Thursday, December 24, 2015

कंदहार - हिंदूकुश पर्वतरांगा ...हिंदूंचा एक रोचक शोध - इतिहास ...

क़ीमत, क़ुरबानी हे जसे खालच्या बिंदूचे उर्दू उच्चारण असलेले उर्दू शब्द आहेत तसाच क़ंदहार हा शब्द देखील आहे. आपले काही इतिहास अभ्यासक आणि संशोधक कंदहार शहर - प्रांत म्हणजे आपल्या ग्रंथ पुराणात उल्लेख असलेले काही हजार वर्षापूर्वीचे गांधार हे राज्य समजतात. तसेच उर्दू - पर्शियन इतिहास अभ्यासक या शहराला सिकंदरने (द ग्रेट वॉरियर) स्थापन केलेले सिकंदरिया हे शहर मानतात. आजच्या घडीला हे शहर तालिबानी कट्टरवाद्यांचे प्रमुख आश्रयस्थान आहे. अफघाणिस्तानच्या दक्षिणेकडील हा सर्वात अस्थिर प्रांतापैकी एक आहे, याची दक्षिणेकडील सीमा पाकिस्तानच्या उत्तरेस लागून आहे. पश्तून ही इथली मुख्य भाषा आहे. कंदहार येथील उत्खननात सापडलेल्या चीजवस्तूंना मोठे  ऐतिहासिक मुल्य आहे कारण त्याचा कालखंड !

कंदहारपासून दक्षिणपूर्वेस २७ किमी अंतरावर दिधमोर्सी घुंद या स्थळी ७००० ते ५००० वर्षापूर्वीचे अख्खे खेडे सापडले होते. या स्थळापासून जवळ असणारया सैद क़ला या भागात ताम्र युगातले खेडे सापडले होते. ख्रिस्तपूर्व दोन सह्स्त्रकाहून अधिक जुनी अशी पितळी, तांब्याची भांडी तिथे सापडली होती. अनेक खोल्यांचे  विटांचे पक्के बांधकाम असणरी घरे या दोन्ही गावात सापडली होती. तर कंदहारच्या दक्षिण पश्चिम भागात असणारया सियास्ताननजीकच्या शम्शीर घौर भागात देखील अशीच भांडी अन घरे सापडली होती. ह्या भागातील भांडी, वस्तू आणि घरांची रचना यांची स्थापत्य - निर्मितीशैली ही सिंधूपूर्व संस्कृतीतील  स्थळांचे उत्खनन केल्यावर आढळून आलेल्या शैलीशी खूपच मिळतीजुळती आहे ही विशेष बाब इथे नमूद करावी वाटते. डूप्रे लुईस या पुरातत्व अभ्यासकाने हे उत्खनन केले होते.

अतिप्राचीन इतिहासात या भौगोलिक भागाचा उल्लेख अरेकोसिया नावाने आला आहे. दक्षिण, मध्य अन दक्षिणपश्चिम आशियाला जोडणारा भाग साम्राज्यवाढीसाठी अन मार्गक्रमणासाठी महत्वाचा होता आणि आजही आहे. अकेमेंडीस कडून तो अलेक्झांडरच्या (सिकंदर) ताब्यात येईपर्यंतचा सर्व इतिहास रक्तरंजित आहे. त्यानंतरच्या काळात सम्राट अशोकच्या अधिपत्याखाली हा भाग आला होता. सिमेटीक उपवंशज जी अर्मैक भाषा बोलत त्या भाषेत आणि ग्रीक भाषेत कोरलेले स्तंभ अशोकाने कंदहारमध्ये उभारले होते. मधल्या काळात तिथे झुबिल्सांचे राज्य होते. त्यांनी अरबांना इसवीसनपूर्व सातव्या शतकापर्यंत झुंझवले, त्यानंतर अरब आक्रमकांनी इथे उम्मायद खलिफाची राजवट अमलात आणली. हजरत मोहमद यांच्या मृत्यूपश्चात इथे उम्मायादांनी राज्य केले, पण तत्पूर्वी इथल्या स्थानिकांचा कडवा प्रतिकार त्यांना मोडून काढावा लागला.                     

इस्लामी धर्मप्रसारण आणि साम्राज्यवाद यांनी पछाडलेल्या अरब आक्रमकांना ज्या झुबिल्सांनी लढा दिला त्याची माहिती इथे सर्वात महत्वाची आहे. या (कंदहार) भागात तत्कालीन कालखंडात झमिनदावर ( जमीन + दतबार = न्याय किंवा जामीन किंवा जमीन देणारा, वाटणारा, हाच शब्द आपल्याकडे जमीनदार म्हणून आजही रूढ असल्याचे आढळते) आणि झाबुल (जबाला) कपिश (कपि + ईश ?) वा कियापीशी असं त्यांचं उच्चारण होते. या लोकांनी काबुलमध्ये असणारया तत्कालीन शाह लोकाशी रोटी बेटी व्यवहार केले आणि बुद्धिस्ट-शाही अशी वेगळीच राजवट तिथे काही वर्षे नांदवली. नवव्या शतकापर्यंत पर्शियन आक्रमक यांनी इथे थोपवून धरले होते, मात्र यांनीही तत्कालीन सिंधू खोऱ्यात आक्रमणे केली होती. शाह आणि झुबिल्स यांनी केलेल्या या बांधणीमुळे तत्कालीन अरब आक्रमकांनी इथल्या राजांसाठी अल- हिंद हा शब्द वापरलेला आढळतो ! (हिंद !!) या झुबिल्सांचे जे राज्य होते त्याला जाबुलीस्तान असाही शब्द आढळतो.  नवव्या शतकात इथे धूळधाण उडाली आणि सफारीद साम्राज्यकांनी या प्रांतावर त्यांचा ताबा मिळवला, जेंव्हा अफघाण आक्रमकांच्या टोळ्या एकमेकावर शिरजोर झाल्या, त्यातही गझनवीच्या आक्रमकांनी ताकदीचे हल्ले या भागात चढवले. विशेषतः मुहमद या सुलतानाने ( जो आपल्याकडे गझनीचा मोहमद या नावाने प्रसिद्ध आहे )  १० शतकात इथे आपले पाय पसरले अन इथे ठाण मांडून बसलेल्या घौरी आक्रमकांना पिटाळून लावले. इस ९९८ ते १०३० या कळात इथे गझनवी साम्राज्य होते, या काळात तिथे असणाऱ्या हिंदू आणि बौद्धांची गच्छंती झाली, शिरकाण झाले ! पुढे तैमूरच्या वंशजांनी देखील इथे हात मारला. १३८३ ते १४०७ या काळात इथे पीर मुहम्मद ह्या तैमूरच्या नातवाचे राज्य होते.१३ व्या शतकाच्या सुरुवातीस चेंगीझखानाने हे शहर पूर्ण बेचिराख केले होते. ते तैमुरच्या वंशजांनी पुनःनिर्मित केले.   

१६ व्या शतकात हा भाग बाबराच्या ताब्यात होता. पुढे हा प्रांत शिया सफवैद टोळ्यांच्या हाती होता, मात्र यांचे सुन्नी मुघलांशी हाडवैर होते. त्यामुळे इथे सतत लढाया होत राहिल्या. १७०९ मध्ये मीर वैस होटक याने इथे होटक साम्राज्याचा झेंडा रोवला. १७२९ पर्यंत ही एक ताकदवान अफघाण सत्ता होती, मात्र नादिरशहाने गील्झाई टोळ्यांशी युद्ध पुकारून इथपर्यंत धडक मारली. यामध्ये शाह हुसेन हा शेवटचा होटक राजा पराभूत झाला.                               

अफघाणिस्तानचा स्थापक अहमदशहा दुराणीने इथे १७४७ मध्ये ताबा मिळवून कंदहारला त्याच्या काळातील अफघाणिस्तानाची राजधानी केले. १७७० मध्ये कंदहारवरून राजधानी काबुलला हलवण्यात आली, तोपर्यंत कंदहार हेच या भागातील सर्वोच्च महत्वाचे शहर होते. यावरून कंदहारचे प्रदीर्घ ऐतिहासिक आणी भौगोलिक महत्व ध्यानात यावे.१८३२ ते १८४० आणि १८७८ ते १८८० या काळात इथे ब्रिटीशांच्या अधिपत्त्याखालील भारतीय सैन्याने अफघाणी आक्रमकांशी युद्धे केली होती. त्यानंतर जवळपास १०० वर्षे हा इलाखा शांत होता, ही शांती १९७९ मध्ये जी भंग पावली ती कधी पुनस्थापित झाली नाही. आता तर ती एक खदखदणारी रक्तरंजित जखम बनून राहीली आहे. सोविएत युनियनच्या शीतयुद्धाचा तो काळ होता. सोविएत सैन्याशी टक्कर देण्यासाठी तिथे मुजाहिदीन टोळ्या उगम पावल्या. १९९४ मध्ये सोविएत युनियन बरोबरचे युद्ध संपले, रशियनांनी तिथून काढता पाय घेतला. आणि हा भाग तालिबानी हुकुमतीखाली आला. तेंव्हा इथला म्होरक्या होता, गुल अझा करझाई. पुढे त्याच्याजागी युसुफ पठाण आणि असदुल्लाह खालेद आले. दरम्यानच्या काळात अमेरिकेने इथे शांतता प्रस्थापित करण्याच्या नावाखाली सैनिकी तळ बनवले ! तालिबानी, आयसीसचे अतिरेकी आणि मुळचे अफघान मुजाहिदीन यांची या अमेरिकन सैनिकांशी धुमश्चक्री चालू असायची. ओबामा प्रशासनाने आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या टप्प्यात इथे तैनात असलेले सैन्य काढून घेतले आहे. तरीही इथे अशांततेचेच राज्य आहे. 

कंदहारचा इतिहास अभ्यासताना हिदूकुश पर्वताचा उल्लेख न केल्यास तो पूर्णत्वास जाणार नाही. गझनी हे शहर आताच्या काबुल कंदहार हायवेवर असणारे शहर आहे. इसपूर्व सातव्या शतकात इथे बौद्धांचे प्राबल्य होते. निद्रावस्थेतील इथली 'तैपेई सरदार' या नावाने प्रचलित असणारया भागात ही मूर्ती सापडली होती. महायान शैलीतले इथले स्थापत्य आणि नालंदामधले स्थापत्य यात बरेचसे साम्य आहे. तत्कालीन कंदहार आणि गझनी यांच्या मधोमध मध्य अफघाणिस्तान ते उत्तर पाकिस्तानच्या दरम्यान असणाऱ्या ९०० किमी लांबीच्या ज्या पर्वतरांगा आहेत ते म्हणजे हिंदूकुश पर्वत होत. हिंदुकुश हिमालयन भाग असाही याचा भौगोलिक उल्लेख होतो. प्राचीन ग्रीक इतिहासात याचे उल्लेख 'ईंडीकस' (INDICUS) या नावाने आहेत ( Caucasus Indicus ) ग्रीक इतिहासात नोंद असणारया 'ओक्सोस' ( OXOS) नदीचे ( जिचे संस्कृत इतिहासात 'वक्षु' असे उल्लेख आहेत) आणि सिंधू नदीचे खोरे या हिंदूकुश पर्वत रांगांनी छेदले आहेत आणि तिचे दोन भाग केले आहेत. कुशचे शब्दार्थ पाहिले तर कुस म्हणजे जिथून निर्मिती होती ती असा अर्थ इथे घेता येतो. सिंधू ( INDUS) ची कूस जिथून उगवते तो पर्वत असाही याचा अर्थ काही अभ्यासक लावतात. आजमितीस सिंधु नदी ही दक्षिण आशियामधील एक प्रमुख नदी आहे. तिबेट, भारत व पाकिस्तानातून वाहणारी प्रमुख नदी आहे. तिबेटमध्ये उगम पावून ती भारतातील लदाख प्रांत व पाकिस्तानमधून वाहते. इंग्रजी भाषेत या नदीला इंडस (Indus) असे संबोधले गेले. मेगॅस्थेनिसने लिहिलेले 'इंडिका' या ग्रंथाचे शीर्षक इंडोस (indos) या मूळ ग्रीक शब्दाचे रोमनाइज्ड स्वरूप होते. प्राचीन पर्शियन भाषेत तिचेच उल्लेख हिंदू असे आहेत तर तत्कालीन साहित्यानुसार हा शब्द संस्कृतमधील  'सिंधू'पासून घेतला गेला. विशेष म्हणजे 'सिंधू'चा संस्कृत शब्दार्थ - मोठा जल स्त्रोत असा होतो. तर असिरियन साम्राज्यात 'सिंदा' नावाने हिचे उल्लेख आढळतात. द ऑक्सफोर्ड सेंटर फॉर हिंदू स्टडीजचे प्रमुख अभ्यासक गेव्हीन फ्लड यांच्या मते हिंदू हा शब्द सिंधू या शब्दाच्या आधीचा आहे. याचे समर्थन करताना ते म्हणतात की, जे लोक indus/ इंदूस/ सिंधू नदीच्या काठाच्या पलिकडे राहत होते त्यांना प्राचीन पर्शियन लोक हिंदू म्हणून संबोधत. प्राचीन पर्शियन शब्दाभ्यासशास्त्रात S/स च्या ऐवजी H/ह हा वर्ण प्रचलित होता. त्यामुळे जे लोक स्वतःला सिंधू संस्कृतीतील म्हणवून घेत ते सिंधूच्या पश्चिमेकडील पर्शियन लोकांसाठी हिंदू म्हणवले गेले. त्याचे कारण पर्शियन भाषेच्या शब्दाभ्यासातच आहे. पर्शियनांनी सिंधूचे हिंदू केले आणि तोच शब्द ग्रीकांपर्यंत पोहोचताना त्याचे H/ ह स्वरूप जाऊन ( हिंदूमधील ह जाऊन) तिथे i/इ प्रारूप चिकटले. indos / plural - indoi असे उच्चारण रूढ झाले. याचे कारण लॅटिन भाषेच्या मुळात आहे. लॅटिनचा उगम आताच्या जर्मनीतला आहे. जिथे H आणि U चे स्पष्ट उच्चारण होत नाही. त्यामुळे सिंधूचे हिंदू झाले आणि ग्रीकांनी तिचे उच्चारण indos / इंडोस केले.         बॅबिलोन, पर्शियाचा राजा आणि इजिप्तचा फॅरो दरायसच्या काळात हिंदू - सिंधू या दोन्हीची अधिक उकल होते. त्यात हिंदुश Hi[n]dush मध्ये राहणारे Hinduvān असा स्पष्ट उल्लेख आहे. तर झोराश्त्रिनिझमच्या (यांचे बोधचिन्ह atar म्हणजे अग्नीकुंड होते, जे बऱ्यापैकी आर्यांच्या यज्ञपात्राशी साम्यदर्शक होते) मुलभूत धार्मिक ग्रंथात (झेंद-अवेस्त) Hapta Hindu असा उल्लेख आहे हा उल्लेख वेदांत आढळणाऱ्या सप्त सिंधूशी अत्यंत मिळता जुळता आहे. तर हिंदूंच्यासाठी हिंदवी hindavīहा शब्दप्रयोग आठव्या शतकातील चाचनाम(Chachnama)मध्ये पहिल्यांदा झाला होता.  नागर सिंधू संस्कृतीचा उगम याच नदीच्या किनाऱ्यांवर झाला होता. हिंदू धर्मातील वेद सिंधू नदीच्या किनारी रचले गेले आहेत. हिंदू व हिंदुस्थान हे शब्द याच नदीवरुन पडल्याचे यावरून स्पष्ट होते. पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे नाव सिंधु नदीवरूनच पडले आहे. या हिंदूकुश पर्वत रांगांतील सर्वात उंच शिखराचे नाव आहे 'तिरीच मीर' ! आता हे शिखर पाकिस्तानातील ख़ैबर-पख़्तूनख़्वा प्रांतात चित्राल शहराजवळील एक पर्वतराजीत आहे. चित्राल जवळील तिरीचच्या खोऱ्याचा राजा म्हणजे तिरीचमीर होय कारण मीरचा अर्थ राजा असा आहे. हिंदूकुशचा मूळ उच्चार कुश नसून काश असल्याचेही दाखले इतिहासात आहेत. या पासूनच काश- मीर शब्द अस्तित्वात आल्याचा दाखला काही इतिहासकार देतात. आणखी एक विशेष बाब अशी की, हिंदूकुश पर्वतरांगा आणि काराकोरम पर्वतरांगामध्ये हिंदूराज पर्वतदेखील आहे. यावरून या भागाशी हिंदूंचा असणारा दृढ संबंध लक्षात येतो.

एकंदर बारकाईने निरीक्षण केलं तरी हा संपूर्ण भूभाग पूर्वी हिंदू, नंतर बौद्ध अन पुढे इस्लामी आक्रमकांच्या ताब्यात होता इतके अनुमान तरी नक्कीच काढता येते. कंदहारचा इतिहास असा रंजक आहे. यातील उल्लेख केलेल्या #नादिरशहा  वर मी एक स्वतंत्र पोस्ट देखील लिहिली आहे ज्यावरून अलीकडच्या काळातील तीन शतकाचा या भागातील इतिहास समजण्यास मदत होते. आपल्या इतिहासाच्या इतक्या समृद्ध अन विशाल पाऊलखुणा असूनही आपल्याकडे आपल्याच इतिहासाचे विकृतीकरण केलेले सिनेमे, पुस्तके येतात आणि लोक पॉपकॉर्न खात त्याची मजा घेतात...ही आपली आपल्या इतिहासाप्रती असणारी अनास्थाच होय ...

ज्या देशातले लोक आपला इतिहास विसरतात तिथला भूगोल निश्चित बदलला जातो याची आठवण लोकांना कुणी अन कशी करून द्यावी म्हणजे लोक जागे होतील याचे उत्तर माझ्याजवळ तर नाही ...


- समीर गायकवाड .