रविवार, १७ मे, २०२६

हरलेल्या एकाकी माणसाची गोष्ट!



23 नोव्हेंबर 2023. व्हीआरएल ट्रॅव्हल्सच्या खासगी बसमधून एक प्रौढ दाम्पत्य प्रवास करत होतं. त्यांची मुलगी आणि मुलगाही त्यांच्या सोबत होते. त्यांचा प्रवास मजेत चालला होता. बस वेगाने पुढे चालली होती. मध्यरात्रीच्या सुमारास कोल्हापूर-राधानगरी रोडवरील पिरवाडी-पुईखडी घाटात, ड्रायव्हरला वळणाचा अंदाज आला नाही आणि घाटात बस उलटली.

बसमधले बरेच प्रवासी जायबंदी झाले. तीन जणांचा मृत्यू झाला. त्यात त्या 55 वर्षांच्या कर्त्या पुरुषाच्या शेजारच्या सीटवर बसलेली त्याची पत्नी जागेवर गेली आणि पुढच्या सीटवरची त्यांची टीन एजर मुलंही तत्काळ गेली. त्या इसमाने आपल्या डोळ्यादेखत कुटुंब आचके देत मरताना पाहिलं.

आपण त्यांना वाचवू शकलो नाही याचा गिल्ट त्याच्या मनात तयार झाला. खरे तर अपघातात तेही जखमी झाले होते मात्र त्यांचा जीव वाचला होता. परंतु आपण उगाच वाचलो असं त्यांना राहून राहून वाटू लागलं.

ते राहायचे पुण्याजवळील मांजरी येथे. अपघातानंतर दवाखान्यातून घरी परतल्यानंतर त्यांना राहून राहून ती दृश्ये दिसू लागली, आपल्या जिवलगांचे अंतिम क्षण त्यांच्या मनःचक्षुसमोर तरळत राहिले. त्यांना डिप्रेशनने ग्रासले.

जेव्हा जेव्हा त्या दुःखद आठवणींचे कढ दाटून येत तेव्हा ते मांजरीपासून अडीचशे किमी अंतरावरील पुईखडी घाटातल्या अपघातस्थळी तासंतास जाऊन बसायचे, लहान मुलांसारखे रडायचे.

हा सिलसिला तब्बल अडीच वर्षे चालला.

वास्तवात नीट विचार केला तर लक्षात येते की, मागील अडीच वर्षे ते देहरूपाने जिवंत होते, त्यांचे मन त्याच दिवशी मरण पावले होते जेव्हा त्यांचे जिवलग त्यांना सोडून इहलोकापासून दूर गेले होते.

अपघाताच्या दिवसापासून ते कणाकणाने झिजत गेले आणि गत सप्ताहात त्यांनी निश्चय केला की, ही कश्मकश आता थांबवायची!

खिशात विषाची बाटली घेऊन ते त्या अपघातस्थळी आले, जिथे अपघात घडला होता त्या ठिकाणच्या रेलिंगला त्यांनी तीन पुष्पहार अर्पण केले! जणू काही त्यांच्या तीन जीवश्च कंठाश्च आत्म्यांशी त्यांनी संवाद साधला होता! बराच वेळ तिथे बसून त्यांनी अखेरचे रडून घेतले!

हार घालून होताच तिथेच त्यांनी विष प्राशन केलं. काही तासांनी त्यांचे प्राणोत्क्रमण झालं. शुक्रवारच्या सुमारास दुर्दशा झालेल्या अवस्थेतला त्यांचा मृतदेह काही वाहन चालकांना दिसला. त्यांनी पोलिसांना कळवले.

पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे चालवली आणि विराट गौतम यांचे नाव समोर आले! अपघातातुन वाचलेल्या विराट गौतम यांना विरह आणि एकांत असह्य झाला होता. त्या दुःखद आठवणींनी ते कासावीस झाले होते! त्यांचे श्वास कुंठित झाले होते!

58 वर्षांच्या हारलेल्या थकलेल्या विराट गौतम यांनी त्यांच्या जिवलगांच्या विरहातुन स्वतःला संपवले होते. खरे तर त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली तेव्हाच काही कारवाई झाली असती तर कदाचित ते वाचले असते! पण ते वाचले असते म्हणजे नेमके काय झाले असते?

त्यांची दुःखे तर कमी झाली नसती! उलट त्यांचे विरह वैफल्य अधिक वाढले असते! खरे तर मागील अडीच वर्षात त्यांचे दुःख हलके करायला त्यांना एक खांदा मिळायला पाहिजे होता! कदाचित ते त्याच्यापाशी बोलले असते, त्याच्या खांद्यावर आपलं डोकं टेकवून धाय मोकलून रडले असते!

पण त्यांना तसं कुणी मिळालं नसावं! ते कुढत गेले आणि मेलेल्या मनाच्या देहाला त्यांनी संपवून टाकलं! एक चालता बोलता माणूस त्याचं कुटुंब डोळ्यादेखता संपलं म्हणून अडीच वर्षे कुढत राहतो आणि अखेरीस स्वतःलाही संपवतो! हे विलक्षण क्लेशदायक आहे.

आपली दुःखे सांगता आली पाहिजेत, ते कसब आलं पाहिजे! आपल्याला काही दुःखे नसतील तर ज्यांच्या मनात वेदनांचा सागर आहे त्यांच्यासाठी आपला खांदा पुढे केला पाहिजे! मात्र ह्या काळात या साध्यासुध्या अपेक्षाही हिमालयाइतक्या मोठ्या नि कठीण वाटू लागल्यात!

आपलं सामाजिक स्वास्थ्य बिघडलं असल्याची अनेक उदाहरणे आपण रोजच पाहतो मात्र विराट गौतम यांचं हे उदाहरण काळीज हेलावणारं ठरलं!

थोड्याफार अशाच आशयाची 'हायवे' नावाची एक अनुभवकथा मी लिहिली होती त्याची तीव्र आठवण झाली.

सोलापूर पुणे हायवेवर एका दांपत्याचा अपघात झाला होता, त्यांची मुलं टोल नाक्यापाशी हॉटेलजवळ थांबली होती. अपघातानंतर दोन वर्षांनी ती मुलं तिथं त्या जागेवर आणली आणि मग जे काही घडलं ते स्तब्ध करणारं होतं!

विराट गौतम यांनाही भास झाले असतील का? त्यांना काही वेगळं जाणवलं असेल का? खरे तर हे सगळे मनाचे खेळ असतात. हा एक मनोविकार असतो. यावर त्यांनी उपचार घेतले असते तर कदाचित चित्र वेगळॆ दिसले असते!

असो. जर तरच्या गोष्टींना काही अर्थ नसतो! ज्याची जिवाभावाची माणसं गेलेली असतात त्याचं दुःख त्यालाच ठाऊक असतं!

जगण्याचं प्रयोजन, श्वासाचे कारण नव्याने निर्माण करता आलं नाही तर माणसं खचतात आणि स्वतःला हरवून बसतात! अशी माणसं नजरेस पडल्यावर त्यांच्याशी करुणेचे आस्थेचे उभारी देणारे चार शब्द बोलता आले पाहिजेत!

आपल्या माणूसपणाची ही खूण आहे, ती निभावता आली पाहिजे!

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा