्यांनी सांगलीमध्ये एका भाषणात प्रत्युत्तर देत होय मी टग्याच आहे असे विधान केले होते; मात्र आपण कशा प्रकारचे टगे आहोत हे त्यांनी अगदी लख्ख स्पष्ट केले होते! अजित दादांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचा 'बायो' आहे; जो अतिशय कमी शब्दांत स्पष्टपणे खूप काही सांगून जातो - तिथे लिहिलंय, ‘संकल्प, निष्ठा, कर्म- हाच माझा धर्म!’ त्यांच्या जाण्याने अनेकांनी आपल्या घरातला हक्काचा 'कामाचा माणूस' गमावला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ते एक प्रमुख चेहरा होते. त्यांच्या प्रत्येक भाषणाकडे माध्यमांचे आणि राजकीय विश्लेषकांचे लक्ष असायचे.
अजित दादा पवारांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते, शरद पवार यांचे मोठे भाऊ अनंतराव पवार आणि आई आशाताई पवार यांचे ते पुत्र. लहानपणापासूनच ते सामाजिक आणि शेतीच्या समस्यांशी अवगत झाले. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले आणि कुटुंबाची जबाबदारी उचलली. देवळाली प्रवरा येथील शाळेत शिक्षण घेतले, पण महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. या कठीण काळात त्यांनी सहकारी दूध संघ, साखर कारखाने आणि बँकांमध्ये नेतृत्व केले, ज्याने त्यांच्या राजकीय प्रवासाची पायाभरणी केली. त्यांच्या या सुरुवातीच्या संघर्षांनी त्यांना जनसामान्यांच्या दुःखाची जाणीव दिली, जी नंतर त्यांच्या राजकारणात प्रतिबिंबित झाली. अजित दादांचे वैयक्तिक जीवन साधे पण प्रेमळ होते. 1985 मध्ये त्यांचा विवाह सुनेत्रा पवार यांच्याशी झाला. पार्थ आणि जय ही दोन मुले त्यांच्या कुटुंबातील आनंदाचे केंद्र होत. अजितदादा हे शरद पवारांचे पुतणे असले तरी त्यांचे कौटुंबिक संबंध नेहमीच गुरु-शिष्य आणि भावंडांसारखे राहिले. सुप्रिया सुळे ह्या अजितदादांना प्रेमळ भाऊ मानत. कामाच्या व्यस्ततेतही अजितदादा आपल्या कुटुंबासाठी वेळ काढत. पहाटे पाच वाजता उठून रात्री उशिरापर्यंत काम करणारे दादा, बारामतीच्या लोकांसाठी नेहमी उपलब्ध असत.
अजित दादांची राजकीय कारकीर्द 1982 मध्ये सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाने सुरू झाली. 1991 मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले, नंतर विधानसभेत निवडून आले. सात वेळा बारामतीतून आमदार म्हणून ते निवडले गेले, प्रत्येक वेळी मोठ्या मताधिक्याने. सिंचन, ग्रामविकास, ऊर्जा आणि अर्थखाते अशा महत्वाच्या खात्यांचे ते मंत्री राहिले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी सहा वेळा पद भूषवले – हाही एक विक्रमच आहे. 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केले, जरी ते अल्पकाळ टिकले तरी. 2023 मध्ये पक्ष फोडून ते स्वतंत्र गटाचे नेते झाले आणि महायुती सरकारात सामील झाले. पुणे आयटी पार्क, सिंचन योजना आणि ग्रामीण विकासात त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. ते नेहमी म्हणत, "काम पूर्ण होईल तरच हो म्हणतो, नाही तर नाही." त्यांच्या या स्पष्टवक्तेपणाने ते लोकप्रिय झाले. त्यांच्या कामाच्या व्यसनामुळे कुटुंबाला कधी कधी एकटेपणा जाणवला असेल, पण त्यांच्या जनसेवेच्या व्रताने अनेकांना प्रेरणा दिली. आज त्यांच्या जाण्याने सुनेत्रा वहिनी आणि मुले कोलमडून गेली असतील, पण त्यांच्या स्मृती त्यांना आधार देतील. त्यांच्या कामाचा वसा त्यांना घ्यावाच लागेल, दादांना याहून चांगली श्रद्धांजली असू शकणार नाही!
अजित दादांच्या सभा नेहमी गर्दीने गजबजलेल्या असत. परभणी, पिंपरी-चिंचवड, बारामती - प्रत्येक ठिकाणी ते जनतेच्या समस्या ऐकत आणि सोडवत. त्यांच्या भाषणांत ग्रामीण म्हणी आणि लोकभाषेचा वापर असायचा, ज्यामुळे ते सामान्य माणसाशी जोडले जात. 2013 मधील इंदापूर येथील सभेत दुष्काळावर बोलताना त्यांनी धरणातील पाण्याच्या साठयाविषयी अतिशय निंदनीय आणि धक्कादायक विधान केले होते. हे वाक्य वादग्रस्त ठरले, पण नंतर त्यांनी ते आपली "सर्वात मोठी चूक" म्हणून स्वीकारले आणि माफी मागितली. अलीकडेच, 2026 च्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवडच्या सभेत ते म्हणाले, "तुम्ही मला निवडले म्हणजे मी तुमचा मालक नाही, मी सेवक आहे." त्यांच्या सभांमध्ये ऊर्जा आणि उत्साह असायचा. दादा पहाटेपासून कामाला लागत आणि सभांमध्ये जनतेच्या हृदयात उतरत. त्यांच्या भाषणांनी लाखो लोकांना प्रेरणा दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांची विचारसरणी भिन्न, भाजप हिंदुत्ववादी तर राष्ट्रवादी सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष पण अजितदादा भाजपसोबत सत्तेत गेल्यावर तेभाजपची हिंदुत्वाची विचारसरणी स्वीकारतील, असे सर्वांना वाटत होते. आपला पक्ष हा पुरोगामी विचाराचाच आहे, असे ते कायम ठामपणे सांगत आले. नुसते ते सांगत आले नाही तर त्यांनी कृतीतही ते उतरवले. हिवाळी अधिवेशना दरम्यान महायुतीचे सर्व सदस्य नागपुरातील रेशीमबाग मैदानावर हेडगेवार स्मृती मदिरात जाऊन नतमस्तक होत असे. पण अजितदादांनी हे कधीच केले नाही. हेच त्यांचे वेगळेपण ठरले.
एकसंघ राष्ट्रवादीमधून बाहेर पडून दादांनी राष्ट्रवादीचा स्वतंग गट स्थापन केला. भाजपसोबत जाऊन ते उपमुख्यमंत्री झाले. तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. कारण अजित पवार यांची प्रतिमा ही पुरोगामी नेता अशी होती. भाजपसोबत गेल्याने त्यांच्या या प्रतिमेला तडा जाईल,अशी शंकासर्वांना होती. तसे झाले नाही. 2014 मध्ये भाजप सत्तेत आली तेव्हापासून नागपूरचे महत्व वाढले. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये येणारे भाजपचे मंत्री आमदार हे अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात संघभूमीवर जात व हेडगेवार समाधीचे दर्शन घेत. पाच वर्ष ही परंपराच भाजपने सुरू केली.
उद्धव ठाकरे यांचे सरकार आल्यावर व या पक्षाला पुरोगामी पक्षाचा पाठिंबा असल्याने त्यांनी ही परंपरा खंडित केली. पण नंतर पुन्हा भाजप हे शिंदेच्या मदतीने सत्तेत आले तेव्हा झालेल्या अधिवेशन काळात शिंदे स्वत: व त्यांचे आमदार रेशीमबागेत जाऊन आले 2024 पूर्वी अजित पवार हे भाजपसोबत गेले, सत्तेत सहभागी झाले. ते जेव्हा अधिवेशनकाळात नागपुरात येत असत तेव्हा ते, त्यांचे आमदार या सर्वांनी रेशीमबागेत जाण्यास नकार दिला. विचारधारेचा मुद्दा पुढे केला. अजित पवार यांनीही त्याला पाठिंबा देत रेशीमबागेचा प्रभाव पक्षावर पडू दिला नाही. त्यामुळेच त्यांची पुरोगामी नेता म्हणून निर्माण झालेली प्रतिमा कायम राहिली.
दादांच्या आठवणींमध्ये त्यांचे अनुशासन आणि कामप्रेम ठळक आहे. ते म्हणजे एक कामाचा ध्यास असलेला कर्मयोद्धा. पहाटे उठून कॅबिनेट बैठकांना हजर राहणे, रात्री उशिरा जनता दरबार घेणे - हे त्यांचे रोजचे जीवन होते. एकदा ते म्हणाले होते, "राजकारण हे जागतिक घटनांपासून गावच्या समस्या पर्यंत जोडलेले असते!” ते एक कठोर पण प्रेमळ नेते होते आणि कुशल प्रशासकही होते. लवासा प्रकल्प, सिंचन घोटाळे यांसारख्या वादांनी त्यांना त्रास दिला, पण ते नेहमी पुढे जात राहिले. मुख्यमंत्रीपदाची इच्छा अपूर्ण राहिली, पण ते "महाराष्ट्राचे सर्वोत्तम मुख्यमंत्री जे कधी झाले नाहीत" म्हणून ओळखले जातील. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे, जी कधी भरून येणार नाही. खरंतर अजित पवार म्हणजे केवळ एक नाव नव्हतं, तर तो एक 'ब्रँड' होता. "जे पोटात तेच ओठात" हा त्यांचा बाणा अनेकांना कधी टोचला असेल, पण तोच त्यांचा पारदर्शक स्वभाव लोकांच्या मनाला भावला. एखादं काम होणार असेल तर 'हो' आणि नसेल होणार तर तोंडावर 'नाही' म्हणण्याची हिम्मत फक्त दादांमध्ये होती. एक असा नेता जो महाराष्ट्राच्या राजकारणाचं 'पॉवर हाऊस', आणि कार्यकर्त्यांचा हक्काचा आधारस्तंभ होता. दादा फटकळ होते पण त्यांचे शब्द टोचायचे नाहीत. त्यात हक्क होता. दरारा होता. आपलेपणा होता.
अजितदादांनी कधीही आपल्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडलं नाही. राजकारणाच्या धावपळीतही सामान्य कार्यकर्त्याच्या हाकेला ओ देणारा आणि संकटात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा तो निधडा छातीचा नेता आज आपल्यात नाही. त्यांच्या जाण्यानं केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र 'पोरका' झालाय. महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीत अजितदादांचं योगदान विसरता येणार नाही. उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी राज्याच्या तिजोरीवर जशी पकड ठेवली, तशीच विकासाच्या कामांतही कधी तडजोड केली नाही. त्यांचा कामाचा धडाका आणि अहोरात्र कष्ट उपसण्याची तयारी हे नव्या पिढीच्या राजकारण्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. अजित दादांच्या अकाली एक्झिटने, एक असा जननायक आपण गमावला आहे जो शक्तिशाली कर्मयोद्धाही होता! दादांनी असं जायला नको होतं!
- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा