ही बाई घाण आहे, ही रांड आहे, ही वेश्या आहे, ही तर धंदेवाली छिनाल आहे अशा पोस्टचा रतीब घातला गेला! या पोस्ट टाकणारे लोक आणि यामुळे उत्तेजित होऊन त्यावर कमेंट करणारे, लाइक करणारे लोक जेमतेम आठवड्यापूर्वी नारी सन्मान, नारी वंदन, महिला हक्क इत्यादि गोष्टींवर रान हाणत होते! यांच्या मनात विद्रोही स्त्रियांबद्दल केवळ आणि केवळ गरळ साठली आहे हे नित्य अधोरेखित होत असतं. ही घटनाही त्याला अपवाद ठरली नाही.
समजा एखादी बाई रांड आहे, वेश्या आहे, धंदेवाली आहे तर मग ती माणूस नाहीये का? तिला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाहीये का? तिने प्रश्नच विचारता कामा नये असे तुम्हाला का वाटते? तुम्हाला वेश्यांचा इतकाच तिटकारा वाटतो तर देशभरातल्या सर्व शहरात ज्या वेश्या वस्त्या आहेत तिथे जाऊन त्यांची सुटका का नाही करत? त्यांच्याकडे बिस्तर गरम कारायला येणारे पाकिस्तानातून येत नाहीत, ते आपल्याच देशातले आहेत. त्यांना का नाही झोडपून काढत? याचे उत्तर तुम्ही देऊ शकत नाही. कारण या बायका अशा पद्धतीने भोगण्यासाठी उपलब्ध असाव्यात याकडे तुमचा कल असतो! म्हणूनच तर बलात्कार प्रकरणी दोषी सिद्ध झालेल्या नीच लोकांचे तुम्ही सत्कार करता!
उन्नाव, हाथरस, कठूआ, मणीपूर अशी अनेक नावे घेता येतील जेव्हा तुम्ही शोषण करणाऱ्यांच्या बाजूने असता! महिलांचे शोषण करणाऱ्या बाबा बुवा लोकांचा धिक्कार करायला तुम्हाला लाज वाटते कारण तुम्ही त्यांचीच मायक्रो आवृत्ती असता! रामरहीम असो की आसाराम, तुम्ही त्यांना झिडकारत नाही. यातच सारे येते.
एखाद्या स्त्रीने तुम्हाला प्रश्न विचरलेला चालत नाही, ही तुमची सहनशीलता आणि संवेदनशीलता आहे! कुणी आपल्या विरोधात गेली रे गेली, की लगेच तिचे चारित्र्यहनन करणे हा तुमचा आवडता विकृत छंद आहे. बेसिकली हीच तुमची आयडेंटीटी आहे, आपल्याला विरोध म्हणजे देशाला विरोध ही भ्रामक कल्पना तुम्ही हेतुतः बनवली आहे कारण तुम्हाला विरोध केला की लगेच त्याला देशद्रोही म्हणून निकालात काढता येतं! आणि समजा ती एखादी स्त्री असेल तर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले की बाकी काम सोपे होते, हा तुमचा फंडा!
स्त्रीचा मुकाबला करू न शकणारे लोक अशी मानसिकता राखतात. ते तिची बदनामी करून तिला शांत बसवू पाहतात. आमच्याशी पंगा घ्याल तर अशी गत होईल असा एक छुपा संदेश यात असतो. एरव्ही स्त्रीला देवता मानणारे अनेक जण मिटक्या मारत याचा आनंद घेतात, यात स्त्रियाही सामील असतात!
मानवी इतिहासाच्या नोंदी अभ्यासल्या तर असे लक्षात येते की जेव्हा जेव्हा दोन भिन्न शक्तींनी एकमेकाविरोधात आक्रमणे केलीत तेव्हा प्रथम शिकार त्यांनी स्त्रियांना बनवलेय. त्यांची एकत्रित अब्रू लुटणे, पुरुषांच्या समोर त्यांच्यावर बळजोरी करणे, विवस्त्र करून मारहाण करणे, धिंड काढणे आणि सरते शेवटी शेकडो स्त्रियांचे शिरकाण करणे आदी गोष्टी केल्या जातात. स्त्रीचे शील हरण करणे हाच आजवरचा पुरुषार्थ मानला गेलाय आणि दुर्दैवाने ही मध्ययुगीन मानसिकता अशा लोकांच्या मस्तकात अजूनही खिळा ठोकल्यागत रुतून बसली आहे! म्हणूनच यांना प्रश्न विचारणारी, उलटून बोलणारी, शक्तिशाली झालेली आणि विद्रोह करणारी स्त्री चालत नाही!
बायांनो यांना भिऊ नका! हे तेच काम करत आहेत जे यांच्या मेंदूमध्ये फिक्स केलेले आहे, त्यांना क्षमा करा, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि प्रश्न विचारत राहा! प्रश्न विचारलेच पाहिजेत, सरकारला, व्यवस्थेला, समाजाला, भोवतालाला आणि जे जे खटकते त्या त्या प्रत्येक घटकाला प्रश्न विचारलेच पाहिजेत.
- समीर गायकवाड
आता ही पोस्ट वाचून लगेच काहीजण धावून येतील की, तु याच्यावर लिहिलं नाहीस आणि त्याच्यावर लिहिलं नाहीस, तु अमुकवर व्यक्त झाला नाहीस आणि तमुकवर व्यक्त झाला नाहीस! वास्तवात असे प्रश्न विचारणारे स्वतः मात्र पूर्णतः एकांगी असतात, ते स्वतः कायम एकच बाजू मांडत असतात, ते एककल्ली एकारलेपणाचे गळू जतन करत असतात आणि समोरच्याला मात्र निपक्षपातीपणाची अक्कल शिकवत असतात!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा