5 जुलै 2017 रोजी सकाळी रोहन, जवळच्या बागेत खेळायला गेला होता. त्याचे घर छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यातील खमतराई येथील डब्ल्यूआरएस कॉलनी पीएच रेल्वे स्टेशनजवळ असल्याने, चुकून ट्रेन पकडून झारसुगुडा येथे पोहोचला होता.
झारसुगुडा येथे पोहोचल्यावर, 6 जुलै 2017 रोजी चाइल्डलाइनच्या अधिकाऱ्यांनी त्याला झारसुगुडाच्या तिकीट काउंटरजवळून वाचवले होते. तो कर्णबधिर आणि मुका आहे हे कळल्यावर, चाइल्डलाइनच्या अधिकाऱ्यांनी त्याला ट्रेन/बसचे फोटो दाखवून तो झारसुगुडाला कसा पोहोचला याची चौकशी केली. त्याने होकारार्थी मान डोलावून ट्रेनने झारसुगुडाला पोहोचल्याचे खुणांनी सांगितले.
त्यांच्या घरात चार सदस्य होते. त्याचे वडील रोजंदारीवर काम करत, तर त्याची आई आणि एक मोठी बहीण मोलकरीण म्हणून काम करत असत. घटनेच्या वेळी आई वडील आणि बहीण घरी नव्हते, ते कामावर गेले होते.
तो हरवला, त्या दिवशी, नातलगांनी त्याचा शोध घेतला पण तो सापडला नाही. स्थानिक पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रारही दाखल केली, पण काहीच झाले नाही. तो सापडेल ही त्यांची आशा जवळजवळ मावळली होती, पण चाइल्डलाइनच्या अधिकाऱ्यांमुळेच त्यांची पुनर्भेट शक्य झाली. ज्यांनी आपल्या मुलाची भेट घडवून आणायला मदत केली, त्या सर्वांचा मी ऋणीआहे," असे रोहनचे वडील, राजाराम सोना, सांगत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या.
हे सर्व आज लिहिण्याचे कारण म्हणजे ज्या तपास पद्धतीने रोहनचा ठावठिकाणा शोधला तीच पद्धत वापरुन अकोला लोहमार्ग पोलीस, तसेच चाइल्डलाइनचे कार्यकर्ते आणि जिल्हा प्रशासन ह्यांनी एक हृदयस्पर्शी कामगिरी केली आहे. हरएक सामान्य माणसाला ही पद्धत ठाऊक असली की एखादा अज्ञात इसम आपल्या पाहण्यात आला आणि त्याचा पत्ता शोधण्याच्या कामी ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरू शकते! याची माहिती अधिकाधिक लोकांना व्हावी म्हणून ही पोस्ट!
लोहमार्ग ‘चाइल्ड हेल्पलाईन’च्या कर्मचाऱ्यांना ८ एप्रिल रोजी अकोला रेल्वेस्थानकावर एक बालक एकटाच आढळून आला. आधार क्रमांकाच्या मदतीने त्याच्या घराचा शोध घेण्यास सुरुवात झाली. त्या मुलाच्या आधार नोंदणीचा प्रयत्न झाला. अगोदरच आधार नोंदणी असल्याने नवी नोंदणी रद्द झाली. अकोला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर यांनी प्रकरणाची माहिती देत मूळ कार्डवरील पत्ता मिळवून देण्याची विनंती आधार कार्ड प्रतिनिधींकडे केली. नियमांमुळे तसे करता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जुना आधार क्रमांक मिळण्यासाठी तक्रार नोंदवून घेतली. जुने कार्ड मिळवण्यासाठी लागणारा ओटीपी व इतर तांत्रिक सहकार्य महाआयटी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद ठाकूर यांनी केले.
मुंबईच्या आधार कार्यालयाशी संपर्क करून त्यांनी जुना आधार क्रमांक प्राप्त केला. आधार प्रणालीत स्कॅनिंग, बालकाच्या डोळ्यांचे छायाचित्र घेऊन पूर्ण माहिती मिळवण्यात आली. त्यावर नमूद असलेला मोबाइल क्रमांक मिळाला. त्यावर संपर्क साधून मुलाच्या वडिलांशी संवाद साधला. मुलाच्या शोधात असलेल्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. त्यांनी ‘व्हिडिओ कॉल’ करून मुलाशी संवाद साधला.
त्या मुलाचे आई, वडील व काका, काल 1 जूनला अकोला येथे आले. बालकल्याण समितीने सर्व प्रक्रिया पूर्ण करून, जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थितीत मुलाला आई-वडिलांकडे सुपूर्द केले. मध्य प्रदेशमधील खांडवा इथला रहिवासी असणाऱ्या ह्या अकरा वर्षीय मूकबधीर मुलाला त्याच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले तेव्हा उपस्थित सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले! पुनर्भेटीचा एक ह्रदयंगम सोहळा त्यांनी अनुभवला!
आज हा मुलगा त्याच्या गावी त्याच्या घरी पोहोचला असेल! हरवलेलं आपलं कुणी जिवलग घरी परतणं ही नव्याने जन्म घेण्यासारखी कठीण गोष्ट आहे! आपल्या देशात रोज हजारो माणसं बेपत्ता होतात त्यापैकी अगदी मोजकी माणसं पुन्हा आपल्या घरी परततात! बाकी सारी लापता माणसं विजनवासाच्या अंधारात कुठे नि कशी जगत असतील हे कुणीच सांगू शकत नाही! मात्र अशी भरकटलेली एकटी दुकटी मुलगा मुलगी वा स्त्री पुरुष कुणीही असो, आपण त्याची माहिती संबंधित यंत्रणांना दिली तर ह्या पद्धतीने त्यांचा तपास करणं शक्य आहे, त्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्याच्या प्रक्रियेत आपला तीळमात्र जरी वाटा असला तरी त्याचे समाधान हिमालयाहून मोठे असते हे स्वानुभवातून सांगतो!
ही कामगिरी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे, समाजिक संघटनांचे आणि समाजहितैशी कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे!
- समीर गायकवाड
सोबतच्या फोटोविषयी - फोटोत दिसणारा मुलगा संजय घंटे आहे, तो लातूरच्या देवणी तालुक्यातील हंचनल गावचा आहे आणि त्याच्या शेजारी असलेली स्त्री म्हणजे त्याची मावशी. संजय मूक बधिर आहे. 2011 साली त्याच्या बालपणीच त्याचे आईवडील वारले. त्याचा मोठा भाऊ संगम आणि मावशी संगव्वा हेच त्याची देखभाल करायचे. 2014 च्या उन्हाळ्यात ह्या भावंडात भांडण झाले. मोठा भाऊ सतत सूचना करतो घराबाहेर जाऊ देत नाही, ह्या रागापोटी संजय घर सोडून गेला. बडोदा रेल्वे स्टेशनवर तो सापडला. एप्रिल 2017 मध्ये आधार कार्डद्वारेच त्याचा शोध घेण्यात आला आणि त्याच्या मावशीला कळवण्यात आले. डॉन बॉस्को स्थित स्नेहालयात त्याला ठेवण्यात आले होते. त्याची मावशी त्याला भेटली तेव्हा ती हमसून हमसून रडली. 'तुझा शोध लागला नसता तर दिवंगत बहिणीला मी काय तोंड दाखवले असते' असं म्हणून ती मोठ्याने रडत होती. संजय आणि संगम ही दोन्ही भावंडे तिच्या पदराखाली घेऊन ती माऊली लातूरला परतली, त्यांची भेट झाली तेव्हाचा हा फोटो! या तपास पद्धतीने सुटका झालेला तो पहिला मूकबधिर मुलगा होता. आजवर ह्या पद्धतीने जितक्याही लोकांची सुटका झाली आहे त्यात एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे ह्यांना एकट्याने भेदरलेल्या अवस्थेत पाहून लोकांनी कळवले! मित्रांनो तुमच्या पाहण्यात देखील असे कुणी आले तर प्लीज त्याची नोंद घ्या, कदाचित तुम्ही त्या व्यक्तीचे पाथ फाइंडर ठरू शकाल! ह्या सुखासारखे दुसरे सुख नाही!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा