Monday, December 28, 2015

अजरामर ग़ालिब .....


ग़ालिबच्या पत्नीने अनेक अपत्यांना जन्म दिला. मात्र त्याचं एकही अपत्य जगत नव्हतं. तेव्हा माणसाच्या काही सगळ्याच इच्छा पूर्ण होत नाहीत हे उमजून असलेला ग़ालिब लिहितो…
'हजारों ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले…' या पातळीचं सत्य लिहिल्यानंतरही गालिब स्वतःच्या आयुष्यातून पुत्राच्या इच्छेला बाहेर काढत नाही आणि तो सतत मूल जगण्याची वाट पाहत राहतो. पाचवीला पूजलेली आर्थिक चणचण, एकही अपत्य न जगणं, प्रेयसीचं निधन अशा नैराश्याच्या फेरयात अडकलेला गालिब लिहितो …
'कैदे हयात, बन्देगम, अस्ल में दोनों एक हैं
मौत से पहले आदमी गम से नजात पाए क्यों?…'
असं जेंव्हा तो मन व्यक्तवतो तेव्हा मनातल्या भावना मांडणारे अचूक शब्द आणि त्या शब्दांत भरून राहिलेला अर्थ जाणवून ऐकणारा स्तिमित होतो.


उर्दू साहित्याच्या दुनियेत मिर्ज़ा ग़ालिबचं (१७९७ ते १८६९) स्थान अनन्यसाधारण आहे. मोगल साम्राज्याचा शेवटचा सम्राट बहादुरशहा जफर यांचा उर्दू शायरीत गुरू असलेल्या ग़ालिबने उर्दू शायरीत नवे वारे आणले. एकोणिसाव्या शतकात मोगल साम्राज्य जेव्हा लयाला जात होते, तेव्हा गालिब उत्तर भारतात होता. १८५७चं बंड झालं तेव्हा तो दिल्लीत होता. बंडखोरांना मदत केल्याच्या आरोपावरून कंपनी सरकारने त्याचं निवृत्ती वेतन बंद केलं होतं. ते सुरू करण्यासाठी त्याला भरपूर पायपीट करावी लागली आणि कलकत्त्याला चकरा माराव्या लागल्या होत्या. त्याच्या कवितेला प्रेमभावनेखेरीज, सामाजिक जाणिवा, देवाच्या अस्तित्त्वाबद्दल संशय असे अनेक आयाम आहेत. मुख्य म्हणजे त्याचं आयुष्य अत्यंत खळबळजनक होतं. परिणामी त्याचं आयुष्य कलाकृतीचा विषय आहे. लहानपणचा ग़ालिब, तारुण्यातील गालिब, नाव कमावलेला गालिब, कर्जाने बेजार झालेला गालिब शेवटी निवृत्तीवेतनासाठी हताश झालेला तरीही पीळ न सोडणारा गालिब अशी गालिबची महत्त्वाची रूपं त्याच्या आयुष्याच्या पटात आढळतात.

ग़ालिबच्या तरुणपणी मीर तकी मीर या ज्येष्ठ कवीचं प्रस्थ होतं. एकदा रस्त्यात तरुण ग़ालिब आणि वयोवृद्ध मीर समोरासमोर येतात. मीरची प्रौढ व अनुभवी नजर गालिबमधील ताकद ओळखते. हळूहळू विविध मुशायऱ्यांतून ग़ालिबचं नाव गाजायला लागतं. ग़ालिब त्याच्या काळाच्या बराच पुढे होता. ज्याकाळी एखाद्या उर्दू कवीने अल्लाहच्या अस्तित्त्वाबद्दल शंका घेणं शक्य नव्हतं, त्याकाळी ग़ालिब उघडपणे रमझानच्या काळात मद्यपान करत असे. ही बंडखोरी त्याच्या काव्यात अनेक ठिकाणी उतरली आहे.
'दुनिया मे और भी सुखनवर बहुत अच्छे...
कहते है की गालिब का अंदाजे बयाँ और है...'

'पूछते है वो कि ‘ग़ालिब’ कौन है?
कोई बतलाओ कि हम बतलाए क्या…'
ग़ालिब… उर्दू आणि फारसी भाषेतील मातब्बर शायर. कोणताही मुशायरा असो, ग़ालिबचे शेर असल्याशिवाय उसमे जान नही आती… नव्यानेच प्रेमात पडलेला कवीदिलाचा तरुण ए दिले नादान तुझे हुअ क्या है, आखिर इस दर्द कि दवा क्या है… हा गालिबचा शेर अक्षरशः जगत असतो. वाद्यसंगीतासोबत असलेला गझल गायनाचा कार्यक्रम तर गालिब का कलाम और गायकों का अंदाज अशा पद्धतीने सजवला जातो. आणखी चारेक वर्षांनी मिर्ज़ा ग़ालिबला जाऊन १५० वर्षं होतील. या दीडशे वर्षांत एकही नवीन शायर असा जन्माला आला नाही ज्याने ग़ालिबचं बोट पकडून शेरोशायरी शिकली नाही. मराठी आणि उर्दू यांचं सख्य पाहता गालिब यांची शायरी महाराष्ट्रात फारशी झिरपलेली नाही.

ग़ालिबला जाऊन जवळपास आता दिड शतक उलटले आहे. तरीही त्याच्या शब्दांची जादू कायम आहे. आणि ग़ालिबचं हेच शब्दधन आता रसिकांसाठी मराठीतूनही खुलं होत आहे. नागपूरचे प्राध्यापक अक्षय काळेंनी ग़ालिब मराठीत आणण्याचा वसा पूर्ण केला आहे. आजही उर्दू शायरीच्या दर्दी रसिकाचा दिवस ग़ालिबची गझल ऐकल्याशिवाय संपत नाही. पण ग़ालिबची भाषा आणि तिचा गोडवा प्रत्येकापर्यंत पोहचण्यात त्याची भाषा हाच सर्वात मोठा अडसर ठरतो. नागपूरच्या डॉ. अक्षय काळेना हे गोष्ट खटकली. आणि दोन वर्ष अथक प्रयत्न करून त्यांनी गालिबच्या सर्व २३५ गझला आणि ४० जमिमांचं मराठीत भाषांतर केलं आहे. मराठीत ग़ालिबचं काव्य आलचं नाही असं नाही. १९५७ मध्ये सेतू माधवराव पगडींनी तसा प्रयत्न केला. पण तो काहीच गझलांपुरता मर्यादित होता. विनय वाईकर यांच्या कलाम-ए-ग़ालिब या पुस्तकातही काही गझलांचा अनुवाद झाला. पण नागपूर विद्यापीठात मराठी भाषा विभागप्रमुख असलेल्या डॉ. अक्षय काळेंनी काळेंनी संपूर्ण ग़ालिबच मराठी रसिकांसमोर पेश केला आहे. याशिवाय काळेंच्या ७५० पानांच्या या ग्रंथात मिर्झा ग़ालिबचा जीवनपट उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ग़ालिबचे पत्रव्यवहारही या पुस्तकातून मराठी वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

ग़ालिबला आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर प्रश्न पडत गेले आणि त्या त्या प्रश्नाचं उत्तर शोधत त्याने शेर लिहिले. ग़ालिबचे शेर आपल्याला चार ओळीत जीवनाचं तत्त्वज्ञान सांगून जातात. ग़ालिबने ज्या प्रकारचे शेर लिहिले तसं काव्य करणारे संत आपल्यालाही माहीत आहेत. पण संत हे स्वतः भौतिकतेच्या पलीकडे गेलेले होते आणि म्हणूनच ते तसं लिहू शकले. मात्र मोठा कवी, महान शायर असला तरी ग़ालिब तुमच्या माझ्यासारखा कधी घाबरणारा, कधी धीट तर कधी लोभी वागणारा होता. त्यामुळे गालिब मला आपल्यातला वाटतो.

ग़ालिब एक विलक्षण आयुष्य जगला. एकाचवेळी भौतिक सुखापासून अलिप्त राहण्याचा शेर लिहिणारा ग़ालिब स्वतः मात्र त्याच भौतिकतेत चाचपडत राहिला. राग, लोभ, मद, मत्सर, इर्ष्या, लालसा या सगळ्या मानवी भावना त्याने येथेच्छ भोगल्या. अंतिम सत्य सांगणारे शेर लिहिणारा आणि बरोबर विरोधाभासी आयुष्य जगलेला असा कलंदर, मिश्कील आणि जिंदादिल गालिब अशी त्याची अनेक रूपे आहेत. आयुष्यात ग़ालिबला वाटलेला राग, प्रेम, मत्सर, लोभ वेगळ्या संदर्भात त्याने काव्यात व्यक्त केला त्यामुळे कलाकार म्हणून अल्लाह के दरवाजे तक पोहोचलेला गालिब जसा षड्रिपूंपासून मोकळा होत नाहीत तसाच वैचारिक पातळीवर मोठा झालेला तो लेखकही प्रसिद्धीच्या इच्छेपासून मुक्त होत नाही. मानवी भावनांची गुंतागुंत, मनात उठलेलं विचारांचं काहूर कायम ग़ालिबच्या मनात उठत राहिलं.

कहां मैखाने का दरवाजा, ग़ालिब, और कहां वाइज
पर इतना जानते हैं, कल वो जाता था, कि हम निकले
(मदिरालय कुठे आणि धर्माचा प्रचार करणारा धर्मगुरु कुठे ! (वासना कुठे आणि विरक्ती कुठे!) हां, पण काल आम्ही गुत्त्यातून बाहेर पडताना कुणीतरी आत शिरताना दिसला बुवा! बहुदा एखादा धर्मगुरुच असावा!)
धर्म, देव, पापपुण्य अशा कल्पनांची मनसोक्त टिंगल करणारा, आपले दुर्गुण, दोष निलाजरेपणाने जगासमोर मांडणारा, 'आधा मुसलमान हूं, शराब पीता हूं, सुवर नहीं खाता' अशी चालूगिरी करणारा, ऐयाश, उधळ्या, कफल्लक, उद्धट, गर्विष्ठ, व्यसनी , जुगारी शायर ग़ालिब. समकालीन शायरांच्या कितीतरी वर्षे पुढे असणारा विलक्षण प्रतिभावान शायर, उर्दू आणि फारसीचा खराखुरा उस्ताद, दिलदार मित्र, जिंदादिल आशिक आणि अहंकार वाटावा इतका तीव्र स्वाभिमान असणारा मनस्वी कवी ग़ालिब. एका ग़ालिबमध्ये असे अनेक ग़ालिब आहेत.

२७ डिसेंबर १७९७ रोजी आग्रा येथे जन्मलेला असदुल्ला बेग खान म्हणजेच ग़ालिब. त्यामुळेच ग़ालिब हे त्याचे उपनाम –तखल्लुस’ जरी असले तरी त्याच्या शायरीत असद असाही उल्लेख आढळतो. १८१२ साली ग़ालिब दिल्लीत आला. तेंव्हापासून बहुतेक काळ गालिबचा मुक्काम दिल्लीतच राहिला. दिल्लीतच त्याची शायरी फुलली, बहरली. दिल्लीतच त्याला मान-सन्मान मिळाले, दिल्लीतच त्याची बदनामी झाली, दिल्लीतच त्याला तुरुंगवास सहन करावा लागला आणि दिल्लीतच १५ फेब्रुवारी १८६९ रोजी तो मरण पावला. (कौन जायें जौक दिल्ली की गलियां छोड कर हे त्यामुळेच आठवते!)

बालपणातच ग़ालिबची प्रतिभा दिसू लागली होती. मीर तकी मीर यांनी बालग़ालिबची शायरी बघून याला योग्य उस्ताद मिळाला तर हा फार मोठा शायर होईल, नाहीतर बाकी हा भरताडच लिहीत राहील, असे म्हटले होते. समकालीन शायरांविषयीची मीरची तुच्छता ध्यानात घेता हे फार महत्वाचे आहे. याची उतराई म्हणून की काय, ग़ालिबने म्हटले आहे,

'रेख्ते के तुम्ही नहीं उस्ताद ग़ालिब
कहते है अगले जमाने में कोई मीर भी था...'
(उर्दू शायरीचा तूच एक उस्ताद नाहीस, ग़ालिब. तुझ्याआधी 'मीर' नावाचा कुणी एक होऊन गेला असे ऐकिवात आहे)

उर्दू भाषेच्या उगमाविषयी माहिती घेताना असं लक्षात येते की उत्तर भारतात नवीन भाषेचा जन्म घेण्याची प्रक्रिया बरीच वर्षे सुरु होती. योगायोगाने त्या काळात मुसलमान लोक तेथे येऊन पोचले. त्यांनी आपल्याबरोबर फारशी ही आर्यन भाषावंशातील एक भाषा आणली. तिच्यामागे महान साहित्यीक परंपरा तर होतीच, शिवाय ती विजेत्यांची भाषा होती; त्यामुळे नव्याने जन्माला येत असलेल्या उर्दूवर या भाषेचा प्रभाव पडणे अगदी स्वाभाविक होते. पण नव्याने जन्माला आलेली उर्दू ही तिचा शब्दसंग्रह, वाक्यप्रचाराची पद्धत व व्याकरण याबाबत पूर्णपणे भारतीय होती. मुसलमानांचा वाटा फक्त लिपी, काही टक्के फारशी शब्द आणि काही इराणी कल्पना व वाक्प्रचार यापुरता मर्यादित होता. लष्करात बोलली जाणारी भाषा ती उर्दू असा उल्लेख मिर्जा ग़ालिब या मालिकेतही होता.

ग़ालिबचे वैवाहिक जीवन ही एक शोकांतिकाच होती. त्याची पत्नी उमराव ही कर्मकांडांत अडकलेली देववादी स्त्री होती. तिच्यापासून ग़ालिबला सात मुले झाली, पण त्यातले एकही मूल जगले नाही. संसारात सुखाला पारखा झालेल्या गालिबने आपली शायरी, आपले मित्र आणि शराब यांचा सहारा घेतल्याचे दिसते. त्याच्या आयुष्यात इतरही काही प्रेमप्रकरणे झाली. त्याच्या काव्यात डोमनी डोकावत राहते (अर्थ: नाचगाणे करणारी मुलगी)
'इश्क मुझको नहीं, वहशत ही सही
मेरी वहशत तेरी शोहरत ही सही...'
हे ग़ालिबने त्याच्या प्रेमपात्रासाठीच लिहिले होते, असे म्हणतात

ग़ालिबचे आयुष्य ही एक विसंगतीचीच कहाणी म्हणावी लागेल. एकीकडे ऐयाश आणि विलासी जीवन जगणारा ग़ालिब दुसरीकडे आयुष्यभर पैशाच्या चणचणीतच राहिला. त्याला सरकारकडून एक कसलेसे अर्धे पेन्शन वारसाहक्काने मिळाले होते. ते पूर्ण मिळावे म्हणून इंग्रज दरबारी खेटे घालणे आणि वेळीप्रसंगी इंग्रजी अधिकार्यांसचा लाळघोटेपणा करणे यात गालिबचे बरेच दिवस गेले. (ग़ालिबच्या चरित्रकारांनी याला 'भिकारडे पेन्शन' असा समर्पक शब्द वापरला आहे!) पण या पेन्शनच्या कारणाने ग़ालिबला बर्‍याच ठिकाणी फिरावे लागले. त्यातून त्याचे अनुभवविश्व अधिक समृद्ध झाल्याचे जाणवते. पेन्शनच्या कामासाठी दिल्ली ते कलकत्ता हा प्रवास गालिबच्या आयुष्यातली एक महत्वाची घटना आहे. त्या काळातला तो प्रवास आणि त्यातून ग़ालिबचा ऐयाश मिजाज यामुळे गालिबला दिल्लीहून कलकत्त्याला पोचायला चांगले वर्षभर लागले असे दिसते.

ग़ालिबच्या शायरीचं एक वैशिष्ट्य म्हणजे स्वतःवर आणि स्वतःच्या परिस्थितीवर हसण्याची त्याची वृत्ती. आपण आख्ख्या दिल्लीत मशहूर आहोत, याचा त्याला सार्थ अभिमान होता, पण आपण का मशहूर आहोत, याची त्याला पुरेपूर जाणीवही असावी.
'होगा कोई ऐसा के जो ग़ालिब को ना जाने
शायर तो वो अच्छा है, के बदनाम बहुत है...'
हा शेर काय किंवा
'रंज से खूगर हुवा इन्सां तो मिट जाता है रंज
मुश्किलें मुझ पर पडी इतनीं की आसां हो गयी..'
(दु:खाची एकदा का सवय झाली, की मग त्याचं काही वाटत नाही. आता माझंच बघा ना, माझ्यावर इतक्या अडचणी येऊन कोसळल्या की आता मला त्यांचं काहीच वाटत नाही!)

हा शेर काय किंवा इतर शेरही ग़ालिबच्या जीवनदृष्टीवर प्रकाश टाकून जातात. आणि यावरचा कळस म्हणजे
'हो चुकी ग़ालिब बलायें सब तमाम
एक मर्गे-नागहानी और है...'
(आता सगळ्याच बला - आपत्ती - ओढवून झाल्या आहेत. अचानक येणारं मरण तेवढं बाकी आहे)

ग़ालिबचे काही शेर तर 'कोटेबल कोटस' च झाले आहेत.
'बसके दुश्वार है हर काम का आसां होना
आदमी को भी मयस्सर नहीं इन्सां होना'
हे लिहिणारा ग़ालिब महान तत्वज्ज्ञ वाटू लागतो.

कोणत्याही गोष्टीचे लगेच उदात्तीकरण करणे हे समाजाच्या उथळपणाचे लक्षण आहे असे मला वाटते. उर्दू-फारशीचा कदाचित आजवरचा सर्वश्रेष्ठ शायर ग़ालिब अशा उथळपणावर सतत वक्रोक्तिने बोलत राहिला. खुज्या, किडक्या समाजाची अवहेलना करणारा गालिब आपल्यापुढे उभा राहातो तो एक सच्चा, जिंदादिल माणूस म्हणून. एक हाडामांसाचा, तुमच्याआमच्यासारखा माणूस. एक बेफिक्र शायर. 'हजारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकलें...', 'निकलना खुल्दसे आदमका सुनते आये हैं लेकिन....', 'बहोत बेआबरु होकर तेरे कूचेंसे हम निकले...' असं म्हणणारा ग़ालिब दंतकथा वाटू लागतो. आणि मग त्यानेच म्हटलेले
'हुई मुद्दत के ग़ालिब मर गया पर याद आता है
वो हर इक बात पर कहना के यूं होता, तो क्या होता...'
हेच खरे असावे असे वाटू लागते. .......

( लेखनसंदर्भ - मिर्ज़ा ग़ालिब - ले. श्री. प्रदीपजी निफाडकर)