मराठी साहित्यातला 'नाम'महिमा .....

आयुष्यात सर्वप्रथम अक्षरं डोक्यात शिरली ती बाराखडीतून. आज बाराखडी क्रमानुसार कितीजणांना म्हणता येते ते सांगता येणार नाही मात्र त्यातील काही अक्षरांनी केलेली जादू दिगंतापर्यंत टिकून राहणारी असेल हे निश्चित. तर या बाराखडीतील अक्षरे कित्येक लेखक - कवींच्या नावात प्रवेशकर्ती झाली अन त्या अक्षरांची एक जोडीच बनून गेली. मराठी साहित्यातील काही नावं त्यांच्या अद्याक्षरातच इतकी सवयीची होऊन जातात की त्यांच्या उच्चारणात एक गोडी निर्माण होते अन त्या नावाशी आपसूक भावनिक नाते तयार होते. अशी अनेक नावं वानगीदाखल सांगता येतील. ग.दि.माडगुळकर (आपण तर थेट गदिमाच म्हणतो की नै !) , पु.ल.देशपांडे (हे असं इतकं मोठ्ठ नाव घेण्याऐवजी आपल्याला पुलं जास्त जवळचं वाटतं होय ना ?), वि. स.खांडेकर (यांना तर आपण विसं या नावानेच आणखी शॉर्ट केलं आहे) , व.पु.काळे (पूर्ण नावाचा इथं पुन्हा कंटाळा वर भरीस आणखी लघु रूप - फक्त वपु !), गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर (इथंही विंदा असं सहजरूपच जास्त रसिकप्रिय). 
ह.ना.आपटे, बा.सी.मर्ढेकर, ह. मो. मराठे, य. दि.फडके, म.गो.रानडे, भा.रा.तांबे, बा.भ.बोरकर, वि. वा.शिरवाडकर, प्र.के.अत्रे, चि.त्र्यं.
  | 
| बालभारती | 
  | 
| उजळणी  | 
खानोलकर, ना.धों.महानोर, श्री.ना.पेंडसे, श्री.म.माटे, जी.ए.कुलकर्णी (जीएंच्या नावातलं कुलकर्णी उच्चारले नाही तरी नुसत्या जीएवर सहज काम भागते, होय ना ?), फ.मुं.शिंदे (यांच्या नावाचे तर अनुस्वार आपण उडवले अन ते फक्त 'फमु'च झाले) , शं.ना.नवरे ( नुसतं शन्ना हे देखील किती भारी वाटतं ना ?), पु.शि.रेगे,  दि.पु.चित्रे, द.मा.मिरासदार ( फक्त दमामि इतकं म्हटलं तरी कुणाची मिरासदारी आहे हे कळायचं) आ. ह.साळुंखे, गं. बा.सरदार, न.चिं.केळकर, गो.नी. दांडेकर (गोनीदा असं आपण याला आणखी लाघवी केलं आहे), वा.रा.कांत, ना. सी.फडके, य. गो.जोशी, रा.रं.बोराडे, चिं. वि.जोशी, भा.रा.भागवत, वि. सं.वाळिंबे, रा.ग.जाधव, वि. का.राजवाडे, पु.भा.भावे, वि. स.पागे, ग.ल.ठोकळ, ना.सं.इनामदार, पी.सावळाराम, वि.म.कुलकर्णी, रा.ग.जाधव, न.र.फाटक, गो.पु.देशपांडे, गो.ना.दातार, ना. घ.देशपांडे, दि.बा. मोकाशी, गो.म.कुलकर्णी, वि.म.दांडेकर,द.भि.कुलकर्णी, शि.म.परांजपे, शि. द.फडणीस (शब्दांऐवजी रेषातून बोलणारे) , ग.प्र.प्रधान, गो.ब.देवल, व.बा.बोधे, ग.ह.पाटील, म.वा.धोंड, त्र्यं. श्री. शेजवलकर, रा. चिं. ढेरे, प्र.ल. मयेकर आणि शेवटी एकाक्षरी कवी 'बी' (मुरलीधर गुप्ते) ! नेमके या उलट असलेले म.द. हातकणंगलेकर हे श्रेष्ठ विचारवंतच असणार याची ख्याती नामभिधानातून येते !  तर वि.दा.सावरकर नाव उच्चारले तरी आपोआप 'जयोस्तुते' ऐकू येतं !
आ.रा.देशपांडे मात्र अनिल या नावानेच जास्त जवळचे वाटतात. तर शांता ज. शेळके यांच्यातल्या 'ज'शिवाय
  | 
| कुमारभारती   | 
काहीतरी हरवल्यासारखे वाटते. याचा मतितार्थ असा नाही की ज्यांची नावे सरळ सरधोपट होती वा कलाकुसरीची वा प्रज्ञावंत, शोभिवंत होती ते मनात ठाण मांडून नव्हते ! त्यांनाही सर्व रसिकांच्या मनात मानाचे स्थान आहेच ! जसे की नरहर कुरुंदकर, मंगेश पाडगावकर, सुरेश भट, नारायण सुर्वे, रंगनाथ पठारे, इंदिरा संत, नामदेव ढसाळ, दया पवार, जयवंत दळवी, केशव मेश्राम, सरोजिनी बाबर, ज्योती लांजेवार, यशवंत देव, माधव मनोहर, अशोक नायगावकर, मधुसूदन कालेलकर, जगदीश खेबुडकर, रॉय किणीकर, सदानंद रेगे, अनिल अवचट, गंगाधर महांबरे, पद्मा गोळे, वंदना विटणकर, शंकर वैद्य, रमेश मंत्री, इंद्रजीत भालेराव, अनिल कांबळे, इलाही जमादार, प्रवीण बर्दापूरकर, गौरी देशपांडे, अरुणा ढेरे, अनुराधा पोतदार, विभावरी शिरुरकर, प्रभा गणोरकर, सुनिता देशपांडे, स्नेहलता दसनूरकर, दुर्गा भागवत, सुमती क्षेत्रमाडे, वासंती मुजुमदार, हिरा बनसोडे, गोडावरी परुळेकर ही सर्व नावे वाचली तरी मन हरखून जाते अन ऊर मायमराठीच्या अभिमानाने फुलून येतो ! सेतू माधवराव पगडी, शिवाजी सावंत, रणजीत देसाई, संजय सोनवणी,विश्वास पाटील ही नावे जरी घेतली तरी शिवकालात गेल्यासारखं वाटतं ! मारुती चितमपल्ली हे नाव उच्चारलं तरी जंगलाची सैर करून आल्यासारखं वाटतं तर जयंत नारळीकर व निरंजन घाटे म्हटल्याबरोबर विज्ञानकथेत कुठे तरी भेटलेल्या माणसाची आठवण होते. महेश एलकुंचवार कसं 'चिरेबंदी' नाव आहे ना ! बाबुराव बागुल- अर्जुन डांगळे - भुजंग मेश्राम ही नावे एकत्र वाचली तरी विद्रोहाचा बिगुल वाजतो. शंकर पाटील नावासरशी गालावर हसू येतं.
यातही काही नावे अनोखी होती, शरच्चंद्र मुक्तिबोध आणि नंदिनी आत्मसिद्ध ही भारदस्त नावं मला अजूनही
  | 
| युवकभारती  | 
खुणावतात तर साधी सोपी 'बहिणाई' देखील काळजात ठाण मांडून बसते. 'ग्रेस'मधला ग्रेस कधीच संपत नाही. 'सौमित्र' हा तर काव्यमित्र वाटतो. आरती प्रभू म्हणजेच चि.त्र्यं.खानोलकर असतील यावर अजूनही विश्वास बसत नाही. तर विभावरी शिरुरकर आणि मालती बेडेकर ह्या दोघी भिन्न व्यक्ती असाव्यात असंच वाटते. त्याच बरोबर शिरीष पै ही एखादी शोडषाच असावी असंच अजूनही वाटते. नाट्यछटावाले 'दिवाकर' हे कुणी तरी गूढ वयस्क व्यक्तीच असावेत असं भासतं. माधव ज्युलियन या नावाचा कुणी इंडोइटालियन देखणा रोमन असावा असं वाटते. राम गणेश गडकरी हेच 'गोविंदाग्रज' हे पटत नसायचे वर अजून हाच माणूस बाळकराम कसा काय बुवा असा विचार येतो. तर 'कुसुमाग्रज' म्हणजेच वि.वा.शिरवाडकर नसून ते कुणी तरी स्वर्गीय जादुई कवीच असं भासतं ! वसंत आबाजी डहाके या नावाचा माणूस अक्षरेच चित्रलिपीतून जन्मास घालत असणार असं मनात येतं. विजय तेंडुलकर या नावातच रंगभूमीचा अर्थही सामावला असावा असं वाटत राहतं.  भालचंद्र नेमाडे या नावानिशी हेमाडपंती खमकी शैली असणारा माणूस अक्षरबाह्य जगातही भेटतो. बाळ गाडगीळ - गंगाधर गाडगीळ या द्वयीने अन केशवसुत आणि केशवकुमार या दोन दिग्गज नावांनी बालपणात अनेक वेळा गोंधळवलं आता मात्र हेच जीवनाचे आधारविचार वाटतात. तर्कतीर्थ म्हटलं आपोआप लक्ष्मणशास्त्री पुढ उच्चारलं जातंच ! मालिका अमरशेख या नावाचंही असच गारुड तर बाबा भांड नाव जरी घेतलं तरी 'तंट्या'बखेडा सुटल्यासारखं वाटतं.  बाबा कदम, रत्नाकर मतकरी, सुहास शिरवळकर ही नावच रहस्यमय वाटतात.  राजन खान आपल्या नावातूनच प्रश्नचिन्ह लावायला सुरुवात करतात.
  | 
| मुळाक्षरे  | 
बाळकृष्ण कोल्हटकर, वसंत कानेटकर, श्रीपादकृष्ण कोल्हटकर या तीन नावात अनकेदा सारखेपणा वाटायचा. त्याचबरोबर मधु मंगेश कर्णिक हे नावातले तीन शब्द आहेत पण ते एकजीव असल्यासारखेच वाटतात. अण्णा भाऊ साठे, अनंत विठ्ठल कीर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, हरी नारायण आपटे, पांडुरंग सदाशिव साने, उत्तम बंडू तुपे ह्या त्रिदेही नावातील शब्ददेखील अशीच ब्रम्हा विष्णू महेश या धर्तीची एकमेकाशी तादात्म्य पावलेले ! ह्या सर्व नावांत एक अनामिक ओढ आहे आणि मराठीची गोडी आहे…
  | 
| अक्षरधारा   | 
नावात काय आहे असं जरी शेक्सपिअरने म्हटलं असलं तरी ही नावं मला फार आपलीशी वाटतात याचं एक कारण असं असू शकतं की माझ्या जडणघडणीत या सर्वांचा वाटा असला पाहिजे. आधी बाराखडी, मग बालभारती, पुढे कुमारभारती नंतर युवकभारती आणि आता आयुष्याच्या प्रत्येक पायरीवरती या नावांची एक शिडी कामाला येते जी अडीअडचणीतून मार्ग काढते अन आनंदी जीवन जगण्याच्या सुबक अक्षय अक्षरी प्रेरणा देते. ज्याने जीवन सुफळ संपूर्ण होते !
- समीर गायकवाड 
 
 
 
 
          
      
 
  
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा