Sunday, December 27, 2015

"तिसरे बादशहा हम है " - काला पत्थरच्या निमित्ताने ....जमिनीच्या उदराखाली भली मोठी खाण अजगरासारखी सुस्त पडली आहे अन वर लख्ख उन्हात वेगळाच डाव चालू आहे..अपंग मनमोहन कृष्णचे चहाचे छोटेसे टपरीवजा छप्पर आहे, तिथे बाहेर एक लाकडी फळकुटाचे टेबल आहे. त्याच्या आजूबाजूला दोन मरतुकडे बाकडे टाकलेले आहेत. या टपरीच्या बाजूला कोळशाचे ट्रक उभे आहेत. कळकटलेले कामगार डोक्याला पांढरे हेल्मेट घालून येजा करताहेत. सगळे कसे यंत्रवत चाललेले आहे, या टेबलावर काळपट चॉकलेटी रंगाच्या चहाचे काचेचे ग्लास आहेत, पांढुरक्या रंगाच्या टवके उडालेल्या बशीत मातकट फरसाण पडलेलं आहे अन पत्त्याचा डाव रंगात आलेला आहे. राणा (मॅकमोहन) त्याच्या मित्रांबरोबर तीन पत्तीचा डाव लावून बसलेलाय. 'एक चाल मेरी भी, एक और मेरी, एक और सही आणि शो ..' असे त्यांचे जुगारी डावपेच चालू आहेत. मागे पार्श्वसंगीतात गीता दत्तच्या आवाजातलं 'तदबीर से बिगड़ी हुई तक़दीर बना ले, तक़दीर बना ले अपने पे भरोसा है तो ये दांव लगा ले….' मंद ट्युनिंगमध्ये चालू आहे.. बेगम,गुलाम आणि देहला असे बिनीचे पत्ते दाखवून राणा डाव जिंकतो, समोरचा हारलेला ओशाळवाणा होऊन, 'धत तेरे की,सब पैसे हार गया … ' असं पुटपुटू लागतो…
त्या टेबलाला रेलून उभा असलेला, कंबरेचा जाड पिवळ्या हुकचा पट्टा गळ्यात अडकवलेला, मळकट खाकी कपड्यातला मंगल सिंह (शत्रुघ्न सिन्हा ) पत्त्याचा हा डाव बेरकीपणाने बघतोय, त्याला राणाचा डाव बघून चेव येतो अन तो त्याला विचारतो,"क्यों राजा नल हमसेभी एक हाथ खेलोगे ?" राणा उत्तरतो, "क्यो नही ?"

बाकड्यावर बसलेल्या कामगारांना एका फटक्यात सरकवत चुटकी वाजवत मंगलसिंह आता त्या बाकड्यावर राणाच्या समोरासमोर बसलेला आहे. राणा त्याच्याकडे मारक्या म्हशीगत बघत बघत पत्ते पिसू लागतो. राणा हा त्या भागातला मुरलेला अट्टल जुगारी म्हणून ख्याती पावलेला आहे तर मंगलसिंह हा एक बेरड गुन्हेगार आपली ओळख लपविण्यासाठी त्या खाणीत कामाला आलेला आहे. आता त्याचा तीन पत्तीचा डाव राणासोबत चालू आहे. मागे सुरु असलेल्या 'लगा ले दांव लगा ले …' चा आवाज आता चांगलाच वाढलेला आहे अन मंगलसिंह हुबेहूब गाण्याबरहुकुम त्या लाकडी टेबलावर दोन्ही तळहाताने चांगलाच ठेका धरून वाजवू लागला आहे. पत्ते पिसता पिसता राणा त्याचे पत्ते काट मारण्यासाठी मंगलसिंहच्या पुढ्यात हात करतो, टिचक्या वाजवत त्या पत्त्याच्या वरतीच टिचकी देतो, छद्मी पणाने हसतो. राणाचे आता तीन तीन पत्ते वाटून झाले आहेत. मंगल सिंह ते पत्ते उचलून दोन्ही हाताच्या ओंजळीत धरून एकेक पत्ता हळूहळू कोपरा उघडून सरकवत सरकवत तिन्ही पाने बघतो. राणा देखील पत्ते एका आड एक धरून त्याची तिन्ही पाने पाहतो. बदाम बादशहा, किलवर बादशहा आणि किलवर दुर्री अशी मंगलसिंहची पाने आहेत. पाने बघून तो एक चुरगळलेली नोट खिशातून काढत "एक चाल मोहब्बत मे ' असं म्हणत म्हणत टेबलावर टाकतो. मंगलसिंह कडे काहीशा संशयाने पाहत राणा देखील पत्ते एका आड एक धरून त्याची तिन्ही पाने बघतो. चौकट गुलाम, इस्पिक गुलाम आणि इस्पिक चौक अशी त्याची पाने आहेत. त्याने आधीच्या डावात जिंकलेल्या टेबलावरतीच पडलेल्या नोटातली एक नोट उचलून पुढे डावात टाकतो. मंगलसिंह अजून एक चुरगळलेली नोट काढून 'भाईचारे मे एक चाल और आगे ..' असं म्हणत डावात टाकतो.

'एक मेरी भी' असं म्हणत राणा आणखी एक नोट पुढे करतो, इतक्या वेळ बेरकीपणाने त्याच्याकडे पाहणारा मंगलसिंह आता सावध होऊन पुन्हा पत्ते बघतो, त्याचे लक्ष पत्त्यात आहे हे हेरून राणा त्याच्या शर्टच्या बाहीत लपवलेला बदामचा गुलाम वरती काढून हातातला पत्ता बदलतो अन "एक चाल मेरी भी !" असं आव्हान देतो. आता वैतागलेला मंगलसिंह पुढची चाल करतो.

"देखो राजा बनारस ये तेरी मेरी मे बहोत टाईम लग जायेगा, एक सौ का नोट है मेरे पास … " असं म्हणत तो खिशातून शंभराची नोट काढून डावात टाकतो. अन म्हणतो की "अब तुम भी डाल दो, अब जिसका बडा पत्ता होगा वो ले जायेगा !". राणा त्याचे आव्हान स्वीकारून शंभराची नोट पुढे करतो. या दोघांचे हे आवेशातले बोल ऐकून हॉटेलवाले मनमोहन कृष्ण मंगलला सांगतात की तू नवा आहेस, कशाला पैसे वाया घालवतोस, तू याचा नाद करू नकोस, हा नेहमीच जिंकत आलेला आहे यावर मंगल उत्तरतो - 'बडे भैय्या से आजतक कोई जीता नाही और हम आजतक किसीसे हारे नही, तो अब देख लेते है. हो जाये !"

त्याचे हे उद्गार ऐकून राणा त्याचे तीन पत्ते तीन गुलाम एकेक करून टेबलावर खुले टाकतो अन 'तीन गुलाम' असं म्हणत टेबलावरच्या नोटा आपल्याकडे ओढू लागतो. तेव्हढ्यात त्याला अगदीच धुत्कारत, हिणवत 'अरे बस्स.. हाड हांड करू लागतो.
" क्यो तुम्हारे पास क्या है ?' असं राणाने विचारताच मंगलसिंह उत्तरतो, "हमारे पास तीन बादशहा है !"
अधीर होऊन राणा विचारतो "दिखाओ, दिखाओ तीन बादशे !"

आता त्या टपरीच्या खांबाला अगदी आरामात रेलून बसत बसत त्याची पाने दाखवतो. तो आधी किलवर बादशहा टाकतो मग बदाम बादशहा टाकतो आणि थांबतो. अधीर झालेला राणा त्याला म्हणतो, "तिसरा ? तिसरा बादशहा दिखाओ ?"असं फर्मावतो.

"मेरे ताश के तिरपनवे पत्ते, तिसरे बादशहा हम है" असं आपल्या ठेवणीतल्या खर्जातल्या आवाजात हुकुमी संवादफेकीत मंगलसिंह हातातले तिसरे पान फाडून त्याचे चार तुकडे करतो अन राणाच्या तोंडावर फेकून "दिखाई नही देता ? तिसरे बादशहा हम है !!" असं म्हणत एका मुठीतच टेबलावरच्या सगळया नोटा कोंबून उठून चालता होतो देखील !
थियेटर मध्ये शिट्या अन आरोळ्यांचा नुसता कल्लोळ उठतो.

आणखी एका सीनमध्ये अमिताभ त्याच टपरीवजा हॉटेलमध्ये बसलेला असतो. तो सिगारेट शिलगावण्यासाठी समोरच्या कामगारास काडीपेटी मागतो, तो काडीपेटीतील एक काडी काढून पेटवून अमिताभच्या पुढे धरतो. इतक्यात तिथे आलेला शत्रुघ्न त्या कामगाराचा हात मागे ओढत त्याच्या काडीवर आपली सिगारेट पेटवतो न दुसरीकडे जाऊन बसतो. चिडलेला अमिताभ त्याची सिगारेट त्या काडीवर न शिलगावता शत्रू बसलेल्या टेबलाजवळ जातो अन त्याच्या हातातल्या जळत्या सिगारेटवर आपली सिगारेट शिलगावतो. शिवाय पुढे जाताना शत्रूची सिगारेट भिरकावून देतो . या नंतर दोघात जाम दण्णादन्नी होते ती पडद्यावर जाम खुन्नस देऊन जाते.

पुढच्या एका सीनमध्ये चहा आधी कोण पिणार या प्रश्नावर शत्रुघ्न (मंगलसिंह) आणि अमिताभ (विजय) यांच्यात होणारी खीचातानी बघण्यासारखी आहे. या दोघाच्या वादात शशी कपूर (इंजिनियर रवी ) पुढे येऊन चहा पिऊन वाद तिथेच थांबवतो.

वर्ष होते १९७९. सिनेमा होता काला पत्थर.यश चोप्रा कॅम्पमधील सिनेमा ! हा सिनेमा म्हणजे स्टार्सची मांदियाळी शोभावा असा होता. अनेक वैशिष्ट्ये अन अनेक आठवणी या सिनेमाच्या आहेत . यातली काही गाणी देखील गाजली, शशी कपूरची पत्नी जेनिफर हिचे लोभस असं काही क्षणाचे दर्शन देखील यात झाले होते. ‘टावरिंग इन्फर्नो’च्या यशानंतर पाच वर्षांनी म्हणजे १९७९ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते यश चोप्रा यांनी ‘काला पत्थर’ या चित्रपटाची निर्मिती केली. यापूर्वीचे त्यांचे चित्रपट प्रेम कथानकावरच आधारित होते परंतु या चित्रपटाच्या कथानकाची त्यांनी निवड केल्यानंतर चित्रसृष्टीतील अनेक दिग्गजांना आश्‍चर्याचा धक्का बसला होता. या चित्रपटाच्या पटकथेची जबाबदारी सलीम-जावेद या जोडगोळीवर सोपविण्यात आली होती. या जोडीने १९७५ मध्ये घडलेल्या ‘चसनाला खाण दुर्घटने’ला डोळ्यासमोर ठेवून पटकथेचे लिखाण केले. या दुर्घटनेत ३७२ खाण कामगारांना जलसमाधी मिळाली होती. यश चोप्रांच्या ‘काला पत्थर’ या चित्रपटात गाणी आणि संगीतावर विशेष लक्ष देण्यात आले होते. त्यामुळेच आज तीन दशकानंतरही या चित्रपटातील गाणी रसिकांच्या स्मरणात आहेत. चांगले स्टार कास्ट, प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे कथानक आणि सुरेल संगीत या सर्वांचा उत्कृष्ट मिलाप झाल्याने अपेक्षेपेक्षा जास्त यश या चित्रपटाला मिळाले होते. सुरुवातीला शत्रुघ्नसिन्हा ही भूमिका करण्यास राजी नव्हते. पण त्यांनी ही भूमिका स्वीकारली अन त्यातले त्यांचे संवाद देखील हिट झाले. 

काला पत्थरचे पोस्टर

प्रेम या विषयावर विविध कोनांतून पाहणारे चित्रपट ही यश चोप्रा यांची खासियत मानली गेली. परंतु, आपल्या कारकिर्दीत त्यांनी ‘काला पत्थर’ हा वेगळा चित्रपट केला आणि फारसा चालला नसला तरी हा चित्रपट ‘यश चोप्रा क्लासिक’ म्हणून गणला जातो. मागच्या वर्षी कोळसा खाणींच्या कथेवर आधारित आलेला गुंडे हा सिनेमा त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्याशी लेखक-दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी कथानक व पटकथा याबाबत चर्चा करून मंजुर करून घेतला होता. वास्तव स्थळी हा चित्रपट चित्रित करण्याची इच्छा त्या वेळी यश चोप्रा यांनी व्यक्त केली होती. त्याचबरोबर कोळसा खाणी, कोळसा माफिया, तिथली परिस्थिती यांतील अनेक बारकावेही यशजींनी दिग्दर्शकाला सांगितले होते. या चित्रपटाची चित्रीकरणाची प्रक्रिया यश चोप्रा यांच्या निधनानंतरच सुरू झाली होती. ‘गुंडे’ हा कोळसा माफिया या विषयावरचा सिनेमा होता पण संकल्पना, चित्रीकरण स्थळनिश्चिती आणि गोष्ट या पातळीवरचा यश चोप्रा यांचा शेवटचा चित्रपट म्हणता येईल. काला पत्थर हा त्यांचा शैलीबाह्य सिनेमा होता अन गुंडे हा लौकिक अर्थाने शेवटचा होता, पण दोन्ही सिनेमाची पार्श्वभूमी एकच होती.


हे पोस्टर खूप फेमस झाले होते  
काला पत्थरला इतर यशराज सिनेमांसारखे छप्परफाड यश न मिळाल्यामुळेच की काय यश चोप्रांनी असं हटके पाऊल पुन्हा हयातीत टाकले नाही. आज काला पत्थरवर लिहिण्याचे कारण म्हणजे ज्या दुर्घटनेवर आधारित हा सिनेमा होता ती दुर्घटना आजच्या दिवशी झाली होती. २६ डिसेंबर १९७५ ला बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार काही मिनिटांत ठार झाले होते. काला पत्थरमधेही शेवटी मंगलसिंह सह अनेक कामगार पाण्यात बुडून मरतात असाच क्लायमॅक्स होता !

जुन्या आठवणींचा उजाळा कधी कधी एकाच वेळी सुखाचाही असतो पण त्याला अशी दुःखाची झालरही असते….

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment