Tuesday, June 6, 2017

'जंगलाचा आलेख' - वंचितांचे खरे दुखणे.....दलितांचे तथाकथित नेते आणि त्यांच्यासाठी झटत असल्याचा आव आणणारया दलितेतर राजकारण्यावर विचार करण्याजोग्या संदर्भाची जुळवाजुळव करताना या कवितेची प्रकर्षाने आठवण येते. या कवितेचा संयमी अर्थपूर्ण सवाल अन अत्यंत टोकदार पद्धतीने मांडलेला आशय सध्याच्या काही प्रश्नावर मस्त भाष्य करू शकतो.....


'त्याने जंगलाच्या संदर्भाचा नवा आलेख
उसवून द्विधा झालेल्या झुडुपांसमोर सादर केला
तो त्यांचेसाठीच होता असा त्याचा सूर होता.
पण उपस्थितांमध्ये फक्त रंगविलेले एक
चिनार झाडच होते,
तेव्हढ्यामध्येही त्याला बरंच समाधान झालं.
नाहीतरी आलेख तयार करत असताना
त्याला असंच वाटायचं....आपला आलेख
समजून घेण्याची पात्रता फक्त चिनार झाडामध्ये आहे.
पण, झुडुपाबाद्द्ल स्तोत्र आहे
हेही त्याला सांगायचं होतं ;
म्हणजे चिनार झाडांचीही मेहेरनजर
अटळ राहील आणि झुडुपामाध्येही
भरभक्कम पत अबाधित राहील.
यामध्ये आपण काही बनवाबनवीचा प्रकार करतो आहो
असे त्याचे गावीही नव्हते,
अर्थात हे सगळे त्याचेसाठी गृहीत,
त्याला हे माहित आहे जंगल उभारणीच्या
सत्कृत्यासाठी आपले तेव्हढे हात लागले
तेव्हढे आणखी कुणाचे लागले नसतील.
तरीपण अंगभर वाढलेल्या पापांकडे
दुर्लक्ष करून रस्त्यांवर भडव्यांचे हाट
लागतात हे त्याला सांगावेसे वाटतं,
कारण दगडावर कोरलेली वाक्यं....
.....इतिहासात जमा होत जातात ;
अर्थात, इतिहासाच्या पानावर जमा असलेल्या
फसव्या तत्वज्ञानाचा पुढची पिढी
उदो उदो करते.
मित्रा, ज्या जंगलाचे संदर्भ गोळा केले आहेस
त्या जंगलाचे जंगलपण उपभोगलं आहेस काय ?
नाही ......असं जर उत्तर असेल
तर तुझ्या आलेखाला काही किंमत नाही.
आधी जंगलाच्या काळोखात उसविणारया
आयुष्याचे पोटी जन्म घे !
तुला कोणतेही संदर्भ गोळा करण्यासाठी ग्रंथालयाच्या
पायरया झिझवाव्या लागणार नाहीत,
सगळे संदर्भ तुझ्या मानगुटीवर ओझ्यासारखे
लादूनच येतील .....'

वंचितांचे जीवन जगताना, त्यांचे अनुभव मांडताना अनेक जण जिथे होते तिथेच राहिले. पण इतराना गुलछबू स्वप्ने दाखवून, परंपरेच्या मोहात पडून आपल्याच स्वकीयांचा घात करून पुढे गेलेले अनेक जण सापडतात. उदाहरणच सांगायचे तर आजकालच्या तथाकथित दलित पुढारयांच्या बाबतीत बोलता येईल. बाबासाहेब ज्यांच्याबद्दल जळते घर म्हणून इशारा देऊन गेले, हे आयुष्यभर लूत भरलेल्या प्राण्यागत त्यांच्या दारात लाचार होऊन पडून राहीले. शिवछत्रपतींच्या तेजस्वी मात्यापित्यांना अन खुद्द शिवाजीमहाराजांना जशी गुलामगिरी मंजूर नव्हती, अन त्यांनी स्वराज्याची स्वप्ने बघितली व स्वराज्य स्थापन करून जगाला आदर्श घालून दिला. तद्वत तितके मोठेही नसेल पण तशा अर्थाचे स्वप्नसुद्धा ह्या विचार- तत्वांशी गद्दार नेत्याना पडली नाहीत यातच काय ते कळून येते. आपली तुंबडी भरण्यासाठी यांनी स्वतःसकट आपला अख्खा समाज विविध लेबले वापरून वेगेवगळ्या राजकिय दुकानदारीत गहाण टाकला.

वैचारिक गळती लागलेल्या अशा अनेक फुटक्या टमरेलाना पूजेच्या कलशाचा दर्जा प्राप्त होण्याची स्वप्ने मात्र जरूर पडली, अन त्यासाठी त्यांनी समाजामध्ये बुद्धीभेद केला. आपणच एकेमेव कैवारी अन आपणच चळवळीचे खरे वारसदार हे बिंबवण्यासाठी त्यांनी आपल्या अंगावरची तत्वांची वस्त्रे कधी उतरवली हे त्याना देखील कळाले नाही. आपल्यातुन पुढे गेलेल्या सर्वच क्षेत्रातल्या प्रातिनिधिक म्होरक्यानी केलेल्या ह्या स्वप्नदोषी पतनामुळे दलितसमाज तेंव्हापासुन जो गोधळलेला आहे त्याला अजूनही चळवळीची दिशा अन दशा कळून यायला मार्ग नाही.

त्याच सुमारास संपूर्ण देशाच्या पटलाचा विचार करताना असे दिसून येते की, ज्या दलितेतर पुढारयांनी आपणच खरे अन निस्सीम पण तालेवार कैवारी असे बिंबवले त्यांची तळी काहीजणांनी उचलली अन समाजाभिमुख विकासाचा तथाकथित गलका अजून मोठा झाला.
कवितेतले चिनार झाड हे अशा गद्दारांचे प्रतिक आहे जे समाजाला विकून गहाण टाकून आपल्याच तालात अन बेगड्या सप्तरंगात न्हाऊन गेलेले आहे. अन जंगलाचा आलेख हे प्रतिक आहे, विकासाच्या खोट्या ब्ल्यू- भगव्या- हिरव्या-निळ्या प्रिंटचे !
अन हे जंगलाला नवे संदर्भ देण्याची भाषा बोलणारा जो वरवरचा पोकळ सहृदयी आहे तो या चिनाराच्या समाधानावर खुश आहे. त्यालाही तेव्हढेच समाधान पुरेसे आहे, आपण काही तरी करत असताना आपल्या इतके हात कुणाचे लागले नसतील हा सोयीस्कर विचार म्हणूनच त्याच्या मनात येऊन जातो.

म्हणून कवी शेवटी विचारतो, मित्रा ज्या जंगलाचे संदर्भ तु गोळा करत आहेस वा केलेले आहेस, ज्या आधारे तु जंगलाच्या विकासाचे नवे आलेख बनवत आहेस त्या जंगलाचे जंगलपण तु अनुभवले आहेस का ? जर तुझे उत्तर नाही असेल तर त्या आलेखाला काही अर्थ नाही. ज्या सुध्रारणा किंवा योजना केले जाणे अपेक्षित आहेत व हे सर्व ज्यांच्यासाठी केले जाणे अपेक्षित आहे, त्यांचाच जर यात सहभाग नसेल तर जो काही आराखडा बनेल तो तकलादू असेल. कारण ज्यांनी हे बनवले आहे, ते पुस्तकी संदर्भ मिळवून वा अशी चिनारची झाडे जे हे जगलेच नाहीत त्यांच्याकडून संदर्भ मिळवून ते केले गेले आहे त्यामुळे त्याला काहीही वास्तवता अन योग्यतेची इतर परिमाणे त्यात असणार नाहीत.

नुकतीच झालेली जातनिहाय जणगणना असो वा स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची ६५ - वर्षात येऊन गेलेल्या डझनावारी योजना अन त्यावर खर्च झालेले अरबो-खरबो रुपये खर्चून काय झाले ? फक्त रंगीत चिनारांची झाडे थोडीफार वाढली...खरे वंचित अन दिनदलित ज्याना कवीने झुडुपांची उपमा दिली आहे. ते तर अजूनही जातीयतेच्या अन दारिद्र्याच्या जंगलातच खितपत पडले आहेत.

धर्मराज निमसरकर यांनी लिहिलेल्या ‘जंगलाच्या नव्या आलेखाबद्दल ..’ या बोलक्या कवितेचे हा विचार करायला प्रवृत्त करणारा आशय आहे. मुळातच प्रवाही अशी संवादशैलीतली ही कविता आणखीच प्रभावी वाटते,तिच्यातल्या प्रतीकात्मक अन मार्मिक उपमांमुळे त्यातला आशय सुलभ होऊन जातो. जसे की इतिहासाच्या पानावर जमा असलेल्या फसव्या तत्वज्ञानाचा पुढची पिढी उदो उदो करते हे सांगताना दगडावर कोरलेली वाक्ये इतिहासजमा होऊन जातात असे सहज पण आशयघन सुचवून आपला अर्थ कवी नेमकेपणाने व्यक्त करतात...

स्वतः निमसरकरानी हलाखीचे अन तुच्छतेचे जीवन अनुभलेले आहे. अस्मितादर्श आणि युगवाणीमध्ये त्यांनी लेखन केले आहे. जयभीम या साप्ताहिकासाठीही त्यांनी लेखन केले आहे.कोळसा आणि चुन्याच्या खाणीत काम करणारया नागपुरी कुटुंबाच्या संघर्षमय पार्श्वभूमीने त्यांचे विचार अधिक व्यापक झाले आहेत. आपल्या जन्मदात्यांच्या अंगभरच्या भेगामध्ये अन डोईवरच्या विरळ झालेल्या केसामध्ये दिवसभर चुन्यात कष्ट करून साठलेली धुळ त्यांनी आईच्या संस्कारासह आपल्या काळजामध्ये जतन करून ठेवली आणि पुढे त्याच्याच योगाने ती अस्वस्थता कवितेच्या प्रेरणेपैकी एक बनून गेली. आवेशपूर्ण पण इतरांपेक्षा वेगळी अभिनवपूर्ण अशी त्यांची काव्यशैली अंतर्मुख करून जाते.

'जंगलाचे आलेख..' या कवितेचे सद्यकालीन संदर्भ देताना एक ढळढळीत उदाहरण देता येईल... जातीनिहाय गणनेचा अहवाल सरकारने जो खरे तर दडपुन ठेवलाय असे ज्याचे वर्णन करता येईल, कारण अजून तो सार्वजनिक झालेला नाही. त्या अहवालाच्या आधारे सरकार म्हणते तसे दलितांच्या सर्वांगीण विकासासाठी काही नियोजन होणार असेल तर त्यासाठी त्या क्षेत्रातले जास्तीत जास्त अनुभवी अन वास्तवाच्या आगीतून तावून सुलाखून निघालेले खरोखरीची आस्था असणारे लोक त्यात असायला पाहिजेत. नियोजनाच्या देखाव्यात फक्त सरकारी मान्यतेची रंगीत चिनाराची झाडे असतील तर इतर झुडुपांच्या विकासाचा आलेख ते कसा काय मांडू शकतील ? हे मुठभर लोकांच्या कल्याणाचे काम असेल, त्यात सर्वसामवेशकता नसेल ......

रामविलास पासवान, रामदास आठवले, राजेंद्र गवई इत्यादीना आताची चिनाराची झाडे म्हणावे का ? जातीयतेचा - धर्मभेदाचा विखार अंगी बाळगणाऱ्या आताच्या ढोंगी राजकीय पक्षांत असे मुखंड जागोजागी आहेत हेच वंचितांचे खरे दुखणे म्हणावे का ?

- समीर गायकवाड .