मंगळवार, १४ जुलै, २०२६

परिकथेमागचे दुःख - हॅन्स अँडरसनचा संघर्ष!



विलक्षण आनंद देणाऱ्या, मनाला उभारी देणाऱ्या, नैतिकतेची पायाभरणी करणाऱ्या आणि जगभरात गाजलेल्या कथांचे लेखन करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात आनंदाचे अगदी मोजके क्षण यावेत ही अतिव दुःखद गोष्ट! जन्मापासून मरणापर्यंत दुःखाने ज्याचा पाठलाग केला अशा माणसाने आनंद, प्रेम, तृप्तता, प्रेरणा यांनी भारलेल्या कथा कशा लिहिल्या असतील याचे कोडे उमगत नाही. कारण माणूस जे जगतो तेच त्याच्या लेखनात येते असं म्हटलं जातं. एखाद्याने कल्पनाविलास करून लेखन केले असेल तरीही त्याचे वैयक्तिक आयुष्य थोडे का होईना पण लेखनात डोकावत असतेच! मात्र लाखात एखादा अपवाद असतो जो ह्या गृहितकाच्या छातीवर बसून त्याला खोटं ठरवतो! हॅन्स अँडरसन त्यापैकीच एक होता.

प्रसिद्ध डॅनिश लेखक हॅन्स अँडरसन यांच्या परिकथा माहिती नाहीत असा रसिक माणूस विरळाच असेल. त्यांनी लिहिलेल्या 'द लिटल मर्मेड' ह्या कथेत एका जलकन्येची तरुणावरील, मानवतेवरील प्रेमाची आणि तिच्या त्यागाची दास्तान होती. 'द अग्ली डकलिंग' ही एका सुंदर राजहंसाची ही कथा आहे, जो सुरुवातीला शापित बदकाच्या कुरूप स्वरूपात दिसत होता. 'द स्नो क्वीन'मध्ये गेर्डा आणि काई ह्या दोन लहान मुलांची आणि एका बर्फाच्या राणीची जादूई साहसी कथा होती. 'द एम्परर्स न्यू क्लोद्स' ह्या कथेमध्ये एका राजाच्या नवीन आणि अदृश्य कपड्यांची फेमस उपरोधिक गोष्ट होती. एका खऱ्या राजकन्येची परीक्षा घेणारी मजेशीर कथा म्हणून 'द प्रिन्सेस अँड द पी' ही गोष्ट आजही प्रसिद्ध आहे.

हॅन्स अँडरसन यांच्या वैयक्तिक आयुष्यात गरिबीचे बालपण, शालेय अपमान आणि प्रेमात आलेले अपयश हे प्रमुख बिंदू होते. डेन्मार्कमधील ओडेन्स येथे एका गरीब चर्मकार कुटुंबात त्यांचा जन्म झाला. एका छोट्याशा खोलीतल्या घरात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले. त्यामुळे त्यांच्या शालेय जीवनावर, बालपणाच्या आनंदी जीवनावर परिणाम झाले. लहान वयातच त्यांना विणकाम व अन्य कारखान्यांत काम करावे लागले.

त्यांची आई कपडे धुण्याचे काम करत असे, घरातला खर्च भागवताना तिचा जीव मेटाकुटीला येई! कुटुंबाचा भार तिला पेलवत नव्हता. अत्यंत दारिद्र्य, एकटेपणा आणि नैराश्यामुळे तिने मद्याचा आधार घेतल्याचे उल्लेख चरित्रकार करतात. आपल्या व्यथा वेदनांचा तिच्या परीने तिने उपाय शोधला होता मात्र त्या उपायाने हॅन्सच्या आयुष्याची अजूनच माती झाली. त्यांना शाळा बदलावी लागली. गरीब आणि असहाय मुलांना सवलत असणाऱ्या शाळेत ते शिक्षण घेऊ लागले. घरचा त्रास कमी झाला म्हणून त्यांनी शाळेत येताच सुस्कारा टाकला मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. ह्या शाळेचे मुख्याध्यापक एक जालिम कठोर इसम होता. ह्या मुख्याध्यापकाकडून त्यांना खूप त्रास सहन करावा लागला.

घरी असले की आई त्रास द्यायची आणि शाळेत गेल्यावर त्यांच्यापेक्षा मोठ्या वयाच्या मुलांकडून त्यांनां कुचेष्टा सोसावी लागली. वर्गात रोज त्यांची टवाळकी केली जाई. आपला आत्मविश्वास खचतो की काय अशी भीती त्यांना वाटू लागली. आपल्या आजोबांप्रमाणे स्वतःलाही मानसिक मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची आणि वेडे होण्याची भीती वाटू लागली. शालेय शिक्षण कसेबसे संपले आणि त्यांनी तारुण्यात पाऊल टाकले! मात्र इथेही त्यांच्या हाती वेदना आणि प्रतारणाच आली! आयुष्यभर त्यांनी प्रेमात स्वतःला अजमावलं! मात्र प्रेमात सतत अपयशच आलं. त्यांनी कधीही लग्न केले नाही. ते एकटे राहिले, एकांतात राहिले!

स्वीडिश ऑपेरा गायिका जेनी लिंड आणि एडवार्ड कॉलीन यांच्यावर त्यांचे एकतर्फी प्रेम होते, पण त्यांच्यापैकी कुणीही त्यांना प्रतिसाद दिला नाही. आज ना उद्या आपले प्रेम आपल्याला साद घालेल अशी त्यांची वेडी आशा होती! यामुळे ते आयुष्यभर तीव्र एकाकीपणाने ग्रस्त राहिले. मात्र याची कसलीही किनार त्यांच्या लेखनात कुठेही झळकत नाही!

1872 साली ते पलंगावरून पडले, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आणि ह्या दुखण्यातून ते कधीही पूर्णपणे बरे होऊ शकले नाहीत. भरीस भर म्हणून अखेरच्या काळात यकृताचा कर्करोग असल्याचे काही चरित्रांमध्ये नमूद केले जाते; मात्र याबाबत इतिहासकारांमध्ये एकमत नाही. 1875 साली आजच्या तारखेस 4 ऑगस्ट 1875 रोजी त्यांचे निधन झाले.

हॅन्सच्या जीवनात अनेक दुःखद घटनांची रेलचाल होती. बालवयात त्यांच्यापाशी खेळण्यांपेक्षा कल्पनाशक्ती हेच त्यांचे सर्वात मोठे भांडवल होते! तसे पाहिले तर त्यांच्यापाशी जगण्याची व पुढे जाण्याची कोणतीच साधने नव्हती, मात्र एका गोष्टीने ते परिपूर्ण होते! आणि ती गोष्ट म्हणजे त्यांना लाभलेली विलक्षण कल्पनाशक्ती! ते स्वतःच्या बाहुल्या बनवत असत. ज्यांना त्यांच्या बाहुल्यात स्वारस्य असे त्यांच्याकरिता शो करण्यासाठी एक छोटेसे थिएटर तयार करायला त्यांना नेहमीच आवडायचे. जादुई कथांनी नेहमीच त्यांच्या डोक्याचा ताबा घेतलेला असे.

ते फक्त चौदा वर्षांचा असताना एका छोट्याश्या पिशवीत जरुरीच्या चीजवस्तू घेऊन ते घराबाहेर पडले. तिथून ते थेट कोपनहेगन या गजबजलेल्या मोठ्या शहरात गेले. एखाद्या गाजलेल्या मंचावरचा प्रसिद्ध अभिनेता किंवा गायक होण्याचे त्यांचे स्वप्न होते. आपले स्वप्न प्रत्यक्षात यावे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केला, पण ते खूप कठीण होते. बराच काळ उमेदवारीत गेल्यानंतर त्यांना लक्षात आले की, गायन अथवा अभिनय ही त्यांची सर्वोत्तम कला अभिव्यक्ती नव्हती! गोष्टी सांगणे ही त्यांची सर्वाधिक आवडणारी गोष्ट होती!

आपण लोकांना कथा सांगतो मात्र त्या कथा किती जणांच्या लक्षात राहत असतील ह्या प्रश्नाने त्यांना हैराण केले! मग त्यांनी ठरवलं की, ह्या कथा लिहून ठेवल्या पाहिजेत! आपल्या डोक्यात ठाण मांडून बसलेल्या सर्व गोष्टी त्यांनी कागदावर उतरवायला सुरुवात केली. मत्स्यकन्या, परी, बदक, राजहंस, जादूगार, महाल, वृद्ध चेटकीण, सहृदयी नायक, त्याचे सद्गुण आणि प्रेमळ नायिका! त्यांच्या गोष्टींत असे तमाम अद्भुत अतर्क्य घटक असत! मुलांसाठी त्यांनी शेकडो परीकथा लिहिल्या.

त्यांच्या कथा जगभर अनुवादित झाल्या आणि ते जागतिक लेखक झाले! आजही अनेक बालके त्यांच्या कथा वाचतात! चांदण्या रात्री एखादे बालक आपली कथा वाचतेय आणि आपण आकाशातून त्याच्याकडे तृप्ततेने पाहत आहोत असं त्यांना नित्य वाटे! आणि त्यांचा हा भास खरा ठरला! गेली कित्येक वर्षे प्रत्येक पिढ्यातली बालके त्यांच्या कथा वाचतच मोठी झालीत!

हॅन्स अँडरसनची स्वप्ने सुखांची, आनंदाची, तृप्ततेची, नात्यांच्या गहिरेपणाची होती! प्रेमाच्या आसक्तीची होती, चांगल्या वाईटाच्या सीमा दाखवून देणाऱ्या नैतिकतेची होती! त्यांची स्वप्ने जादुई कथांचा रंग घेऊन अवतीर्ण झाली आणि अख्ख्या जगाला त्यांनी भुलवले! ह्या जादुई कथा आजही तुम्हाला हसवू शकतात, आनंदी ठेवू शकतात आणि आशेची स्वप्न दाखवू शकतात.

ज्याच्या आयुष्यातील एक साधे स्वप्नही पूर्ण झाले नाही, ज्याला मनसोक्त आनंद कधी उपभोगताच आला नाही, त्यांच्या आयुष्यात अपूर्ण प्रेम, एकटेपणा भावनिक निराशा गच्च दाटून होती! अशा माणसाने गेली दोन शतके लहान मुलांना आनंद दिला आहे ही गोष्टच मुळात किती अफाट उत्तुंग उदात्त आहे ना! जगाला आनंद देणारी माणसं चांगल्या अर्थाने लक्षात राहतात, लोक त्यांचे स्मरण आनंदाने करतात. जे एका कालखंडात लोकप्रिय असतात मात्र त्यांच्या विकार विकृतीची सच्चाई समोर आल्यावर जग त्यांचा तिरस्कार करू लागते! अशा लोकांनाही जग ध्यानात ठेवते मात्र एक तिरस्करणीय, वाईट आणि अमानवी घटक म्हणून!

हॅन्स अँडरसनचे मोठेपण त्यांच्या दातृत्वात दडलेय, जो आनंद त्यांनी केवळ स्वप्नातच पाहिला तो आनंद त्यांनी शब्दरूपात जगाला वाटला! त्यांच्या वाट्याला आलेली दुःखे, अवहेलना, अपमान यातलं काहीही जगापुढे थेट मांडलं नाही, मात्र त्यांच्या परीकथांमध्ये काही प्रसंग काही पात्रे अशी रेखाटली की, दुःख, त्याग, मृत्यू, एकाकीपणा यांचे आगळे वेगळे स्वरूप त्यांनी जगापुढे आणले! आपल्या वैयक्तिक वेदनांना थेट केंद्रस्थानी न ठेवता त्यांचे रूपांतर कल्पनारम्य, नैतिक आणि भावस्पर्शी कथांमध्ये केले. ह्यासाठी खूप मोठं मन लागतं! कदाचित ह्यामुळेच त्यांच्या परीकथा अस्सल आणि गहिऱ्या वाटतात! दुःखाला लावलेला सुखाचा वर्ख इतका तेजस्वी असू शकतो याची आपण कल्पना करू शकत नाही! अशी माणसं म्हणूनच अमर होतात!

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा