Thursday, June 22, 2017

'हसीना'...


१९८० च्या सुमारास अरुण गवळी सुरुवातीच्या काळात रमा नाईकच्या टोळीत सक्रीय होता ज्यायोगे तो दाऊदच्या कन्साईनमेंटला प्रोटेक्शन देई. खटाव मिल्सच्या वांद्यात त्याने हे काम सोडले आणि अमर नाईकची टोळी जॉईन केली. या दरम्यान दाऊदसाठी काम करणारे कोब्रा गॅंगचे म्होरके पारसनाथ पांडे आणि शशी रेशम यांच्या हत्येप्रकरणी त्याला पहिल्यांदा अटक झाली होती. पुढे जोगेश्वरीतील जमिनीच्या वादातून दाऊद आणि रमा नाईक यांच्यात टोळीयुद्धाचा भडका उडाला. यात रमा नाईक मारला गेला आणि अरुण गवळीने त्याचा वसा आपल्या खांद्यावर घेतला. यामुळे चिडलेल्या दाऊदच्या माणसांनी गवळीचा भाऊ पापा(उर्फ किशोर) गवळी याची निर्घृण हत्या केली. गवळीचा जीव तळमळला. याचा सूड घेण्यासाठी त्याने मोठी गेम 'ठोकण्याचा' निर्धार केला आणि अंमलात आणला देखील.

या दरम्यान दाऊदचा भाऊ शाबीर इब्राहिम कासकर हा १२ फेब्रुवारी १९८१ रोजी प्रभादेवी येथे मारला गेल्यानंतर दक्षिण मुंबईत दाऊदची कोकणी गँग व करीमलालाची पठाण गँग असे गँगवॉर उफाळून आले. आपल्या मोठ्या भावाची हत्या झाल्याने हाजी मस्तानसाठी काम करणारा दाऊद इब्राहिम सूडाने पेटून उठला. पूर्व उपनगरात आपल्या नावाचा दबदबा असणारा राजन नायर ऊर्फ बडा राजनला त्याने शाबीरच्या हत्येत सहभागी असलेला प्रमुख आरोपी अमीरजादा यास उडविण्याचे फर्मान काढले. तारीख व वार ठरला. ६ सप्टेंबर १९८३ रोजी अमीर जादाला मुंबईच्या सत्र न्यायालयात शाबीर हत्येप्रकरणी हजर करण्यात आले. सकाळचे ११.३० वाजले होते. न्यायालय पूर्णपणे भरले होते. अमीरजादाला बेड्या घालून पोलिसांनी न्यायाधीशांसमोर हजर केले. त्याच वेळी सुसाट वेगाने आलेल्या एका बुलेटने अमीरजादाच्या छातीचा वेध घेतला. अमीरजादा विटेनस बॉक्समध्येच कोसळला आणि रुग्णालयात नेण्यापूर्वी मरण पावला. बडा राजनने हायरकेलेल्या (भाडोत्री) सुपारी किलर डेव्हिड परदेशीने हा गेम केला. तेथे हजर असलेल्या तरुण तडफदार इसाक बागवान या फौजदाराने पळून जाणार्‍या डेव्हिडला झडप घालून अटक केली. या डेव्हिडचे पुढे आणखी एक कनेक्शन दाऊदच्या कुटुंबाशी जुळले होते जे खूप कमी लोकांना ठाऊक आहे.

आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जून १९९१ मध्ये अरुण गवळीने दाऊद इब्राहीमचा सख्खा मेव्हणा इस्माईल पारकरची हत्या घडवून आणली. ही हत्या करणाऱ्या शैलेश हळदणकरला १२ सप्टेबर १९९२ च्या दिवशी दाऊदच्या गुंडांनी जेजे हॉस्पिटल परिसरात घुसून गोळ्या घालून मारले. विशेष म्हणजे रिअल लाईफमध्ये घडलेले हळदणकर आणि अमीरजादाचे खून हिंदी सिनेमात इतक्या वेळा इतक्या स्क्रिप्टमध्ये प्लॉट केले गेले की ते पांचट होऊन गेले...असों. पुढचे वर्षभर गवळी आणि दाऊद एकमेकाच्या टोळ्यातली माणसे उडवत राहिले पण दोघेही सहीसलामत राहिले. १९९३ ला मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले आणि दाऊद त्याआधी काही दिवस देश सोडून परागंदा झाला. पोलिसांनी सगळ्याच अंडरवर्ल्डच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली, यात त्यांना यश मिळाले पण एक बाई पोलिसांना आवरता आली नाही. तिने रिअल इस्टेटपासून ते सुपारी किलींगपर्यंत आपलं साम्राज्य उभं केलं, देश सोडून गेलेल्या भावाचा धंदा टिकवून ठेवला, आपला स्वतःचा वचक निर्माण केला. अपहरण, एक्सटोर्शन तिचे आवडते उद्योग राहिले. ख्याती वाढल्यावर तिचा 'दरबार'ही भरू लागला आणि त्यात कैफियत घेऊन येणाऱ्याचा ती 'न्याय'ही करू लागली. हे सगळं उफराटं होतं पण खरं होतं. बघता बघता ती नागपाडयाची 'गॉडमदर' झाली...

डोळ्यात सुरमा, ओठावर पानाची लाली, नाकात मोरणी, कानात हिऱ्याच्या कुड्या / झुबे, डोळ्यात टेरिफिक जरब, काहीसा पुरुषी आवाज आणि बोलताना बोटांचा चाळा करणारी, उंची साड्या घालणारी ती स्त्री दाऊदची सख्खी बहिण होती ; जिच्या नवऱ्याला इस्माईलला गवळी टोळीने उडवले होते त्याची बायको, हसीना इस्माईल पारकर ! तिच्यावर आधारलेला बॉलीवूडचा 'हसीना' हा चित्रपट आता रिलीज होतोय..

बॉलीवूडला ज्या वाईट खोडी आहेत त्यातली एक म्हणजे समाजविघातक लोकांचे उदात्तीकरण करून त्यांना प्रोजेक्ट करणे. या खोडीला अनुसरून हसीना पारकरवर श्रद्धा कपूरचा हसीना येतोय. या भुमिकेसाठी तिने जबरी वेटगेन केलंय. ती नागपाडयातल्या एका घरात काही दिवस येऊन जायची आणि तिथल्या बायकांची तिने स्टडी केली. या सिनेमात शैलेश हळदणकरबद्दल आणि गवळीबद्दल दिग्दर्शकाने काय ऍटिट्यूड ठेवला असेल हा अनेकांसाठी उत्सुकतेचा भाग आहे. हसीनाच्या 'दरबारात' चालणाऱ्या सर्व गोष्टी जशाच्या तशा दाखवण्याचा 'दम' दाखवला आहे का हेही कळेल.. तिची लाईफस्टाईल टिपिकल ईस्लामी 'बुरखानशीन' दाखवलीय की 'मॉड' लेडी डॉनची हे देखील महत्वाचे ठरेल.

श्रद्धाकपूरसाठी ही एक सत्वपरीक्षाच आहे कारण या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत. हसीनाचा मोठा मुलगा २७ एप्रिल २००६ ला मुंबई गोवा महामार्गावर हसीनाचा मुलगा दानिश अपघातात मृत्यूमुखी पडला होता तेंव्हा तिचे वय ४७ वर्षे होतं. अनेकांचा रक्तपात घडवून आणणारी हसीना तेंव्हा कशी मूक झाली होती हे पडद्यावर साकारणं नक्कीच सोपं नाही. हसीनाची मुलगी कुदेसिया ही आईच्या पाऊलावर पाऊल टाकून मोठी झाली. २००८ मध्ये तिच्यावर फॉर्जरीच्या केसेस झाल्या तेंव्हा तिच्यात आणि हसीनात खटके उडाले पण तिच्या 'मामा' लोकांनी तिची पाठराखण केली होती. एक मुलगी, एक आई, एक बहिण आणि एक लेडी डॉन असे मुख्य पदर या भूमिकेत आहेत. श्रद्धासाठी हे आव्हान ठरले असणार !....

६ जुलै २०१४ च्यादिवशी हसीना पारकर मरण पावली होती तेंव्हा तिच्या अंत्यविधीस पाचेक हजार लोक उपस्थित होते, अनेकांनी आपली छाती बडवून घेत शोक व्यक्त केला होता. तर मुंबई पोलीस त्या दिवशी दाऊदच्या मोठया माशांना गळास लावण्यासाठी हाय अलर्टवर होती. पण काही विशेष घडलं नाही. खूप ड्रामा आणि इमोशन हसीनाच्या लाईफमध्ये घडलं पण तिची डेथ सायलेंट ठरली. हसीनाच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी तिच्या धाकट्या मुलाचा (अलीशाह) निकाह आयेशा नागानी हिच्याबरोबर झाला तेंव्हा तिथले वातावरण काही काळ भावूक झाले होते. हसीनाला हे सुख पहायची जबर इच्छा होती पण ती अधुरी राहिली. हसीनाच्या संपूर्ण आयुष्याकडे चित्रपटाने कोणता 'नजरिया' ठेवलाय यावर भविष्यात खूप राळ उठेल. दिग्दर्शक अपूर्व लाखियाच्या डोक्यात काय दृष्टीकोन आहे हे चित्रपट रिलीज झाल्यावरच कळेल... सिद्धांत कपूरने दाऊदची भूमिका केलीय आणि चरणप्रीतसिंहला डेव्हिड परदेशीचा थोडा मोठा पण डार्क रोल दिल्याचे बोलले जातेय म्हणजेच अपूर्व लाखियाने नक्कीच मोठी खिचडी पकवली असणार...

सो वेट फॉर 'हसीना'..

- समीर गायकवाड.