Thursday, May 26, 2016

आठवणीतले विलासराव...


आठवणीतले विलासराव ...
विलासरावांच्या ६०व्या वाढदिवशी ज्येष्ठ पत्रकार श्री.मधुकर भावे यांचे 'राजहंस' हे पुस्तक मुद्रा प्रकाशनने प्रसिद्ध केले होते. त्याचे प्रकाशन त्यावेळचे राज्यपाल रा.सु. गवई यांच्या हस्ते झाले. या पुस्तकाची कल्पना भावेंनी विलासरावांना दिली. त्यावर विलासराव त्यांना फोनवर म्हणाले की, " तुम्हाला त्यात ज्या कोणत्या मान्यवरांचे फोटो द्यायचे असतील ते द्या; पण दोन फोटो द्यायला विसरू नका, एक वसंतदादा पाटील यांचा आणि दुसरा माधवराव शिंदे यांचा. पुढे राजहंसचे थाटात प्रकाशन झाले. त्या पुस्तकाची प्रत भावेंनी विलासरावांना दिली. वसंतदादा आणि माधवरावांचे फोटो पाहून ते काहीसे हळवे झाले. कारण तेंव्हा हे दोन्ही नेते जगात नव्हते आणि विलासराव म्हणाले, "तुम्हाला हे दोन फोटो टाकायला सांगितले त्याचे कारण म्हणजे मला वसंतदादांनी राज्यमंत्री करून गृहखाते दिले आणि कॅबिनेट मंत्र्याला देतात त्याप्रमाणे मी राज्यमंत्री असताना मला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री केले."

हळवे झालेले विलासराव मनमोकळेपणे आणखी बोलले, "वसंत दादांच्या मनाचा मोठेपणा फार आहे. दादा मुख्यमंत्री असताना गृहखात्याचा एक प्रश्न दत्ता पाटील यांनी अडवून धरला. त्या प्रश्नाला मला उत्तर द्यायला सांगण्यात आले होते. मी तयारी करून गेलो होतो. पण विधान परिषदेत अडकलो. दादांचा निरोप आला, 'लगेच विधानसभेत लगेच या.' मी घाईघाईने सभागृहात गेलो. तेव्हा दत्ता पाटील तावातावाने बोलत होते. आणि दादा उभे राहून सांगत होते. मी या विषयाचा अभ्यास करून आलेलो नाही. विलासरावांना ते काम दिले आहे. तेवढयात मी सभागृहात आलो. त्यावेळी दादा चालण्याकरिता काठी वापरत होते आणि सभागृहात काठी आणायला त्यांना परवानगी होती. मी सभागृहात आल्याचे बघताच दादांनी दत्ता पाटलांसमोर काठी धरली आणि म्हणाले, 'दत्ता, आता काय विचारायचं आहे ते विचार..दादांची ही आठवण सांगताना विलासराव भावुक झाले होते आणि म्हणूनच दादांचा फोटो टाकायला मी तुम्हाला सांगितले."

माधवरावांच्या बाबतीत मी नेहमीच कृतज्ञ आहे.अक्षरश: आवंढा गिळून विलासराव म्हणाले, ‘१९९९ साली मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत तीन-चार नेते होते. मी माधवरावांकडे दिल्लीला बसलो होतो. माधवराव शांतपणे मला म्हणाले, ‘मी तुम्हाला सोनियाजींकडे घेऊन जाईन आणि सर्वकाही ठीक होईल.एक तासाभरात सोनियाजींची वेळ घेऊन माधवराव मला सोनियाजींकडे घेऊन गेले आणि कसलीही चर्चा न करता माझ्यासमोर सोनियाजींना म्हणाले, ‘विलासरावजी को ही बनाना है..’ ‘मी प्रथम मुख्यमंत्री झालो तो माधवरावांमुळे आणि म्हणून त्यांचा फोटो टाका हे मी तुम्हाला आठवणीने सांगितले.

आपल्या उपकारकर्त्यांचे ऋण व्यक्त करण्याची परिपक्वता आणि संस्कार सध्याच्या राजकारणात अपवादानेच दिसून येतात, गतकाळातील राजकीय सभ्यता आणि मर्यादा यांचा ऱ्हास का होतो आहे हा खरे तर राजकीय नेत्यांच्या आत्मपरीक्षणाचा विषय आहे, त्याचबरोबरीने खाऊगिरीने सोकलेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या लवचिक विकाऊ निष्ठेची ही विषारी फळे आहेत का याचेही एकदा सिंहावलोकन व्हायला पाहिजे....असो..

गोपीनाथजी मुंडे व विलासरावांची मैत्री सर्वश्रुतच होती. विलासरावांच्या निधनानंतर आपल्या पहिल्यावहिल्या आमदारकीच्या तसेच त्या दोघांमधील मैत्रीच्या अनेक आठवणी जागवताना गोपीनाथ मुंडें म्हणाले होते की, "कॉलेजच्या काळापासून सुरू झालेली मैत्री त्यांच्या निधनापर्यंत कायम होती. कॅन्सरचे दुखणे स्वत:जवळ ठेवत ते कायम हसतमुखच राहिले. रडणे नव्हे, तर लढणे हा त्यांचा स्वभाव होता.... खासदार म्हणून दिल्लीत गेल्यानंतर संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आम्ही किमान दोन तास गप्पा मारायचो. विलासराव गेल्यानंतर मी त्या हॉलकडे फिरकलेलो नाही. कारण त्यांची आठवण त्रास देते... " या उमद्या नेत्यांमधील मैत्री म्हणजे आपसात राजकीय विरोध असूनही जिवलगांचा दोस्ताना होता..  

विधानसभेत आपण विरोधीपक्षनेते असताना विलासराव कसे भावले, याची आठवण सांगताना नारायण राणे म्हणाले होते की, "१९९९  मध्ये विलासराव मुख्यमंत्री तर आपण विरोधीपक्षनेते होतो. आम्ही त्यावेळी विलासरावांवर प्रखर टीका केली. तर माझ्या हल्ल्याने ते कधीही विचलित झाले नव्हते. उलट सभागृह संपल्यानंतर ते मला फोन करून विचारापूस करायचे. विलासराव टीका विसरून माझ्या दालनात मासे खाण्यासाठी आले होते. मुख्यमंत्र्यांनी विरोधीपक्ष नेत्याच्या दालनात जाणे हीच खरी लोकशाही असल्याचे विलासरावांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. २००५ मध्ये मी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी मोठे मन दाखवून माझ्या गौरवाचा प्रस्ताव विधानसभेत मांडला. हा प्रस्ताव मांडताना विलासरावांनी उद्गार काढले, ते माझ्या आयुष्यातील भांडवल आहे. मनाचा मोठेपणा दाखविणारे विलासराव अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते.."

एक वेगळी आठवण अशीही आहे. सरकारतर्फे दरवर्षी उत्तम ग्रंथांना पुरस्कार दिले जातात.  मंत्री रामकृष्ण मोरे यांना हा कार्यक्रम दरवर्षी साहित्यप्रेमी नेते आणि राज्याचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी २५ नोव्हेंबरला घेण्याची  हरी नरके सरांनी सुचना केली. ती त्यांना आवडली. ते त्यांना घेवुन लगेच मुख्यमंत्री विलासरावांकडे गेले. त्यांनी विलासरावांपुढे  हा दिवस "संस्कृती दिन" म्हणुन साजरा करण्याची कल्पना मांडली. त्यांना ती इतकी आवडली की ते म्हणाले 'आत्ताच्या आत्ता एंटीचेंबर्मध्ये बसुन प्रस्ताव तयार करा, उद्याच्या केबिनेटमध्ये मंजुर करुन घेवु.' हा प्रस्ताव त्यांनी मंजुर करुन घेतला. पहिल्या पुरस्कार वितरण आणि साहित्यसंमेलनाच्या या कार्यक्रमाला ते स्वतः क-हाडला गेले होते.

विलासरावांचे व्यक्तीमत्त्वही त्यांच्या स्वभावाप्रमाणेच अत्यंत प्रसन्न होते. डोळे मोठे करुन टाळी देत विनोदाला दाद देणे ही त्यांची खास स्टाईल होती. त्यांचा स्वभाव जसा मिश्किल तसाच गंभीरही होता. गंभीर प्रश्‍नावर बोलताना ते कधीही विनोद करायचे नाहीत. मात्र, वातावरण गंभीर होत असेल तर ते कसे अलगद हलके करायचे हे विलासरावांना प्रभावीपणे जमायचे. एखाद्या विषयावर पोकळ बडबड करणे किंवा गोल गोल विधाने करणे हे विलासरावांना कधीच जमले नाही.

विलासरावांचा हिंदी आणि उर्दू भाषेवरही हातखंडा होता. उर्दू आणि हिंदीवर पगडा असणारी मराठी माणसे थोडीच. पण विलासरावांचे या दोन्ही भाषेवरही कमालीचे प्रभुत्व होते. एका माजी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचेही अशाच प्रकारे उर्दूवर प्रभुत्व होते. त्यावेळी एका सभेत या मंत्र्यासमोर विलासरावांनीही उर्दूत व्याख्यान करत ती सभा गाजवली होती. उर्दूतील अनेक काव्यरचना आणि साहित्याचा अभ्यासही त्यांच्या बोलण्यातून जाणवत असे. अर्थात त्यांनी आपले हे ज्ञान उगीचच केव्हाही दाखवले नाही. पण गरज पडेल तेव्हा ते याचा अत्यंत खुबीने वापर करत असत.

सकारात्मक आणि आशावादी दृष्टीकोन ही विलासरावांची जमेची बाजू होती. त्यांच्याकडे जाणारा कधीच निराश होऊन परतला नाही. याचेच फलित म्हणून सर्वसामान्यांनी त्यांना बाभूळगावच्या सरपंचापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत अन केंद्रीय मंत्र्यापर्यंत नेऊन पोहोचवले. विलासरावांचा आधुनिक आणि शैक्षणिक क्षेत्राबाबतचा व्यापक दृष्टीकोन त्यांच्या बोलण्यातूनही जाणवत असे. शिक्षण ही काळाची गरज असल्याचे ते वारंवार बोलत असत. त्यांनी स्वत: पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून बीए आणि बीएससी पदवी प्राप्त केली. शिवाय, आयएलएस लॉ कॉलेजमधूनही एलएलबीची पदवी मिळवली. शिवाय मराठवाड्यासह मुंबईतही काही महाविद्यालये सुरू करून आपला शैक्षणिक दृष्टीकोन समाजासमोर मांडला होता.

आज विलासराव देशमुखांचा जन्मदिवस आहे त्या निमित्ताने जुन्या आठवणींना दिलेला हा छोटासा उजाळा ...

- समीर गायकवाड.


No comments:

Post a Comment