शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५

अटलजी.......



राजकारणाचे एक युग गाजवलेल्या अन आपल्याच पक्षाच्या सद्य विचारसरणीहून भिन्न विचारशैली व मर्यादेचे सजग समाजभान असणारया, आपल्या विचारधारांशी समर्पित राहिलेल्या राष्ट्रतेज अटलजींची आज उणीव भासत्येय आणि त्यांची किंमत अधिक प्रखरतेने लक्षात येतेय. वाजपेयीजींच्या काळातील लोकसभेच्या निवडणुकात मी भाजप उमेदवारास पसंती दिली होती. अपेक्षित असलेले बदल त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात झाले नाहीत त्याच बरोबर फारशी निराशाही पदरी पडली नाही. यथातथा असे ते अनुभव होते. मात्र काँग्रेसच्या भ्रष्ट शासनापेक्षा त्यांचे सरकार उजवे वाटायचे.

मोदीजींच्या वेळी झालेल्या लोकसभा निवडणुकात पुन्हा एकदा भाजपा उमेदवारास पसंती दिली. पण या खेपेस केवळ दोन वर्षातच मोठा पश्चाताप होतो आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार भाजपचं होतं, पण मोदी यांचं सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आहे. हा एक मुद्दा या विचारामागे असावा. धार्मिक आचरण आणि धार्मिक तत्वांची सामान्य माणसाच्या जीवनात झालेली घुसखोरी हे त्याचे मुख्य कारण असावे. विकास, कर्तुत्व यांना फाट्यावर मारून सातत्याने बरळत असणारे वाढत्या संख्येने सक्रीय होत चाललेले वाचाळवीर हा दुसरे कारण असावे. वाजपेयींच्या काळात एनडीएचे सरकार होते आणि आताचे सरकार एनडीएचे असूनही ते फक्त भाजपाचेच वाटते हा तिसरा मुद्दा असावा. उपक्रमांचा उच्छाद आणि अंमलबजावणीचा ठणठणाट हे चौथे कारण असावे तर सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत मुलभूत प्रश्नांत जसे की महागाई, सुरक्षा इत्यादीमध्ये काहीच फरक न पडता उलट गुंतागुंत वाढली आहे हे पाचवे कारण ठरावे. शिवाय अनेक आघाडयांवर केवळ प्रचारकी थाटात केलेली शोबाजी जी वाजेपेयी सरकारने 'शायनिंग इंडिया'च्या नावाने केली होती ती शोबाजी मोदिजींनी सत्तेत येताच सुरु केली आणि त्यांच्या समर्थकांनी पृथ्वी पादाक्रांत केल्याच्या थाटातल्या राणा भीमदेवी गर्जना सुरु ठेवल्या हेही कारण आहे.

वाजपेयीजींनी राजधर्म आणि कर्तव्यमुल्ये यांचे पालन याला महत्व देताना सामाजिक एकोपा अबाधित ठेवून राष्ट्रहितास प्राधान्य देणारा त्यांचा कार्यकाळ स्मरणीय असाच होता. त्यांच्या जीवनातला मोठा काळ तीव्र संघर्ष करण्यात केला. राजकारणात राहूनही ते बहुआयामी राहिले. तितकेच व्यासंगी अन सृजन. लढवय्येही अन तत्वचिंतकदेखील. अनेक चढ उतार त्यांनी आयुष्यात अनुभवले, सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचले. लोकमान्यतेच्या अन लोकप्रेमाच्या अमृतधारा अनुभवल्या. आताच्या नेतृत्वात आणि त्यांच्या भोवती असणारया कोंडाळ्यात वाजपेयींच्या विचाराशी बांधील असणारे कुणीच दिसत नाहीत ही तशी क्लेशदायक बाबच म्हणावी लागेल पण त्याचे कोणत्याच भाजपाईला फारसे वावगे वाटू नये याचेही आश्चर्य वाटते. पक्षातील जुन्या जाणत्या लोकांची घडी घालून त्यांचा बोऱ्या बिस्तरा बांधून ठेवून त्यांनी आणखी आवाज केला की तो लगोलग दाराबाहेर ठेवला जाईल याची जी खबरदारी भाजपाने घेतली आहे तीही पटणारी नाही. अशा अनेक कारणांमुळे या सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. आपल्या विरोधकांनाही आपलेसे वाटणाऱ्या आणि विरोधकामधील माणूस जिंकणारया अटलजींच्या उणीवेची जाणीव आणखी टोकदार होत जाते. खरेच ते आज असते तर आजचे चित्र वेगळे दिसले असते का ?

खरे तर अटलजींना तोड नाही पण भाजपाच्या कार्यकर्त्यांना नरेन्द्र मोदी यांच्यात दुसरे अटलजी दिसले. अटलजी नव्याने राजकारणात आले तेव्हा म्हणजे १९५० – ६० च्या दशकात ते नेहरूंच्या पक्षात नसले तरीही त्यांना भारताचा दुसरा नेहरू असे म्हटले जात होते. वयाची तिशीही न गाठलेले वाजपेयी संसदेत परराष्ट्र खात्याच्या मागण्यांवर भाषण करायला उभे रहात तेव्हा नेहरू सभागृहात नसले तरी पळत पळत लगबगीने सदनात येत असत आणि या तरुण नेत्याचे भाषण केवळ लक्ष देऊन ऐकतच असत असे नाही तर हातात वही घेऊन त्या भाषणातले काही मुद्दे टिपून घेत असत. म्हणूनच वाजपेयींना दुसरे नेहरू म्हटले जात होते. अटलजी हे दुसरे नेहरू होते पण आता दुसरे अटलजी कोण हा प्रश्न मात्र आता निकालात निघालाय. वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्याबाबत भाजपात आणि आघाडीत एकमत होते पण संघाचा कल वाजपेयी यांच्या पेक्षा अडवाणी यांच्याकडे अधिक होता कारण त्या काळात अडवाणी यांनी कट्टर हिंदुत्ववादी अशी आपली प्रतिमा निर्माण केली होती आणि वाजपेयी हे उदारमतवादी नेते म्हणून ओळखले जात होते. म्हणजे संघाची थोडी नाराजी असतानाही वाजपेयीच सरस ठरले. वाजपेयी यांच्या लोकप्रियतेपुढे संघाला माघार घ्यावी लागली होती. आजघडीला मात्र अटलजी गलितगात्र होऊन गेले आहेत हेच खरे ....

आज संध्याछायेच्या कुशीत आता त्यांना कसे वाटत असेल ? ते काय विचार करत असतील ? त्यांच्या स्मृतीच्या मंतरलेल्या चैत्रबनात अजूनही कधी बहार होत असेल का ? राहिलेल्या काही ईच्छा अन निसटलेले काही क्षण यांची पानगळ होत असेल का ? हरवलेल्या तारुण्यातील मागे राहिलेला गीत गांधार अजूनही मनात अवचित कधी बरसत असेल का ? विजनवासात देखील ते कोट्यावधींच्या मनांचे कानेकोपरे धुंडाळत असतील का ? त्यांनाही नातलग होते, आप्तेष्ट होते,मित्र होते कधी कोणी त्यांच्या स्वप्नात येत असेल का ? त्यांचे स्वर्गवासी जन्मदाते अवती भोवती असल्याचे भास होत असतील का ?सकाळी जागे होताना त्यांचे डोळे पाणावत असतील का ? थरथरत्या बोटांनी त्यांना डोळे पुसता येत असतील का ? अटलजींना त्यांचा स्वतःचा संघर्षाने भरलेला गतकाळ आठवत असेल का ?

काही वर्षे मागे गेले की अटलजीच्या संघर्षमय जीवनाचा बोलका पट डोळ्यासमोर उलगडत जातो. लोकशाहीची जगभरातील सर्वात मोठी परंपरा असलेल्या भारतीय राजकारणातील भीष्म पितामह म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचेच एकमेव नाव घेता येईल, असे गौरवोद्गार माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी राज्यसभेत काढले होते. मितभाषी, मनमिळावू राजकारणी, उत्तम नेता, संवेदनशील कवी, उत्कृष्ट वक्ता अशा एक ना अनेक बिरुदावल्या वाजपेयी यांच्यासाठी वापरल्या जातात. ग्वाल्हेरजवळच्या छोटय़ाशा गावातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अटलजींनी कानपूरमधून राज्यशास्त्रात एम. ए. केल्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता होणे पसंत केले. राजकारणात सक्रीय राहूनच त्यांनी त्यांच्यातील साहित्यिक आणि पत्रकार जागा ठेवला. राष्ट्रधर्म, वीर-अर्जुन आणि पांचजन्य यासारख्या विविध नियतकालिकांमधून त्यांनी पत्रकारिता केली. महात्मा गांधी यांच्या ब्रिटीशांविरोधातील ‘चले जाव-भारत छोडो’ या आंदोलनात ते सक्रीय होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात याच चळवळीतून झाली. स्वातंत्र्यानंतर १९५१ साली भारतीय जनसंघाची स्थापना झाली. या पक्षाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे ते विश्वासू शिष्य होते. १९५७ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेचे सदस्य बनले.

आणीबाणीच्या काळात वाजयेपी यांनी त्यांच्या पक्षाचे विलीनीकरण जनता पार्टीत केले, पण पुढे ती पार्टीही टिकली नाही. संकुचित दृष्टीकोन असलेल्या आपल्या पक्षाला विशाल दृष्टीकोन देण्याचा प्रयत्न केला.

इंदिरा गांधी यांना कौतुकाने दुर्गेचा अवतार म्हणणारे वाजपेयी आणीबाणीच्या काळात त्यांचा विरोध करण्यासाठी सर्वात पुढे होते. वाजपेयींच्या कामाची पद्धत लक्षात घेवून तत्कालीन पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनी उत्तम वक्ता असेलला हा युवक पुढे या देशाचा पंतप्रधान होईल, असे भाकित केले होते. पंडित नेहरू यांनी वर्तवलेले भाकित तब्बल ३९ वर्षांनी सत्यात उतरले.

१९८० साली अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या सहकाऱयांसोबत 'भारतीय जनता पक्ष' या नावाने नव्या सुरुवातीचा शंखनाद केला. १९८४ च्या निवडणुकीत मोठय़ा पराभवाला सामोरे जाण्याची वेळ आली. एकेकाळी ३० पेक्षा अधिक जागांवर आपले अधिराज्य गाजवणाऱया पक्षाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. अनेक ठिकाणी डिपॉझिट जप्त झालेले असतानाही त्यांनी धीर न सोडता आपल्या पक्षाचा चेहरा अधिक तेजोमय करण्याचा अखंड प्रयत्न सुरू ठेवला.

राजकारणातील सात्विक चेहरा अशी ओळख लाभलेल्या वाजपेयी यांनी आपल्या लोकांना धीर देताना ‘सूरज निकलेगा, अंधेरा छटेगा, कमल खिलेगा’ हा दिलेला मंत्र तेव्हाही लागू पडला होता. आणि आज देशातील भाजपाच्या यशाची स्थिती पाहता त्यांचे बोल तंतोतंत खरे ठरताना दिसत आहेत. १९९६ साली पहिल्यांदा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळणाऱया वाजपेयी यांना पं. नेहरूंप्रमाणे तीन वेळा भारताचे पंतप्रधानपद भूषविण्याचा बहुमान मिळाला. अर्थात त्यांचे पहिले सरकार दुर्दैवाने केवळ १३ दिवसांचेच होते. वाजपेयी यांनी त्यांच्या राजकीय जीवनात अनेक चढउतार पाहिले, पण कधीही नाउमेद न होता पुढील कार्यासाठी स्वतःला वाहून घेण्याची वृत्ती नेहमीच आजच्या राजकारणातील तरुण पिढीला पेरणादायी ठरणारी आहे.

पंतप्रधानपदावर असताना १९९८ साली त्यांनी पोखरण येथील वाळवंटात पाच अणुस्फोट चाचण्या घडवून अमेरिकेसारख्या बलाढय़ राष्ट्रांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यावेळी अमेरिकेसह युरोपीय राष्ट्रांनी भारतविरोधी भूमिका घेत भारतावर निर्बंध घातले होते. त्यावेळी वाजपेयी यांनी कुशल नेतृत्व दाखवत भारताची भूमिका जगाला पटवून दिली होती. त्याआधी १९७४ साली भारताने हा यशस्वी प्रयत्न केला होता.

पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात वाजपेयी यांनी भारत-पाकिस्तान संबंध सुधारणेचे महत्त्वाचे पाऊल उचलले होते. शांतता-समझोता करार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दिल्ली-लाहोर बससेवा सुरू करून त्यांनी दोन देशांमधील लोकांचे संबंध सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाची सुरुवात केली होती.

वर्षानुवर्षे राजकारणाच्या खुर्चीला चिकटून बसण्याची परंपरा भारतात रुजलेली असताना वाजपेयी यांनी २००५ साली स्वतःहून राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. आपले राजकीय जीवनही अत्यंत मनमोकळेपणाने जगणाऱया वाजपेयी यांनी लिहिलेली ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘मेरी एक्क्यावन्न कविताएँ’ हा त्यांचा काव्यसंग्रह विशेष गाजला. संवेदनशील अशा कविमनाच्या वाजपेयींना पं. भीमसेन जोशी यांच्या गायकीची तर पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरी वादनाची विशेष आवड आहे. वाजपेयीजींना नुकताच भारतरत्न हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला आहे.

वाजपेयी यांना गीतकार साहिर लुधियान्वी यांचे ‘कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है, हे गाणे मनापासून आवडत असे. याच गाण्याच्या पंक्तीनुसार त्यांच्यासारखे नेते समाजोद्धारासाठीच जन्माला आलेले असतात, असे म्हटल्यास योग्य ठरेल.

वाजपेयींचे वेगळेपण सांगणारी घटना देऊन लेखास पूर्णविराम देतो. गुजरात दंगलीच्या काळात गुजरातेतील कायदा-सुव्यवस्थेची माहिती केंद्र सरकारकडून घेतली जात होती. २७ फेब्रुवारी २००२ ते ३० एप्रिल २००२ या दोन महिन्यांमध्ये तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील कायदा-सुव्यवस्थेविषयी अनेकदा पत्रव्यवहार झाला होता. दंगलीच्या काळात वाजपेयी यांनी मोदी यांना धर्म किंवा जातीच्या आधारे भेदभाव न करता सुप्रशासन चालवण्याचे म्हणजेच ‘राजधर्माचे पालन करा’ असे आदेश दिले होते, अशी माहिती नंतर दिवसांपूर्वी पुढे आली होती. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये काय पत्रव्यवहार झाला होता, अशी मागणी मध्यंतरी एका स्वयंसेवी संस्थेने केली होती. दंगलींच्या वेळी मुख्यमंत्री असणारे नरेंद्र मोदी आणि तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यात झालेला पत्रव्यवहार उघड करण्यास आताच्या पंतप्रधान कार्यालयाने नकार दिला होता. पंतप्रधान कार्यालयाने हा पत्रव्यवहार गोपनीय असल्याचे सांगत ही माहिती सार्वजनिक करणे नाकारले होते. ही पत्रे सार्वजनिक झाली तर अनेकांचे बुरखे फाटतील अन वाजेपेयींची प्रतिमा आणखी उजळून निघेल अशी तर काहींना भीती वाटत नसेल ना ? कारण जिथे सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या महान नेत्यांचे दस्तऐवज खुले केले जातात तिथे मोदीजींची पत्रे खुली होण्यास हरकत नसावी. असो तोही दिवस कधी तरी येईल आणि वाजपेयींची जनमानसातील प्रतिमा आणखी मोठी होईल अशी आशा करतो. १९९८ मध्ये वाजपेयी सरकार कोसळवणार सुब्रमणियम स्वामी आता मोदीजींच्या खूप जवळचे सहकारी आहेत ही बाबही बरेच काही सांगून जाते... असो या सर्व घडामोडीमुळे भ्रमाचा भोपळा फुटलेले माझ्यासारखे कितीजण आहेत हे कोणास ठाऊक ?

राजधर्म आणि नैतिकता यांवर आधारित सामाजिक जाण असणारया या ऋषितुल्य, योगी नेत्यास उर्वरित आयुष्यमानानंतर अस्तित्वाच्या शोधाची अखेरची वाट धुंडाळत असताना त्यांचे इप्सित मिळो ही सद्गदित शुभकामना ....

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा