मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१६

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ...


"लहान मुलीसारखी कविता कोणासमोर उभी करणे आणि अनुकूल अभिप्रायासाठी कटोरा पुढे उभे करणे म्हणजे कवितेचा अपमान आहे" - कुसुमाग्रज आपल्या या मताशी ठाम राहिले आणि त्यांनी कवितेच्या शैशवात लिहिलेल्या अशा जवळपास दीडशे 'कुमारकविता' आपल्या संग्रहातून वगळल्या !

कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या 'म्यानातुनि उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात !' या कवितेने पिचलेल्या मनगटात शंभर हत्तींचे बळ दिले. मायबाप रसिक आजही त्यांना लवून कुर्निसात करतात ! ही कविता आजही मराठी माणसासाठी अखंड प्रेरणास्त्रोताचे काम करते तर 'माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा' असं मातीचं गौरवगानही त्यांची कविता करते. 'मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’! असं सांगत जगण्याची लढाई जिंकायची अनामिक ताकद त्यांची कविता देते. त्यांनी लिहिलेली 'कोलंबसाचे गर्वगीत' ही कविता त्यांच्या प्रतिभाशक्तीची दार्शनिक ठरावी अशी आहे.

कुसुमाग्रजांनी 'उठा उठा चिऊताई' सारख्या किलबिल कविता लिहिल्या तशाच 'पृथ्वीचे प्रेमगीत' सारख्या गहन कविताही लिहिल्या. ’काढ सखे गळ्यातले’ सारखे लडिवाळ शब्दही त्यांचे आणि ’जे भुक्त त्यांची राहते पोटात सारी संस्कृती’ हे स्पष्टोक्तीचे परखड बोलही त्यांचेच. कुसुमाग्रजांचे नाव जरी घेतले तरी आपल्या कानी येतो गगनभेदी जयघोष. त्वेषाने आपणही गाऊ लागतो, ’गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार !'

कुसुमाग्रजांची कविता मृत्यूलाही आवाहन करते, "शरिरांचा कर सुखेनैव या, सुखेनैव संहार मरणा, सुखनैव संहार..." मरणाला कस्पटासमान लेखून त्याच्यावर मात कशी करायची याचे हे उत्तुंग काव्य आहे. "कशास आई, भिजविसि डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल " असं वीररसात चिंब भिजलेलं त्यांचं काव्य मनामनात आक्रंदन करून उठतं. "सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते लोहदंड तव पायांमधले खळाखळा तुटणार आई, खळाखळा तुटणार !" असा तेजस्वी आशावादही त्यांच्याच कवितांत आढळतो.

"माझ्या मातीचे गायन, तुझ्या आकाश श्रुतींनी जरा कानोसा देऊन कधी ऐकशील का रे, माझा रांगडा अंधार, मेघामेघात साचला तुझ्या उषेच्या ओठांनी कधी टिपशील का रे !' असं ओघवतं कवन ते आपल्या मातीसाठी रचतात. 'सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा । जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणाकरा ॥' अशी विश्वशांतीची प्रार्थना ते लिहितात. 'तिमिरातुनी तेजाकडे ने दीपदेवा जीवना ॥ ज्योतीपरी शिवमंदिरी रे जागवी माझ्या मना ॥' अशी करुणा देवाला भाकतात आणि जीवनातील अंधार नष्ट करण्यासाठी विश्वनिहंत्याने मनामनात आशादीप चेतवावेत अशी विनंती ते देवाला करतात !

कुसुमाग्रजांच्या कवितेला विषयाच्या चौकटीत बांधता येत नाही. सामाजिक प्रबोधनापासून ते प्रेमगीतांपर्यंत आणि देशभक्तीच्या गाथेपासून ते सृष्टीच्या गौरवगीतांपर्यंत, देवत्वाच्या खऱ्या प्रकटनापासून ते अस्तित्वाच्या शोधापर्यंत अनेक विषयांच्या उत्तुंग शिखरांना त्यांची कविता समर्थपणे आपल्या अंगी मिरवते ! त्यांच्या कविता त्या आशयाचा पट एका विशाल परिघातून आपल्याला उलगडून दाखवतात. त्यांचे सर्वच काव्य श्रेष्ठ आहे, त्यांनी लिहिलेल्या अफाट काव्यसागरातले काही वेचक मोती इथे मांडले आहेत.

"कवी म्हणजे सुसंस्कृत समाजातील असंस्कृत अथवा रानटी मनुष्य. याचा अर्थ कवीजवळ संस्कृती नसते असा नाही, किंबहुना इतरांपेक्षा बहुधा अधिक असते. पण त्याची निष्ठा असते ती संस्कृतीच्या मूल, विशुद्ध तत्त्वावर. त्यावर उभारलेल्या रंगीत, नक्षीदार ताबुतावर नव्हे." कवीविषयक जाणिवांच्या या स्वतःच्या व्याख्येस ते जगले याची साक्ष त्यांच्या कविता देतात.

कुसुमाग्रजांची कविता पाखंडीपणावर मार्मिकतेने आणि तार्किक कसोट्यांवर सिद्ध होईल अशा सैद्धांतिक शब्दात कठोर प्रहार करते.
"दर्शनाला आलात? या..
पण या देवालयात, सध्या देव नाही
गाभारा आहे, चांदीचे मखर आहे." असं सांगून ते वास्तवच समोर आणतात.
"पण तुर्त गाभाऱ्याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर, गाभार्याशचे महत्व अंतिम असत,
कारण गाभारा सलामत तर देव पचास..." असं जळजळीत भाष्य ते करतात.
देवाबद्दल ते लिहितात -'एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा,
शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन,
बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी,
माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी..
दक्षिण दरवाज्याजवळ,
मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.
सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी..
आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या” आणि
काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर
त्याला पुन्हा.. प्रवेश द्यावा की नाही,
याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना,
पत्रव्यवहार चालु आहे.. दुसऱ्याच मुर्तीसाठी !'
पाखंडीपणा, जातीयवाद, दैववादाच्या नावाखाली चाललेला बाजार यावर त्यांनी अगदी तिरकस शब्दास्त्र चालवले आहेत.

माणसे जिथे देवाला सोडत नाहीत तिथे महापुरुषांचा काय पाड लागावा ? लोक महापुरुषांचा वापर स्वतःच्या लाभासाठी करतात आणि गरज संपली की त्यांना आणि त्यांच्या विचारांना मागे टाकून आपल्या विकृतवाटांवर वेगाने मार्गस्थ होतात. आज हे महापुरुष असते तर त्यांना काय वाटले असते, ते किती खजील झाले असते. या कल्पनेवर आधारित कुसुमाग्रजांची ही कविता सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठा गहजब माजवून गेली होती.
"अखेर कमाई -
मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.
ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फ़क्त मराठ्यांचा.
आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद्गारले ,
मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !"
महापुरुषांचे विचार तसबिरीत चिणून त्यांना भिंतींवर टांगून ठेवण्याचे महापातक आम्ही केलेले आहे आणि त्याची आम्हाला न खेद ना खंत ! मात्र त्या महापुरुषांना किती वाईट वाटत असेल याची पुसटशी कल्पना ही कविता आगदी निर्ढावलेल्या माणसाला देखील देऊन जाते.

उत्तुंग प्रतिभाशक्ती, देखणे शब्दसौंदर्य आणि जीवनमूल्यांचा परिपूर्ण आशय याचे संयुक्त प्रकटीकरण त्यांच्या कवितांत ओतप्रोत भरलेले आहे.
कोलंबसाचे गर्वगीत...
"हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे
ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता
की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान
पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती
सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम
काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?
कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती
मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"
यातली शेवटची पंक्ती म्हणजे कवितेचा परमोच्च बिंदू आहे, जगण्याचे अप्रतिम गीत ही कविता अत्यंत जोरकसपणे आपल्यापुढे मांडत राहते अन आपण त्यात गुंतत राहतो !

आपल्या मायभूमीच्या रक्षणासाठी लढणाऱ्या त्या अनामवीरांना चेतवण्यासाठी ते शब्दांचा एल्गार करतात -
"रक्तध्वज पूर्वेवर चढु दया,
खोप्यातिल खग नभी उडूद्या
आकाशात निखारा फुटु दया,
ज्वालांत जळूद्या तम सारा
हा काठोकाठ कटाह भरा..."

स्वातंत्र्यसमराच्या यज्ञात पडलेल्या या जीवन आहुत्यांचे हौतात्म्य ते आपल्या अभिजात प्रतिभेच्या जोरावर लाघवी शब्दात व्यक्त करतात.
"समिधाच सख्या त्या, त्यात कसा ओलावा,
कोठुनी फुलापरी वा मकरंद मिळावा?
जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा,
तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा!"


देव आणि निर्मिकाच्या मधली अदृश्य रेषा ते आपल्या ओजस्वी लेखणीने स्पष्टपणे अधोरेखित करतात.
'काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही..
माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे
पण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही..
नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही..
मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही..
दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
त्याचा कोष किनार्यालस कधी लाभणार नाही..
तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखार्याात कधी तुला जाळणार नाही'
त्यांची कविता काही बोलणार नाही असं म्हणत वास्तवाचे खरेखोटे सुनावते !
कुंभमेळ्याच्या नावाखाली भरल्या जाणाऱ्या साधूगिरीवर देखील त्यांनी आपल्या कवितेतून वज्राघात केले होते.

लोकांना ठराविक काळापुरता देशप्रेमाचा तात्पुरता उमाळा येतो, हा आवेग ओसरल्यावर राहते ती कृत्रिम देशभक्ती अन देशभक्तांची उपेक्षा, त्यांच्या नशिबी आलेली अवहेलना ! मात्र जे देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावतात त्यांचे यशोगान गाताना कुसुमाग्रज दोन्ही बाजू समोर मांडतात. सीमेवरती त्यांच्या देहाची कलेवरे धडाडून पेटून उठताना संध्येच्या रेषा मूकपणे अंधारात लपेटून घेतात मात्र विजयाचा पहाटतारा बनून सकळांच्या आयुष्यात तेच प्रकाश आणतात असं अंगवार रोमांच उभं करणारं वर्णन त्यांनी केलं आहे.
'अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात !
धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी !
मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !
जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !
जरी न गातिल भाट डफावर तुझे यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान !
काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा ! !'

कुसुमाग्रज फक्त प्रेम, शृंगार, आशावाद यात रमले नाहीत. त्यांचा काळ हा स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीचा होता. इंग्रजांच्या अत्याचाराचा वरवंटा संपूर्ण देशभर फिरत होता. इंग्रजांविरुद्धच्या असंतोषाने संपूर्ण हिंदुस्थान पेटून उठला होता. जनमानसाचं हे प्रतिबिंब कुसुमाग्रजांच्या कवितेत उमटलं नाही तर नवलच. त्यांच्या अहि-नकुल या कवितेत अहि म्हणजे सर्प हे उन्मत्त व माजलेल्या इंग्रज सरकारचं प्रतीक आहे तर नकुल हे त्याला नेस्तनाबूत करणार्या त्याचा वध करणार्यात क्रांतिकारकाचं प्रतीक आहे. अशाच आशयाची कुसुमाग्रजांची कविता म्हणजे ‘आगगाडी आणि जमीन’ ज्यात आगगाडी ही शोषकांचं प्रतीक आहे तर जमीन ही शोषितांचं प्रतीक आहे. जमिनीवर अत्याचार करणार्याा आगगाडीला जमीन विनवत आहे – 'नको ग! नको गं, आक्रंदे जमीन पायाशी लोळत, विनवी नमून धावसी वेगात मजेत वरून आणिक खाली मी चालले चुरून' तर याच जमिनीला आगगाडी उद्दामपणे सांगते – 'दुर्बळ अशीच खुशाल ओरड, जगावे जगात कशाला भेकड पोलादी टाचा, या छातीत रोवून अशीच चेंदत धावेन धावेन!' परंतु एका क्षणी मात्र समाजाचं प्रतिनिधित्व करणार्याा जमिनीच्या शक्तीचा उद्रेक होतो आणि प्रचीती म्हणजेच – 'उलटी पालटी होऊन गाडी ती हजार शकले पडली खालती !'

सगळ्या जगासाठी अन्न पिकवणारा आजही आपल्या देशात उपाशी मरतो आहे, देशोधडीला लागला आहे, त्याचे घरदार आजही लिलावात निघते अन आजही बांधाबांधावरच्या चिंच- लिंबांच्या झाडांत तो फास गळी लावून घेतो. शेतकऱ्याची ही दुर्दशा अगदी हृदयद्रावक काव्यकथेतून कुसुमाग्रजांनी उलगडली आहे. "लिलाव -
उभा दारी कर लावुनी कपाळा
दीन शेतकरी दावुनी उमाळा,
दूत दाराशी पुकारी लिलाव,
शब्द कसले ते-घणाचेच घाव !
पोसलेले प्राशून रक्त दाणे
उडुनि जाती क्षणी पाखरांप्रमाणे
निघत मागुनि वाजले आणि थाळि,
गाडग्यांची ये अखेरीस पाळी !
वस्तुवस्तूवर घालुनिया धाड
करित घटकेतच झोपडे उजाड
स्तब्ध बाजूला बसे घरधनीण
लाल डोळ्यातिल आटले उधाण
भुके अर्भक अन् कवळुनी उरास
पदर टाकुनि त्या घेइ पाजण्यास
ऊर उघडे ते तिचे न्याहळोनी
थोर थैलीतिल वाजवीत नाणी
“आणि ही रे !” पुसतसे सावकार,
उडे हास्याचा चहुकडे विखार !!"
डोळ्यात पाणी आणणारे आणि काळजाचे ठाव घेणारे हे काव्य दुदैवाने आजच्या घडीलाही तंतोतंत लागू पडते हा केव्हढा मोठा दैवदुर्विलास म्हणावा लागेल.

आजकालचे बेगडी प्रेमवीर किरकोळ प्रेमकथांचे भाकड गीत रचतात. मग त्यांचे हे पोकळ इमले कोसळले की तेही धराशायी होऊन जातात. प्रेम म्हणजे दोन विजातीय लिंगी व्यक्तींनी एकमेकावर केलेले विषयाआसक्तची भावना आहे का ? या प्रश्नाचे या कवितेइतके समर्पक उत्तर कुठे मिळणार नाही. प्रेमाच्या सर्वोच्च भावनांचा हा अविष्कार आपले डोळे नकळत उघडून जातो हे या कवितेचे मोठे यश म्हणावे लागेल. आजकालच्या प्रेमवीरांसाठी तर ही कविता एक झणझणीत अंजनच ठरावी. प्रेम कुणावर करावं याचं आशयघन आणि सर्वसमावेशक उत्तर इतकीच या कवितेची व्याप्ती न ठरता प्रेम कसं असावं याचा धडा देणारी एक सर्वोत्तम प्रेमकविता म्हणूनही या कवितेकडे पहिले जाते.
" प्रेम कुणावर करावं ?
कुणावरही करावं...
प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं,
कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावं,
भीष्मद्रोणांच्या थकलेल्या तीर्थरुप चरणांवर करावं,
दुर्योधन-कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं।
प्रेम कुणावरही करावं।...
प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं,
अर्जुन नावाच्या राजेन्द्रावर करावं,
बासरीतून पाझरणा-यासप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं,
यमुनेचा डोह जहरुन टाकणा-या कालियाच्या फण्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं....
प्रेम
रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं,
वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं,
गाईच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं,
मोराच्या पिसा-यातीलअद् भुत लावण्यावर करावं,
प्रेम काळजाच्या नात्यावर करावं,प्रेम खड्गाच्या पात्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं...
प्रेम
गोपींच्या मादक लीलांवर करावं,
पेंद्याच्या बोबडया बोलावर करावं,
यशोदेच्या दुधावर,
देवकीच्या आसवांवर,
प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं
कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं,
ज्याला तारायचं,
त्याच्यावर तर करावंच,
पण ज्याला मारायचं,
त्याच्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं...
प्रेम
योगावर करावं,
भोगावर करावं,
आणि त्याहुनही अधिक,
त्यागावर करावं...
प्रेम
चारी पुरुषार्थांची झिंग देणा-याजीवनाच्या द्रवावर करावं,
आणि पारध्याच्या बाणानं घायाळ होऊन अरण्यात एकाकी पडणा-यास्वतःच्या शवावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं
कारण
प्रेम आहे
माणसाच्या संस्कॄतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणि
भविष्यकालातील
त्याच्या अभ्युदयाची आशा
एकमेव ..... ! ! "

वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे खरे नांव गजानन रंगनाथ शिरवाडकर. दत्तक गेल्यामुळे त्यांचे नांव विष्णू वामन शिरवाडकर झाले. २७ फेब्रुवारी १९१२ साली त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पिंपळगाव येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण नाशिक येथील न्यू इंग्लीश स्कुलमध्ये म्हणजे आजचे जे जु. स. रुंगठा विद्यालय आहे तेथे झाले. मॅट्रिक परिक्षा ते मुंबई विद्यापीठातून पास झाले.

१९३० साली ते हं. प्रा. ठाकरसी विद्यालयात होते तेव्हा 'रत्नाकर' मासिकातून त्यांच्या कविता प्रसिध्द होत. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या आपल्याच लोकांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून १९३२ साली जो सत्याग्रह झाला त्यात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यामूळे बाल्यावस्थेतील त्यांच्या लिखाणाला प्रौढत्वाची लकाकी चढून हळूहळू त्यांच्या साहित्याने आकाशाला गवसणीच घातली. त्यांनी फक्त कविताच नाही तर कथा, कादंबऱ्या, नाटके, ललित साहित्य याबरोबर प्रभा साप्ताहिक, प्रभात वृत्तपत्र, सारथी, धनुर्धारी व नवयुग यामध्ये पत्रकारिताही केली. त्यांचे आवडते लेखक पी. जी. वुडहाऊस होते तर आवडता अभिनेता चार्ली चाप्लिन होता.

१९४२ साली प्रसिध्द झालेला 'विशाखा' हा काव्यसंग्रह म्हणजे मराठी वाङमयातील उच्च कोटीचे वैभव होय. जे आजही मराठी साहित्यप्रेमींना भुरळ घालते. 'मराठी माती', 'स्वागत', 'हिमरेषा' यांचबरोबर 'ययाती आणि देवयानी' व 'वीज म्हणाली धरतीला' ही नाटके १९६० ते १९६६ साली प्रसिध्द झाली. त्यांच्या साहित्य कृतींना राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले . १९४६ साली 'वैष्णव' ही कादंबरी व 'दूरचे दिवे' हे नाटक प्रसिध्द झाले. 'नटसम्राट' ही त्यांच्या लेखणीतून उतरलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती तर होतीच शिवाय त्याचे नाटयप्रयोगही खूप गाजले. नाटयवेडया मराठी रसिकांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. अत्यंत नाजुक व भावुक विषयाला हाताळणारे हे नाटक वयोवृध्दांचा दृष्टीकोन बदलणारे ठरले कारण अनेक वृध्दांनी हे नाटक पाहिल्यावर आपले मृत्यूपत्र बदलले. तरूणांचाही वृध्दांकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला. या नाटकावर बेतलेल्या सिनेमाने अभूतपूर्व यश संपादन केले होते.

साहित्य प्रवासाबरोबरच एक सृजनशील माणूस म्हणून त्यांचं वेगळं व्यक्तिमत्व अभ्यासायचं झालं तर अनेक पैलूनी ते पहावे लागेल. नाशिकमधील विविध चळवळींचे ते प्रणेते होते. उदाहरणार्थ, त्यांनी लोकहितवादी मंडळ १९५० मध्ये सुरू केले. नाशिकच्या प्रसिध्द सार्वजनिक वाचनालयाचे ते १९६२ ते १९७२ पर्यंत अध्यक्ष होते. ते दशक वाचनालयाचे सुवर्णयुग म्हटले पाहीजे. सामाजिक वा वैयक्तिक अशा कुठल्याही प्रकल्पांना ते मार्गदर्शन करीत. कोणीही कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन मागण्यास आला तर क्षणात त्या व्यक्तीची क्षमता ओळखून ते मदत करीत. असं असूनही यश साजरं करतांना ते मागे राहणंच पसंत करत.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात कुसुमाग्रजांच्या निधनाने जी पोकळी निर्माण झाली ती कधीच भरून निघणार नाही. मानवतेचा कळवळा व मराठी भाषेवरचं प्रभुत्व यामुळेच 'नटसम्राट' व 'विशाखा' सारखे साहित्य जन्माला आले. एवढं उत्तुंग कर्तृत्व व अनेक पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व अत्यंत साधे तर होतेच पण शेवटपर्यंत अत्यंत नम्र व सत्कार्याला वाहून घेतलेले जीवन ते शेवटपर्यंत जगले. शिक्षणक्षेत्रात त्यांनी खूप मार्गदर्शन केले. आजची परीक्षा पध्दती मुलांसाठी निष्ठुर पध्दती आहे असे त्यांचे मत होते. इतरही अनेक क्षेत्रात त्यांनी लोकांना योग्य मार्ग दाखवले. त्यांचे घर म्हणजे तीर्थक्षेत्र झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्थापण्यात आलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचे समाजातील गरीब, गरजू व मागासलेल्या जनतेसाठी योगदान वाखाणण्यासारखे आहे. ते खऱ्या अर्थाने मराठी साहित्यातील महाकवी होते.

'हे कुसुमाग्रज ! तुम्हि रहिवासी गगनाचे -
परि कृतार्थ केली तुम्ही मराठी माती
या मातीमधल्या अगण्य अणुरेणूंची
जोडलीत सार्या नक्षत्रांशी नाती'
कवी वसंत बापट यांनी कुसुमाग्रजांची थोरवी या कवितेतून अत्यंत चपखल शब्दांत वर्णिली आहे ती अत्यंत यथार्थ आहे...

मराठी साहित्यावरील कुसुमाग्रजांचे ऋण व्यक्त करण्यासाठी २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. तमाम मराठी रसिक मनांच्या वतीने केला गेलेला हा कुसुमाग्रजांचा सार्थ गौरव आहे...

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा