'शिवाजी कोण होता' ह्या मूळ पुस्तकाच्या आशयात बदल केल्याचे आणि त्यातील मजकुराशी छेडछाड केली असल्याचे काल स्पष्ट झाले.
मूळ पुस्तकातली अतिशय महत्वाची अशी, न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची प्रस्तावना गाळली गेलीय. मूळ पुस्तकातील काही पाने वगळली गेलीत आणि काही पाने वा काही पंक्ती घुसडल्या गेल्यात. दादोजी कोंडदेव, शिवा काशीद यांच्या उल्लेखांची छेडछाड केली गेल्याचा आरोप पानसरे कुटुंबाने केलाय.
संबंधित प्रकाशकाकडून फक्त वीस रुपये किंमत ठेवून हे पुस्तक विकले गेलेय; इतक्या कमी मूल्यात दर्जेदार छपाई मूल्य असलेल्या पुस्तकाची निर्मितीच शक्य नसल्याने, इतके कमी मूल्य ठेवून विक्री करणे कोणत्याही प्रकाशकाला शक्य नाही, साहजिक कमी किंमत असल्याने हे पुस्तक अधिक विकले जाईल आणि मूळ मजकूर असलेले पुस्तक कमी विकले जाईल असा संबंधितांचा अंदाज होता का?
चांगल्या प्रतीचा कागद वापरुन न परवडणाऱ्या कमी किमतीत, चुकीचा इतिहास आणि मुस्लिमद्वेषी आशय घुसडून पुस्तक निर्मिती कुणी आणि का केली असेल? याच्या मागे कोणता कारस्थानी मेंदू असेल?
हे जाणीवपूर्वक केले गेलेय किंवा कसे ह्याचा उलगडा तपास केल्यानंतरच होईल.
पानसरे कुटुंबाने या संबंधी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर चुकीचे संपादन केल्याचे मान्य करत अशी पुस्तके नष्ट केली जातील असे प्रकाशकाच्या वतीने सांगितले गेलेय अशी बातमी वाचनात आली.
45000 पुस्तके नष्ट केलीत असाही उल्लेख बातमीत आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात ही चुकीच्या आशयाची पुस्तके छापण्यामागे काय उद्दिष्ट असेल? मग त्यांनी आजवर किती पुस्तके छापली आणि किती विकली ह्याचा खरा तपशील समोर येईल का?
सहज याचे क्रॉसचेक करावे म्हणून प्रकाशकांच्या वेबसाईटवर चक्कर मारली तर आणि ही धक्कादायक गोष्ट नजरेस पडली. वेबसाईटवर पुस्तकाच्या माहितीत, 'लांड्या बजाजी' असा उल्लेख दिसला! हा उल्लेख करण्यामागचे कारण तेच सांगू शकतात. मात्र हे सर्व अतिशय ओंगळवाणे आणि हिडीस आहे!
कारण असा उल्लेख तर 'शिवाजी कोण होता' ह्या पुस्तकातही नाही! प्रत्यक्षात पानसरे यांच्या पुस्तकात असे वाक्य आहे की, 'लांड्या म्हणून ज्याला हिणवत होते त्या बजाजी निंबाळकरास शिवाजीने स्वतःची मुलगी दिली.'
संबंधितांनी हा ध चा मा करणारा मजकूर का आणि कधी अपलोड केला होता हे ठाऊक नाही मात्र हा प्रकार किळसवाणा आणि क्लेशदायक होय. आता हे पेज त्यांनी डिलिट केले आहे.
मराठी साहित्य व्यवहाराला कलंक लावणारा हा सर्व घटनाक्रम आहे असे खेदाने म्हणावे लागते! त्याही पलीकडे जाऊन ह्यामुळे खोटा इतिहास रुजतो ही अतिशय वाईट बाब होय; खेरीज चांगल्या ऐतिहासिक व्यक्तींचे चारित्र्यहनन होते, समाजात धार्मिक तेढ वाढीस लागते. असे व्हायला नको होते! असो.
खोलात जाऊन बजाजी नाईक निंबाळकर यांच्याविषयीची माहिती मिळवली तर त्यांच्या एकंदर उल्लेखाचेच खूप वाईट वाटले. कारण बजाजी निंबाळकर यांचे धर्मांतर झाले ह्याचे सबळ पुरावे उपलब्ध नसून तशी एक दंतकथा प्रचलित आहे (दख्खनचा इतिहास, मुसलमान आणि मराठा) आणि त्याचाच आधार पुस्तकात घेतला असावा.
'शिवाजी कोण होता' ह्या पुस्तकातील 'शिवाजी आणि धर्मांतर' ह्या प्रकरणात पान नंबर 53 वरती बजाजी निंबाळकर यांच्याविषयीचा हा उल्लेख आहे. केवळ ह्याच पुस्तकात नव्हे तर आणखी बऱ्याच पुस्तकात अशा प्रकारचे उल्लेख असू शकतात. जागृत इतिहास अभ्यासकांनी ह्या गोष्टी वेळच्या वेळी तपासणे आवश्यक आहे असे वाटते.
मी काही इतिहास संशोधक अथवा इतिहासातला माहितगार नाही मात्र एक इतिहासप्रेमी, एक शिवप्रेमी म्हणून वेळ मिळेल तेव्हा जमेल तितकी ऐतिहासिक साधने वाचतो, चाळतो. त्यातून समोर आलेली बजाजी नाईक निंबाळकर यांच्याविषयीची अस्सल तथ्यांवरची माहिती अशी आहे -
1) फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर यांच्यासबंधी एक प्रसिद्ध दंतकथा आहे. ती अशी की -
“विजापूरच्या आदिलशहाने त्यास विजापूरला धरून नेले व त्याचे धर्मांतर केले. गावी परतल्यावर आपल्याकडून झालेल्या धर्मांतराचा बजाजींना पश्चात्ताप झाला. बजाजीला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिखर शिंगणापूर येथे विधिपूर्वक हिंदू धर्मात आणले. त्यानंतर काही दिवसांनी बजाजीचा मुलगा महादजी निंबाळकर यास शिवाजी महाराजानी आपली मुलगी दिली.”
मात्र, असे धर्मांतर झाले असा कुठेही उल्लेख नाही आणि जर बजाजी निंबाळकर यांचे धर्मांतर झालेच असेल तर मग त्यांचे ” मुसलमान “ नाव काय, याची अस्सल माहिती आजतागायत कोणीही दिलेली नाही. या कथेचा उल्लेख करताना कुठलीच तारीख – शक – संवत्सर काहीसुद्धा आजपर्यंत उपलब्ध झालेले नाही. दंतकथाकार कथेत बजाजीराजे हे 1642 मधे मुसलमान झाले असे म्हणतात. त्यानुसार 1642 ते 1651 या कालखंडामध्ये जर त्यांचे धर्मांतर झाले असेल तर त्यांचा कागदोपत्री उल्लेख हा मुसलमान नावाने यायला हवा, पण तो येत तर नाहीच तर, याच दरम्यान त्यांचा उल्लेख समकालीन कागदपत्रामंध्ये हिंदू म्हणूनच केला जातो.
2) शिवभारत हे अस्सल साधन आज उपलब्ध आहे, प्रथम त्याचा संदर्भ पाहू या - शिवभारत – अध्याय 13 - श्लोक 10 - घांटीको (घाटगे) मत्तराजश्च कुलीशोपमसायकः | तथा फलस्थान (फलटण) पतिबलवान बाजनायकः ||
यामध्ये कवींद्र परमानंद हे बजाजीराजेंचा उल्लेख 'बाजनायक' असा करतात, शिवभारतामध्ये येणारा हा उल्लेख 1648 मधल्या प्रसंगाचा आहे. तेव्हा शिवाजीवर फतहखानाचे संकट आले होते. कवींद्र परमानंद यांनी बजाजीस फलटणचा अधिपती आणि बाजनायक असे म्हणले आहे, श्लोकामध्ये जर बजाजीराजांचे धर्मांतर झाले असेल तर त्यांच्या यवनी नामाचा उल्लेख अजिबात नाही, शिवभारत हे विश्वासार्ह आहे कारण ते समकालीन आहे आणि त्यावर विश्वास ठेवणे हे क्रमप्राप्त आहे. कवींद्र परमानंद हे शिवाजीचे निकटवर्ती होते. तेव्हा हा पुरावा निश्चित विश्वासपात्र आहे.
3)निंबाळकर घराण्याची इ.स.1822 मध्ये लिहिली गेलेली एक छोटी बखर बापूसाहेब निंबाळकर यांच्या दफ्तरात सापडली. तिच्यात असा एक उल्लेख आहे की बजाजीनी इ.स.1651 मध्ये बेगम (विजापूरची बडी बेगम ?) हिच्याकडून फलटणची सनद घेतली. इथेही बजाजीचे नाव हिंदूच असून, त्यांच्या धर्मांतराचा काहीही उल्लेख नाही. विजापूरचा बादशहा महंमंद आदिलशाहा हा इ.स 1627 मध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी गादीवर आला. त्याच्या कारकिर्दीचा इतिहास त्याचा राजकवी मुहम्मद जहूर बिन जहूरुल्लाह ( टोपण नाव - जहूरी) याने महंमदनामा या नावाने लिहला. त्यात आदिलशहाच्या बेगम नावाच्या मुलीचा कुठेच उल्लेख नाही.
4)बजाजी निंबाळकर अफजलखान स्वारीच्या वेळी सन 1659 मध्ये फलटण परिसरात होते. त्यांना अफजलखानाने पकडले व त्यांची सुंता करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली, त्यावेळी अफजलखानाकडील सरदार नाइकजीराजे पांढरे यांच्या मध्यस्थीने बजाजी निंबाळकर यांच्याकडून 60 हजार होनांची खंडणी घेऊन अफजलखानाने त्यांना सोडले. खानाने बजाजींकडून 60 हजार होन म्हणजे दोन लाख 10 हजार रुपये दंड घेतला होता असा उल्लेख आहे. त्यावेळी बजाजींचा मुलगा महादजी व पत्नी सावित्रीने मलवडीचे सावकार जयचंदजी भाई व बबनभाई यांच्याकडून फलटणची देशमुखी गहाण ठेऊन व्याजाच्या पंचोत्री दराने रक्कम उभी केली होती.
ह्या संदर्भातील अस्सल पत्र खाली दिले आहे. -
” धनकोनाम जयचंदीभाई व जमामाव बाबानभाई मुक्काम मलवडी यास रिणकोनाम बजाजी नाइक निंबाळकर व सावित्रीबाई महादजी नाइक निंबाळकर देशमुख परगणे फलटण…कारणे लिहून दिला कर्जकतबा ऐसाजे बदल खान आजम आबदलाखान (अफजलखान) यासी पातशहानी साहेबी शिवाजी राजेवारी मसलत केलि. ते वख्ति आबदलाखान कुचावर कुच करून मलवडी उतरले, ते वख्ति अम्हाबद्दल शिवाजी राजे यानि नाइकजी राजेस (नाइकजीराजे पांढरे) बहुत प्रकारे कागद लिहला होता आम्हास दस्त करून गल्यात तोफ घालून सुनता करून हत्तीच्या पायाखाले घालून मारावे, तो नाइकजी राजे यांनी बहुत काही आडमुड होउन आबदलाखानास अर्ज केल्यावरी साठी हजरावारी करार करून, होन साठी हजारावर दरम्यान नाइकजी राजे पांढरे जमान होउन सोडिवले
साक्षीदार – रतनजी माने देशमुख कसबे म्हसवड, मलजी राजे पांढरे, रविराव ढ़ोणे, जाधवराव देशमुख दौलताबाद, धूलाजी राजे सडगे, देवजी राजे धायगुड़े, तानाजी राजे कोकरे, दत्ताजी माने देशमुख कर्यात मलवडी, विठ्ठल भालेरावजी दीवाण निरत नाइकजी राजे पांढरे ” ( शिवकालीन पत्रसारसंग्रह – खंड – २ – लेख.क्र. – 1797 ) "
5)जर इ.स 1659 मधे अफजलखान बजाजीराजे नाइक यांची सुंता करायची धमकी देतो. तर ह्यावरून सिद्ध होते की – 1659च्या आधी बजाजी निंबाळकर यांची सुंता झालीच नव्हती, कारण जर ती झालेली असती तर अफजलखानाने तशी धमकी बजाजीस दिलीच नसती.
असे असले तरी रणजित देसाई यांनी आपल्या 'श्रीमान योगी' पुस्तकात बजाजी यांना मुसलमान केल्याचा उल्लेख केला आहे मात्र त्याच्या समर्थनार्थ पुरावे त्यात दिलेले नाहीत. असो.
बजाजी निंबाळकर हे विजापूरच्या आदिलशाहीचे निष्ठावंत सेवक होते. आपली बहीण सईबाई हिचा विवाह त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी लावून दिला होता. तद्पश्चातही निंबाळकर हे आदिलशाहीच्या दरबारी चाकरी करायचे. 1648 साली आदिलशहाने शहाजीराजांना कैद करून शिवाजीवर फतेहखान व फरादखानास पाठविले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत फलटणचे निंबाळकरही स्वराज्यावर चालून आले होते.
1655 साली शिवाजी महाराजांनी बजाजी निंबाळकर यांचा मुलगा महादजीशी आपली कन्या सखुबाई हिचा विवाह करवून दिला. त्यावेळी महादजी हे फलटणचे सरदार होते. बजाजी निंबाळकरांचे निधन 1682 मध्ये झाले. त्यांची समाधी फलटण येथे आहे.
संभाजीराजांना औरंगजेबाने पकडून नेते वेळी बजाजीचे पुत्र, महादजी नाईक निंबाळकर हे मुघलांच्या हाती लागले. महादजीराजे यांना औरंगजेबाने ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैदेत ठेवले काही दिवसांनी महादजी नाईक निंबाळकर यांचा ग्वाल्हेरच्या कैदेतच मृत्यू झाला.
नंतर त्यांच्या पत्नी सखुबाई राणीसाहेब फलटणला सती गेल्या. सखुबाई राणीसाहेब यांची समाधी फलटणला राॅयल छत्रीबाग येथे आहे. सखुबाई राणीसाहेब यांना शिवाजीमहाराजांनी पुरंदर तालुक्यातील वाल्हे हे गाव चोळी बांगडीसाठी इनाम म्हणून दिले होते.
फलटणचा मुलुख आदिलशाहीच्या राज्यात महत्त्वाचा समजला जाई. महाराजांच्या काळात बजाजीराजे नाईक निंबाळकर हे तिथले जहागीरदार होते. शिवछत्रपतींच्या सख्ख्या मेहुण्याची, सईबाई राजे साहेबांच्या भावाची अशी घोर बदनामी गेले कित्येक वर्षे सुरु असूनही त्याविषयी इतिहास अभ्यासक मौन का राहतात हे अजूनही आकळत नाही.
पानसरे यांचे 'शिवाजी कोण होता' हे पुस्तक असो किंवा रणजित देसाई यांची 'श्रीमानयोगी' कादंबरी असो, ह्यात बजाजी नाईक निंबाळकर यांच्याविषयीचे हे बदनामीकारक उल्लेख वगळले जावेत. फारतर असे लिहिले जावे की, बजाजी निंबाळकर यांचे धर्मांतर केल्याची वदंता होती मात्र त्याचे अस्सल पुरावे आढळत नाहीत.
नेताजी पालकर ह्यांच्या धर्मांतराचे जसे ढळढळीत पुरावे आढळतात तसे पुरावे बजाजी निंबाळकर ह्यांच्या बाबतीत आढळत नाहीत हे वास्तव आहे. अशा चुकीच्या अर्थाचा उल्लेख असणारी बरीचशी पुस्तके 2000 सालापूर्वीची आहेत आणि ही नवीन तथ्ये अलीकडील वर्षात समोर आली असल्याने जुन्या पुस्तकातले उल्लेख तसेच राहून गेले हे आपण समजू शकतो मात्र वास्तव समोर आल्यानंतर, नव्या मुद्रण आवृत्तीत असे उल्लेख बदलले जाणे अपेक्षित आहे.
शिवाजी राजांविषयीचे सिनेमे आणि कादंबऱ्या ह्यांनी हे सर्व पुरावे गढूळ करण्याचे काम केलेले असल्याने इतिहास अभ्यासकांनी ह्यावर मौन राहू नये ही विनंती. कारण पुढे जाऊन ह्या बेगडी साधानांच्या आधारेच इतिहासाचे विद्रूपीकरण होते आणि मूळ इतिहास बदलला जातो हे वास्तव आहे. आज समोर आलेला घटनाक्रम ह्याकडेच निर्देश करतो!
- समीर गायकवाड
हा वाद उद्भवल्यानंतर काही दिवसांतच संबंधित प्रकाशकांनी आपण अगदी मूळ प्रतिवरून पुस्तक बनवल्याचे पुरावे पेश केले. ह्यावर पानसरे कुटुंबाकडून असा दावा करण्यात आलाय की, पानसरे हयात असतानाच मूळ प्रतीत सुधारणा करून आता अस्तित्वात असलेली प्रत बनवली गेली, ह्या सर्व गदारोळात सत्य झाकोळले गेले की उजळून निघाले हे कळायला मार्ग नाही!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा