शनिवार, २४ जून, २०१७

माहेरची पाखरे .....

सोबतच्या छायाचित्रातल्या या सर्व जणी कोण आहेत ? मैत्रिणी ? भिशीग्रुपच्या महिला मेम्बर्स ? कुठल्या संस्थेतील स्टाफ कुलिग्ज ? की शेजारणी ? ..... काही अंदाज लावता येतो का ?
हरलात ना !
मीच सांगतो .... या सर्वजणी माझ्या बहिणी आहेत !!!! तब्बल वीस बहिणी !
यातली कुणी वयाची सत्तरी जवळ आलेली तर कुणी पस्तिशीच्या उंबरठयावर पोहोचलेली ! इतका मोठा जनरेशन गॅप असलेल्या तरीही एकमेकांची मने ओळखणाऱ्या अशा प्रेमळ, सोज्वळ आणि नितांत लडिवाळ मायाळू स्वभावाच्या माझ्या या बहिणी .... यांच्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे...


मुंबई, नवी मुंबई, वाशी, पुणे, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, विजापूर, बेंगलूर अशा मोठ्या शहराबरोबरच सांगली जिल्ह्यातील मायणी, म्हैसाळ, कडेगाव, येळावी, वायफळे, हिंगणगाव ; सातारा जिल्ह्यातील बलवडी ; माझ्या सोलापूर जिल्ह्यातील होटगी, बार्शी ; दुष्काळी उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा अशा खेडोंपाडी माझ्या बहिणी दिलेल्या. आणि एक बहिण तर आमच्या गावातच (मु.पो.कोंडी तालुका उत्तर सोलापूर) दिलेली.

या प्रत्येकीची संघर्षकथा निराळी आहे. यांची जीवनशैलीही अनोखी आहे. कुणी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष पुरवत संसाराचं - घरादाराचं चक्र हाकताना शेतीवाडीचेही ध्यान राखते, गुरांना चारापाणी करते तर कुणाची मुलं परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेली. जीवनमानात प्रचंड फरक असूनही या सगळ्या जणी आपल्या कुटुंबात सुखी आणि समाधानी आहेत. कुणाची किरकिर नाही की कसली तक्रार नाही.
बहिणींचा गोतावळा 
काहींच्या आयुष्यात आभाळाएव्हढी संकटे येऊन गेली पण त्या डगमगल्या नाहीत. तर काहींना मोठया सेटबॅकचा सामना करावा लागला. पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागली.

फिनिक्स पक्षाने राखेतून भरारी घ्यावी तशा त्या नव्या दमाने उभ्या राहिल्या. आता आपल्या मुलाबाळात आणि संसारात त्या अगदी रममाण झालेल्या आहेत पण त्यांची माहेरची ओढ जशीच्या तशी आहे अगदी मातीत खोल गेलेल्या झाडाच्या मुळांसारखी ! गावाकडच्या मातीचे संस्कार निश्चितच वेगळे असतात त्याचाच हा परिणाम. माझे आजोबा वै. बलभीमराव गायकवाड ज्यांना आम्ही अप्पा म्हणत असू आणि आजी चंद्रभागा यांनी जे संस्कार त्यांच्या मुलांत रुजवले, तेच संस्कारबीज त्यांच्या मुलांनी आपल्या पुढच्या पिढीत रोवले. माझ्या बहिणींनी त्याची जोपासना आपल्या सासरी केली. त्यामुळे या सर्वजणी आपापल्या सासरच्या आदर्श सूना न ठरल्या तर त्यात नवल ते काय !

गावाकडे आजोबांची पुण्यतिथी असो वा घरातले एखादे मंगलकार्य असो आपल्या कुटुंबाचे - वेळेचे नियोजन करत जमेल तशी हजेरी या लावत असतात. माहेरी आल्यावर चुलत्या काकांचे आणि आपल्या भावांचे सुखदुःख जाणून घेत असतात. माहेरवाशिन झाल्यानंतर काही दिवस राहून आपल्या सासरी परत जाताना ओल्या झालेल्या डोळ्याच्या कडांना हलकेच पदर लावत असतात.

या सर्वजणी घरी एकत्र आलेल्या असल्या की आनंदाची मोठी पर्वणी असते. प्रत्येक दिवस दसरा दिवाळी होतो. प्रत्येक क्षण आनंदात न्हाऊन निघतो. घरदार कसं भरभरून जातं. घराचं कसं गोकुळात रुपांतर होऊन जातं. भाऊबीजेच्या एक रूपयाच्या ओवाळणीपासून ते राख्यांनी गच्च भरलेल्या हाताने गावभर मिरवत फिरण्याच्या रक्षाबंधनाच्या दिवसाच्या अनेक आठवणी मनात फेर धरून नाचतात. यांची नागपंचमी पाहताना आम्हा भावंडांचे मन खट्टू होऊन जायचे इतका त्यात जोश आणि रंग भरलेला असायचा. अशा अनेक आठवणींचा खजिना यांनी समृद्ध केला आहे...

मुलगी पोटाला येणं ही खरंच मोठी भाग्याची बाब आहे! बहिणीबाळी नसतील तर आयुष्यातील निम्मी नाती कळत नाहीत. स्त्रीत्वाचा अर्धा अर्थ अनभिज्ञ राहतो. जन्मापासून ते लग्नघटिकेपर्यंत आपल्या अंगणात वाढलेले प्रेमाने जोपासलेले, रात्रंदिवस मायेने देखभाल केलेले एखादं झाड एका क्षणाला
नटून सजून फोटोसाठी तयार !
उपसून काढायचे आणि दुसऱ्याच्या अंगणात जड हाताने नव्या मातीत, नव्या अंगणात पुन्हा लावायचे. त्या झाडाने तिथे अंग धरावे, फुलावे, बहरावे व स्वतः उन्हात उभं राहून त्या घरावर आपली सावली धरावी हे सगळं किती दिव्य आहे ! अथांग मायेचा आणि निस्सीम त्यागाचा हा सर्वोच्च दाखला आहे. आमच्या गायकवाडांच्या परिवारात जन्मलेल्या, वाढलेल्या ह्या वृक्षवेली आता दुसऱ्यांच्या कुटुंबाची शान झालेल्या आहेत. त्यांचे कर्तुत्व त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे, त्यासाठीच्या सर्व कसोट्यावर खरं उतरताना त्यांना जीवघेणी कसरतही करावी लागली आहे.

यासर्व जणी आधी मायबापासाठी जगल्या, पुढे त्यांच्या जोडीदारासाठी जगल्या आता त्यांच्या अपत्यांसाठी जगत आहेत. या धावपळीत त्यांचं स्वतःचं आयुष्य जगायला त्या विसरल्या. पण काही दिवसापूर्वी कोल्हापुरातील माझ्या ज्येष्ठ भगिनींनी सगळ्यांनी तीन दिवस एकत्र रिसोर्टवर राहण्याची संकल्पना मांडली. प्रत्येकीच्या सासरकडून हिरवा कंदील मिळाला. मग काय अगदी आखीवरेखीव नियोजन होऊन या सगळ्याजणी एकत्र आल्या. एकदम धमाल केली. अगदी साडी ते ड्रेसपर्यंतचा कलरकोड त्यांनी अमलात आणला. आपलं कुटुंब आणि त्याचं रहाटगाडगं मागे ठेवून गेलेल्या दिवसात त्या रममाण झाल्या. सुखदुःखाचे क्षण आठवून हळव्या झाल्या आणि जीवनाची लढाई लढण्यासाठी नव्या उमेदीने पुन्हा तरारून उठल्या.

यातल्या बऱ्याचजणी आता आजीच्या भूमिकेतूनही पुढे गेल्या आहेत. प्रत्येकीची जबाबदारी भिन्न आहे आणि संघर्षाचा प्रांतही भिन्न आहे. पण अंतस्थ मायाप्रेमाच्या समान धाग्याने त्यांना अगदी नेटाने बांधून ठेवलेलं आहे.. माझं बालपण, आयुष्य समृद्ध करण्यात माझ्या बहिणींचा मोठा वाटा आहे. आम्ही भाऊबहिणी मिळून बत्तीसजण आहोत. एका अतूट नात्यात गुंफल्या गेलेल्या माळेचे तजेलदार आणि तेजस्वी मोतीच जणू !

आईच्या पाठोपाठ बहिणीचे स्थान असते. मात्र आजकालच्या जगात भौतिक गरजा आणि कौटुंबिक अडचणीपायी अनेक जण एकच अपत्य होऊ देण्याकडे कल ठेवताना दिसतात. काहीना दोन किंवा जास्तीत जास्त तीन ते चार अपत्येही असल्याचे आढळते. यामुळे कधीकधी या मुलांना कधी भाऊ नसतो तर
अशीही एक रम्य आठवण 
कधी बहिण नसते. एकच अपत्य असेल तर त्याचे भावविश्व अगदीच सीमित होऊन जाते. त्याला ना भाऊ ना बहिण असे कमनशिबी जीवन जगावे लागते. कधी दोन बहिणी असतात तर कधी दोन भाऊ असतात. काही घरात मात्र एक बहिण आणि एक भाऊ असतो. तर काही ओढाळ घरात ही संख्या किंचित जास्त असते. तरीही या आकसत चाललेल्या नात्यांच्या संख्येमुळे मुले हळूहळू आत्येभाऊ - बहिण, मामेभाऊ - बहिण, मावसभाऊ - बहिण, चुलत भाऊ - बहीण आता तर सख्खे भाऊ - बहिण या नात्यांची गळचेपीच झाली आहे. काही दशकानंतर ही नाती केवळ पुस्तकांत असतील अशी चिन्हे आहेत. ही सर्व गुंतागुन्त पाहू जाता आम्ही भावंडं मात्र खूप नशीबवानच म्हणायला पाहिजेत. आजही जेंव्हा कधी आमचं संपूर्ण कुटुंब एकत्र येतं तेंव्हा एक हृदयस्पर्शी आनंद सोहळाच साजरा करत असतं.....

आजकालच्या व्यवहारीक जगात अनेक नाती, घरं उन्मळून पडताना दिसत आहेत तिथे अशा घटना मायेचा ओलावा निर्माण करणाऱ्या ठरू शकतात. काहींना त्यातून नात्यांची नव्याने प्रेरणा घेता यावी या हेतूने अवीट गोडीचे हे कौटुंबिक क्षण सोशल मिडियावर शेअर करतोय....पोस्ट वाचून तुमच्या नात्यांबद्दल तुम्हाला काय वाटते ते नक्की कळवा.

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा