शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

बाळासाहेब आणि पवार साहेब - एक दिलदार यारीदुष्मनी !



बाळासाहेबांचे आणि पवारसाहेबांचे आपसातील नातेच वेगळे होते. वैयक्तिक जीवनात मैत्री आणि  राजकारणात वैमनस्य असं असूनही त्यांनी आपसातले संबंध तुटूपर्यंत कधीच ताणले नाहीत. 'मैद्याचे पोते' म्हणून बाळासाहेब ज्यांची टिंगल करायचे ते शरद पवार हे त्यांचे पाच दशकाचे सोबती आणि मैत्र होते. 'ज्यांना भुईमुगाच्या शेंगा जमिनीवर उगवतात की मातीखाली उगवतात हे  माहिती नाही त्यांनी माझ्याबद्दल बोलू नये' अशा शब्दात पवारसाहेबदेखील त्यांच्यावर सभांमधून बोलायचे. सभा - भाषणे यातून दोघे जरी एकमेकावर राळ उडवत असले तरी त्यांनी त्यांच्यात आपसात असलेले एक ट्युनिंग कधी बिघडू दिले नाही अन ते दोघे कधी एकही झाले नाहीत अन आपसातल्या मैत्रीतून विभक्तही झाले नाहीत. ही दोन ब्रम्हफुले महाराष्ट्राच्या एकाच वेलीवर फुलली असल्याने त्यांची आपसातील वीण घट्ट होती याचे दार्शनिक असणारे अनेक किस्से गेल्या साठ वर्षात घडले. त्यापैकीच एक किस्सा शरद पवारांनी २०१७ च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजिलेल्या मुलाखतीत सांगितला होता. डॉ.जनार्दन वाघमारे, कवी फ. मुं. शिंदे व ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी त्यांना बोलते केले होते, या मुलाखतीत त्यांनी अनेक मजेशीर गोष्टी प्रकाशात आणल्या. त्यातली एक गोष्ट बाळासाहेब आणि पवारांनी एकत्र येऊन काढलेल्या मासिकाच्या जन्मकथेची होती….


अनोखी मैत्री 

शिवसेनेच्या स्थापनेआधी ऐन उमेदीच्या काळात बाळासाहेब ठाकरे आपलल्या उमेदीच्या काळात 'फ्री प्रेस जर्नल'मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते. १९६० मध्ये त्यांनी ही नोकरी सोडली. यानंतर त्यांनी कुठेही नोकरी केली नाही वा कुणाची ताबेदारी स्वीकारली नाही त्यांच्या डोक्यात स्वतःचे एखादे नियतकालिक वा मासिक सुरु करण्याचे घोळत होते. त्‍याच काळात शरद पवार, भा. कृ. देसाई आणि शशिशेखर वैद्यक या तीन तरुणांना सोबत घेत त्‍यांनी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतून प्रसिद्ध होणारया ‘टाइम’ मासिकाच्या तोडीचा त्याचा दर्जा असावा, असे या सगळ्यांचे एकमत झाले. आपसात बैठका झाल्या, रूपरेषा ठरवली गेली आणि चौघांनीही खूप विचार करून याचे नियोजन केले. मासिकाचे नाव एकमताने 'राजनीती' असे देण्याचे ठरले. नाव ठरले, त्यातील कंटेंट कसे असावे ठरले आणि त्यावरील मालकी हक्काची वाटणीही आधीच ठरली. मासिकावर चौघांची मालकी समान राहील असे ठरवले गेले .

एका प्रसन्न क्षणी दिग्गज ..

मजकूर छापण्याआधी दर वेळेस चौघांनी मिळून कंटेंट तपासून घ्यायचे ठरले. यात नेमकी कोणती सदरे घ्यायची यासाठी या चौघांच्या अनेक बैठका झाल्या. मासिकासाठी समान भांडवल चौघांनी मिळून उभे करण्याचे ठरले त्यानुसार त्यांनी या मासिकासाठी 55 हजार रुपयांचे भांडवल जमा केले. मासिकाचे, मार्केटिंग, डिझाइन तासंतास बोलून ठरवले गेले. मासिक तयार झाल्यानंतर स्वतःच वितरीत करायचे की वितरकाला द्यायचे यावरही बराच खल झाला अन शेवटी याची जबाबदारी वितरकावर टाकायची ठरली आणि त्याकाळातील अग्रगण्य वितरकांच्या त्यांनी भेटी घेतल्या. आपण सगळेच जण मासिकाच्या सर्वच अंगांवर इतकी जीव तोडून मेहनत घेतोय व त्यातील दर्जा -मजकूर पाहता हे मासिक अल्पावधीतच देशात पहिल्या स्थानावर जाईल याची चौघांनाही  खात्री होती.

एक अविस्मरणीय क्षण - पवारसाहेब, बाळासाहेब आणि अटलजी     
मासिकाच्या प्रकाशनाच्या वेडाने झपाटलेल्या या ध्येयवेड्या तरुणांनी अफाट मेहनत घेऊन मासिकाच्‍या पहिल्‍या अंकाचे काम पूर्ण केले. आता सर्व सदरे, मजकूर आणि डिझाईन संपूर्णतः तयार झाले होते केवळ मुद्रण बाकी होते. याच वेळी बाळासाहेब पवार साहेबाना बोलले की, ''त्यांच्या एका भगिनीला अंतर्ज्ञान आहे, त्यांच्या अंगात आल्यावर त्यांनी सांगितलेले भाकित खरे ठरते. त्यांचा सल्ला‍ घेऊ''. त्यांच्या या कृतीला शरद पवारांनी आधी आढेवेढे घेतले पण या सर्व प्रक्रियेत अंतिम शब्द बाळासाहेबांचा ठरलेला असल्याने मासिकाचे प्रकाशन कधी करावे, याचा मुहूर्त काढण्‍यासाठी हे चौघे बाळासाहेबांच्‍या 'त्या' बहिणीकडे गेले.

बाळासाहेबांच्या 'त्या' भगिनींनी या चौघांना आशीर्वाद देऊन प्रकाशनासाठी मुहूर्त सांगितला. एवढेच नाही तर या मुहूर्तावर हे मासिक प्रकाशित केले तर बाजारात अंकच राहणार नाही, असे भाकितही केले. त्यांचे हे भाष्य ऐकून चौघेही उत्साही झाले. बाळासाहेबाच्या भगिनीने सांगितल्याप्रमाणे मासिकाची पहिली प्रत मनोभावे सिद्धीविनायकाच्या चरणी ठेवली. इतकी मेहनत घेऊन तयार झालेल्या पहिल्या अंकाचा प्रकाशन सोहळा देखील मोठी प्रसिद्धी करून करण्यात आला. अंक छपाई पार पाडली अन अंक वितरकाकडे रवाना झाले. प्रकाशनानंतर काही दिवसांनी आपल्या अंकाची विक्री किती झाली याचा आढावा घेण्यासाठी त्यांनी वेगवेळ्या गावी जावून बाजारातील स्टॉलवरील
अखेरच्या दिवसातले क्षण  
मासिकाच्या विक्रीची माहिती घेतली. त्यांना फार आनंद झाला कारण एकाही स्टॉलवर अंक शिल्लक नव्हता. अत्यंत खुशीने त्यांनी वितरकाकडे संपर्क साधला. वितरकांने केलेल्या खुलाशाने मात्र ते हैराण झाले ! 'राजनीती' या मासिकाची एकही प्रत विकली न गेल्याने त्यांनी सर्व अंक गोळा करून  कपाटात बंद करून ठेवले होते. बाळासाहेबांच्या 'त्या' भगिनींनी वर्तवलेले 'बाजारात एकही प्रत राहणार नाही' हे  भाकित अशा पद्धतीने चक्क खरे ठरले. हा या मासिकाचा पहिला आणि अखेरचा अंक ठरला !! हे मासिक पुन्हा कधीही प्रकाशित झाले नाही.….

मासिकाची अशी दुरावस्था झाल्यानंतर हे चौघे बाळासाहेबांच्या घरी एकत्र जमले. तिथे अर्थातच गप्पांचा मुख्य विषय बंद पडलेले 'राजनीती' मासिक हाच होता. .इतक्यात देवीचा संचार अंगी होणाऱ्या बाळासाहेबांच्या 'त्या' भगिनी तिथे आल्या. बाळासाहेबांनी त्यांना पुढे जाताजाता थांबवले आणि त्यांनी सल्ला दिलेल्या उपक्रमाची कशी वाट लागली, याबद्दल खास ठाकरी भाषेत त्यांना जे काही सुनावायचं ते सुनावलं. त्यानंतर पवारांसह इतरांनी तो विषय तिथंच सोडून दिला. "एकंदरीत चार मराठी माणसांनी एकत्र येऊन उद्योगाचा एक महान उपक्रम हाती घेतल्यावर त्याची ‘अखेर’ कशी होते, हेही आम्हा सगळ्यांना समजून चुकलं !" असं मार्मिक अन खुमासदार वक्तव्य पवारांनी या आठवणीच्या अखेरीस केलं होतं !

बाळासाहेब आणि पवार साहेब दोघेही राजकीय शत्रू होते पण राजकारण बाजूला सारलं की दोघेही रसिक मित्र वाटायचे. दोघांनीही मर्यादा ओलांडून टीकाटिप्पण्या केल्या नाहीत, व्यक्तिगत चिखलफेक केली नाही. टपल्या मारल्या, नकला केल्या पण त्यालाही एक शालीनतेचा बाज होता. त्यात हाडवैराची अणकुचीदार वेदना नव्हती. त्यात तिरस्कार किंवा द्वेष, मत्सर नव्हता. त्यात ओढून ताणून आणलेले गळाकाढू बेगडी प्रेमही नव्हते. तसेच दोस्तीचे वा दुष्मनीचे फाजील प्रदर्शनही नव्हते. राजकारणी माणसाने आपसात नाती कशी ठेवावीत आणि आपसातले मतभेद जतन करूनही कसे दुखावू नये याचे हे आदर्श उदाहरण आहे. 

आजकाल फेस्बुकीय राजकीय पाठीराखे सर्व मर्यादा, सभ्यतेचे सर्व संकेत पायदळी तुडवून एकमेकाचे कपडे फाडत असतात. यात त्यांना हे ही भान राहत नाही की आपण कोणाच्या बाजूने, कोणाविरुद्ध,कसे, कुठे आणि का भांडत आहोत ? त्यांनी या बाबीवर थोडे लक्ष दिले तर फार बरे होईल .....असो

बाळासाहेब आणि पवारसाहेबांच्या मतभेदाचे किस्से जास्त रंगवून सांगितले जातात मात्र त्यांच्या आपसातल्या गहिऱ्या मैत्रीचे असे किस्से समोर आले की मराठी माणूस हा दिलदार यारदुश्मन असतो याची प्रचीती येते !!

(टीप - लेखातील माहिती जालावरून संकलित केलेली आहे) 


अशीही कुरापत असू शकते ! 



बाळासाहेब ठाकरे यांचा २३ जानेवारी १९२६ रोजी जन्म झाला. सामाजिक सुधारणेची परंपरा असलेल्या कुटुंबात त्यांचा पुण्यामध्ये जन्म झाला. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे हे समाजसुधारक आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे अग्रगण्य नेते होते. त्यामुळे त्यांना बालपणापासूनच अन्यायाविरोधात लढण्याचे आणि मराठीचा बाणा जपण्याचे बाळकडू मिळाले होते. त्यांचे वडील, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी आपल्या लेखन, वक्तृत्व आणि कार्यामधून लोकांमध्ये जनजागृती करण्याचं कार्य केलं. प्रबोधनकारांनी अन्यायकारक चालीरीती, परंपरा आणि जाति-आधारित सामाजिक व्यवस्थेवर जोरदार हल्ला चढवला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचं योगदानही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बाळासाहेबांनी प्रबोधनकारांप्रमाणंच सामाजिक सुधारणा, पुरोगामी विचार आणि आक्रमक स्वभाव यांचा वारसा जपला.

वयाच्या २३ व्या वर्षी बाळासाहेबांचा वैद्य कुटुंबातील सरला यांच्याशी विवाह झाला. विवाह झाल्यानंतर नाव बदलून मीना ठेवण्यात आलं. ऑफिसमधून घरी परतल्यावर बाळासाहेब ठाकरे फिरायला जात असत. त्यांना नाटके आणि चित्रपट पाहण्याची आवड होती.

इतिहास घडवणारे व्यंगचित्रकार: बाळासाहेब ठाकरे यांनी १९५० च्या दशकाच्या सुरुवातीला मुंबईतील 'फ्री प्रेस जर्नल'मध्ये व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांची तल्लख बुद्धी, प्रतिभा, सामाजिक संवदेनशीलता यांची छाप व्यंगचित्रकलेत पडली. त्यामुळे त्यांच्या व्यंगचित्रांना अमाप प्रसिद्धी मिळाली. त्यांची व्यंगचित्रे केवळ मनोरंजकच नव्हती, तर विचारप्रवर्तकही होती. व्यगंचित्रांमधून त्यांनी सत्तेला आव्हान दिले. विविध समस्यांवरून जाब विचारला. त्या काळातील सामाजिक-राजकीय वास्तवाचे व्यगंचित्रामध्ये प्रतिबिंब दिसून आलं. त्यामुळेच व्यंगचित्रांच्या या विलक्षण आणि अद्भुत जगात बाळासाहेबांनी स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. बाळासाहेब ठाकरे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. मराठी अस्मितेवर प्रेम अमोघ वक्तृत्व, कलेवर निस्सीम प्रेम, संघटनकौशल्य, नेतृत्व, दृढनिश्चय यांनी गुणांमुळे त्यांनी आपलं वेगळे स्थान निर्माण केलं.

नैसर्गिक शैली आणि अनुभवांवर आधारित व्यंगचित्रे- केवळ व्यंगचित्रांमुळेच राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचलो, अशी त्यांनी प्राजंळ कबुली दिली होती. ते त्यांच्या काळातील प्रसिद्ध, यशस्वी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले व्यंगचित्रकार होते. ते म्हणायचे, "देवाची कृपा की, मी कला शाळेत गेलो नाही. "औपचारिक शिक्षणामुळे व्यंगचित्रकलेतील त्यांची नैसर्गिक शैली आणि स्वतंत्र विचार मर्यादित झाले असते, असे त्यांना वाटायचे. त्यांची कला मुक्त आणि त्यांच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारित होती.

बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रकार म्हणून काम करतानाही बाणेदारपणा जपत वर्तमानपत्रामधील नोकरीचा दोनवेळा राजीनामा दिला.

पहिला राजीनामा (१९५२): सुरुवातीला त्यांना कामासाठी दिलेली जागा एका अरुंद टेलिफोन ऑपरेटरच्या केबिनमध्ये होती. कामावर लक्ष केंद्रित करता येत नसल्यानं त्यांनी १९५२ मध्ये पहिल्यांदा राजीनामा दिला.

दुसरा आणि शेवटचा राजीनामा (१९६०): वृत्तपत्राच्या व्यवस्थापनात बदल झाल्यानंतर, त्यांना मिनू मसानी आणि एस.के. पाटील यांच्यासारख्या नेत्यांची व्यंगचित्रे काढण्यास मनाई करण्यात आली. व्यंगचित्रांवर निर्बंध झालेल्या नाराज बाळासाहेबांनी १९६० मध्ये वर्तमानपत्रातील नोकरीला कायमचा ‘जय महाराष्ट्र” केला.

'मार्मिक'चा जन्म (१९६०): नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्यातील ‘व्यंगचित्रकार’ स्वस्थ बसवत नव्हता. त्यांनी व्यंगचित्राला प्राधान्य असलेले 'मार्मिक' हे राजकीय साप्ताहिक सुरू केले. मुंबईतील स्थानिक मराठी भाषिकांना नोकऱ्यांमध्ये डावलले जात असल्याचा मुद्दा त्यांनी मार्मिकमधून उपस्थित केला. विशेष म्हणजे मासिकाचे नाव बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनीच सुचवलं होतं. मासिकातील व्यंगचित्रे, लेख आणि स्तंभ यामधून मराठी भाषिक लोकांवर अन्यायाला त्यांनी वाचा फोडली. मराठी लोकांना संघटित केलं.

शिवसेना पक्षाची स्थापना: मार्मिक मासिकाच्या प्रभावानं मुंबईतील मराठी भाषिक लोक बाळासाहेब ठाकरे यांना भेटून आपल्या तक्रारी आणि प्रश्न मांडत असत. बाळासाहेब त्यांना मार्गदर्शन करत असत. याच काळात प्रबोधनकार ठाकरे यांनी एखाद्या राजकीय पक्ष किंवा संघटनेबद्दल काही विचार आहे का,असे बाळासाहेबांना विचारले. लोकांच्या आवाजाला एक सामूहिक आणि संघटित स्वरूप कधी देणार आहेत, असा प्रश्न विचारून संघटना स्थापन करण्याकरिता प्रोत्साहन दिलं.

' ८० टक्के समाजकारण तर २० टक्के राजकारण' - १९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये सभेला उपस्थित राहण्याचं जनतेला आवाहन केलं. सभेला फारसे लोक येणार नाहीत, अशी भीती त्यांना वाटत होती. प्रत्यक्षात सुमारे २ लाख लोक सभेसाठी आले. या सभेत बाळासाहेबांनी आपल्या मित्रांसोबत नारळ फोडून शिवसेनेची स्थापना केली. मराठी लोकांवरील अन्यायाविरुद्ध लढणे आणि हिंदुत्वाचा आवाज बनणे हा पक्षस्थापनेचा उद्देश होता. बाळासाहेबांनी पक्ष स्थापनेसाठी भूमिपुत्र' ' ८० टक्के समाजकारण तर २० टक्के राजकारण' ही त्यांनी घोषणा दिली होती.

पहिली शिवाजी पार्क रॅली (३० ऑक्टोबर, १९६६): त्यांनी शिवाजी पार्कमध्ये आपली पहिली भव्य सभा घेतली. त्यानंतर दरवर्षी शिवसेनेची शिवाजी पार्कमध्ये होणारी संभा एक परंपरा ठरली आहे. शिवसेनेसाठी शिवाजी पार्क मैदान 'शिवतीर्थ' ठरलं आहे. याच मैदानावर बाळासाहेबांनी अनेक ऐतिहासिक दसरा मेळावे आणि जाहीर सभा घेत जनतेच्या मनावर गारुड निर्माण केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या रोखठोक भूमिकेमुळे त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हटलं जाऊ लागले.

जनमानसावरील प्रभाव: प्रभावी वक्तृत्व आणि तीक्ष्ण बुद्धिमत्तेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी तरुणांमधून अत्यंत निष्ठावान असे शिवसैनिक तयार केले.

'मातोश्री' बंगला ठरलं सत्ताकेंद्र : 'मातोश्री' बंगला हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निवासस्थान हे सत्तेचं मुख्य केंद्र होते. १९६६ मध्ये स्थापन झालेल्या शिवसेनेच्या राजकीय घडामोडी, निर्णय आणि विचारसरणीसाठी 'पवित्र मंदिर' मानले जाणारे हे निवासस्थान बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व आणि आणि मराठी अस्मितेच्या राजकारणाचे प्रतीक बनले. 'मातोश्री' बंगल्याला शिवसेनेतील प्रत्येकासाठी खूप महत्त्व होते. 'मातोश्री'मधून दिलेले आदेश शिवसेनेत नेहमीच अत्यंत महत्त्वाचे मानले जात असत. 'मातोश्री' भेट देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला बाळासाहेब आदरातिथ्य केल्याशिवाय जाऊ देत नसल्यानं अनेकांना ते घरासारखे वाटायचे. जेव्हा कोणी मातोश्रीला येत असे, तेव्हा बाळासाहेब कुटुंबा प्रमुखाप्रमाणे त्याच्याशी चर्चा करत असत. भारत आणि जगभरातील अनेक प्रमुख नेते, अभिनेते आणि प्रसिद्ध व्यक्तींनी बाळासाहेबांना भेटण्यासाठी 'मातोश्री'ला भेट दिली आहे. यामध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी, सुपरस्टार रजनीकांत आणि पॉप गायक मायकल जॅक्सन यांचा समावेश आहे.

मोरारजी देसाईंना विरोध केल्यानं ठाकरेंना अटक: १९६० च्या दशकात महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सीमावादामुळे दोन राज्यातील संबंध ताणले होते. बेळगाव, कारवार आणि निपाणीसह मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्याची मागणी शिवसेनेनं मागणी लावून धरली होती. कर्नाटक सीमेवरील गावांचा महाराष्ट्रात समावेश होण्यासाठी केंद्र सरकार ठोस निर्णय घेत नसल्यानं शिवसेनेत संतापाचे वातावरण होते. ७ फेब्रुवारी १९६९ रोजी तत्कालीन उपपंतप्रधान मोरारजी देसाई हे मुंबईच्या दौऱ्यावर होते. शिवसेनेनं त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. सीमाप्रश्न सुटेपर्यंत कोणत्याही केंद्रीय मंत्र्याला मुंबईत मोकळेपणाने फिरू दिले जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेनं घेतली होती. मोरारजी देसाईंच्या ताफ्याविरोधातील आंदोलनानंतर मुंबईत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला. मुंबईत चार दिवस दंगली सुरू असताना सार्वजनिक मालमत्तेचं मोठं नुकसान झालं. या हिंसाचाराला जबाबदार धरून राज्य सरकारनं बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या इतर प्रमुख नेत्यांना अटक केली.

'सामना' मुखपत्राची स्थापना: शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी २३ जानेवारी १९८९ रोजी मध्यरात्री शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' सुरू करण्यात आले. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते 'सामना'च्या प्रकाशनाचे उद्घाटन झाले. सुरुवातीच्या काळात केवळ व्यंगचित्रे प्रकाशित होणारा 'सामना' कालांतरानं शिवसेनेचा अधिकृत मुखपत्र बनला. "हिंदुत्वाचा प्रभावीपणे प्रचार करण्यासाठी आणि रोजच्या आरोपांना सडेतोड उत्तर देण्यासाठी 'सामना' हे एक शस्त्र म्हणून काम करेल”, अशी सामना सुरू करतान बाळासाहेब ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली होती.

किंगमेकर बाळासाहेब: बाळासाहेब ठाकरे यांनी कोणतेही लाभाचे अधिकृत पद भूषवले नाही. तसेच कोणतीही निवडणूक लढवली नाही. तरीही अनेक वर्षे ते महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी असे राजकीय व्यक्ती मानले जात होते. स्वतः खुर्चीवर न बसताही, मित्रपक्ष आणि मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात त्यांनी अनेकदा महत्त्वाची भूमिका बजावली.त्यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची नाकारत मुंबईतील त्यांच्या 'मातोश्री' निवासस्थानातून राज्याचा कारभार चालवण्यास प्राधान्य दिले. विशेषतः १९९५ ते १९९९ या काळात शिवसेना-भाजपा युती सरकारच्या काळात बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रावर "रिमोट कंट्रोल"ने राज्य करण्यासाठी ओळखले जात होते. महाराष्ट्रात १९९५ मध्ये पहिल्यांदाच शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आल्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी 'रिमोट कंट्रोल' हा शब्दप्रयोग वापरला. "मी रिमोट कंट्रोलनं सरकार चालवतो. जसे तुम्ही रिमोटनं टीव्ही चॅनल बदलता, त्याचप्रमाणे सरकारमध्ये काही चुकीचे घडल्यास मी गोष्टी बदलू शकतो”, असे बाळासाहेब ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना वक्तव्य केले होते. तेव्हा शिवसेनेचे मनोहर जोशी हे मुख्यमंत्री पदावर होते.

हिंदूहृदयसम्राट म्हणून मिळाली ओळख: मराठी तरुणांना न्याय मिळवून देणं हा शिवसेना स्थापनेमागील मुख्य उद्देश होते. बाळासाहेब एक प्रखर राष्ट्रवादी होते. सुरुवातीच्या काळात शिवसेनेनं हिंदुत्वाशी संबंधित विविध मुद्दे हाती घेतले. शिवसेनेने मराठी अस्मितेकडून कट्टर हिंदुत्वाकडे वाटचाल करत एक पाऊल पुढे टाकले. देशातील हिंदूंवरील अन्याय आणि अत्याचारांविरुद्ध लढण्यासाठी आणि सीमावर्ती भागातील लोकांना दहशतवाद्यांपासून वाचवण्यासाठी शिवसेनेनं हिंदुत्व आणि राष्ट्रवादाचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. प्रबोधनकार ठाकरे यांची हिंदुत्वाविषयीची दृष्टी पद्धतशीर आणि वैज्ञानिक होती. हाच वारसा बाळासाहेब ठाकरेंनी चालविला.

घराणेशाहीचे आरोप झाल्यानं राजीनामा: बाळासाहेबांनी १८ जुलै १९९२ रोजी पक्षाचे मुखपत्र 'सामना'मधून राजीनाम्याची घोषणा केली. काही तासातच शिवसैनिक मोठ्या संख्येनं मुंबईत जमले. अखेरीस शिवसैनिकांची भावना पाहून बाळासाहेबांनी राजीनामा मागे घेतला. दुसऱ्याच दिवशी त्यांनी एक रॅली काढून आपली मुंबईतील राजकीय ताकद दाखवून दिली. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे अविभाज्य आहेत, हे समीकरण शिवसैनिकांच्या मनात घट्ट रुजलं होते. पक्षाचा रिमोट कंट्रोल अजूनही आपल्याच हातात आहे हे दाखवून त्यांनी शिवसेनेतील बंड शमवलं होतं.

बाळासाहेबांचा आणीबाणीला पाठिंबा: १९७५ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी घोषित केलेल्या आणीबाणीला शिवसेनेचा पाठिंबा दिला. देशभरातून आणीबाणीला विरोध होत असताना बाळासाहेबांनी आणीबाणीला दिलेला पाठिंबा अनेकांना रुचला नव्हता. पण त्यांची आज्ञा शिवसेनेत अंतिम मानली जात असे. मराठी लोकांवरील अन्यायासाठी त्यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारला जबाबदार धरले होते. अशा परिस्थितीत मराठी माणसावरील अन्यायांसाठी जबाबदार असलेल्या काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेत्या इंदिरा गांधींना पाठिंबा का द्यावा? असा अनेकांना प्रश्न होता. पण बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना नव्हे, तर त्या विशिष्टवेळी आणीबाणी घोषित करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता.

८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास: अनेक दिवसांपासून गंभीर आजारी असलेले शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्यांना २५ जुलै २०१२ रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १४ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी त्यांच्या 'मातोश्री' निवासस्थानीच उपचार सुरू केले. परंतु त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे निधन झाले. त्यांच्यावर शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या अंत्ययात्रेत प्रचंड जनसमुदाय जमला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा