बुधवार, ११ फेब्रुवारी, २०२६
गोष्ट सिडनी शेल्डनची!
ही गोष्ट अशा लेखकाची आहे, ज्यांची पुस्तके जगातल्या कोणत्याही देशातील कोणत्याही मोठ्या शहरातील बुक स्टॉलवर विक्रीस उपलब्ध आहेत! ज्यांच्या पुस्तकांच्या वाचनाचा आनंद आजही नव्या पिढीसह जुने वाचकही घेतात! मात्र या लेखकाचे आयुष्य साधे सरळ नव्हते, त्यांच्या आयुष्यात अनेक उतार चढाव येऊन गेले. ज्यांना लेखनासाठी शेरेबाजीही ऐकून घ्यावी लागली!
तुम्ही अमुक वयातच लिहू शकता किंवा तुम्हाला कादंबरी कधीच लिहिता येणार नाही अशा अर्थाची वाक्ये अनेक जण अधून मधून फेकत असतात. मात्र हे सदासर्वकाळ सत्यच असेल असे काही नाही. जगातली सर्वाधिक खपाची पुस्तके लिहिणाऱ्या आणि साहित्यातील महत्वाचे पुरस्कार मिळवणाऱ्या वैश्विक कीर्तीच्या एका लेखकांनी वयाच्या अठराव्या वर्षी आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि त्यांची पहिली कादंबरी वयाच्या 53 व्या वर्षी लिहिली होती!
आत्महत्येपासून एक पाऊल मागे सरकल्यानंतर हा लेखक थेट काळाला भिडला आणि त्याने इतिहास घडवला! ही हकीकत आहे, जागतिक दर्जाचे लेखक सिडनी शेल्डन यांची! थरारपटाच्या जॉनरचे बेताज बादशहा राहिलेल्या सिडनी शेल्डन यांचे आयुष्य हे स्वतः एक थ्रिलर कादंबरीसारखे आहे.
गरीबीतून सुरू होऊन हॉलीवूड, ब्रॉडवे आणि बेस्टसेलिंग लेखक म्हणून जगप्रसिद्ध होण्यापर्यंतचा प्रवास विलक्षण प्रेरणादायी आहे. त्यांच्या जीवनात अनेक चमत्कारिक, अविश्वसनीय आणि थरारक घटना घडल्यात्, ज्या त्यांच्या थरारक कथांपेक्षा कमी नाहीत. 2005 साली प्रकाशित झालेल्या 'द अदर साइड ऑफ मी' ह्या त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रात या घटनांचे वर्णन आहे.
1934 मध्ये, डिप्रेशनच्या काळात, सिडनी शेल्डन यांनी कॉलेज सोडले होते. त्यांना नोकरी मिळत नव्हती, त्यांचे कुटुंब गरिबीत रुतले होते, आणि एके दिवशी त्यांना वाटले की, आता आयुष्यात काहीच सुधारणा होणार नाही, आता सारे संपले आहे! त्यांनी शिकागोच्या एका हॉटेलमध्ये खिडकीतून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
पण अगदी शेवटच्या क्षणी, त्यांच्या मनात अचानक एक विचार आला की, "मी अजून काहीतरी केले पाहिजे, मी तर तितके खूप काही प्रयत्नही केलेले नाहीत." आत्महत्येच्या निर्णयापासून ते मागे हटले.
हा निर्णय त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. या दिवसाविषयी, घटनेविषयी आत्मचरित्रात त्यांनी लिहिलंय की, "तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार होता. स्वतःला संवपण्याच्या विचारानेच मी स्वतःला घडवले!" त्या दिवशी काही अप्रिय घडले असते तर जगाला त्यांच्या 18 बेस्टसेलिंग कादंबऱ्यांना आणि अद्वितीय साहित्यास मुकावे लागले असते. आणि ऑस्कर, टोनी आणि एडगर सारख्या पुरस्कारांवर त्यांच्या नावाची मोहर उमटली नसती.
1937 मध्ये ते हॉलीवूडला गेले आणि एका स्टुडिओमध्ये स्क्रिप्ट रीडर म्हणून 17 डॉलर प्रति आठवड्याची नोकरी मिळवली. पण फक्त तीन वर्षांत त्यांनी द बॅचलर अँड द बॉबी सॉक्सर या चित्रपटासाठी बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले'साठीचा ऑस्कर पुरस्कार जिंकला!
त्यांच्या आयुष्यातली ही सर्वात मोठी चमत्कार सदृश उलथापालथ होती. एक गरीब, बेरोजगार तरुण अचानक हॉलीवूडचा यशस्वी लेखक झाला. नंतर त्यांनी ब्रॉडवेवरच्या 'रेड-हेड' या नाटकासाठी टोनी पुरस्कार जिंकला. 'आय ड्रीम ऑफ जेनी', 'द पॅटी ड्यूक शो' सारखे हिट शो टेलिव्हिजनवर सादर केले!
अल्पावधीतच सिनेमा, नाटक आणि टेलिव्हिजन या तीनही मध्यमांत त्यांचे नाव कर्णोपकर्णी झाले. 1970 पर्यंत ते टीव्ही शो आणि चित्रपटांचे कथालेखक म्हणून प्रसिद्ध होते, पण कादंबरी लेखनाबद्दल त्यांना अनामिक भीती वाटत होती.
जवळच्या एका मित्राने तर त्यांना आव्हानच दिले की "तू कधीही कादंबरी लिहू शकत नाहीस." ही गोष्ट त्यांच्या मनाला टोचली. त्यांनी निर्धार केला आणि इतिहासाचा पुढचा अध्याय लिहिला. 1970 मध्ये त्यांनी लिहिलेल्या 'द नेकेड फेस' या कादंबरीने विक्रमी खप नोंदवला! या कादंबरीसाठी त्यांना एडगर पुरस्कार जाहीर झाला!
त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. 53 व्या वर्षी त्यांनी कादंबरी लेखन सुरू केले ही गोष्ट आता खोटी वाटू शकते! त्यांनी लिहिलेल्या 'द अदर साईड ऑफ मिडनाइट' या कादंबरीने तर ऐतिहासिक खप केला! तब्बल 52 आठवडे ही कादंबरी न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलर लिस्टमध्ये होती.
सिडनी शेल्डन यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या जगभरात आजवर 30 कोटीहून अधिक अधिक प्रती विकल्या गेल्यात. ते जगातील सातव्या क्रमांकाचे सर्वाधिक पुस्तकविक्री होणारे लेखक आहेत.
त्यांची कारकीर्द एका चमत्कारासारखी आहे! बहुतेक लेखक वयाच्या तिशी चाळीशीत लेखक म्हणून मान्यता पावतात मात्र या गोष्टीकरिता शेल्डनना पन्नाशी पूर्ण केल्यानंतर नाव मिळाले आणि तेही अशा दर्जाचे की, जगाने डोळे विस्फारले!
शेल्डन यांना आयुष्यभर बायपोलर डिसॉर्डरने ग्रासले होते. त्यांना मॅनिक-डिप्रेसिव्हचा त्रास होता. ते अनेकदा डिप्रेशनमध्ये जात, दिवसभर बेडवर पडून राहत, पण मॅनिक फेजमध्ये रात्रभर लिहित. त्यांनी आत्मचरित्रात लिहिलेय की, "अशा वेळी देखील माझ्या डोक्यात सतत वेगवेगळ्या कथा घोंगावत असत."
वरवर साधी वाटणारी ही बाब थरारक होती, कारण त्यांच्या मानसिक आजाराने त्यांना अनेकदा आत्महत्या करण्याच्या विचारापर्यंत नेले, पण त्यांनी लढा दिला आणि वयाच्या 89 व्या वर्षांपर्यंत ते लिहित राहिले.
आत्मचरित्रात त्यांनी आपल्या लेखन प्रेरणेविषयी सच्चेपणाने लिहिले आहे. त्यांना बऱ्याचदा स्वप्ने पडत, ते दचकून जागे होत आणि तत्काळ लिहायला बसत. ते एकटाकी लिहून काढत. 1960 च्या दशकात, त्यांना एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात एका बाटलीतून जिनी बाहेर येत असल्याचे दिसले, तिची कथाही दृश्यमान झाली! जाग आल्यावर त्यांनी ताबडतोब, 'आय ड्रीम ऑफ जीनी' या सिरिजच्या लेखनास प्रारंभ केला.
तब्बल पाच वर्षे ही सिरिज हिट राहिली. भवतालात घडणाऱ्या अनेक घटना आणि मनातली इंटयूशन्स यांचा ते अचूक मेळ घालत असत. त्यांनी लिहिलेल्या थरारकथा, क्राइमस्टोरीज त्यांच्या मनात एकाएकी घोळत ; मग ते त्यावर काम करत आणि त्यास शब्दरूप देत असत.
2007 मध्ये सिडनी शेल्डन यांचे निधन झाले. आजही त्यांची पुस्तके जगभरात वाचली जातात. भारतातल्या सर्व मोठ्या रेल्वे स्टेशन्स, बस स्टँडसह शहरातल्या कोणत्याही नामवंत बुक स्टॉलवर त्यांचे पुस्तक विक्रीस नसेल असे होऊ शकत नाही यावरून आपल्याकडची त्यांची लोकप्रियता लक्षात येईल.
आपल्यापैकी अनेकांनी त्यांची पुस्तके वाचली असतील. काहींना ते आवडतही नसतील! त्यांनी लिहिलेले 'ब्लडलाइन', 'रेकलेस' आणि 'स्ट्रेंजर इन द मिरर' मला विशेष आवडले. पॉकेट बुक्सचा ट्रेंड त्यांनी अफाट उंचीवर नेऊन ठेवला. त्यांच्या पायरेटेड पुस्तकांची विक्री कोटयवधी प्रतींच्या घरात आहे, यावरून त्यांची लोकप्रियता लक्षात येईल!
स्वतःला सिद्ध करण्याची तीव्र इच्छाशक्ती असेल आणि आपल्या निश्चयाशी आपण प्रामाणिक असू तर अशक्य काहीच नाही, असं शेल्डन लिहितात! एक लेखक म्हणून ते भारीच होते त्याच बरोबरीने प्रेरणादायी आयुष्य जगलेला विलक्षण माणूस शेल्डन ग्रेटच होते!
- समीर गायकवाड
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा