बशीर बद्र यांचे निधन झाले तेव्हा देशाच्या सर्व भागातला सोशल मीडिया त्यांच्या शायरीने भरभरून वाहिला, लोकांनी आपल्या आवडत्या शायरला प्रेमाने निरोप दिला; त्यांच्या रचनांची नव्याने उजळणी झाली इतके प्रेम लोकानी केले.
मात्र काल त्यांना अंतिम विदाई देण्यात आली तेव्हा मोजके लोक त्यांच्या जनाजाला खांदा देण्यासाठी जमा झाले होते. ही गोष्ट खटकली तरीही, 'कुछ तो मजबुरिया रही होंगी' ही पंक्ती आठवून आपण गप्प राहिलं पाहिजे!
त्यांच्या अंतिम यात्रेत अनेक लोक सहभागी होतील अशी अपेक्षा होती, परंतु जनाजाच्या नमाजात म्हणजेच अंत्यविधीच्या प्रार्थनेत मात्र पाचशे लोक सहभागी झाले आणि त्यानंतर लोकांची संख्या आणखी कमी झाली.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आवडत्या कवीला अखेरचा निरोप देण्यासाठी भाजपचा एकही नेता उपस्थित नव्हता. बशीर बद्र हे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले असल्याने निदान त्यांच्या शवावर तिरंगा तरी हवा होता!
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये, मंत्री विश्वास सारंग आणि त्यांचे समकक्ष मंत्री कृष्ण गौर हे दोघेही त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित नव्हते.
औपचारिकता पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सहायक जिल्हाधिकारी सुमित पांडे यांना पाठवले होते आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी एक एसीपी उपस्थित होते.
ज्या कवीच्या रचना संसदेपासून रस्त्यांपर्यंत ऐकू येतात, त्या कवीच्या कुटुंबियांना कोणताही मंत्री किंवा आमदार भेटला नाही.
बशीर बद्र मुसलमान होते म्हणून त्यांना असे वागवले असे तरी कसे म्हणावे? कारण भाजपच्या पूर्वीच्या सरकारांनी बद्र सरांचा सन्मान केला होता. वाजपेयी सरकारने 1999 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
भाजपच्याच राजवटीत, ते बिहार उर्दू अकादमीचे अध्यक्ष झाले आणि 2020 मध्ये तत्कालीन राज्यपाल लालजी टंडन यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी बद्र यांच्या निवासस्थानी भेट दिली होती.
कदाचित वाजपेयी आणि आताच्या सरकारमधला बुनियादी फरक हाच असावा, रसिक असणं वेगळं; प्रतिभावंतांची कदर करणं वेगळं आणि कदर करत असल्यासारखं दाखवणं वेगळं! मात्र लोक आता यातला फरक ओळखतात!
1924 साली वाजपेयी ग्वाल्हेरला जन्मलेले तर बशीर बद्र ह्यांचा जन्म 1935 साली हंसवर इथे झालेला. बशीर बद्र यांचे कुटुंब काही काळातच इटावाला स्थलांतरित झालं. इटावा हे वाजपेयी यांचे मातृक आजोळ! बशीर बद्र आणि वाजपेयी यांची तोंड ओळख याच काळातली!
पुढे जाऊन 1974 मध्ये बशीर सर मेरठ कॉलेजच्या उर्दू विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेव्हा सरकार विरोधातला बुलंद आवाज म्हणून वाजपेयी ख्यातकीर्त झाले होते.
1987 च्या कुख्यात मेरठ दंग्यामध्ये बशीर बद्र यांचे घर जाळले गेले. त्यांची शायरी, वह्या, पुस्तके सारं आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अतिशय जड अंतःकरणाने बद्र यांनी मेरठ सोडले आणि ते भोपाळला आले. वाजपेयीनी त्यांना आपल्या संवेदना कळवल्या होत्या.
मेरठला दंगे झाले तेव्हा कॉँग्रेस नेते वीर बहादूर सिंह हे तत्कालीन युपीचे मुख्यमंत्री होते. न्यायाच्या नावावर तीस वर्षे कुचेष्टा केली गेली. 2015 साली यातील पीडितांच्या नातलगांना नुकसान भरपाई दिली गेली हे चित्रच मुळात निराशाजनक होते!
ह्या सर्व पार्श्वभूमीवर बशीर बद्र ह्यांचे निधन झाल्यावर त्यांच्या अंतिम विदाई समयी त्यांना जो सन्मान देणं अपेक्षित होतं तो सन्मान मिळाला नाही. तरीही, त्यांच्या कुटुंबियांनी त्याबद्दल तक्रार केली नाही.
वास्तवात बशीर बद्र ह्यांची लोकप्रियता इतकी अफाट होती की त्यांच्या शेरोशायरीची गुंज संसदेतही ऐकू येई! 2018 साली तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर टीका करताना तत्कालीन विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी बद्र यांचा 'दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हो', हा शेर वापरला होता.
दुसऱ्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी संसदेला उत्तर देताना आपल्या भाषणात हाच धागा पकडून बशीर बद्र ह्यांचाच, 'जी बहुत चाहता है सच बोलें, क्या करें हौसला नहीं होता' हा शेर ऐकवला होता. 2018 सालच्या प्रचारादरम्यान उत्तराखंडमधील अल्मोडा येथे राहुल गांधी ह्यांनी देखील बशीर बद्र ह्यांचा शेर उच्चारला होता!
बशीर बद्र ह्यांची पहचान बनून गेलेला शेर म्हणजे, 'लोग टूट जाते है एक घर बनाने में, तुम तरस नहीं खाते बस्तीयां जलाने में!' त्यांचे स्वतःचे घर दंग्यात जाळले गेले, त्यांची निम्मी अर्धी शायरी भस्मसात झाली तेव्हा व्यथित होऊन त्यांनी हा शेर लिहिला होता. मात्र चोराच्या मनात चांदणे ह्या म्हणीप्रमाणे दंगेखोर व्यक्तींसाठी हा शेर म्हणजे काळजातला बाभूळकाटा झाला होता.
बद्र ह्यांच्या अंतिम विधीस फक्त भाजपचेच कुणी गेले नाही अशीही गोष्ट नव्हती, काँग्रेस वा अन्य पक्षांचे मान्यवर देखील तिथे फिरकले नाहीत! ज्या कवीचे नाव उठता बसता घेतले जात होते, ज्याला इतके मोठे सन्मान बहाल करण्यात आले होते त्याच्या विदाईला कुणी मोठी हस्ती गेली नाही ही अतिशय लाजिरवाणी आणि दुःखद गोष्ट आहे!
कवी लेखक साहित्यिकांचे समाजातले स्थान ह्यावरून लक्षात येते. गल्लीपुरते अस्तित्व असणाऱ्या एखाद्या गँगस्टरच्या मयतीला देखील लोक गर्दी करतात, पुढारी टेचात बूड टेकवून बसतात, वाहिन्या बाइट्सचा रतीब घालतात मात्र समाजाला दिशा देणाऱ्या आणि जीवनाचे मर्म उलगडून सांगणाऱ्या एका प्रतिभावंत गुणी साहित्यिकाला निरोप देण्यास मोजकेच लोक येतात हे किडलेल्या समाजाचे लक्षण आहे आणि आपण अशा समाजाचे घटक आहोत याचे मला शल्य वाटते! बशीर बद्र सर, आम्हाला माफ करा! -
'परखना मात, परखने से कोई अपना नहीं रहता, किसी भी आइने में चेहरा देर तक नहीं रहता' ही बद्र सरांचीच पंक्ती त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी प्रतिबिंबित झाली, काल अनेकांचे चेहरे उघडे पडले! असो.. ह्या गोष्टीचा सल बरेच दिवस राहील!




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा