सोमवार, १४ डिसेंबर, २०१५

संजय गांधी - काही आठवणी .....



देशात जेंव्हा आणीबाणीची घोषणा झाली होती तेंव्हा पुलित्झर पुरस्कार विजेते पत्रकार लुईस एम सिमन्स हे 'द वॉशिंग्टन पोस्ट'चे संवाददाता म्हणून दिल्लीत कार्यरत होते. याच वर्तमानपत्रात त्या काळात एक बातमी छापून आली होती की, एका खाजगी पार्टीमध्ये संजय गांधीनी आपल्या मातोश्री, देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या श्रीमुखात भडकावली होती. स्क्रोलडॉटइन या वेब पोर्टलवर एका मुलाखतीत काही दिवसांपूर्वी त्यांनी या गोष्टीचा पुनरुच्चार केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार ही घटना आणीबाणीपूर्वी काही दिवस अगोदरची असून एका निकटवर्तीय खाजगी जीवनातील जवळच्या माणसाच्या घरी एका पार्टीत घडली होती. त्यात नेमका काय वाद झाला माहिती नाही, पण संजय गांधी यांनी संतापाच्या भरात हे कृत्य केले असे ते म्हणतात. याचे दोन प्रत्यक्षदर्शी सूत्र त्यांच्या संपर्कात असल्याने ही माहिती कळाल्याची पुष्टी त्यांनी जोडली होती. कुलदीप नय्यर यांच्या आणीबाणीवरील' द जजमेंट' या पुस्तकातदेखील हा उल्लेख आहे. 'द इमरजेंसी : अ पर्सनल हिस्ट्री' या पुस्तकात वरिष्ठ पत्रकार कुमी कपूर यांनीही या घटनेला पुष्टी देणारे विधान केलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या घटनेची तेंव्हा वाच्यता देखील झाली होती अन वणव्यासारखी ही बातमी पसरली होती, पण मीडियात असलेल्या अघोषित सेन्सॉरशिप आणि दहशत यामुळे ही बातमी तेंव्हा छापली गेली नाही… आता संजय गांधी हयात नाहीत आणि इंदिराजी देखील हयात नाहीत. या घटनेची सत्यासत्यता तपासणे काळाच्या कसोटीवर व्यक्तीसापेक्ष प्रामाणिकता पाहू घेता कठीण असल्याचे वाटते. सत्य काहीही असो पण संजय गांधींचे जगणे हे वादग्रस्त होते हे मात्र निर्विवाद सत्य आहे…. 

आणीबाणी मागे घेण्यात आल्यावर तीन वर्षांनी संजय गांधी यांचा अपघाती मृत्यू झाला. ही बातमी समजल्यावर भारताच्या सर्वांत शक्तिशाली पंतप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी पार खचून गेल्या होत्या. यापूर्वी कुणीही इंदिरा गांधी यांनी रडताना बघितले नव्हते. २३ जून १९८० रोजी विमान दुर्घटनेत संजय गांधी यांचे निधन झाले. त्यावर अनेक तर्कवितर्क मांडण्यात आले. पण त्यातील कोणताही खरा किंवा खोटा ठरला नाही. संजय गांधी विमान असे चालवायचे, की रस्त्यावर कुणीतरी बेफिकीरीने कार चालवावी.

१९७६ मध्ये संजय गांधी यांना कमी वजनाची विमाने उडविण्याचा परवाना मिळाला होता. आणीबाणीनंतर मोरारजी देसाई यांच्या सरकारने त्यांचा हा परवाना रद्द केला होता. इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्यावर संजय यांना पु्न्हा हा परवाना मिळाला. मे १९८० मध्ये इंदिराजींचे निकटवर्तीय धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी संजय यांच्यासाठी पिट्स एस टूए विमान भारतात आणले होते. या विमानाची जोडणी दिल्लीच्या सफदरजंग विमानतळावर करण्यात आली होती. यासाठी बरीच घाईगडबड करण्यात आली होती. त्यानंतर दिल्लीच्या फ्लाईंग क्लबला हे विमान सोपविण्यात आले होते.

संजय गांधी यांना या विमानाची चाचणी करायची होती. पण सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना याची परवानगी मिळाली नाही.२० जून १९८० रोजी फ्लाईट इन्स्ट्रक्टरने विमानाचे यशस्वी उड्डाण केले. त्यानंतर २१ जून रोजी संजय यांनी पहिल्यांदा हे विमान उडवले. २२ जून रोजी त्यांनी पत्नी मनेका गांधी, आई इंदिरा गांधी, आर. के. धवन आणि धीरेंद्र ब्रह्मचारी यांना घेऊन ४० मिनिटे उड्डाण केले. पण तरीही पुढे जाऊन अघटीत घडलेच.

२३ जून रोजी माधवराव सिंधिया संजय यांच्यासोबत पिट्स विमानात उड्डाण करणार होते. पण संजय यांनी सिंधिया यांना सोबत घेतले नाही. ते दिल्ली फ्लाईंग क्लबचे माजी प्रशिक्षण सुभाष सक्सेना यांच्या घरी गेले. संजय गांधींनी सक्सेना यांना सोबत घेतले. विमानतळावर आल्यावर संजय कार पार्क करायला निघून गेले. सक्सेना एका कर्मचाऱ्यासोबत गप्पा मारीत होते. यावेळी दोघांनी चहा घेतला. तेव्हा एक चपराशी धावत आला. संजय विमानात बसले आहे, असे सांगितले. त्यानंतर सक्सेना धावत विमानाजवळ गेले. ते वैमानिकाच्या शेजारील सीटवर बसले तर संजय गांधीनी विमानाचे नियंत्रण हातात घेतले. सात वाजून ५८ मिनिटांनी दोघांनी विमान टेकऑफ केले. संजय यांनी नियम बाजूला सारुन दिल्लीच्या रहिवासी भागातून तीन लुप घेतले. चौथा लुप लावणार तेवढ्यात सक्सेना यांच्या एका सहायकाने खालून बघितले, की विमानाचे इंजिन बंद झाले आहे. विमान लगेच वळले आणि धाडकन जमिनीवर जाऊन आदळले. कंट्रोल रुमच्या लोकांनी संदेश दिले की, विमान अशोक हॉटेलच्या मागच्या बाजूला जाऊन कोसळले आहे.
सक्सेना यांच्या सहायकाने विमानाला खाली पडताना बघितले होते. जराही वेळ न गमावता तो लगेच सायकल घेऊन घटनास्थळाच्या दिशेने निघाला. तेथे एक खड्डा झाला होता. काळा धूर निघत होता. विमानाला आग लागलेली नव्हती. संजय यांचा मृतदेह विमानापासून चार फुट अंतरावर पडला होता. सक्सेना यांच्या मृतदेहाचा खालचा अर्धा भाग विमानाच्या ढिगाऱ्याखाली खाली होता.

दुसरीकडे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या घरी उत्तर प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री विश्वनाथ प्रताप सिंह भेटीसाठी वाट बघत होते. यावेळी त्यांच्या कानावर बातमी आली, की 'आर. के. धवन कुणाला तरी मोठा अपघात झाल्याचे असेच काहीसे सांगत आहेत.' तितक्यात मोकळ्या केसांच्या अवस्थेतील इंदिरा गांधी घरातून बाहेर आल्या. आर. के. धवन यांच्यासोबत बाहेर उभ्या असलेल्या अॅम्बॅसिडर कारमध्ये बसल्या. त्यांच्या मागे व्ही. पी. सिंह तेथे पोहोचले. ते घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी यावेळी दोन्ही मृतदेह रुग्णालयात नेण्यासाठी अॅम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी घटनास्थळी संजय गांधीच्या हातातील घड्याळसदृश्य वस्तू शोधत होत्या असेही काही ठिकाणी नोंदवले गेलेय. इंदिराजी काय शोधत होत्या हे जगापुढे कधीच आले नाही.

या दरम्यान सर्वांत आधी रुग्णालयात पोहोचलेल्या नेत्यांमध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि चंद्रशेखर यांचा समावेश होता. इंदिरा गांधी यांनी काळा चष्मा घातला होता. रुमालाने जरा जरा वेळाने त्या अश्रू पुसत होत्या. यावेळी इंदिराजींच्या जवळ जाऊन वाजपेयी म्हणाले की, 'इंदिराजी या कठिण प्रसंगी तुम्हाला फार हिमतीने वागावे लागेल.' त्यावर इंदिरा गाधींनी काही उत्तर दिले नाही.

रुग्णालयात छिन्नविच्छीन्न मृतदेहाला जोडण्याचा प्रयत्न डॉक्टर करीत होते. यावेळी इंदिरा गांधी त्याच खोलीत एका कोपऱ्यात उभ्या होत्या. त्यानंतर मनेका गांधी रुग्णालयात आल्या. तेव्हा इंदिरा खोलीतून बाहेर आल्या. त्यांनी मनेका यांची समजूत काढली. त्यांना शेजारच्या खोलीत बसण्यास सांगितले. इंदिरा गांधींनी सुभाष सक्सेना यांच्या पत्नीस आणि आईस दिलासा दिला. संजय गांधींचा मृतदेह जोडण्यासाठी डॉक्टरांना तीन तास मेहनत घ्यावी लागली. जेव्हा काम झाले तेव्हा इंदिरा म्हणाल्या, की मला माझ्या मुलाजवळ एकटे सोडून द्या. डॉक्टरांनी त्यांना एकटे सोडण्यात नकार दिला. तेव्हा इंदिरा चिडल्या. त्यांनी डॉक्टरांना बाहेर काढले. काही मिनिटांनी त्या बाहेर आल्या. मनेका यांच्या जवळ गेल्या. त्यांनी सांगितले, की आता संजय या जगात नाही.

त्यानंतर संजय यांचा मृतदेह इंदिरा गांधी यांच्या शासकीय निवासस्थानी आणण्यात आला. बर्फाच्या लादीवर तो झोपलेल्या अवस्थेत ठेवण्यात आला. संजय गांधी यांच्या मृतदेहाचा एक डोळा आणि डोक्यावर पट्टी बांधलेली होती. नाक चांगलेच दबले गेले होते. दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्काराच्या वेळी इंदिरा गांधी मनेका यांचा हात हातात घेऊन होत्या. २५ जून रोजी अस्थी अकबर रोडवरील लॉनमध्ये ठेवण्यात आल्या. यावेळी इंदिरा गांधी अश्रू रोखू शकल्या नाहीत.

राज थापर यांनी त्यांचे पुस्तक 'ऑल दीज इयर्स' यात लिहिले आहे, की संजय यांच्या मृत्यूचे सर्वांनाच दुःख झाले होते. अवघ्या देशात शोकाकूल वातावरण होते. पण देशाने एक प्रकारचा सुस्काराही सोडला होता. देशाने जे काही अनुभवले होते त्यातून सुटका झाली होती...
इंदिरा गांधी यांचे चुलत बंधू आणि अमेरिकेतील भारताचे राजदूत बी. के. नेहरु यांनी 'नाइस गाइज फिनिश सेकेंड' या पुस्तकात या घटनेचा सविस्तर उल्लेख केला आहे.

आणीबाणीच्या काळात संजय गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर वाटाघाटी करण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, संघाच्या नेत्यांनी संजय गांधी यांचा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळून लावला होता, अशी माहिती अमेरिकेच्या भारतातील दूतावासाने पाठविलेल्या केबल्समधून उघड झालीये. या केबल्स विकिलीक्सने उघड केल्या होत्या .आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी संघ आणि केंद्र सरकार यांच्यातील तणाव टोकाला पोहोचला होता. १४ डिसेंबर १९७६ मध्ये अमेरिकेच्या दूतावासाने पाठविलेल्या एका केबलमध्ये संजय गांधी आपला वाटाघाटींचा प्रस्ताव घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे गेले होते, अशी माहिती ब्रिटनच्या भारतातील उच्चायुक्तांच्या हवाल्याने दिली आहे. मात्र, त्यावेळी संघाने संजय गांधींचा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळला होता.

त्याकाळी भारतामध्ये संघाच्या असलेल्या प्रभावाबद्दल या केबलमध्ये म्हटले आहे की, वेगवेगळ्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अनेकांनी यूथ कॉंग्रेसमध्ये नावनोंदणी केली आहे. यूथ कॉंग्रेसमध्ये ते हेरगिरी करण्यामध्ये गेले होते का, याची माहिती मात्र मिळालेली नाही. आणीबाणीच्या पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातील सत्ताधाऱयांविरोधातील सर्वांत प्रभावी राजकीय संघटना होती. संघटनेच्या गाव आणि शहर पातळीवर अनेक शाखाही होत्या, असेही या केबलमध्ये लिहिले आहे.

आणिबाणीच्या काळात असाधारण महत्व प्राप्त झालेले संजय गांधी यांची तीन वेळा हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता, असा गौप्यस्फोट विकिलीक्सने मागे केला होता. या तीन कटांपैकी एका कटात संजय गांधींना मारण्यासाठी रायफल वापरण्यात आली होती, असेही विकिलीक्सने सांगितले होते. सप्टेंबर १९७६ मध्ये आणिबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मुलगा संजय गांधी यांना मारण्यासाठी सुनियोजित कट रचण्यात आला होता. मात्र तीन ही वेळा हा प्रयत्न यशस्वी झाला नव्हता. तो दिवस आणिबाणीच्या काळातीलच होता, असेही विकिलीक्सने म्हटले होते. इंदिरा गांधींचा मुलगा संजय गांधी यांना ऑगस्ट ३० किंवा ३१ रोजी तीन वेळा मारण्याचा प्रयत्न झाला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे असे विकिलीक्सने म्हटले होते. तसेच या घटनेत संजय गांधी तीनही वेळा सही सलामत सुटले. तसेच या घटनांमध्ये ते गंभीर जखमी वैगरे काहीही झाले नव्हते, असेही यात म्हटले होते. जर संजय गांधी यांना जखमा झाल्या असतील तर त्याचे स्वरुप कसे होते याची माहिती मिळालेली नाही. पण ही माहिती भारतीय गुप्तहेर विभागातील सूत्रांकडून मिळालेली आहे, असेही यात म्हटले होते. भारतीय गुप्तहेर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार संजय गांधी यांच्यावर झालेला हा हल्ला तिसरा हल्ला होता. या कटामागे बाहेरील शक्तींची साथ होती, असेही विकिलीक्सने म्हटले होते.
यूपीमधील ती घटना किंवा अन्य घटनेची पूर्ण माहिती यामध्ये नोंदवण्यात आलेली नव्हती. ती माहिती विकिलीक्सला भारतीय गुप्तहेर विभागातील सूत्र देऊ शकले नाहीत की ते तितक्या योग्यतेचे नव्हते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र इतके स्पष्ट आहे की आणिबाणीच्या काळात संजय गांधी यांनी घेतलेल्या धा़डसी निर्णयांमुळे त्यांचे मोठे शत्रूही तयार झाले होते. आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या धोरणांमुळे १९७७मधील निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आणि जनता पक्ष सत्तेत आला. मात्र या काळात संजय गांधीच्या हत्येचा प्रयत्न झाल्याचा उल्लेख नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

जनता पक्षाला मागे खेचत काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यानंतर संजय गांधी यांचे २३ जून १९८० रोजी हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले. वयाच्या ३३ व्या वर्षीच ते इंदिरा गांधीनंतर पंतप्रधान पदाचे दावेदार मानले जात होते. मात्र त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे राजीव गांधी प्रकाशात आले. तो पर्यंत राजीव गांधी हे इंडियन एअर लाइनमध्ये वैमानिक म्हणून काम पाहात होते. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी हे पंतप्रधान पदावर विराजमान झाले होते.

संजय गांधी हे वडील फिरोज गांधी आणि आई इंदिरा गांधी या दांपत्याचे धाकटे चिरंजीव होते. १९७७ सालच्या भारतात लादलेल्या आणीबाणीच्या काळात त्यांनी जबरदस्तीने गलिच्छ वस्त्या उखडून किंवा जाळून टाकणे यांसारखी कामे हाती घेतली होती, यातही दिल्लीच्या मुस्लीम बहुल तुर्कमान गेट परिसरात त्यांनी बुलडोझर फिरवले होते याचा फार गवगवा झाला होता. इंदिरांजींचे यावरून त्यांच्याशी खटके उडाले होते.संततिनियमन न करणाऱ्या लोकांच्या शस्त्रक्रिया करण्यावर संजय गांधी यांनी जोर दिला होता. त्यामुळे ते जुन्या सनातनी विचारांच्या लोकांमध्ये आणि मूलतत्त्ववादींमध्ये अप्रिय झाले होते. त्याचवेळी कॉंग्रेसचा जनाधार असलेल्या मुस्लीमांमध्ये त्यांच्या विषयी कमालीची नाराजी पसरली होती. संजय गांधी असेच वागत राहिले तर आपला मतांचा जनाधार वेगाने कोसळत जाईल हे इंदिराजींनी नक्कीच ताडले असणार. संजय गांधींच्या बेमुर्वतखोरीचा तोटा कॉंग्रेसला पुढच्या निवडणुकात झाला होता."नसबंदीके तीन दलाल, ईंदिरा- संजय-बन्सीलाल "अशी घोषणाही घुमली हाेती. पण महाराष्ट्रात किंवा पश्चिम दक्षिण भारतात संजय गांधींचा वचक फारसा जाणवला नाही. तुलनेने उत्तर भारतात त्यांनी उच्छाद मांडला होता. यामुळेच की काय उत्तरेत पडझड होऊनही दक्षिणेत काँग्रेसने चांगल्या जागा जिंकल्या होत्या. संजय गांधी भारताच्या सातव्या लोकसभेत अमेठी मतदारसंघातून निवडून गेलेले खासदार होते. स्वत:च चालवत असलेले त्यांचे विमान जमिनीवर कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात संजीय गांधी यांचे निधन झाले होते असे त्यांच्या मृत्यूबद्दल तत्कालीन तपास अहवालात नोंद केले गेले होते ही त्यांची अंतिम सरकारी नोंद ठरली.

एक वादळी आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून भारतीय राजकारणात नोंद घेतली गेलेल्या आणि अकाली मृत्यू झालेल्या या तरुण नेत्याचा आज जन्मदिवस आहे.…
आज संजय गांधी हयात असते तर असा जर-तरचा प्रश्न कधी कधी विचारांचे भयंकर काहूर उगाचच माजवून जातो ….

- समीर गायकवाड.

(टीप - लेखातील माहिती जालावरून संकलित केलेली आहे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा