माणसं जी दुष्कृत्ये करतात ती त्यांच्या मृत्यूनंतरही टिकून राहतात; मात्र त्यांची सत्कृत्ये अनेकदा त्यांच्या अस्थींसोबतच गाडली जातात... म्हणूनच, त्याला सापाच्या अंड्यासारखे समजले पाहिजे; कारण ते अंडे उबल्यावर त्यातून बाहेर पडणारा जीव त्याच्या जातीप्रमाणेच अपायकारक ठरतो. हे यामागचे लॉजिक!
विख्यात दिग्दर्शक इंगमार बर्गमन यांच्या 'द सर्पंट्स एग' ह्या सिनेमाची कथा ह्याच सुत्राभोवती गुंफलेली आहे. चित्रपटाची पार्श्वभूमी आहे 1923 मधील बर्लिन शहराची. जर्मनी आपल्या अस्तित्वासाठी झगडतोय. पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर जर्मनीची अर्थव्यवस्था अक्षरशः कोसळली आहे. चलनवाढ इतकी प्रचंड आहे की सकाळी मिळालेला पगार संध्याकाळपर्यंत कागदाच्या भंगाराइतकाही मोलाचा राहत नाही. बेरोजगारी, उपासमार, गुन्हेगारी आणि निराशा यांनी शहराला वेढले आहे. माणूस नावालाच जगतोय; जगण्याचा अर्थ त्याच्याकडून हिरावून घेतला गेलाय.
याच काळात आपल्याला भेटतो एबेल रोझेनबर्ग. तो अमेरिकेतून आलेला ज्यू वंशाचा सर्कस कलाकार आहे. त्याचा भाऊ मॅक्स, अचानक आत्महत्या करतो आणि त्या घटनेने एबेलच्या आयुष्याचा पाया हादरतो. आता तो एकाकी होऊन जातो, अस्थिर होतो आणि जगण्याचा आधार शोधू लागतो. त्याची मेहुणी मॅनुएला हिच्याबरोबर तो जगण्याचा प्रयत्न करतो; पण त्यांच्या सभोवतालचे शहर प्रत्येक दिवसागणिक अधिक अमानुष होत जाते.
एबेलच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना सुरुवातीला वेगवेगळ्या वाटतात. पोलिसांची चौकशी, विचित्र कारणांनी येणारे लोकमृत्यू, निरर्थक हिंसा, संशयास्पद व्यक्ती आणि समाजातील वाढती विकृती, हे सारे एका साखळीचे विस्कळित धागे होत. परंतु हळूहळू त्या धाग्यांचे एक भयावह वस्त्र विणले जात असल्याचे लक्षात येते.
एबेल एका हॉस्पिटलमध्ये कामास लागतो. त्या दरम्यान त्याच्या लक्षात येते की त्या क्लिनिकमध्ये काही छुप्या संशोधन प्रक्रिया राबवल्या जातात. ज्यात मानवी मन आणि शरीरावर क्रूर प्रयोग केले जात आहेत. विज्ञानाचा वापर उपचारासाठी नव्हे, तर माणसाला नियंत्रित करण्यासाठी आणि त्याची मानवी ओळख नष्ट करण्यासाठी केला जातोय. प्रयोगशाळेतील त्या गोठलेल्या भिंतींमध्ये भविष्यातील छळछावण्यांची सावली दडलीय. चित्रपट तसं स्पष्टपणे सांगत नाही; पण सूचित करतो की, पुढच्या काळात उदयास येणाऱ्या ना*झी अमानुषतेची बीजे याच मानसिकतेत रुजली आहेत.
चित्रपटाच्या अखेरीस प्रेक्षकाला उमगते की, आपण केवळ एका व्यक्तीच्या दुःखाची कथा पाहत नव्हतो; आपण इतिहासाच्या गर्भात वाढणाऱ्या एका विषारी अंड्याचे कवच पारदर्शक होताना पाहत होतो. सापाच्या अंड्याच्या प्रतिमेचा वापर करून बर्गमन सांगतात की, हुकूमशाही, द्वेष, वंशश्रेष्ठत्व किंवा सामूहिक हिंसा एका दिवसात जन्माला येत नाही. ती आधी समाजाच्या मानसिकतेत अंकुरते. आर्थिक संकट, नैतिक अधःपतन, राजकीय अस्थिरता आणि मानवी असुरक्षितता यांच्या उबेत तिचे संगोपन होते. ह्या गोष्टी आपल्याशी रिलेट होतात का?
1923 हे वर्ष जर्मनीसाठी निर्णायक होते. पहिल्या महायुद्धानंतरच्या नुकसानभरपाईमुळे देश आर्थिकदृष्ट्या कोसळला होता. चलनवाढ नियंत्रणाबाहेर गेली होती. लोकशाही संस्थांवरील विश्वास कमी होत होता. समाजात ज्यूविरोधी भावना, राष्ट्रवादी आक्रमकता आणि कट्टर विचारसरणी हळूहळू बळकट होत होती. याच दशकाच्या अखेरीस आणि पुढे हि*टलरच्या नेतृत्वाखाली ना*झी पक्षाचा उदय झाला. चित्रपट हा इतिहास सांगत नाही; तो त्या इतिहासाला जन्म देणाऱ्या मानसिक अवस्थेचे चित्र रेखाटतो. हे चित्रही आपल्याला रिलेट होतेय का!
या चित्रपटाचे सामर्थ्य सर्वकालीनतेत आहे. आर्थिक विषमता वाढली, लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास ढासळला, सामाजिक माध्यमांतून द्वेषाचा प्रसार झाला, अल्पसंख्याकांविषयी संशय आणि भीती पसरवली गेली, किंवा विज्ञानाचा वापर मानवी स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी होऊ लागला, तर इतिहासातील तीच प्रक्रिया नव्या रूपात पुन्हा सुरू होऊ शकते. हे गृहितक मात्र बऱ्याच देशांशी संबंधित आहे! असो.
आज अनेक देशांमध्ये लोकशाही संस्थांवरील अविश्वास, ध्रुवीकरण, कट्टर राष्ट्रवाद, दिशाभूल करणारी माहिती आणि सतत वाढणारी सामाजिक दरी यांवर चर्चा होत असते. या पार्श्वभूमीवर 'द सर्पंट्स एग' आपल्याला सावध करतो की, कोणत्याही समाजात मानवी प्रतिष्ठा, विवेक आणि संवाद यांची घसरण झाली तर त्याचे परिणाम दूरगामी असतात. हा चित्रपट कोणत्याही विशिष्ट वर्तमान देशाशी थेट तुलना करत नाही; मात्र इतिहासातील प्रक्रियांकडे लक्ष देण्याची सूचना करतो. आपल्यासाठी ही धोक्याची घंटा आहे का? कुणास ठाऊक!
चित्रपटात बर्लिन हे शहरही स्वतंत्र पात्रासारखे उभे राहते. धूसर रस्ते, उदास इमारती, अंधुक प्रकाश, रिकामे चेहरे आणि सतत जाणवणारी भीती यांमुळे वातावरणात एक गुदमरवणारी संवेदना निर्माण होते. प्रेक्षकाला सतत असे वाटत राहते की एखादी अघटित घटना घडणार आहे; आणि हीच अस्वस्थता चित्रपटाचे सर्वात मोठे कलात्मक यश ठरते.
कथानक संथ गतीने पुढे सरकते. त्यामुळे जलद घटनांची अपेक्षा करणाऱ्या प्रेक्षकाला तो संयमाची मागणी करतो. परंतु ही संथता हेतुपुरस्सर आहे. ती समाजाच्या आतल्या कुजण्याची प्रक्रिया दाखवते. बर्गमन यांना हिंसेचे दृश्य दाखवण्यात रस नाही; हिंसेला जन्म देणाऱ्या मानसिकतेचा मागोवा घेण्यात त्यांना अधिक स्वारस्य आहे. सद्यकाळात आपल्या देशासह जगातील बऱ्याच देशांना ही समस्या भेडसावतेय. ह्याविषयीचे एक भाष्य सिनेमाच्या अखेरीस येते, ते पडद्यावर पाहणे इष्ट!
'द सर्पंट्स एग' हा ना*झीवादावरील चित्रपट नाही; तो ना*झीवाद जन्माला येण्यापूर्वीच्या शांत, पण वि*षारी गर्भावस्थेचा चित्रपट आहे. तो सांगतो की, इतिहासातील सर्वात मोठ्या शोकांतिका अचानक घडत नाहीत. त्या आधी समाजाच्या विवेकावर बारीक सारीक आघात होतात, माणसाच्या संवेदनशीलतेवर धूळ साचते आणि सामान्य वाटणाऱ्या घटनांच्या सावलीत असामान्य विनाश आकार घेत राहतो.
म्हणूनच हा चित्रपट आजही केवळ भूतकाळाची कहाणी राहत नाही. तो प्रत्येक पिढीला एकच प्रश्न विचारतो, आपल्या सभोवतालच्या समाजात कुठे एखादे ‘सर्पाचे अंडे’ शांतपणे उब घेत तर नाही ना? आणि त्याचे पारदर्शक कवच दिसत असतानाही आपण त्याकडे दुर्लक्ष तर करत नाही ना? आपल्या देशात अशी स्थिती आहे असे अनेक अभ्यासकांना वाटते तर काहींना त्याचाही अभिमान वाटतो तर बऱ्याच जणांना असे काही वाटत नाही. समाजाचा विवेक कसा लयास जातो याचे संथ प्रभावी परिणामकारक चित्रण ही ह्या सिनेमाची बाजू!
आपल्यापैकी अनेकांना ही कथा कुठंतरी वाचल्याची, ऐकल्याची अथवा अनुभवल्याची फिलिंग असेल तर त्यात नवल वाटण्याजोगे काही नाही. कारण आपण हा काळ जगत आहोत! इंगमार बर्गमन दूरदृष्टी असणारा द्रष्टा माणूस होता हे इथे पुन्हा एकदा नव्याने सिद्ध झाले! आज त्याचा स्मरणदिवस!
- समीर गायकवाड


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा