शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१६

आठवणी जयवंत दळवी आणि प्रवीण बर्दापूरकर यांच्या ......



ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक जयवंत दळवींच्या कालच्या पोस्टच्या निमित्ताने दिग्गजांच्या आठवणींचा एक अनोखा पुनर्प्रत्यय या पोस्टमधून आपल्यापुढे मांडताना मला विलक्षण आनंद होतोय. .
प्रख्यात संपादक, लेखक व ज्येष्ठ विचारवंत श्री. प्रवीण बर्दापूरकर यांनी 'नोंदी डायरीनंतरच्या' (प्रकाशक -ग्रंथाली) या त्यांच्या आत्मकथनपर पुस्तकांत त्यांच्या काही आठवणी, काही प्रसंग व त्यांच्या प्रदिर्घ वृत्तपत्रीय कारकिर्दीत आणि दैनंदिन जीवनात संपर्कात आलेल्या काही व्यक्तीविशेषांवर त्यांच्या ओघवत्या, रसाळ, प्रवाही शैलीत लेखन केले आहे. यातीलच एक प्रकरण आहे 'अनुभवसंपन्नता'....
या प्रकरणात त्यांनी सुरुवातीलाच लिहिलं आहे की, "पत्रकारिता करताना बातमी जशी 'बिटवीन द लाईन' वाचायला आणि त्याहून ती अधिक समजायला सिनियर्सनी मोलाची मदत केली तशीच मदत माणसे वाचायलाही केली !"....

बर्दापूरकर सरांना यामुळे पुढे माणसं वाचायचे व्यसन जडले आणि त्यातून त्यांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व घडत गेले आणि महाराष्ट्राने एक धारदार लेखनशैली असणारे, नेटक्या शब्दात मार्मिक लेखन करणारे संपादक अनुभवले. त्यांच्या जीवनात आलेल्या महत्वाच्या व्यक्तींच्या नामावलीत एक नाव जयवंत दळवी यांचेही आहे. त्यांच्याबद्दल बर्दापूरकरांनी काय लिहिलंय हे जाणून घेण्यापूर्वी त्यांनी साहित्यिक व राजकारणी यांच्या खाजगी - सार्वजनिक जीवनाच्या अनुषंगाने निरीक्षण नोंदवले आहे, ते वाचण्यासारखे आहे.
"राजकारणी दोन मुखवटे घेऊन जगतात, ती त्यांची गरज आणि अपरिहार्यता असते. पण कलावंत आणि साहित्यिक यांच्या बाबतीत तसे नसते. त्यांनी एकाच वेळेस दोन मुखवटे पांघरून जगणे अपेक्षित नसते. कारण वाचक श्रोत्यांच्या दृष्टीकोनातून ते प्रेषिताची भूमिका पार पाडत असतात." मुखवटे न लावता आपला सच्चा चेहरा जगासमोर घेऊन वावरणे हे खऱ्या लेखकाचे लक्षण आहे. ही उक्ती जितकी जयवंत दळवींना लागू होते तितकीच दस्तुरखुद्द बर्दापूरकरांना लागू होत असल्याने त्यांच्या जीवनातील एका छोट्या आठवणीचा हा लेखप्रपंच ...

या पुस्तकात बर्दापुरकर लिहितात की, 'ऑगस्टमधल्या तालबद्ध पावसाशी दळवींच्या आठवणींशी माझी नाळ जोडली गेली आहे.' त्यांच्या उमेदवारीच्या काळात चिपळूणमधल्या दैनिक 'सागर' मध्ये कामास सुरुवात केली असताना त्यांनी पत्रकारितेच्या आरंभ काळात असणाऱ्या जोशपूर्ण आवेशात जयवंत दळवींच्या 'सावल्या' आणि 'प्रवाह' या दोन कादंबऱ्यावर समीक्षा करणारे पत्र दळवींना तावातावाने पाठवले. या कालखंडात दळवींच्या समग्र लेखनास मिळणारा प्रतिसाद लक्षणीय होता ही विशेष बाब होय. वास्तविकतः त्यांच्या बालपणीच त्यांच्या मातोश्रींनी दळवींच्या लेखनाशी त्यांना परिचित करून दिले असल्याने बर्दापूरकर दळवींच्या साहित्य संपदेशी अनभिज्ञ नव्हते तरीही त्यांनी असे पत्र पाठवले होते. हा काळ 'ललित'मधल्या 'ठणठणपाळ'चा सुवर्णकाळ असल्याने आपल्या लेखनाच्या 'महासागरी' व्यापातून आपल्या सारख्या नवशिक्या पत्रकाराच्या टिकात्मक पत्रास ते पत्रोत्तर देणार नाहीत या विचाराने बर्दापूरकर या पत्राला टपालपेटीत टाकल्याक्षणी विसरून गेले. मात्र त्यांच्या समजास छेद देणारी घटना घडली.

काही दिवसांनी त्यांना एक पत्र आले. अत्यंत सुवाच्च अक्षरातलं दळवींचे ते पत्र पाहून बर्दापूरकरांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याहूनही अधिक ते चकवले गेले ते पत्रातील मजकुराने. त्यात दळवींनी अगदी आपुलकीने व मायेने बर्दापूरकरांची चौकशी करत त्यांनी कादंबऱ्यांवर केलेला प्रतिकुल युक्तिवाद नम्रतेने स्वीकारला होता. शिवाय 'सध्या काय वाचन चालू आहे' याची विचारणा केली होती. तत्कालीन सामाजिक व चळवळीचे संदर्भ व दळवींचे साहित्य जगतातील स्थान पाहता ही घटना एक चमत्कारच होती. या नंतर बर्दापूरकर पत्राद्वारे दळवींच्या संपर्कात राहू लागले. दै.'सागर' मधून 'नागपूर पत्रिका'त रुजू होताना देखीलही त्यांनी दळवींचा सल्ला घेतला होता.

दळवींच्या आठवणींबद्दल बर्दापूरकर हळवे होऊन लिहितात की, 'एखादया वटवृक्षाची मुळे वैपुल्याने पसरावीत तशी दळवींच्या आठवणींची मुळे माझ्या मनात पसरलेल्या आहेत' त्यांच्या या धारणेमागे मायेचा एक गहिरा पोत आहे. १९८५ मध्ये 'नागपूर पत्रिका'ने बनवारीलाल पुरोहित व जवाहरलाल दर्डा यांच्याविरुद्ध एक सूत्रबद्ध मोहीम उघडली होती. खरे पाहता बर्दापूरकर हे तिथं मुख्य वर्ताहर होते. त्यांना वृत्तपत्र मालकाची चाकरी बजावायची होती. मात्र आपल्या सचोटीच्या व तत्वाच्या विरुद्ध जाऊन यात सामील होणे त्यांना जमले नाही. त्यांनी तसे निषेधाचे पत्र पाठवून तडकाफडकीने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. (आजच्या विकाऊ व भडक पत्रकारितेच्या काळात हे उदाहरण अत्यंत ठळकपणे उठून दिसते). त्यांनी राजीनामा दिला खरा. पण प्रापंचिक अडचणींचा डोंगर त्यांच्यापुढे उभा होता. मात्र ते खचले नाहीत वा डगमगले नाहीत. त्यांनी अशा संकटाच्या काळात जयवंत दळवी व मुकुंदराव किर्लोस्कर या आपल्या जवळच्या माणसांना साद घातली. 'आपण घाईघाईत निर्णय घेतला खरा पण त्याचा फटका कुटुंबियांना बसतो आहे' याचे अतिव दुःख व्यक्त करणारे पत्र त्यांनी दळवींना लिहिले....

'एक्स्प्रेस सर्व्हिस'ने पत्र पाठवून तीनेक दिवस झाले आणि दळवींचाच बर्दापूरकरांना फोन आला ! त्यात त्यांनी एकदम आश्वस्त होऊन सांगितलं की, ' जे काही घडून गेलं आहे त्यात बदल करणं आता अशक्य आहे, मात्र तुमच्यासाठी निश्चित काहीतरी करतो !'
दळवींच्या या फोननंतर अशाच स्वरूपाचा निरोप मुकुंदरावांनीदेखील दिला. इतकी मोठी माणसे बर्दापूरकरांना फोन करून त्यांची वास्तपुस्त करतात यावरून इतरांनी त्यांवर विश्वास ठेवण्यास नाकारले. मात्र पुढच्या काही दिवसात आधी 'मुंबई सकाळ'कडून स्ट्रींजर म्हणून आणि नंतर 'लोकसत्ता'कडून नागपूरसाठीचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना आले. याशिवाय नागपूर 'तरुण भारत'कडूनही त्यांना साप्ताहिक सदरासाठी विचारणा झाली. या घटना एका दिवसात घडल्या व त्याच्या दुसऱ्या दिवशी दस्तुरखुद्द गोविंद तळवलकर यांची तार आली, त्यात बर्दापूरकरांची 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये उपसंपादक म्हणून मुंबईत नियुक्ती करत असल्याचे कळवले होते. अखेर साधक बाधक विचार करून त्यांनी मुंबईला न जाण्याचा निर्णय घेतला. आपला निर्णय कोणत्या परिस्थितीतून घेतला गेला आहे याचे दिलगिरी व्यक्त करणारे विनम्रतेचे पत्र बर्दापूरकरांनी दळवींना व मुकुंदरावांना पाठवले अन बर्दापूरकर 'लोकसत्ता'शी जोडले गेले ....

याच पुस्तकात दळवींची आणखी एक आठवण त्यांनी शेअर केली आहे. १९८७ साली नागपूरच्या राजाराम बर्डीवरील राजाराम वाचनालयात दळवींच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. बर्दापूरकरांवर याची बरीचशी जबाबदारी टाकण्यात आली होती. या कार्यक्रमास दळवी सपत्नीक आले होते, शिवाय त्यांच्या सोबत प्रज्ञावंत मधु मंगेश कर्णिक आणि अशोक कोठावळे सर होते. या दरम्यान बर्दापूरकरांनी दळवींना आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रित केले. त्या आमंत्रणास मान देऊन दळवी तिथे गेले खरे मात्र त्यांच्या पत्नी व कर्णिक हे चक्क ऑटोरिक्षाने बर्दापूरकरांच्या घरी गेले. तर खुद्द जयवंत दळवी बर्दापूरकरांच्या स्कूटरवर मागे बसून त्यांच्या घरी गेले !!

बर्दापूरकरांचे छोटेखानी घर आणि त्यातला सानुला संसार अन जोडीला त्यांची चिमुरडी कन्या अशा परिस्थितीत ते सारे तिथे दाखल झाले. बर्दापूरकरांच्या पत्नी स्वयंपाकात मग्न झाल्या अन त्यांच्या कन्येच्या बाललीला सुरु झाल्या. काही वेळाने तिची झोपण्याची वेळ झाली अन तिला आपल्या पित्याच्या खांदयावर थोपटत झोपी जायची सवय असल्याने तिने मोठ्याने रडायला सुरुवात केली. बर्दापूरकर दांपत्य पुरते कावरे बावरे झाले. कारण मुलीला झोपी लावायचे म्हटले तर इतक्या मोठ्या पाहुण्यांशी बोलणार कोण ? त्यांचे आदरातिथ्य कसे करणार ? बर्दापूरकरांच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह दळवींनी एका नजरेत वाचले. आणि त्यांनी समस्या जाणून घेताच त्या छोटया राजकुमारीला आपल्या कडेवर घेऊन थोपटायला सुरुवात देखील केली. अन काही अवधीत मुलगी सहजतेने झोपी गेली, मोठ्या तन्मयतेने त्यांनी मुलीला झोपी लावून बर्दापूरकरांकडे सुपूर्द केले. हे सर्व अत्यंत सहजतेने घडले जणू काही त्या सर्वांचे अनंताचे ऋणानुबंध असावेत इतक्या आस्थेने हे घडले..

आजही बर्दापूरकरांनी मोठ्या प्रेमाने ती पत्रे आणि तार जपून ठेवली आहेत. श्रावण जवळ आला की बर्दापूरकरांच्या स्मृतिवनात या दिग्गजांच्या आठवणी म्हणूनच ताल धरत असाव्यात. या ज्येष्ठांच्या सहृदयतेचे केवळ दर्शन त्यांना झाले असे नव्हे तर व्यक्तिगत पातळीवर त्यांना ते अनुभवता आले. लेखाच्या शेवटी बर्दापूरकर लिहितात की, "हा अनुभव पत्रकारिता आणि माझं वैयक्तिक आयुष्य समृद्ध करून गेला."

आजच्या यंत्रवत आणि कोरडया नात्यांच्या भौतिकतेला प्राधान्य देणारया जगात असे ऋणानुबंध जोपासणारे लोक अगदी कस्तुरीमृगासारखे दुर्मिळ झाले आहेत. त्याच बरोबर अशा प्रज्ञावंतांचा सहवास लाभून आपल्या आयुष्याला ज्यांनी विविध अनुभवांनी समृद्ध केले व समाजमनात आपले एक स्थान निर्माण केले त्या बर्दापूरकरांनी व्यक्त केलेलं हे ऋण आणि आठवणींचा हा देखणा कॅनव्हास सहजतेने चितारणे हे सगळंच आजकाल दुर्मिळ होत चाललंय. असेही लोक होते आणि आहेत हे सोशल मिडियातल्या आभासी जगात जगणाऱ्या नवीन पिढीसमोर आवर्जून मांडावे वाटले. जेणेकरून त्यांना या हृदय आठवणींचा पुनर्प्रत्यय यावा...

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा