बुधवार, १५ जुलै, २०२६

नाळ तुटलेली नाती..


चिंधी आरती नावाची एक तरुणी होती, जी धंदा करायची. पुणे पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये तिचे नाव सापडेल, हौशी माणसं त्याचा शोध घेऊ शकतात. नाव ऐकून कुणाला वाटेल की, हिला चिंधी का म्हटले जात असेल, याची कारणे काय असतील! ह्या बाबतीत लोक काहीही सांगायचे. ती चिंधीवर बसते, चिंधी नेसते इथंपासून ती चिंधी खाते इथंपर्यंतचे प्रवाद होते. वास्तवात तिचे नावच चिंधी होते, तिला लाईनमध्ये आणलं तेव्हा तिच्या मालकिणीने तिला आरती हे नाव दिलं. ते नाव तिला आवडलं नाही. कस्टमरने नाव विचारलं तर ती आपलं नाव चिंधी असंच सांगे. बाकी बायका मात्र तिला आरती म्हणत! अखेरीस ती चिंधी आरती झाली.

आणखी एक असाच नग होता. हातपाय धडधाकट असूनही लोक त्याला पांगळा दत्तू म्हणत! कित्येक दिवस त्यामागचे कारण कळले नाही. एकजण म्हणतो म्हणून अख्ख्या पब्लिकने त्याचे तेच नाव स्वीकारले. पाय नीटनेटके असूनही लोक त्याला पांगळा दत्तू म्हणत आणि तो देखील हसून प्रतिसाद देई. बऱ्याच काळानंतर नेमकी माहिती कळली. तिथे दोन दत्तू होते. एक अंध होता आणि दुसरा अपंग होता. दोघेही एकाच खोलीत राहायचे. अपंग असलेला दत्तू एकदा खोली सोडून त्याच्या गावाकडे गेला, तो परतलाच नाही! मात्र योगायोगाने त्या खोलीला दुसरा शेयरिंग भाडेकरू मिळाला त्याचे नाव दत्तूच होते! अपंग असलेल्या दत्तूच्या जागी आलेला दत्तू म्हणून याची ओळख मस्करीने, पांगळा दत्तू अशीच केली गेली. तीच ओळख कायम झाली.

बुधवार पेठेच्या तोंडावर असलेल्या पान टपरीत सुन्या चव्हाण कामाला होता. स्थानिक लोक त्याला हेकणा म्हणत. वास्तवात त्याचे डोळे अगदी नीटनेटके होते, जराही तिरळेपण नव्हते मात्र लोक त्याला हेकणा म्हणत! त्याच्या टपरीशेजारी एके काळी रेशन दुकान होतं. जे पुढे जाऊन स्थलांतरित झालं. सुन्याची पान टपरी आधी नरसिंग जाधवच्या मालकीची होती. तो जगभराच्या गप्पा मारायचा. शेवटी पान दुकान सोडून तो राजकीय कार्यकर्ता झाला. पुढे जाऊन त्यानं सगळी सेटींग करुन 'मोठं मीटर' लावलं. मात्र फार काळ त्याची डाळ शिजली नाही. अखेर पुढाऱ्यांना भाद्या बायका पुरवायच्या कामावर तो कायमचा रुळला. बंद पडायच्या मार्गावर असलेली त्याची टपरी सुन्याने अशी काही चालवली की सगळ्यांनी नवल केले. नरसिंग नुसताच कहीपती होता पण सुन्या अगदी हिकमती निघाला. रेशन दुकान चालवणाऱ्या भामा पांढरेंचे तोंड कुणी धरत नसे! त्यांनीच, 'सुन्या हिकमती हेकणा लाखात देखणा' असं त्याचं वर्णन ज्याच्या त्याच्यापाशी केलं! लोकांनी बाकी शब्द गिळून टाकले, उरला फक्त हेकणा सुन्या!

त्याच एरियात असणाऱ्या हॉटेल शेरे पंजाब ग्रँडमध्ये भांडी घासणारी एक मावशी होती. चंद्राबाई नलावडे तिचे नाव. तिथले स्टाफचे लोक मात्र तिला हेलन म्हणत! आमच्याकडे हेलन भांडी घासते, असं त्यांच्या बोलण्यातून ऐकलं तेव्हा साहजिकच कुतूहल जागं झालं! तिथली गडी माणसं लै हरामी होती. त्यांनी चंद्राबाईची पाळंमुळं खोदून काढली होती. ती आधी मोडनिंबच्या कलाकेंद्रात नाचगाणं करायची. तिची उमर ढळली. ती देशोधडीला लागली. तिच्या एका इमानी आशिक इसमाने तिला इथं चिकटवून दिलं. घरदार नसलेल्या पन्नाशीपार बाईला खायला राहायला सोय झाली.

हॉटेलचे मालक सरदारजी होते. भला माणूस! तो एकटाच तिला चंद्रामौसी म्हणायचा. बाकीची दोन पायांची जनावरं मात्र तिला हिणवण्यासाठी हेलन म्हणत! पण तिला त्याचे वाईट वाटत नव्हते. कदाचित सुरुवातीला वाटले असावे. नंतर अंगवळणी पडले असावे. ती तिच्या कामाशी मतलब राखायची. नंतरच्या काळात सरदारजींनी हॉटेल विकले. त्यांच्या मुलुखात निघून गेले. जाताना चंद्राबाईला सोबत घेऊन गेले. 'एक तुही निरंकार'वाल्या कुठल्याशा महाराजांचे ते अनुयायी होते. जालन्धरमध्ये कुठे तरी त्यांची पुश्तैनी जमीन जायदाद होती. तिकडे गेले. इकडे काही काळाने हॉटेलच्या मॅनेजरपदावर काम करणाऱ्या समाधान नरळेला पैशांची मोठी नड आली. तेव्हा त्याच्या बायकोने सांगितलं की पहिल्या मालकाकडे जाऊन या! काहीतरी मदत मिळेल.

नरळे दुसऱ्याच दिवशी रेल्वेने गेला. आठवड्याने घरी परतला. मालकाने त्याला पैसे तर दिलेच होते पण चंद्राबाईने आयुष्यभर कमावलेले पैसेही त्याला दिले होते! तिला कॅन्सर झाला होता, ती मालकांच्याच घरी होती. तिने साठवलेले पैसे तिच्या एखाद्या नातलगालाच दिले पाहिजेत असं त्यांना वाटे. पण तिचे नातलग कोण शोधणार! नरळेला पाहून ती धाय मोकलून रडली. तिच्या आयुष्यातल्या, विस्मरणात गेलेल्या सगळ्या गोष्टींचा पट जसाच्या तसा तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. आपण आयुष्यभर जिची अवहेलना केली तिने आपल्याला आयुष्याची पुंजी दिली या सुखद गोष्टीचा बाभूळकाटा आता आयुष्यभर नरळेची सोबत करणार होता!

सुन्या चव्हाणचे पुढे काय झाले माहिती नाही. कारण तिथली पानटपरी मुनसीपालटीने कधीच काढून टाकली. सुन्याचा पोरगा मुंबईत नोकरीस आहे असं समजलं तेव्हा बरं वाटलं. त्याच्या घराचा पत्ता ठाऊक नसल्यानं त्याचं उर्वरित आयुष्य उमजलं नाही. मात्र आठवड्यापूर्वी भामा पांढरेंची लेक रेल्वेत भेटली होती. तिने चाचरत चाचरतच ओळख काढली. आई आता हयात नाही हे सांगताना तिचे डोळे भरून आले होते. रेशन दुकान स्थलांतर केल्यानंतर आईला पॅरालिसिसचा मोठा झटका आला आणि ती दोन दशके अंथरुणाला खिळून होती हे सांगताना तिचे डोळे वाहत होते.

'सुन्यामामाने आईची सेवा केली. खूप मन लावून त्याने काळजी घेतली. आई गेल्यावर मात्र तो घरी यायचा बंद झाला.' डोळे टिपत ती सांगत होती. सुन्याच्या बायकोने त्याला म्हातारपणी घराबाहेर काढलं होतं. मग तो भामापाशी राहायला आला होता. भामाच्या निधनानंतर एके सकाळी तिच्या घरातून तो कायमचाच निघून गेला, तिने हे सांगितलं तेव्हा, त्या भल्या माणसाचं पुढं काय झालं असेल ह्या जाणिवेने काळीज लक्कन हललं. अनामिक लोकांच्या गर्दीत तो हरवून गेला असेल. तो जिवंत असेल का, ह्या प्रश्नाने मन कातर झाले! त्याला आता कुणीच ओळखत नसेल, कुणीच हेकणा म्हणत नसेल हे नक्की!

पांगळा दत्तू अजूनही शुक्रवारात राहतो. त्याचा अंध सहकारी नाशिकला सेटल झालाय. त्याचं लग्न अंध मुलीशी झालं. त्यांना मुलगी झाली जिची दृष्टी नॉर्मल होती. दत्तू तिला पाहून आला तेव्हा त्याला खूप आनंद झाला. गेल्या कित्येक वर्षात त्याने लहान मूल हातात धरलं नव्हतं. दत्तू एका अकाऊंटींग फर्ममध्ये कामाला लागला. तिथंच कामाला असणाऱ्या विधवा राधाबाईंशी त्याची ओळख झाली. पुढे जाऊन त्यांचे लग्न झाले. बाईंची आधीची दोन अपत्ये होती. बाईंनी दत्तूपासून मूल होऊ दिलं नाही मात्र त्याला आपल्या घरात घेतलं. दत्तू आता म्हातारा झालाय. त्याची सावत्र मुलं त्याला सावलीला देखील उभं करत नाहीत. राधाबाईच्या आधी आपल्याला मरण यावं म्हणून तो प्रार्थना करतो. त्याची प्रार्थना त्या निराकार निर्गुणाच्या कानी पडेल की नाही याची मला शंका आहे! दत्तूच्या घरातही सरदारजीच्या गल्ल्यावर होता तसा निरंकारी बाबांचा फोटो होता. त्याला तो कुणी दिला होता, हे काही उमजलेच नाही.

तोंडावर कसलेसे व्रण असणाऱ्या थेरड्या व्यंकटशी आरतीने लपून छपून लग्न केलं. बुधवार पेठ सुटली म्हणून ती खुश झाली. तिच्या जन्माचे भोग सरले, म्हाताऱ्या व्यंकटने गावातल्या वाड्यावर नेलं नाही. तिला शेतात नेऊन ठेवलं. तिने असले हजार पुरुष अंगावर झेललेले असल्याने यातलं गमक ओळखलं होतं! आपली हयात याच्या कामी येणार नाही याचे गणित ओळखले होते. त्याच्या मागं लागून गोड बोलून त्याचं शेत तिने आपल्या नावावर करून घेतलं होतं. म्हाताऱ्याला गंमतीची आठवण झाली की तो शेतात यायचा. त्याच्यापाशी बक्कळ शेतशिवार होतं! आरतीच्या नावाने त्याच्या गावात बोभाटा झाला होता. पण त्याच्याकडे गडगंज पैसा असल्याने कुटुंबासह कोणच त्याच्या वाटेला जात नव्हते. वय झालं असलं तरी त्याच्या अंगात रग होती. त्याला संपवणे सोपी गोष्ट नव्हती. त्यामुळे बरेचजण तो खपायची वाट पाहत होते. मात्र तो नव्वदीत जाऊनही खपला नव्हता. आरतीने नंतर एक पोरगं ठेवलं, त्याच्या देखरेखीसाठी!

आताशा ती देवधर्म करत फिरते. तिथले अंगारे धुपारे आणून व्यंकटच्या उशाला ठेवते. त्याला तितकेच बरे वाटते. ती पुन्हा त्याच्याकडून पैसे घेते, दर खेपेला दुसऱ्या राज्यात देवदर्शनाला जाते! मात्र जाताना ती एकटी नसते, तिच्यासोबत बऱ्याचदा देविका असते. देविका, चंद्राची पोर! अनाथाश्रमात वाढलेली! देविकाचे लग्न ठरलेय, पण चंद्राबाई तिच्या लग्नापद हयात असेल की नाही हे सांगता येत नाही! विधात्याला त्यांची भेट मंजूर असेल तर तेही घडेल! देविकाला तिच्या आईबापाचे तोंड पाहायचे नाहीये. बाप तर केवळ चंद्रालाच ठाऊक असेल. पेशाने वकील असलेल्या भामाच्या मुलीच्या मदतीने, आरतीचे डॉट्स सरदारजी सोबत जोडून द्यावेत असं कधीकधी वाटतं, पण पुन्हा वाटतं की, पोरीला पाहून चंद्राबाई मरण पावली तर पोरीच्या आयुष्याची बरबादी पाहून तिच्या आत्म्याला शांती लाभणार नाही! ती स्वतःला कधीही माफ करणार नाही! काही भेटी गाठी न झालेल्याच बऱ्या असतात!

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा