रविवार, २७ डिसेंबर, २०१५

अंधारवेळेचा आधारवड - ग्रेस !


मराठी साहित्यात असे अनेक दिग्गज कवी होऊन गेलेत की त्यांनी आपल्या दिव्य प्रतिभेचा ठसा विविध वाड्मयीन साधनांत उमटवला आहे. अनेक प्रतिभावंतांनी गतकालीन कवींनी लिहिलेल्या कवितांना एक नवे परिमाण पाप्त करून दिले आणि त्यांच्या नंतरच्या कवींना एक वेगळी दिशा दाखवून दिली. आद्य कवी केशवसुतांनंतरचे मराठीतील एक प्रयोगशील आधुनिक कवी व मराठीतील युगप्रवर्तक कवी म्हणून बा.सी. मर्ढेकर यांना ओळखले जाते.
लेखक समीक्षक विश्राम गुप्ते लिहितात की, मर्ढेकरांनी मराठी कवितेत आशय व अभिव्यक्ती या दोन्ही अंगानी क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणले. सुदैवाने नवी किंवा नवोत्तर जाणीव मराठी वाड्मयीन पर्यावरणाला नवी नाही. मर्ढेकरांपासून जर या जाणिवेचा प्रवास सुरू झाला असं मानलं तर तिला व्यामिश्रतेचे धुमारे फुटले ते दिलीप पुरुषोत्तम चित्रे, अरुण कोलटकर, भालचंद्र नेमाडे, मनोहर ओक आदी संघर्षवादी कवींच्या अफलातून कवितांमुळेच. याच काळात ढसाळांच्या परंपरांच्या मूर्तिभंजक कविता घडल्या. बालकवींनी निसर्गाचे बोरकर, पाडगावकर, बापट यांच्या कवितेतून सौंदर्यवादी अविष्काराचे मनोहर दर्शन साहित्यविश्वाला झाले. मराठी वाड्मयाला विंदांच्या व कुसुमाग्रजांच्या आदर्शाचा ध्यास घेणाऱ्या अलौकिक कवितांचा नवा आयाम प्राप्त झाला. केशवसुत, बालकवी आणि मर्ढेकरी काव्यशैलीचे पाईक असणाऱ्या कवींची पुढे अनेक आवर्तने झाली.

कवींच्या या मांदियाळीत मर्ढेकरी काव्यपताका पुढे घेऊन जाणारे ग्रेस उठून दिसतात ते त्यांच्या अद्भुत, अतर्क्य, देखण्या प्रतिभासंपन्न शब्दसौंदर्याने मंत्रवत भासणाऱ्या कवितांमुळे ! एकच शब्द भिन्न अर्थाने वेगळ्या आशयासाठी वापरताना त्यांनी केलेली शब्दांची अचूक निवड, शब्दांची एकमेकाशी घातलेली सांगड आणि शब्दांच्या छटातून त्यांना अभिप्रेत असणारा नेमक आशय प्रसवण्याचे त्यांचे काव्यकौशल्य अतुलनीयच म्हणावे लागेल. अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कवींनी शब्दांच्या आधारे आपले काव्य सजवले. कवितेतील गर्भितार्थ व्यक्तवताना सुबक मांडणी केली. मात्र ग्रेस तसं करत नाहीत. ग्रेस शब्दांच्या आणि शब्दछटांच्या प्रेमात पडलेले असे पारलौकिक कवी होते की ज्यांना शब्दसौंदर्याने इतके मोहित केले की ते आशयाच्या प्रचितीच्या तुलनेत शब्दांच्या जादुई, असीम रचना निर्मितीत ते स्वतःच्या नकळत अधिकाधिक मोहित होत गेले. किंबहुना हाच त्यांच्या कवितेचा प्राण होऊन गेला.

त्यांनी निवडलेले शब्द चकित करून जाणारे आहेत. शब्दांची मांडणीही तितकीच रंजक व थक्क करणारी आहे. शब्दांना वाकवताना त्यातून नव्या शब्दकळांना ते जन्मास घालतात, त्यातून आशयाची व्याप्ती वाढवतात. मुक्तछंदात लिहिताना त्यांची लेखणी सैरभैर न होता तोलून मापून शब्द वापरते, त्यांना काय सांगायचे आहे याचे चित्र त्यांच्या मनात अतिशय मोहक तसबिरीत पक्के असावे त्यांचे म्हणणे नेमकेपणाने सूचित करण्याचे काम त्यांनी योजिलेले शब्द चोख पार पाडतात. कृष्णशोधाच्या गहन, अध्यात्मिक कार्याचे शब्दधनुष्य लीलया पेललेली त्यांची एक रचना सोबत दिली आहे. त्यात त्यांनी कृष्ण म्हणजे काय, कृष्ण कुणाला मिळतो इथपासून ते राधेचा नेमका अर्थ काय घ्यावा इथपर्यंतची सर्व भाष्ये एकाच कवितेत इतक्या सहजतेने केली आहेत की वाचणारा मंत्रमुग्ध व्हावा. कृष्ण राधेस मिळतो पण इतरांना का मिळत नाही यावर त्यांनी कटाक्ष टाकला आहे. 'राधेस जो मिळाला तो एकटाच उरला' या पंक्तीने कवितेची सुरुवात करून त्याच पंक्तीने शेवट करताना मधल्या पंचवीस पंक्तीत त्यांनी कृष्णभक्ती कशी असावी याचे मार्मिक उत्तर दिले आहे.

राधेस जो मिळाला तो एकटाच उरला !

स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेने
एकदा असाच बळजोरीने
आपल्या अंगणात लावून घेतला
जीवाला आलेलं पांगळेपणही
व्यासपूर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी
पण ते स्वर्गीय रोप देखील हिरीरीने फोफावले
आणि भिंतीवरून झुकून
रुक्मिणीच्या अंगणात फुले ढाळू लागले
सत्यभामेचा चडफङाट तर झालाच
पण रुक्मिणीलाही झाडाचे मूळ
मिळाले नाही ते नाहीच
स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथ्थकरण करून
कृष्णाने त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला
आणि स्वत: मोकळा झाला
प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाच शिरोधार्य मानल्या दोघींनी.
कृष्णाने हे पुरते ओळखले असणार
म्हणूनच त्याने या विकृत मत्सराचे प्रतीक अंगणात खोचून दिले!
राधेसाठी त्यानी असला वृक्ष कधीच आणला नसता
कारण राधा स्वत:च तर कृष्ण-कळी होती
तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसे शृंगारणार ?
तिच्या आत्मदंग बागेत प्रतीक-प्राजक्त कसे काय रुजणार?
कृष्णाने एक स्वर्गीय रोप लावले
आणि अष्टनाईकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोरगी
राधा हीच शेवटी कृष्ण प्रीतीचे प्रतीक होऊन बसली
असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला
राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!

रुक्मिणी आणि सत्यभामा ह्या दोघींचेही श्रीकृष्ण हे पती. श्रीकृष्णाच्या पत्नीचा दर्जा या दोघीना मिळाला मात्र कृष्ण त्यांना मिळाला का ? अर्थातच याचे उत्तर नाही असे आहे. या दोघींनी कृष्णावरील प्रेमापेक्षा त्या प्रेमाचे प्रतिक महत्वाचे मानले. साध्य काय आहे हे त्यांच्या लेखी महत्वाचे नसून त्यांनी साधनाला जास्त महत्व दिले त्यामुळे त्यांना कृष्ण कधीच साध्य झाला नाही. या प्रेमाचे प्रतिक म्हणून ग्रेसांनी प्राजक्ताचा अप्रतिम वापर केला आहे. प्राजक्ताचा आणखी दोन वेगवेगळे संदर्भ इथे येतात ते पौराणिक अनुषंगाने आणि शब्दसौंदर्यासाठी वापरल्या जात असलेल्या उपमा अलंकाराच्या दृष्टीने. पुराण काळात हा वृक्ष देव-दानवांच्या समुद्रमंथनातून निर्माण झालेल्या चौदा रत्नांपैकी एक मानला जातो. स्वर्गात इंद्राच्या दरबारी हा वृक्ष होता असेही मानले जाते. स्वर्गसुख आणि स्वर्गीय आनंद ह्या सर्वांना हव्याहव्याशा कल्पना, त्यात रममाण व्हायला सर्वांना आवडतं. त्यातलं आत्मसमाधान वेगळं आहे, ते भौतिक सुखाच्या अंगाने जातं. कृष्णाने विषयसुख वा भौतिकसुख या दृष्टीने स्वर्गीय प्रतीकाचे परिमाण असणारं हे प्राजक्ताचे झाड वसुंधरेवर आणले. ग्रेस अत्यंत चातुर्याने लिहितात की 'हा वृक्ष बळजोरीने आपल्या अंगणात लावून घेतला.' कृष्णविचार अंगी न भिनवता त्याच्यावरील प्रेमाचे प्रतिक आपल्याकडे असावे हा अट्टाहास यामागे असणार हे उघड आहे.

या पुढच्या पंक्तीत ग्रेस लिहितात, 'जीवाला आलेलं पांगळेपण' !.. याचा अर्थ काय ? मनुष्य विविध इच्छा वासनांच्या आहारी जातो आणि आपलं खरं सुख गमावून बसतो. जगण्यातला खरा अर्थ, जगण्याचे ध्येय गमावून बसतो. त्यातून मन कोसळत जाते. हवे असण्याचा मानवी हव्यास अनंत अक्षय आहे हे याचं कारण. यातून येणारं नैराश्य, विफलता यातून माणूस पुन्हा देवाकडे आश्रय मागतो. इथेही तो मनोभावे देवाचा आणि देवत्वाचा खरा अर्थ ध्यानी न घेता त्याचे प्रतिक असणाऱ्या एखाद्या अधिभौतिक वस्तूच्या मागे लागतो. ग्रेस याचं वर्णन 'हव्यासपूर्तीच्या कुबडया' असं करतात.

ईश्वरीय आराधनेच्या खऱ्या कल्पना आणि ईश्वराचे खरे अस्तित्व न समजून घेता हाती असणाऱ्या त्याच्या
भक्तीप्रेमाच्या प्रतिकालाच आपण ईश्वर समजून जातो. मग खरा ईश्वर कधीच भेटत नाही. आपली भक्ती अशी वरवरची असून देखील ईश्वरी प्रेमाचे प्रतिक म्हणून जी वस्तू आपण आपल्याकडे ठेवून घेतो, बाळगतो, संवर्धन करतो ती मात्र आपल्या अंतरीचे भेदाभेद ध्यानी न घेता आपल्यापाशी वर्धिष्णू होत जाते. सत्यभामेने देखील खरा कृष्णार्थ जाणून न घेता प्रेमदर्शविण्यासाठी प्राजक्त आपल्या दारी लावून घेतला. यामुळे कृष्ण काही तिला मिळाला नाही मात्र त्यातून घडले भलतेच ! सत्यभामेची कृष्णभक्ती खरी की खोटी या फंदयात न पडता तो प्राजक्त बापुडा तिच्या अंगणात फुलत गेला, तो इतका फुलला की त्याची बहारदार फुले सत्यभामेच्या शेजारी राहणाऱ्या रुक्मिणीच्या अंगणात पडू लागली.

आपण केलेल्या कामाचा लाभ आपल्याला न होता दुसऱ्यास झाला तर आपल्याला वैषम्य वाटते. त्याचवेळी
जर आपल्या कामाचा खरा फायदा जर आपण ज्यांचा मत्सर करतो त्यांना झाला तर मग मात्र आपल्या जीवाला हुरहूर लागते. मानवी मनाचा हा दोष ग्रेसांनी मस्त टिपलाय. प्राजक्ताची फुले रुक्मिणीच्या अंगणात पडू लागल्याने तिचा चडफडाट झाला. प्राजक्त फुलांच्या आशेने वेडावलेल्या रुक्मिणीला वाटू लागले की ह्या वृक्षाचे मूळ आपल्या अंगणात असावे, (तिलाही कृष्ण आपल्याकडे असावा असं वाटण्याऐवजी त्याचं प्रतिक असणारा वृक्ष आपल्याकडे असावा असंच वाटलं) मात्र तिला काही या झाडाचे मूळ मिळू शकले नाही. सत्यभामेला कृष्ण तर नाहीच मिळाला, उलट हट्टाने तिने त्याच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून जे रोप अंगणात लावले त्याची फुले तिची सवत असणाऱ्या रुक्मिणीच्या अंगणात पडू लागली तर रुक्मिणीला आयत्या मिळणाऱ्या फुलांवर समाधान न होता आपल्याकडे समूळ प्राजक्त असावा असे वाटू लागले, तिलाही तो सकळ प्राजक्त काही मिळाला नाही. ग्रेस लिहितात - 'स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथ्थकरण करून कृष्णाने त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला आणि स्वत: मोकळा झाला.' ईश्वर ज्याला जे पाहिजे तो देतोच मात्र पूर्ण कोणालाच देत नाही, मात्र याला एखाददुसरे राधेसारखे अपवाद असतात !

कुणाला काय हवं असतं आणि कोणाच्या मनात इतरांबद्दल काय भावना आहेत याचं ज्ञान निर्मिकाला नक्कीच  असतं,  तो त्या प्रमाणे त्या त्या व्यक्तीला देत जातो. मात्र तो कोणालाही रिक्तहस्त ठेवत नाही. सत्यभामा आणि रुक्मिणी या दोघीजणी सवतीभाव मनी ठेवून वागायच्या, त्यांना कृष्ण कळलाच नाही. त्यांच्यात मत्सर वाढतच राहिला, सत्यभामेने जेंव्हा कृष्णप्रेमाचे प्रतिक मनी वांछिले तेंव्हा म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने मत्सराचे प्रतिक म्हणून हा पारिजातक त्यांच्या अंगणी असा काही खोचून दिला की दोघींना एकाच वेळी हव्यासपूर्तीचा आनंद आणि एकमेकींचा द्वेषपूरक हेवा वाटत राहावा ! त्यांनी जे मागितलं ते त्यांना कृष्णाने दिले मात्र राधेला असा वृक्ष त्यांनी दिला नाही. कृष्णाने असे का केलं याचं अतिशय देखणं आणि अर्थपूर्ण उत्तर ग्रेस देतात - "राधेसाठी त्याने असला वृक्ष कधीच आणला नसता कारण राधा स्वत:च तर कृष्ण-कळी होती. बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसे शृंगारणार ?" जो स्वतः कृष्णमय होऊन जातो त्याला कृष्णप्रेमाच्या प्रतिकाची गरजच ती काय ? असं सूचक भाष्य या पंक्तीत आहे. राधेसाठी त्यांनी योजलेला कृष्णकळी हा शब्दच बोलका आहे.

जरी हा प्राजक्त कृष्णाने राधेला दिला तरी तो तिच्या बागेत कधी रुजणार नाही कारण तिची बाग आत्मदंग
आहे, तिचा आत्माच जिथं कृष्ण आहे तिथं त्याच्या वेगळ्या प्रतिकांच्या असण्याला अर्थ उरत नाही. मग कुणासही रिक्तहस्त न ठेवणाऱ्या या जगत दात्याने राधेला काहीच दिले नाही का ? कृष्णाने राधेलाही तिचं दान दिलंय. त्याने स्वतःलाच तिच्या आत्म्याच्या रोपवाटिकेत रुजवलेय. जेंव्हा हे चराचर नव्हते, अष्टदिशाही नव्हत्या तेंव्हाही ह्या निरलस अल्लड मुलीच्या रूपाने निस्सीम कृष्णभक्ती अस्तित्वात होती असं ग्रेस सूचित करतात. कृष्ण राधेत इतका एकरूप होऊन गेला की राधा ही कृष्णप्रेमाचे प्रतिक झाली. ज्यांना कृष्णप्रेमाचे प्रतिक हवं होतं त्यांना त्यांच्या विचारभावनांनुसार केवळ प्रतिकच मिळत गेलं. तर जी राधा प्रेमप्रतिकांच्या मागे न लागता कृष्णमय होऊन गेली होती तिच्या अणूरेणूत कृष्ण विसावला.
अंती ग्रेस लिहितात - "असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला राधेस जो मिळाला तो एकटाच उरला !" इथं कालिंदीचे नदी आणि पत्नी असे दोन्ही संदर्भ अत्यंत चतुरतेने त्यांनी वापरले आहेत. कालिंदी हे कृष्णाच्या पत्नीचेही नाव आहे आणि यमुनेलाही कालिंदी म्हटले जाते. कृष्णभक्ती करणाऱ्या अशा लाखो घटकात, वेगवेगळ्या प्रेम प्रतिकातून कृष्ण लक्षावधीच्या संख्येत अस्तित्वात असेल पण राधेला जो कृष्ण मिळाला तसा कृष्ण कोणालाही मिळाला नाही ! एका कठीण प्रश्नाची उकल अत्यंत सोप्या पद्धतीने ग्रेस इथे करतात. या कवितेतील आशया इतकीच यातील शब्दरचना आपल्या मनावर आपसूक गोंदवली जाते. हे ग्रेसांचे आणि त्यांच्या अद्वितीय प्रतिभेचे यश म्हणावे लागेल.

प्रतिमांचा खुबीने वापर करण्यात त्यांचा हातखंडा होता, अर्थांचे संकेत मोडून ते प्रतिमांची निवड करत.
"‘वाळवंटे फक्त वाळूचीच नसतात डार्लिंग!
फुलांची असतात, झाडांची असतात..
घरांची असतात, शहरांची असतात..
आणि अनाथ अंतरिक्ष तर नव्या
सौंदर्यजटिल साक्षात्कारी वाळवंटाचा
एक साधा प्रारंभच असतो..’’
वाळूच वाळवंट आपण समजू शकतो पण फुलांचे वाळवंट?? झाडाचं वाळवंट?? हे कसं शक्य आहे असा विचार करत असताना जर कविता पुन्हा पुन्हा वाचली तर या वाळवंटाचे संदर्भ आपल्याला मिळत जातात.
एखाद्या अनाकलनीय वा अगम्य चेहराविरहीत माणसांची भावनाशुन्य गर्दी म्हणजे वाळवंट अर्थ सापडू लागतात. शुष्क अशा या वाळवंटाची उत्पत्ती सुद्धा सृजनोद्भव असूनही वास्तवाच्या काळोखात ती विरघळत गेली आणि भकास वाळवंट बनत गेले ! परस्परभिन्न संचांतल्या प्रतिमांमुळे वास्तवाच्या गाभ्यातले अर्थ नेमके प्रकट होतात .................

ग्रेसांच्या काव्यातून वास्तव, स्वप्न, जाणीव, नेणीव यांचा विलक्षण एकजिनसीपणा जाणवतो. ईश्वर, स्त्रीसंबंधीची शारिर व मानसिक पातळीवरची ओढ, मृत्यूचं आकर्षण आणि भय याभोवती त्यांच्या लिखाणाची मुख्य आशयसूत्रं दिसतात. 'दुःख' या अमूर्त जाणिवेचं ग्रेस यांना अबोध आणि गूढ आकर्षण होतं. त्यामुळेच दुःखाशी संलग्न व्याकुळता, भावार्तता, नैराश्य, औदासीन्य, खिन्नता अशा अनेक भावच्छटांनी त्यांची कविता ओथंबून आलेली दिसते. या भावच्छटा ग्रेस यांच्या कवितेत अप्रतिम अशा प्रतिमा घेऊन अवतरतात.
दूर सनातन वृक्षांना ये हिरवट गंध मुका।
दुःखसुरांच्या क्षितिजापाशी मेघ दिसे परका॥

या ओळींमधे ग्रेस यांच्या आर्त करुण भाव दिसून येतो.

ग्रेस त्यांच्या सायंकाळच्या कवितांसाठी जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांना या सांजवेळेचे विलक्षण आकर्षण आहे,
'संध्येचे शामल पाणी,
दु:खाच्या दंतकथेला डोहातून बुडवून आणी !'
असं त्या मागचं गणित आहे.

'फूल होऊनी अंधाराचे गळून पडे काजवा' असं या अंधाराचे देखणेपण आहे.
'दावणीस गाय धूळ काळजाला आली,
सूर्य फेकून नदीत कुठे सांज गेली?'
अशी लाघवी माया या सांजेत आहे.

'धुक्यात हरवलेल्या संध्याकाळी चर्चच्या घंटा वाजतात, हळुच भविष्याची कवाडे उलगडतात !" या सांजवेळेत त्यांना अशी अनामिक ओढ लागून आहे.

अंधारून येणाऱ्या सांजेचं ते अतर्क्य वर्णन करतात -
'पांढऱ्याच शुभ्र हत्तींनी मग डोंगर उचलून धरले,
अन् तसे काळजाखाली अस्तींचे झुंबर फुटले !'

सांजवेळ ही त्यांना कातरवेळ वाटत असली तरी तिच्याबद्दल एक आत्मीय विश्वास त्यांना आहे.


"तू खिन्न कशाने होशी, या अपूर्व संध्याकाळी
स्तनभाराने हृदयाला कधी दुखविल का वनमाळी ?"
अशी त्यांची दृढता आहे.

या सांजेच्या आधारे आपले काव्य कसे जन्म घेते याचे भाष्यही ते करतात -
"तशी सांज आमुच्या दारी येऊन थबकली होती,
शब्दात अर्थ उगवावा, अर्थातून शब्द वगळता !'


सांजेपासून प्रेरणा घेऊन काव्यनिर्मितीतून मनातले भाव व्यक्त झाले इथंवरचा प्रवास ते हळव्या शब्दात मांडताना आपलं एकाकीपण अधोरेखित करतात-
"अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता..' ;


ग्रेसांच्या संध्याकाळच्या भावना गूढ, शोकमग्न आहेत असे नव्हे तर त्या शृंगारिकही आहेत-
'संध्येतिल कमळासम मी नटलो शृंगाराने,
देहाच्याभवती रिंगण घालती निळाइत पाने..'


सरतेशेवटी सांजवेळ म्हणजे काय याचे सूचक उत्तर ते कवितेतून देतात, आपल्याला विचारप्रवण करून आत्मचिंतनात मग्न करून जाते ती सांज असा त्यांचा उत्तुंग विचार आहे -
'देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी,
गाय जशी हंबरते,
तसेच व्याकूळ व्हावे बुडता बुडता सांजप्रवाही;
अलगद भरूनी यावे....'


संध्येचे इतके नानाविध रंग ते शब्दकुंचल्यात इतक्या प्रभावीपणे मांडतात की ती सांज अधिक भव्य होऊन आपल्या डोळ्यापुढे तिच्या चित्रप्रतिमा उभ्या राहतात. असाच अनुभव वसंत आबाजी डहाक्यांच्या कवितांत येतो पण तिची परिमाणे आशयसूचकतेत अधिक आहेत तर ग्रेस निव्वळ शब्दमांडणीच्या जोरावर अप्रतिम चित्र आपल्यासमोर साकारतात.

निसर्गाचे वर्णन करताना ग्रेस त्याच्याशी इतके तादात्म्य पावतात की त्यातील बारकावे संवादी आणि आत्ममग्न या दोन टोकाच्या शैलीत प्रस्तुत करतात.
'ओळखीच्या वाऱ्या तुझे घर कुठे सांग?
गरूडाच्या पंखामध्ये डोंगरांची रांग,
निळे निर्झरिणी अगे सारणीचे राणी,
खडकाच्या डोळ्यालाही येते कसे पाणी ?'

असं मोहक वर्णन ते करतात.

तर त्याच वेळी
'रानझरा ओळखीचा, तहानेची बोली
कात टाकलेला साप पाचोळ्याच्या खाली'

असं गूढ बोलून जातात.

"त्या गुढ उतरत्या मशिदी, पक्ष्यांनी गजबजलेल्या
कल्लोळ पिसांचा उडत्या पंखात लपेटुन बुडाल्या !'

या पंक्तीतून तर साक्षात निसर्गचित्र आपल्या मनःचक्षुसमोर येतं.

'इथलीच उल्का, आषाढ-बनात,
मावलतीची – राधा उन्हांत..'
या पंक्तीतून निसर्गाचं वर्णन करताना ते अस्तित्वाचा शोध चालूच ठेवतात.

'दूर डोंगरांची घळ तिथे आहे शिवालय ;
अशा भासाने गोंदते बया बदकांचे पाय …
देवबाभळीचा काटा त्याला हळदीचा डंख ;
पायी स्वस्तिक कोरता हाती बदकांचे पंख !'

लहानग्या मुलाच्या मनात असणारं हे निसर्गचित्र पूर्ण ताकदीने ते आपल्यापुढे मांडतात.

'असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी'
या कवितेत तर त्यांनी सारी निळाई इतकी सुंदर चितारली आहे की कविता दर वेळेस वाचताना आपल्याला नवे संदर्भ देत जाते.
'निळे घाटमाथे निळ्या राउळांचे,
निळाईत माझी भिजे पापणी,
निळ्याशार मंदार पाउलवाटा,
धुक्याची निळी भूल लागे कुणा,
तुला प्रार्थनांचे किती अर्घ्य वाहू,
निळ्या अस्तकालीन नारायणा,
निळे गार वारे जळाची शिराणी,
निळ्या चंद्रओवीत संध्या डुले,
निळे दुःख चोचीत घेउन आली,
निळ्या पाखरांची निळी पाऊले !'

ग्रेसांची स्वतःची ठसा असणारी शब्दरचना शैली आहे जी अन्य कुणा कवीत तितक्या तन्मयतेने आढळत नाही. उत्कट प्रतिमा आणि संध्याकाळच्या वातावरणातील भावनांची पकड यातून त्यांची कविता वाचकाला एका गूढ प्रांताची सफर घडवते. 'प्राक्तनगंधी मोती', 'अंधाराचे शिंग शुभ्र हाडांनाही', 'खिन्नतेची बासरी', 'कल्लोळ पिसांचा उडत्या पंखात', 'काळा घोडेस्वार ….प्राक्तनाच्या घळीमध्ये', 'रतीरंगातील नि: संग..गाईचे डोळे व्याकूळ घनगंभीर जलधीचेही', 'कुशीत शिंदळवारा', 'नक्षत्र ओळ', 'कुंकवाच्या करंड्यात बाभळीची राख', 'घनवसंत हा मोगरा', 'ह्र्दयस्पंदनाचा झरा, 'पळसपेटला पारवा', 'मरणचंदणाचा दिवा', 'पाचूंचा गिलावा', 'दीपकाजवा मेघवाहि श्रावणात', 'ओंजळ फुटला खांब थरथरत्या बुबुळांपाशी', ' अंधार असा घनभारीचन्द्रातुन', 'शून्यात गरगरे झाड..वक्षात तिथीचा चांद', 'लाटांध समुद्रकाठी', 'वृक्षमाळेतले सावळे' ही सर्व शब्दरचना ग्रेस किती शब्दसौंदर्यासक्त होते याचा प्रत्यय देण्यास पुरेशी आहे.

याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्या सर्व रचना अशा गूढ शब्दभारित होत्या. त्यांच्या साध्या सोप्या रचनाही
तितक्याच कमनीय देखण्या आहेत.
'चांदण्यात आईसाठी वारा दारी येतो,
ओळखीच्या वाऱ्या तुझे घर कुठे सांग ?'

अशी साधी शब्दरचना देखील हळवी करून जाते.
'ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता,
मेघात अडकली किरणे हा सुर्य सोडवित होता
' अशी भावपूर्ण रचना इतकी भाव खाऊन गेली की त्याचं नितांतसुंदर चित्रपटगीत झालं.

'तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे,
तुझी पावले गे धुक्याच्या महाली
ना वाजली ना कधी नादली !'
प्रेमाचे सरळ कवन देखील ते अशा शब्दात गातात.
नेटक्या शब्दात ते विरहभाव मांडतात -
'तू येशील म्हणून मी वाट पहातो आहे,
ती ही अशा कातर वेळी,
उदाच्या नादलहरी सारख्या संधी प्रकाशात…' ;

प्रेमाची ओढ देखील सरळ सहजतेने ते व्यक्तवतात -
'पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने,
हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुराने...''
'भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते' या त्यांच्या कवितेचं संगीतबद्ध रूप 'महाश्वेता' या दूरचित्रवाणी मालिकेत शीर्षकगीत म्हणून वापरलं गेलं. अशा संगीतबद्ध रचनांमधून ग्रेस यांच्या कवितेला लोकप्रियतेचाही लाभ काही प्रमाणात झाला.

आपल्या शब्दप्रेमाबद्दल आणि काव्य प्रयोजनाबद्दलही त्यांच्या धारणा स्पष्ट आहेत. 'ज्याचे त्याने घ्यावे
ओंजळीत पाणी कुणासाठी कोणी थांबू नये!' हे त्यांचे मर्म आहे. 'शब्दांनी हरवुनी जावे , क्षितिजांची मिट्ता ओळ' अशी त्यामागची भावना आहे. 'देता का शब्द थोडेसे उसने - सांगायला माझ्या जिवाचे दुखणे !' अशी स्पष्टताही त्यात आहे. स्वतःला विसरून गेलं तर आपला रोम रोम शब्दांत परावर्तीत करता येतो इतका अत्युच्च विचार त्यांची कविता मांडते - 'डोळियांच्या व्हाव्या वेड्या गाठीभेटी आणि दिठी दिठी शब्द यावे!'. गूढतेशिवाय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबरोबर कवितेला असलेलं अस्तर होतं तथाकथित दुर्बोधतेचं. यामुळे काही समीक्षक वा टीकाकार त्यांच्या कवितांवर अगम्यतेचा दुर्बोधतेचा शिक्का मारत राहिले पण ग्रेस ना स्वतः बदलले ना त्यांनी त्यांच्या कवितांचा पिंड बदलला. आपल्या कवितेवर होणाऱ्या दुर्बोधतेच्या आरोपाचं निराकरण आपल्याला करायचं नाही, अशी स्पष्ट भूमिका ग्रेस यांनी आपल्या 'दुर्बोधतेची बेसरबिंदी' या लेखातून घेतली आणि ही भूमिका त्यांनी शेवटपर्यंत जपली. त्यांनी त्यांच्या टीकाकारांना "मी माझ्या कवितेचा प्रियकर किंवा पाठीराखा नाही" अशा शब्दात उत्तर दिले. अनेक समीक्षकांनी म्हटल्याप्रमाणे ग्रेस यांची कविता पहिल्या किंवा कुठल्याही वाचनाच्या प्रयत्नात संपूर्णपणे कळून घेण्याचा सोस फारसा योग्य नाही. त्यापेक्षा एक अनुभव घेण्याच्या भूमिकेतून त्यांची कविता वाचावी, तिच्यातील शब्दांचा भाव रिचवावा, त्यातील व्याकुळता जाणवून घ्यावी- हाच ग्रेस यांच्या कवितेचा खरा आस्वाद ठरतो.

कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव माणिक सीताराम गोडघाटे असं होतं. १० मे १९३७ रोजी जन्मलेल्या माणिक गोडघाटे यांनी कवी म्हणून 'ग्रेस' हे नाव धारण करण्यामागे कारण ठरली ती लोकप्रिय पाश्चात्त्य अभिनेत्री इन्ग्रीड बर्गमन. 'द इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस' या चित्रपटात इन्ग्रीडसंबंधी 'शी इज इन ग्रेस' असं वाक्य उच्चारलं जातं. हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि आपल्याला प्रतिभेचा पहिला साक्षात्कार झाला, असं ग्रेस यांनी म्हटलं आहे. इन्ग्रीडचे ऋण आठवणीत राहावं यासाठी त्यांनी कायमस्वरूपी 'ग्रेस' हेच नाव लावलं. कवितेशिवाय ग्रेस यांनी ललितबंध हा गद्य साहित्यप्रकारही हाताळला, आणि त्यातही त्यांनी आपल्या गूढ भाषिक कामगिरीचा प्रत्यय वाचकांना जाणवू दिला. त्यांच्या शब्दांमधे असलेलं अपरिहार्य कारुण्य कोणत्याही स्पष्टतेला धुडकावू शकणारं आहे. स्पष्ट अर्थाचा शोध घेण्याऐवजी एका गूढ अनुभूतीच्या अंगाने त्यांच्या कवितांना भिडलं तर अभूतपूर्व अनुभव देण्याची ताकद ग्रेस यांच्या काव्यात आहे.

ग्रेस मूळचे नागपूरचे. त्यांचे वडील सैन्यात होते. नागपुरातील कर्नल बाग परिसरात त्यांचं बालपण हलाखीच्या  परिस्थितीत गेलं. आईच्या अकाली निधनामुळे नोकरी व शिक्षण यांच्यात मेळ साधत त्यांना आपली प्रतिभा जपावी लागली. पहाटे चारला पोहायला जाण्याच्या दैनंदिन सवयीपासून ते घराच्या दारावरल्या 'आय एम फ्री बट नॉट अॅव्हेलेबल' आणि 'द फ्लॅट इज फॉर सेल बट नॉट फॉर अ जंटलमन' या पाट्यांपर्यंत ग्रेस यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू त्यांच्याभोवती गूढत्वाचं वलय निर्माण करत गेलं. १९६६मध्ये ते नागपूर विद्यापीठातून मराठीमध्ये एम.ए. झाले. त्यानंतर दोन वर्षं त्यांनी धनवटे नॅशनल कॉलेजमधे अधिव्याख्याता म्हणून नोकरी केली. १९६८पासून १९९७ साली निवृत्त होईपर्यंत ते नागपूरमधील वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे प्राध्यापक होते. निवृत्तीनंतर काही काळ ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या मराठी विभागात सौंदर्यशास्त्र या विषयाचं अध्यापनही करत होते.

ग्रेसांच्या लिखाणाला सुरुवात झाली १९५५ सालापासून. 'छंद', 'सत्यकथा' या नियतकालिकांमधून त्यांच्या कविता सुरुवातीला प्रसिद्ध झाल्या. १९६७ साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह 'संध्याकाळच्या कविता' प्रसिद्ध झाला. त्यांचं समकालीन कवितेत असलेलं वेगळेपण या कवितासंग्रहामुळे अधोरेखित झालं. मुक्तछंदाचा प्रभाव असणाऱ्या या काळात ग्रेस यांनी निष्ठेने वृत्तबद्ध आणि नादानुसारी लयविभोर काव्यरचना केली. त्यामुळे त्यांची कविता सौंदर्यवादी असूनही तिला अभिजाततेची वैशिष्ट्यं प्राप्त झाली. ग्रेसांच्या शब्दांमधे एकीकडे स्वतःला विसरणं आणि दुसरीकडे स्वतःला शोधणं या दोन गोष्टी वाचक म्हणून केल्या की ग्रेस यांची कविता आपलीशी वाटू लागते. यानंतर प्रसिद्ध झालेल्या राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४), चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७), सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५), सांजभयाच्या साजणी (२००६) बाई! जोगिया पुरुष (२०१२) आदी संग्रहांमधून त्यांची कविता अधिक गूढ आणि व्यामिश्र होत गेलेली जाणवते.

चर्चबेल (१९७४) मितवा (१९८७) संध्यामग्न पुरुषाची लक्षणे (२०००), मृगजळाचे बांधकाम (२००३), वाऱ्याने हलते रान (२००८) कावळे उडाले स्वामी (२०१०) ओल्या वेळूची बासरी (२०१२) हे ललित लेख संग्रह प्रसिद्ध आहेत. ग्रेसांचं मराठीसोबत इंग्रजी व उर्दू भाषांवर प्रभुत्व होतं. त्यांच्या कवितांमधून याचा प्रत्यय येतोच, पण त्यांच्या व्याख्यानांमधे व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत त्यांनी केलेल्या कार्यक्रमांमधूनही त्यांच्या प्रखर वाणीचा अनुभव रसिकांना येत असे. विदर्भ साहित्य संघाचं मुखपत्र असलेल्या 'युगवाणी' या नियतकालिकासाठी त्यांनी संपादकाची भूमिकाही १९७१ ते १९७४ या काळात निभावली. या शिवाय रॉयटर्स सेंटर्सतर्फे निघालेल्या 'संदर्भ' या द्वैमासिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी (१९७५-१९७६) काम पाहिले.

ग्रेस यांच्या 'संध्याकाळच्या कविता' या संग्रहाला १९६८ साली महाराष्ट्र सरकारचं कवी केशवसुत पारितोषिक मिळालं. त्यांच्या 'वाऱ्याने हलते रान' या ललितबंध संग्रहाला २०१२ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. मराठी कवितेला खऱ्या अर्थाने ‘ग्रेसफुल’ करून गेलेल्या कवी ग्रेस यांच्या काव्यउल्लेखाशिवाय मराठी कवितेचे संदर्भ पूर्ण होऊ शकणार नाहीत. त्यांच्या कवितेने मराठी साहित्यसंपदा नेमक्या शब्दात सांगायची झाली तर उत्कट प्रसन्न म्हणजेच 'ग्रेसियस' झाली आहे !.....

- समीर गायकवाड

८ टिप्पण्या:

  1. दुः्रबोध अगम्य ग्रेस, तुम्ही किती साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितले.
    ग्रेस सरांबद्दल आदर वाढला, वाढवीला.
    धन्यवाद समीर साहेब

    उत्तर द्याहटवा
  2. तुम्ही किती साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितले.
    ग्रेस सरांबद्दल आदर वाढला, वाढवीला.
    धन्यवाद समीर साहेब
    Punamkumar Kataria

    उत्तर द्याहटवा
  3. ग्रेस म्हणजे चमत्कृतीपूर्ण कॉईन केलेले शब्दलालित्य.. आणि गूढ आशयघनता.. त्याचा आस्वाद घ्यायचा की अभ्यास करायचा, असा प्रश्न पडतो.. पण बापू तुम्ही लालित्य जराही आहत न करता अभ्यासपूर्ण लिहिलंय.. मला तुमच्यासारखं लिहिता यावं असं आज पुन्हा वाटलं.. थक्क झाले मी.. साक्षात्कारी लिहिलंय.. खरंच!
    -मिथिला सुभाष.

    उत्तर द्याहटवा
  4. अप्रतिम लेख 🙏🏻
    खूप सुंदर लिहता सर तुम्ही 👍

    उत्तर द्याहटवा