2008 साली कोलकत्यातल्या रेड-लाईट एरियात गेल्या
वर तिथल्या एका बंगाली गायिकेने फार सुंदर आवाजात 'लग जा गले के फिर ये हंसी रात हो न हो ...' हे गीत ऐकवलं होतं. ऐकता क्षणापासून काही केल्या त्या आवाजाने पिच्छा सोडला नव्हता, त्या मुलीच्या आवाजात प्रचंड वेदना जाणवत होत्या. आठवड्यानंतर तिथून निघण्यापूर्वी पुन्हा एकदा तिला भेटावं म्हणून दरबार एनजीओच्या कार्यकर्त्यासोबत तिच्या बगानवाडीवर गेलो तर वाईट बातमी कानावर आली होती. तिने पंख्याला ओढणी बांधून जीव दिला होता. कुणाच्या आठवणीने ती इतकी शोकाकुल झाली होती हे उमगलेच नाही. तेव्हापासून हे गीत माझ्यासाठी हॉन्टेड सॉन्ग झाले होते. काही काळानंतर राजाजींची माहिती कळली आणि मग हे गाणं आवडत असूनही आपण होऊन ऐकणं बंद केलं. कुठे कानावर पडलं की मग मात्र राहवत नाही. 'लग जा गले...' हे नुसतं प्रेमगीत नसून त्यात दोन जीवांच्या करुण आर्त भावना कैद आहेत! सात फेब्रुवारी 1964 रोजी ‘वो कोन थी’ रिलीज झाला आणि अडीच वर्षांतच एकोणतीस जुलै 1966 रोजी या चित्रपटाचे गीतकार राजा मेहंदी अली खान यांचे निधन झाले. 'वो कौन थी' साठी दिलेलं 'लग जा गले..' हे अप्रतिम गीत दिग्दर्शक राज खोसला यांनी आधी रिजेक्ट केले होते. हे गाणे नाकारल्याचं राजाजींना विलक्षण दुःख झाले, त्यांनी आपल्या भावना संगीतकार मदन मोहन यांच्या कानावर घातल्या. इतकी चांगली अर्थपूर्ण रचना नाकारल्यामुळे मदनजींनाही वाईट वाटले. त्यांनी चित्रपटाचा नायक असलेल्या मनोजकुमारना बोलवून घेतले आणि त्यांच्याकडे निरोप दिला की, राज खोसलांनी पुन्हा एकदा गाणं ऐकावं अशी विनंती केली जावी. दुसऱ्यांदा गाणं ऐकताना राज खोसला दिग्मूढ झाले. गाणं आधी रिजेक्ट केल्याचा त्यांना खेद झाला. सिनेमा सुपरहिट झाला. हॉरर प्लस रोमान्सचा नवा ट्रेंड आला. या चित्रपटातली गाणी हिट झाली असली तरी राजा मेहंदी अली खान मात्र आपल्या दुःखात बुडाले होते. अंतःकरणापासून लिहिलेली गाणी लोक डोक्यावर घेताहेत पण आपल्या मनातल्या भावनांचे काय, हा प्रश्न त्यांना सतावत असावा. कारण, 'लग जा गले...'ची दास्तान अतिव शोकात्मकतेकडे झुकणारी आहे.
आपण एखादं गाणं गुणगुणत असतो. त्यातला अर्थ भावला, ती रचना आवडली, ती धून पसंत पडली तर ते गीत आपल्याला मनापासून आवडतं. ते गाणं कुठेतरी आपल्या काळजाला स्पर्श करत असल्यावर तर बाकीच्या गोष्टींची नोंद अनाठायी ठरते. ही गाणी आपल्या मनात कोरली जातात, त्यांना अढळस्थान असते. असेच फिलिंग 'लग जा गले के फिर ये हंसी रात हो न हो शायद फिर इस जनम में मुलाकात हो न हो..' या अवीट गोडीच्या देखण्या गीताबाबतीत आहे. या गाण्याची पार्श्वभूमी जाणून घेतल्यानंतर आपल्या दृष्टिकोनात नक्की फरक पडतो.
गीतकार राजा मेहंदी अली खान यांची रोमँटिक गीतं हॉन्टेड कॅटेगरीमधली वाटावीत इतकी गूढतेकडे झुकणारी आहेत. फक्त अडोतीस वर्षे जगलेल्या या माणसाने खंडीभर गाणी लिहिली नाहीत, पण जी लिहिली ती अजरामर होतील अशीच लिहिली. यातली काही गाणी वानगी दाखल देता येतील - अगर मुझ से मुहब्बत हैं, आप की नजरोने समझा प्यार के काबिल मुझे, मेरा सुंदर सपना बीत गया, तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा, तेरे बीन सावन कैसे बिता, आप युंही अगर हमसे मिलते रहे, नयना बरसे रिमझिम, आखरी गीत मोहब्बत का, आप के पहलू में आकर रो दिये, तुम बिन जीवन कैसे बिता पुछो मेरे दिल से... ही सगळी गाणी एका जोडप्याच्या संवादाची गाणी आहेत हे आधी खरं वाटणार नाही. पण वास्तव तसेच होते.
ताहिरा हे राजा मेहंदी अली खान यांच्या पत्नीचं नाव. हे दोघंही उच्चशिक्षित घरातले होते. फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये न जाता ते भारतातच राहिले. ताहिरास मुलबाळ झालं नाही, याचं राजासाहबला दुःख नव्हतं. पण ताहिरा यामुळं दुःखी असायच्या. तर राजासाहब याचं जिक्र कधी करत नसत, आपल्या देखण्या बायकोवर त्यांचं अमीट प्रेम होतं, अगदी तिच्या श्वासावर त्यांचा श्वास चाले असं म्हटले तर वावगे ठरणार नाही. ताहिरांनी अपत्यप्राप्तीसाठी उपचार आणि चाचण्या सुरु केल्या, पण त्या दरम्यान एका परिचित डॉक्टरांनी त्यांना सावध केलं की त्यांना कर्करोग असू शकतो. या बातमीनं ताहिरा डगमगल्या नाहीत पण राजा मेहंदी अली खान मात्र पुरते कोसळले. या काळात ते शोकमग्न होते पण ताहिराला तसं त्यांनी कधी दाखवले नाही. मात्र त्यांच्या गीतातून तो दर्द झळकत राहिला. इथे साहीर लुधियानवी आणि अमृता प्रीतम यांच्या प्रेमबंधाचं गीतातलं प्रकटन नकळत आठवतं.
प्राणाहून प्रिय असलेल्या आपल्या पत्नीचा विरह होणार ही कल्पनाच त्यांना सहन झाली नाही. आणि या दरम्यानच ते आजारी पडले. त्यांनी हाय खाल्ली. अवघ्या काही वर्षात त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या काही निकटच्या स्नेह्यांच्या मते त्यांनी इस्पितळातच आत्महत्या केली, पण याला कधीही दुजोरा मिळू शकला नाही. त्यांच्या रचनांपैकी 'लग जा गले कल फिर रात हो ना हो.. ' हे गीत पत्नीचं आजारपण कळल्यानंतर त्यांच्या लेखणीतून पाझरलं होतं! त्यामुळे त्या प्रेमाला शोकमग्नतेची झालर आहे. आश्चर्याची गोष्ट अशी होती की ताहिरांना कोणताच आजार नव्हता, त्या बऱ्याच वर्ष जगल्या. राजासाहबचं आपल्या पत्नीवरचे प्रेम आणि तिने त्यांना दिलेला प्रतिसाद हा त्यांच्या प्रेमगीताचा आत्मा होता.
स्वातंत्र्यपूर्व भारतातील खरेखुरे राजे असलेल्या पित्याच्या पोटी जन्माला आलेल्या राजा मेहंदी अली खानचे वय चार वर्षाचे असतानाच त्यांचे वडील निवर्तले होते. आई आणि मामूने सांभाळ केलेल्या राजासाहबांच्या काव्यात अतिसंवेदनशीलता विधवा आईच्या स्नेहार्द्र प्रेमातून द्रवली होती आणि ताहिराशी संपर्क झाल्यावर तिच्याबद्दलच्या भावनाही त्यातूनच शब्दबद्ध झाल्या. राजासाहेबांचा स्वभाव अधिक हळवा होण्याचं आणखी एक कारण होतं ते म्हणजे बॉलीवूडशी जोडले जाण्याआधी त्यांची भेट साआदत मंटोंशी झाली होती, ज्यांनी त्यांचा परिचय अशोककुमारांशी करवला होता. राजासाहेब मंटोंना कधीच विसरू शकले नाहीत, ज्यामुळे त्यांच्या जीवनविषयक दृष्टीकोनात स्त्रीविषयक हळूवार प्रेम झळकते.
आपली पत्नी आपल्याला सोडून जाणार, न जाणो उद्याची रात्र असेल नसेल आपण आज तिची गळाभेट घेतलीच पाहिजे या नितळ भावना त्यांच्या लेखणीतून साकार होण्याची पार्श्वभूमी ही अशी आहे. 'लग जा गले...' चा इतिहास असा दुःखदायक आहे. लग जा गले ऐकायला आवडतं, पण पाहायला आवडत नाही. पौर्णिमेचा चंद्र ढगाळ वातावरणात झाडांच्या फांद्याआडून डोकावतोय आणि शुभ्र चमकत्या मोत्यांच्या सरी ल्यालेली, काळ्या साडीतली देखणी साधना गूढ सूरांत त्याला साद देतेय. तो खेचल्यागत तिच्या मागे मागे येतोय. सगळा भवताल भारून गेलेला आहे. हातून काहीतरी निसटतंय, काहीतरी चुकतंय असे भाव त्याच्या ठायी आहेत. हा रोमान्स एक लयीतला कधीच वाटत नाही. यात काहीतरी आर्त आहे हे गाणं पाहताना आणि ऐकताना लगेच जाणवतं. हे जे काही टोकरणारं आहे ते राजा मेहंदी अली खानचं अंतर्मन आहे जे आपल्या काळजाचा ठाव घेतं. आपण नकळत त्याच्याशी कानेक्ट होतो. प्रेमाचं हे असंच असतं.
गाण्याची पार्श्वभूमी कळल्यापासून साधना आणि मनोजकुमारच्या जागी रुबाबदार राजाजी आणि देखण्या ताहिरा दिसू लागतात. हे सर्व खरे असले तरी याच चित्रपटातल्या दुसऱ्या एका गीतानं मनाला आणखी एक डंख होतो. तो कमालीचा विस्मयकारक आहे. आपल्या पत्नीच्या विरहकल्पनेने घायळ झालेल्या राजाजींना ताहिरानेही काही तरी सुनावलं असेल नाही का? मग तिने जे सुनवले ते ही त्यांनी शब्दबद्ध केले असेल का याचे उत्तर माझ्याकडेही नाही. पण राहून राहून तसेच वाटते कारण त्या गीताचे बोल असेच पोखरून काढणारे होते. राजाजींनी 'वो कौन थी'च्या त्या गीतात ताहिराजींपासून अश्रू लपवत काळीज ओतून लिहिलं असेल असं मला वाटतं. कारण त्या गीताचे बोल होते, "जो हमने दास्तान अपनी सुनाई आप क्यों रोये?" तुम्हाला काय वाटते, ताहिरांनीच हा प्रश्न राजाजींना केला असेल की नाही?
प्रेम हे असं असतं.. जो ते अनुभवतो तो त्यावरच जगतो आणि त्यावरच मरतो. बॉलीवूडने भारतीय जनमानसाला प्रेमाची भाषा अधिक नेटकेपणाने कळली, त्यातलं मर्म समजण्यास मदत झाली. हिंदी सिनेमात प्रेमकथांची रेलचेल नेहमीच असते मात्र याशिवाय बॉलीवूडच्या तारकाविश्वातही प्रेमाची अगणित कारंजी फुलत असतात. अलिकडच्या काळात माध्यमे वा सोशल मीडिया नेहमीच बॉलीवूडचे नकारात्मक स्वरूप समोर आणताना दिसतात मात्र अशी उत्तुंग उत्कट भव्योदात्त रिअल लाईफ प्रेमकथा लोकांपुढे आणली जात नाही, आपण प्रेमाचे भुकेले आहोत मग आपण तरी यास न्याय दिला पाहिजे. प्रेम वाढले पाहिजे कारण आताच्या काळात तर प्रेम करणं हाच विद्रोह झालाय. बॉलीवूड नेहमी प्रेमरंगात रंगलेले असते म्हणून लव्ह बॉलीवूड! प्रेमाची अनोखी दास्तान आपल्या अंतरंगी बाळगून असलेल्या अशा गीतांनी आपण समृद्ध होत जातो, या सुखाचे मोल कशातच करता येत नाही!
- समीर गायकवाड.
समीरजी, खूप आवडलं. ताहिराजी आणि राजाजी दोघांच्या असीम प्रेमाचं वर्णन लाजवाब केलंय.
उत्तर द्याहटवा