Thursday, January 21, 2016

प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गाथा - 'एअरलिफ्ट' ......


बर्लिन एअरलिफ्टची दुसरया महायुद्धाअखेरची गाथा इतिहासाच्या सर्व अभ्यासकांना माहिती आहे पण आपल्या सेनादलाने त्यातही विशेषतः हवाई दलाने पार पाडलेले 'एअरलिफ्ट'चे ऑपरेशन जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाले आहे. आपल्या हवाईदलांनी पार पाडलेले एअरलिफ्टचे हे ऑपरेशन इतके विशाल होते की गिनीज बुकमध्ये त्याची नोंद झाली आणि मानवी इतिहासातील आजवरचे सर्वात मोठे मानवी रेस्क्यू ऑपरेशन असे बिरूद या मोहिमेला मिळाले.. 

याच मोहिमेवर आधारित अक्षय कुमार आणि निमरीत कौर यांचा बहुचर्चित एअरलिफ्ट हा चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे. कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी राबवण्यात आलेल्या इतिहासातील सर्वात मोठ्या रेस्क्यू ऑपरेशवर हा चित्रपट आधारित आहे. अमेरिका आणि कुवैत यांच्यात झालेल्या आखाती युद्धात अडकलेल्या भारतीयांना अगदी सुखरुप घरी परत आणण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांचे रुपेरी पडद्यावरील चित्रण अगदी वेधक आणि अंगावर काटे असणारे असे आहे असं खुद्द अक्षयनेच ट्विट करून सांगितले आहे.

हे ऑपरेशन अत्यंत मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आले होते. एअर इंडियाच्या विमानांच्या मदतीने सुमारे १ लाख ७० हजार भारतीयांना यशस्वीरित्या मायदेशी परत आणले होते. हे ऑपरेशन अगदी बारकाईने अभ्यास करून राबवले गेले. त्यासाठी अथक परिश्रम आपल्या हवाईदलाच्या चमूने घेतले अन त्याचवेळेस अनंत अडचणींचा सामना देखील आपल्या सरकारने अन पायलटसनी केला. अत्यंत रोमहर्षक आणि अभिमानास्पद अशी ही मोहीम आपल्या देशाची मान उंचावणारी ठरली होती. तब्बल ५९ दिवस ही मोहीम चालली होती यावरून यातील अडचणी आणि आव्हाने ध्यानात यावीत ….

इराकने २ ऑगस्ट १९९० साली कुवेतवर आक्रमण केले होते. सद्दाम हुसेनच्या आदेशावरून अचानकपणे कुवेतवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर हजारो लोक बेघर झाले होते. नेमक्या त्यावेळी कुवेतमध्ये आश्रयास असलेल्या १ लाख ७० हजार भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला होता. त्या सर्वांच्या जीव धोका होता. इराकच्या लष्कराने केवळ आक्रमण केले नव्हते, तर कुवेत शहरामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यांनी शहरात लुटालूट केली होती. तसेच शहरातील नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचारही केले होते. या संपूर्ण प्रकारामुळे भारतात एकच खळबळ माजली होती. कुवेतमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या भारतात राहणाऱ्या नातेवाईकांच्या भूमिकेमुळे तणावाचे वाचावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. या सर्वाची दखल घेऊन भारत सरकारने इंडियन आर्मी आणि एअर इंडियाच्या मदतीने इतिहासातील सर्वात मोठ्या रेस्क्यू ऑपरेशनचे नियोजन केले.

लष्कर आणि एअर इंडियांच्या विमानांतून भारतीयांना मायदेशी परत आणण्याची योजना आखण्यात आली. पण भारतीय लष्कराच्या विमानांना सुरक्षेच्या कारणांवरून प्रवेशाची परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे अखेर केवळ इतर विमानांचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे सर्व सुरू असताना विचारात घ्यावी अशी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, हे सर्व ज्या काळामध्ये घडत होते म्हणजे ९० च्या दशकातला काळ हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फारसा चांगला नव्हता. त्यावेळी भारतासमोर अनेक आर्थिक समस्या आ वासून उभ्या होत्या. त्यातही विशेष म्हणजे ज्या भागात हे युद्ध सुरू होते, त्याच भागातून मिळणाऱ्या क्रूड ऑइलवर भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर अवलंबून होती. तरीही देशवासियांना वाचवण्यासाठी ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा सरकारी तिजोरीवर भार टाकणारा निर्णय अप्रिय असला तरी लोकहिताचा होता त्यामुळे सरकारने वेळ न दवडता प्रत्यक्ष कुवेतमध्ये हे ऑपरेशन अमलात आणताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यात सरकारकडे जास्त पर्यायही उपलब्ध नव्हते. त्यामुळे अत्यंत नियोजनबद्ध पद्धीतीने या ऑपरेशनची योजना आखण्यात आली. त्यानुसार मोहीम राबवत ५९ दिवसांच्या अथक परिश्रमाने एअर इंडियाच्या ४८८ कमर्शिअल फ्लाइट्सच्या माध्यमातून १ लाख ७० हजार भारतीयांना युद्धाच्या भूमीतून मायदेशी आणण्यात यश आले.

१९९० मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या एका दिवसापूर्वी म्हणजे १४ ऑगस्ट रोजी हे ऑपरेशन सुरू झाले होते ते ११ ऑक्टोबर १९९० पर्यंत चालले. कुवेतमध्ये पाकिस्तानच्या एका एअरलाइनच्या क्रूमधील काही सदस्यदेखिल अडकलेले होते. त्यांनी माणुसकीची साद घातल त्यांना वाचवण्याची विनंती केली. भारतानेही मनात काहीही न ठेवता त्यांना वाचवण्याचा निर्णय घेतला आणि वाचवले. या ऑपरेशनमुळे एअर इंडियाच्या नावावर एक अभिमानास्पद अशा विक्रम नोंदवला गेला. गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्याची नोंद करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी ऑपरेशन पूर्ण केल्याबद्दल हा सन्मान मिळाला. आजही हे ऑपरेशन कोणत्याही देशाकडून राबवण्यात आलेले अशा प्रकारचे सर्वात मोठे ऑपरेशन समजले जाते.

शेवटी एक महत्वाची नोंद -  आपल्या हवाईदलाची शान ठरलेल्या या मोहिमेत एअर इंडियाच्या प्रवासी आणि मालवाहतूक विमानांचा सुयोग्य वापर झाला होता. याचे सर्व नियोजन AI चे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक (Managing Director ) श्री. मायकेल मस्कारेन्हास यांचे योगदान फार मोठे होते. या मस्कारेन्हासना जून २००१ एअरइंडियाच्या एमडी पदावरून भ्रष्टाचारास पाठिंबा, सरकारी धोरणास विरोध, हेकेखोर कारभार आणि सहकारयांशी अयोग्य वर्तन या आरोपांचा ठपका ठेवून पदच्युत करण्यात आले. त्यांच्या जागी आलेले व्ही.के. वर्मा यांना कर्तव्यात कसूर केली म्हणून सहा महिने निलंबित केले गेले होते ही लक्षणीय बाब होती. मस्कारेन्हास यांनी निर्गुंतवणूक आणि खाजगीकरण याच्याविरोधात जाहीर रीत्या व्यक्त केलेली नाराजी त्यांना भोवली होती आणि त्यातून त्यांचे हे पद गेले होते. मस्कारेन्हास यांची उचलबांगडी आणि आपल्या मर्जीतल्या, आपल्या राज्यातल्या व्ही.के. वर्मा यांची नियुक्ती ही दोन्ही 'पुण्यकर्मे' तत्कालीन विमान वाहतूक मंत्री श्री.शरद यादव साहेबांच्या मर्जीनुसार झाली होती !


Image result for airlift 2005 movie

असो....  'हॉलीडे' आणि 'बेबी'पासून अक्षयबद्दलच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्यांची पूर्तता या सिनेमात होईल असे चित्रपटाच्या प्रोमोवरून वाटते आहे. एका वेगळ्या विषयावर सिनेमा काढणाऱ्या निर्माते निखील अडवाणी व भूषणकुमार यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. राज कृष्ण मेनन यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हॉलीवूडमध्ये अशा प्रकारच्या कथानाकांवरील सिनेमांची रेलचेल असते आणि त्याला तिकडे पब्लिक त्याला डोक्यावरही घेते आपल्याकडे फडतूस प्रेमकथांचे फाजील लाड असणारे चित्रपट लोक डोक्यावर घेतात आणि चांगले चित्रपट बरयाचदा फाट्यावर मरतात. आशा आहे की आपल्या कडील सवंग अभिरुचीचे लोक देखील हा सिनेमा आवडीने पाहतील, कारण असे व्यावसायिक यशस्वीतेच्या कसोटीवर उत्तीर्ण झाले तरच निर्माते जास्तीच्या संख्येने अशा विषयाला हात घालणारे चित्रपट बनवतील....
अक्षयकुमार आणि 'एअरलिफ्ट'च्या संपूर्ण चमूला दैदिप्यमान यशासाठी मनापासून शुभेच्छा..

- समीर गायकवाड.

( बर्लिन एअरलिफ्टवर पुन्हा कधी तरी लिहीन, ते देखील अत्यंत इंटरेस्टिंग असे मदत अभियान होते..... ज्यात बर्लिन शहराची नाकेबंदी करून पूर्व व पश्चिम असेच विभाजन नव्हे तर चार तुकडे होऊन देखील अत्यंत चतुराईने रशियाने पूर्व जर्मनी - पूर्व बर्लिनच्या भूभागावरूनू पश्चिम जर्मनी- पश्चिम बर्लिनच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यावर उपाय म्हणून दोस्त राष्ट्रांनी पश्चिम बर्लिनसाठी चालवलेले अभियान हे सर्वात दिर्घकालीन एअरलिफ्ट ठरले आणि  यात विमानांतून केली गेलेली मालवाहतूक आजवरची सर्वात वजनदार मालवाहतूक ठरली होती... विशेष बाब म्हणजे या बर्लिन एअरलिफ्टवर देखील 'एअरलिफ्ट' या नावाचाच इंग्रजी सिनेमा बनला होता )

No comments:

Post a Comment