अनिल बर्वे यांच्या ‘हमीदाबाई की कोठी‘ या नाटकाचे दिग्दर्शन करताना विजयाबाईंना हमीदाबाई या वृद्ध तवायफेच्या शरीर-भाव-चाल-बोली यांचा खरा आत्मा कसा असेल, याची कल्पना येत नव्हती. त्यांच्या सासूबाई दुर्गा खोटे यांनी सल्ला दिला: “एका खऱ्याखुऱ्या कोठीवालीकडे जा.” हा सल्ला मिळताच त्या तडक निघाल्या. त्या काळात ही गोष्ट किती धाडसी होती याची तुम्हाला कल्पना असेलच!
त्या काळात मुंबईत नेहल मंजिलमध्ये राहणारी एक वृद्ध तवायफ नीलम बाई यांच्याकडे विजयाबाई गेल्या. नीलम बाईंनी त्यांना आपले जीवन, सौंदर्य, वृद्धत्व, एकटेपण आणि त्या जगाचे सूक्ष्म बारकावे सांगितले.
हा अनुभव इतका संवेदनशील होता की, विजयाबाईंना हमीदाबाईची भूमिका आणि संपूर्ण नाटकाची दृष्टी मिळाली. ही भूमिका त्यांनी स्वतः केली होती, यावरून नाटकाकडे आणि नाटकातील पात्राकडे पाहण्याची त्यांची दृष्टी लक्षात यावी.
हा प्रसंग त्यांच्या दिग्दर्शनशैलीचे सार दाखवतो. अथक संशोधन, वास्तवाशी सामना आणि कलाकार म्हणून पूर्ण समर्पण, हे घटक इथे अधोरेखित होतात. केवळ स्क्रिप्ट पुरेशी नाही, तर रसरशीत जिवंत नाट्यानुभवासाठी माणसाच्या अंतर्मनात शिरले पाहिजे हे त्यांचे तंत्र होते. त्यांच्या दिग्दर्शनातला जिवंतपणा आणि सच्चाईचे मूळ कशात आहे याची टोकदार जाणीव या घटनेतून व्हावी.
1960 च्या दशकात चिं. त्र्यं. खानोलकर यांनी लिहिलेल्या ‘एक शून्य बाजीराव‘ ह्या नाटकाचे दिग्दर्शन ही त्यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याची सर्वोच्च कसोटी ठरावी. पेशवाईच्या अस्तकाळातील शेवटच्या पेशव्याचे मानसिक विघटन, एकटेपण, सत्ता गमावण्याची वेदना आणि ऐतिहासिक कालखंडातील वैयक्तिक शोक यांचे चित्रण या नाटकात होते.
विजयाबाईंच्या दिग्दर्शनात हे नाटक कमीत कमी सेट, प्रकाश आणि शारीरिक हालचालींवर आधारित होते. शून्यता हा मुख्य विषय होता.
एका प्रसंगात बाजीराव स्वतःशीच बोलतात, भूतकाळातील स्मृतींशी झुंज देतात आणि हळूहळू वेड्याप्रमाणे वागू लागतात. प्रेक्षकांना त्यांच्या अंतर्मनातील त्या शांत, पण भयाण कोलाहलाची जाणीव होते.
नाटक संपल्यावर हॉलमध्ये काही क्षण पूर्ण शांतता पसरत असे. कुणीही हलतही नसे. त्या शून्यतेत प्रेक्षक स्वतःला हरवून बसत. हा अनुभव करूण, थरारक होता आणि मानवी अस्तित्वाच्या क्षणभंगुरतेची, नगण्यत्वाची आठवण करून देणारा होता. विजयाबाईंच्या मिनीमलिस्ट दिग्दर्शनामुळे शब्द आणि मौन यांचा प्रभाव अधिक गडद होत असे.
‘सर्व कला म्हणजे धादांत खोटेपणा आहे, जो अंतिम सत्याकडे घेऊन जातो‘, असं पिकासो सांगतो. वैयक्तिक आयुष्यात विजयाबाई हे भाष्य जगल्या. त्या पुन्हा पुन्हा आघात झेलत राहिल्या नि पुर्वीपेक्षा अधिक प्रखरपणे तेजाळून निघत राहिल्या. विजया मेहता यांचे आयुष्य रंगभूमीच्या तेजस्वी प्रकाशात झळाळले असले, तरी त्याच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक आयुष्यात अंधाराचे गहिरे मेघ होते. त्यांचे आत्मचरित्र ‘झिम्मा’ मधून उमटणारे काही प्रसंग इतके करूण आहेत की, ते वाचताना हृदय पिळवटून जाते.
विजयाबाईंचे पती हरिन, हे दुर्गा खोटे यांचे पुत्र. विजयाबाईंचे लग्न झाले तेव्हा दोघेही तरुण, उत्साही आणि रंगभूमीच्या स्वप्नांनी भारलेले होते. घरात सासूबाईंच्या रूपाने महान अभिनेत्री, सुसंस्कृत वातावरण होते. नव्या दांपत्याची पहिली काही वर्षे सुखात्म होती पण एके दिवशी नियतीने त्यांच्यात दुरावा निर्माण केला, हरिन खोटेंचं अकस्मात निधन झालं. विजयाबाईंनी या प्रसंगाचे वर्णन करताना लिहिले आहे की, जणू आयुष्याचा एक भाग अचानक कापून टाकला गेला. तरुण वयात विधवा होणे, छोट्या मुलांसह एकटी उभी राहणे, रंगभूमीच्या क्षेत्रात पुरुषप्रधान जगात स्वतःला सिद्ध करणे, ह्या सर्वाचा एकत्रित परिणाम असा झाला की, त्यांच्या मनात एक खोल गहिरी पोकळी निर्माण झाली. तरीही त्यांनी कधी हार मानली नाही. या दुःखाने त्यांना अधिक कणखर आणि संवेदनशील बनवले. ‘झिम्मा’ मध्ये हा भाग वाचताना वाचकाच्या डोळ्यात अश्रू तरळतात, कारण त्यात केवळ वैयक्तिक शोक नाही, तर स्त्रीमध्ये रूजलेल्या कलाकाराच्या संघर्षाची संपूर्ण कहाणी आहे.
‘रंगायन‘चा विखुरलेपणा आणि दरम्यानच्या काळामध्ये वैयक्तिक आयुष्यातले बदल ही त्यांच्या कारकिर्दीतली महत्त्वाची घडामोड होती. रंगायन ही संस्था त्यांच्या स्वप्नांचा गाभारा होती. विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे, श्रीराम लागू यांच्यासोबतची सर्जनशील साथ यामुळे मराठी रंगभूमीसाठी हा कालखंड स्वप्नवत होता.
पण पुढे जाऊन फारूख मेहता यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावरवर इंग्लंडला जाणे, संस्थेचे विखुरणे, जुन्या साथीदारांपासून दूर जाणे... हे त्यांना अत्यंत कठीण गेले.
याबद्दल त्यांनी त्यांनी लिहिलं आहे की, “मी निरागसता गमावली, बालिशपणा संपला, प्रौढत्व आले.” या संक्रमणकाळात त्यांना स्वतःला नव्याने शोधावे लागले. रंगभूमीची साथ सोडून नव्या जीवनात पाऊल टाकणे, पुन्हा सुरुवात करणे, हा मानसिक संघर्ष प्रचंड टोकदार होता.
वाढत्या वयाच्या अशक्तपणात, जेव्हा शरीर साथ देत नव्हते, तेव्हा त्यांना मराठी रंगभूमीतील बदल, नाटकांचे वाढते व्यावसायिकीकरण, प्रयोगशीलतेचा ऱ्हास पाहणे इत्यादी गोष्टी अत्यंत दुःखद होत्या. ‘झिम्मा’ च्या शेवटच्या भागात त्यांनी आपल्या एकटेपणाची, गेल्या काळातील तेजस्वी साथीदारांच्या आठवणींची आणि आपण काय सोडून जात आहोत, या भावनेची मनोमन चर्चा केली आहे. पण या सर्व दुःखातही त्यांच्यात एक धग होती. त्यांनी कधी तक्रार केली नाही. दुःखाला त्यांनी सर्जनशील ऊर्जेत रूपांतरित केले. हरिन खोटे यांच्या निधनानंतर त्यांनी रंगभूमीला अधिक गंभीरपणे घेतले. वैयक्तिक शोकाने त्यांची दिग्दर्शनशैली अधिक संवेदनशील आणि मानवी बनली.
विजया मेहता यांचे आयुष्य हे प्रकाश आणि अंधार यांचे मिश्रण होते. दुःखाने त्या मोडून पडल्या नाहीत, दुःखांनी त्या कणखर प्रखर झाल्या. ‘झिम्मा’ वाचताना जाणवते की, खरी महानता ही यातूनच जन्मते, जी एकाच वेळी दुःखाला सामोरे जाते आणि त्याच वेळी सौंदर्यदृष्टी निर्माण करते. ही वेदना त्यांच्या प्रत्येक नाटकात, प्रत्येक भूमिकेत आणि प्रत्येक शब्दात जाणवते. त्यांच्यासारख्या तपस्वी स्त्रीकलाकार होणं म्हणजे केवळ अभिनयाची वी नाट्यकौशल्याची, पारंगततेची गोष्ट नसून समर्पित भावनेने रंगमंच जगण्याची अनुभूती नित्य जागवणं होय.
विजया मेहता यांचे दिग्दर्शन केवळ नाटकाचे जिवंत सादरीकरण नव्हते, तर मानवी मनाच्या गाभ्याशी संवाद साधणे होते. त्यांच्या कामातून नेहमीच एक गहन वेदना आणि सौंदर्य एकत्रित जाणवत असे. त्यांच्या पश्चातही त्यांच्या समृद्ध आठवणींनी रंगभूमी रसरशीत सचेत राहावा ही श्रद्धांजली...
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा