Monday, May 9, 2016

शहीद भगतसिंह आणि हिंदुत्व - एक विरोधाभास ...

"एखादा देवावर विश्वास ठेवणारा हिंदू आपण पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्मावे अशी अपेक्षा करत असेल,
भगतसिंह 
एखादा मुसलमान किंवा ख्रिस्ती आपल्या हाल-अपेष्टांचे व त्यागाचे बक्षीस म्हणून स्वर्गात भोगायला मिळणार्‍या ऐश्वर्याची स्वप्ने पाहत असेल पण मी कशाची अपेक्षा करावी? मला चांगली कल्पना आहे की ज्याक्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतिम क्षण असेल. मी, किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा याचा तेथेच अंत होईल. बस्स इतकेच.
जर असे मानायचे धैर्य मला असेल तर कोणतेही भव्यदिव्य यश न मिळालेले, एक संघर्षाचे, थोड्याच दिवसांचे जीवन हेच खुद्द माझे बक्षीस आहे. याहून जास्त काही नाही. स्वार्थी हेतू न बाळगता, तसेच इहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता, अगदी निरिच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्राच्या ध्येयासाठी वाहिले, कारण त्याहून वेगळे काही करणे मला जमलेच नसते...."

"या विश्वाची व मानवाची उत्पत्ती कशी झाली याची मी कधी व्याख्या करतो असा तुमचा प्रश्न असेल तर मी त्यावर बोलेन की, चार्ल्स डार्विनने या विषयांवर काही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्याचे वाचन करा, सोहन स्वामींचे 'सहज ध्यान' वाचा. तुमच्या या प्रश्नाचे काही प्रमाणात का होईना उत्तर मिळून जाईल. विश्व सृष्टी निर्माण ही एक नैसर्गिक घटना आहे. विविध पदार्थांच्या वायुगोलांच्या आकारात अकस्मात होऊ घातलेल्या संयुगांतून पृथ्वी तयार झाली. केंव्हा तयार झाली याचाही इतिहास बघावा लागेल, अशाच प्रकारे वैज्ञानिक प्रक्रियांतून जीव जंतू तयार झाले अन एका प्रदीर्घ जीवनसाखळी नंतर मानव निर्मितीपर्यंतचा टप्पा आला. डार्विनचे जीव निर्माण तुम्ही वाचा आणि मग तुमच्या लक्षात येईल की, "त्या नंतरचा मनुष्याचा सारा विकास मानवी पिढ्यांनी निसर्गप्रकृती सोबत केलेल्या संघर्षातून त्यावर विजय मिळवून झाला आहे. या घटनेची हीच संक्षिप्त व्याख्या असू शकते !"

"समाजाला या ईश्वरीय श्रद्धांच्या विरुद्ध अशा पद्धतीने लढायला पाहिजे जसे की मूर्तीपूजा आणि क्षुद्र धर्मविचार यांच्या विरुद्ध लढा लढला गेला होता. अशा प्रकारे मनुष्य जेंव्हा आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करून वास्तववादी बनेल तेंव्हा त्याने ह्या दैवी श्रद्धांचे जोखड टाकून दिले पाहिजे ! आपल्यावर येणारया सर्व संकटांच्याविरुद्ध आणि कठीण काळाचा सामना करण्यासाठी मर्दासारखे लढले पाहिजे. माझी स्थिती आज तशीच आहे. माझ्या मित्रांनो माझी विचार करण्याची हीच पद्धत आहे, जिने मला नास्तिक बनवले आहे. ईश्वरावर विश्वास ठेवून आणि रोज नित्य नेमाने त्याची प्रार्थना केल्याने मनुष्य अधिक स्वार्थी होतो की त्याचा स्तर खालावत जातो हे मला माहिती नाही मात्र असं करणे मला सहायक ठरेल की माझे खच्चीकरण करेल हेसुद्धा मला ठाऊक नाही. मात्र मी अशा नास्तिकांच्याबद्दल वाचले आहे ज्यांनी आपल्या सर्व संकटांचा बहादुरीने सामना केला होता म्हणूनच अंततः मीसुद्धा फाशीच्या शेवटच्या क्षणापर्यंत एका मर्दाप्रमाणे माझे मस्तक अभिमानाने ताठ ठेवू इच्छितो !!"

"आणि हिंदूंनो तुम्ही म्हणता की आज जे लोक दुःखी कष्टी आहेत ते त्यांच्या गतजन्माचे पाप आहे ! ठीक आहे, तुम्ही म्हणता की आजचे शोषक मागच्या जन्मी साधू पुरुष होते आणि अंततः ते सत्तेचा आनंद घेताहेत. मला हे मानणे भाग पडतेय की, 'माझे पूर्वज खूपच चतुर होते. त्यांनी असे सिद्धांत मांडले की जे तर्क आणि अविश्वास यांच्यावर आधारित सर्व प्रयत्नांना असफल करण्याची क्षमता बाळगून होते. पण आपल्याला याचे विश्लेषण केले पाहिजे की ही थोतांडे कुठवर टिकतील ?"

"त्या दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी नियमितपणे दोन वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. मी तर नास्तिक होतो. फक्त शांततेच्या व आनंदाच्या काळातच मी नास्तिक असल्याची बढाई मारू शकतो, की अशा कठीण प्रसंगीदेखील मी माझ्या तत्त्वांना चिकटून राहू शकतो, याची माझ्यापुरती तरी मला कसोटी घ्यावयाची होती. बर्‍याच विचारान्ती मी निर्णय घेतला की देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे माझ्याकडून होणार नाही. नाही, ते कधीही शक्य नाही. ती खरी कसोटीची वेळ होती आणि त्यातून मी यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन बाहेर पडलो. इतर काही गोष्टींच्या बदल्यात स्वतःची मान वाचवण्याची इच्छा मी कोणच्याच क्षणी केली नाही. म्हणजे मी कट्टर नास्तिक होतो आणि आजपर्यंत नास्तिकच राहिलो आहे. त्या कसोटीला उतरणे ही साधी गोष्ट नव्हती.

'श्रद्धा' संकटांची व कष्टांची तीव्रता कमी करते, किंबहूना या गोष्टी ती सुखावहसुद्धा करू शकते. देवावरच्या
भगतसिंहांचे लेख 
विश्वासात माणसाला सांत्वन व बळकट राहावे लागते. वादळ आणि तुफानांमध्ये फक्त स्वतःच्या पायावरच उभे राहणे हा काही पोरखेळ नाही. अशा कसोटीच्या क्षणी गर्व, जर असलाच तर पार वितळून जातो. माणूस इतर सर्वसाधारण माणसांच्या श्रद्धांना बेदरकारपणे धुत्कारू शकत नाही, आणि त्याने जर असे केलेच तर आपण असाच निष्कर्ष काढला पाहिजे की त्याच्याकडे केवळ पोकळ ऐट नव्हे तर याहून दुसरी अशी काही शक्ती असली पाहिजे. सध्या माझी स्थिती ही नेमकी अशीच आहे. न्यायालयाचा निकाल हा आधीपासूनच ठरलेला आहे. आठवड्याभरात जाहीर व्हायचा आहे. मी माझ्या ध्येयासाठी प्राणाचा त्याग करत आहे याखेरीज दुसरे कोणते सांत्वन माझ्याकरता असू शकते ?...."

(लाहोर मधून प्रकाशित होणारया 'द पीपल' या वर्तमानपत्रातून २७ सप्टेंबर १९३१ रोजी 'मै नास्तिक क्युं हुं ?' हा शहीद भगतसिंहांनी लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला होता. त्यातील हे अंश आहेत. या लेखात भगतसिंहांनी देवत्व आणि सामाजिक परिस्थिती यावर टोकदार भाष्य केले आहे. जे अनेकांच्या पचनी आज पडणार नाही...असो )

आज शहीद भगतसिंह असते आणि त्यांनी आजच्या काळात हे विचार मांडले असते तर धार्मिक कट्टरतावादयांनी, सनातन्यांनी त्यांना धर्मद्रोही देशद्रोही म्हणायला कमी केले नसते ! त्याच बरोबर आज भगतसिंह असते तर त्यांनी 'जयतु हिंदूराष्ट्रम'चे नारे लावणारया लोकांशी ते कसे वागले असते हा विचार नक्कीच चिंतनीय ठरेल.

देशासाठी आपलं आयुष्य उधळून लावणाऱ्या शहिदांना त्रिवार अभिवादन .....

- समीर गायकवाड.